Tuesday 14 January 2014

५. विद्यापीठ विस्ताराची तात्विक बैठक

                                          विद्यापीठ विस्तार योजनेची तात्त्विक बैठक


                                  विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ विस्तार योजनेस Thaird Dimension म्हणून मान्यता दिलेली आहे.आणि त्याबद्दलची मार्गदर्शक तत्वे सर्व विद्यापिठाना पाठविलेली आहेत.विद्यापीठ विस्तार हा आता विद्यापीठाच्या कार्याचा भाग बनला आहे.विद्यापीठांनी हे आवश्यक कार्य मानले असले तरी विचारवंत,प्राध्यापक,या योजनेतील अभ्यासक्रम राबविणारे,शिकविणारे शिकणारे या सर्वांच्या मनात याबद्दल अत्यंत धूसर कल्पना आहेत.अर्थात सुरुवातीच्या काळात अशी धूसरता असणे अपरिहार्यही असते.ही संदिग्धता कमी करून याबाबत जास्तीतजास्त स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे वाटते.
                           तात्विक बैठक  --     इतिहासातील वेगवेगळे कालखंड पाहिल्यास मुठभर विचारवंत आणि बहुजनसमाज असे स्तर दिसतात.गोपाळ गणेश आगरकरांनी विचार करणारे उपभोग घेणारे आणि काम करणारे अशा तीन स्तरात त्यांची वर्गवारी केली.आहे.यातील विचार करणार्या वर्गात आणि इतर दोन वर्गात उघड उघड फार मोठी दरी निर्माण होणे हे धोक्याचे असते,अल्पसंख्यांक विचारवंतानी बहुजनसमाजाला बरोबर घेऊन जाण्याची धडपड करणे गरजेचे असते.असे झाले तरच संस्कृतीचा विकास होतो.या वैचारिक बैठकीवरच विद्यापीठ विस्ताराचा डोलारा उभा आहे.परंतु काहीवेळा तत्वज्ञान बाजूला राहून आंधळेपणाने कर्मकांडाच केवळ शिल्लक राहते.या दृष्टिकोनातून विद्यापीठ विस्तार योजनेबाबत काय परिस्थिती आहे याचा वैचारिक शोध घेणे आवश्यक आहे.
                         विद्यापीठ म्हणजे काय? -- विद्यापीठ म्हणजे उच्च शिक्षणाचे केंद्र .भारतात नालंदा,तक्षशिला,इ.प्राचीन विद्यापीठे प्रसिद्धी पावलेली होती.चीनी प्रवासी ह्युएनत्सन्ग यांनी लिहिल्याप्रमाणे कोरिया,मंगोलिया,जपान,चीन,तिबेट इ.देशातून येथे विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी येत.असे १०००० स्कॉलर्स
असल्याचे नमूद केले आहे.चार वेद,तत्वज्ञान,व्याकरण,खगोलशास्त्र,शेती इ.विषय शिकविले जात.६४ कलाही शिकवल्या जात.भरभराटीला आलेली ही विद्यापीठीय परंपरा मद्ययुगात लोप पावली.ज्ञानाची वाढ खुंटली.मर्यादित अर्थाने उच्च शिक्षण चालू राहिले.
                          आजची विद्यापीठे ही ब्रिटीश राजवट चालू झाल्यावर इंग्लंडच्या धर्तीवर स्थापिली गेली.मद्रास, कलकत्ता,मुंबई येथील विद्यापीठांची स्थापना सुरुवातीला झाली त्यामागोमाग इतर विद्यापीठांची स्थापना झाली.आज अनेक विद्यापीठे अस्तित्वात आहेत. संशोधन,अध्यापन ही प्रामुख्याने विद्यापीठाची कामे होती.आजपर्यंत तिचा परंपरा चालू आहे.स्वातंत्र्यापूर्व काळात टिळक विद्यापीठ, काशी विद्यावीठ,गुजरात विद्यापीठ, जामियामिलीया विद्यापीठ अशी विद्यापीठे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी निर्माण झाली.त्यांची भूमिका मात्र यापेक्षा थोडी वेगळी होती.विद्यापीठ विस्तार कार्याच्या आजच्या भूमिकेशी ती जवळचीही होती.
                        विद्यापीठ विस्तार -- विद्यापीठ विस्तार या कल्पनेत अध्यापन व संशोधन ही विद्यापीठाची पारंपारिक भूमिका बजावताना विद्यापीठ  क्षेत्राबाहेरील समाजालाही शिक्षण देणार्‍या उपक्रमांचे आयोजन करणे हा विचार आहे.विद्यापीठावर होणारा प्रचंड खर्च म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे.समाजाला शिक्षित करण्याच्या कार्यात हातभार लाऊन थोडीशी परतफेड करणे हा विचारही या मागे आहे.तसेच विद्यापीठीय संशोधन समाजाभिमुख व्हावयचे तर विद्यापीठाने चार भिंतीच्या बाहेर समाजात मिसळणे हेही गरजेचे आहे.
                       विद्यापीठ विस्ताराची वरील भूमिका जगातील सर्व देशात सारखी असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नामाभिदान केले गेले आहे.उदा. ब्रिटनमध्ये एक्स्टेनशान सर्व्हिस,आस्ट्रेलीयात Adult Eduction,हाँकाँगमध्ये एक्स्ट्राम्युरल स्टडी इ.भारतातील विविध विद्यापीठात निरंतर शिक्षण,प्रौढ शिक्षण पत्रद्वारा अभ्यासक्रम,एन.एस.एस.,इ.एम.आर.सी.,कंट्रीवाईड क्लासरूम,बही:शाल व्याख्यानमाला इ. अनेक उपक्रमांचा विद्यापीठ विस्तार योजनेत समावेश होतो.कारण संशोधन अद्यापन या नेहमीच्या कार्यकक्षा सोडून विद्यापीठाच्या चार भिंतीच्या बाहेर पडण्याची प्रक्रिया याद्वारे होते.विकसित देशांनी तसेच अनेक विकसनशील देशांनीही विद्यापीठ विस्तार या कल्पनेचा स्वीकार केला आहे.भारतातही आज विद्यापीठ अनुदान आयोगाने या कल्पनेचा स्वीकार केला आहे.पाश्च्यात्यांच्या अनेक कल्पनांच्या उसनवारीप्रमाणे ही उसनवारी करतानाही भारतीय पातळीवर काही मुलभूत गोष्टी नजरेआड होण्याची शक्यता वाटते.जबाबदारी, गरज आणि कर्तव्य या भूमिकेतून तेथे या कल्पनेचा स्वीकार झाला.भारतीय पातळीवर गरज या गोष्टीचा विचार केल्यास पुढील गोष्टी लक्षात येतात.आज समाजाचे छोट्या समाजाकडून गुंतागुंतीची समाजरचना असलेल्या समाजात परिवर्तन झाले आहे.हा समाज सतत बदलत आहे.ज्ञान, तंत्रज्ञान,मुल्ये,विचारपद्धती यात फार झपाट्याने बदल होत आहे.व्यक्तीना आधुनिक जीवनपद्धतीशी  समायोजन करण्यासाठी नवीन ज्ञान आवश्यक आहे.समाजाची ही गरज पूर्ण करण्यासाठी इतर साधनाबरोबर विद्यापीठेही पुढे आली.भारतातील समाज आणि तेथील समाज यात फरक आहे.विकसित देशात समाजात गरज निर्माण झाली आणि समाज आपणहून पुढे आला. भारतात मात्र अजूनही साक्षरतेचे लक्षही पूर्णपणे गाठले गेले नाही,तर सतत शिकत राहण्याची गरज वाटणे ही कल्पना फार दूरची.त्यामुळे येथील समाजात ही गरज पसरवायाची तर प्रबोधन होणे आवश्यक आहे.विद्यापीठ विस्तारामागची नेमकी भूमिका समजल्याशिवाय हे होणे अशक्य .
                             भारतीय पातळीवर विद्यापीठ विस्ताराची कल्पना निटशी सर्व थरात झिरपत न गेल्याने काही व्यावसायिक अभ्यासक्रम,प्रौढ साक्षरता वर्ग वंचीताना शिक्षण देणे असे काही उपक्रम म्हणजे विद्यापिठ विस्तार अशी कल्पना रूढ होत असलेली दिसते.आज विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापिठांना विस्तार  योजना आवश्यक केली आहे.यामागची भूमिका समजल्याशिवाय अंमलबजावणी झाल्यास येणारे अपयश हे मोठे असते.हे महात्मा गांधीजिच्या मुलभूत शिक्षणासारख्या योजनांच्या अपयशाने दाखवून दिले आहे.म्हणूनच मुळ भूमिका व व्यवहारातील अंमलबजावणी यांची सांगड घालणे व घातली जाते का नाही हे वेळोवेळी पाहणे गरजेचे आहे.
                          समाजाची सतत शिक्षणाची गरज पुरविण्यासाठी जेथे गरज निर्माण झाली तेथे अशैक्षणीक संस्था पुढे आल्याच होत्या.उदा. बँकां,सहकारी संस्था,कामगार संघाटनातून होणारे शिक्षण काही  वैयक्तिक प्रयत्न,दासबोधावरील पत्रद्वारा अभ्यासक्रम इ.असे असता विद्यापिठानीच याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता का वाटते? तर पुढील कारणासाठी.
                         निरंतर शिक्षणासाठी विद्यापीठेच का? 
                          विद्यापीठात अनेक बुद्धिवंत,शास्त्रज्ञ,विचारवंत कार्यरत असतात.विद्यार्थ्यांची फार मोठी कार्यशक्ती विद्यापीठामागे असते,ज्ञानाचा अखंड झरा,सृजाणशील प्रवाह विद्यापीठात वाहात असतो.याशिवाय इतर मार्गाने शिक्षण घेण्यात अशास्त्रीय पद्धतीने ज्ञान पसरण्याचा धोका असतो.विद्यापीठांनी याबाबत नेतृत्व केल्यास हा धोका टळू शकतो. असे अशैक्षणिक संस्थाचे प्रयत्न हे विविध ठिकाणी पसरलेले असतात.त्यांच्यात समन्वय साधण्याचे कामही विद्यापीठ करु शकते.हे सर्व झाले विद्यापीठाने समाजाची गरज भागवण्याबद्दल.विद्यापिठानी हे काम केल्याने विद्द्यापिठेही समृद्ध होतात.ही दुसरी बाजूही तेवढीच महत्वाची आहे.
                         विद्यापीठातील संशोधकाला उपयोजित विज्ञानाच्या बाबतीत समाजातील व्यावहारिक ठोकताळ्यांचा  गृहीतकासाठी उपयोग होऊ शकतो.ज्ञानाला पुढे नेण्यासाठी विद्यापीठातील उच्चशिक्षित आणि समाज यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे.मुलभूत विज्ञानाच्या उपयोजनेतून पुन:पुन:मुलभूत विज्ञान पुढे जाऊ शकेल.समाज व विद्यापीठे यात फार मोठी दरी पडली तर मध्यायुगासारखी स्थिती निर्माण होते.हे समाजाला समजू शकणार नाही.पण विद्यापीठातील विचारवंताना मात्र समजू  शकते.म्हणून विद्यापीठानी यासाठी पुढाकार घेणे  हे गरजेचे आहे.आणि विद्यापीठांच्या हिताचेही आहे.वरवर पाहता ही विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी वाटली तरी विद्यापीठाचे हित आणि समाजहित यांची ही सांगड आहे.विद्यापीठाचा मुळ पाया समाज समृद्ध झाला तरच विद्यापीठे समृद्ध होऊ शकतील.विद्यापीठामार्फत होणारी ही समाजसेवा(Social Service) नाही तर ज्ञान सेवा(Knowledge Service) आहे.
                          विद्यापीठ विस्तार म्हणजेच उच्च शिक्षण तळागाळापर्यंत पोचणे ही समाजाची नित्याचीच गरज आहे.तर विद्यापीठ विस्तार ही कल्पना आजच का निर्माण झाली.वरवर पाहता हे खरे असले तरी उच्च शिक्षण तळागाळापर्यंत पोचणे ही प्रक्रिया पूर्वीही होत होती.उदा. जैन व बौद्ध विद्यापीठामार्फत   झालेला तत्वज्ञानाचा प्रचार ,ज्ञानेश्वर,रामदास,कबीर इ.संतांचे कार्य,गोपाळ गणेश आगरकरांनी तरुण सुशिक्षितास केलेली विज्ञापनेतही हीच वैचारिक भूमिका दिसते.विद्यापीठ अनुदान आयोगाने हा विचार स्वीकारण्यापुर्वीही राजस्थान विद्यापीठ,बडोदा विद्यापीठ,एस,एन,डी.टी.महिला विद्यापीठ,टिळक विद्यापीठ इ.विद्यापीठे वेगवेगळ्या योजनांद्वारेसमाजाशी समन्वय साधून होती,विद्यापीठ विस्ताराचे काम करीत होती.
                        विद्यापीठ अनुदान आयोगाने मदतीचा हात पुढे केल्यावर आज अनेक विद्यापीठे पुढे येत आहेत.विद्यापीठ विस्तार विभागांची स्थापना झाली आहे.या विभागांची,सामाज व विद्यापीठातील विविध विभाग यात समन्वय घालण्याची भूमिका हवी.कॅटेलीस्टीक रोल हवा. पण आज तो दिसत नाही.विद्यापीठातील तज्ञांचे काम पूर्वीप्रमाणेच एका बाजूला आणि विस्तार विभागाचे समाजासाठी विविध उपक्रम योजण्याचे काम एका बाजूला.अशी परिस्थितीच अधिक  दिसते.अनुदान मिळते म्हणून काही उपक्राम राबविणे यातून मूळ गाभा हरविला जाण्याची दाट शक्यता वाटते.'मोले घातले रडाया' अशीच परिस्थिती राहील.तसेच नुसती सोय केल्याने कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत.तर त्यामागे आच निर्माण होणे हे गरजेचे आहे.यातूनच समाज परिवर्तनाचा वेग वाढणार आहे.विद्यापीठाने याबाबत पुढाकार घेतला तर ते विद्यापीठ व समाजविकास या दोघानाही पुढे नेणारे ठरेल याबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुढील विचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील.
                        "पृथ्वीवरच्या वातावरणात,वर उंच गेले म्हणजे श्वासोश्वास करणे जडजड होत जाऊन जीव गुदमरतो,बेशुद्धी येते.तशाच प्रकारच्या उंच पातळीवरच्या मानसिक वातावरणात वावरणार्‍या  उपनिषदकारांचे विचार,त्या उच्च वातावरणात वावरताना बुद्धीची शुद्ध कायम ठेवू शकणार्‍या काही निवडक लोकांच्या आवाक्यातले होते.नवे विचार,नव्या कल्पना,नवे विचार निर्माण करणारे नेहमी अगदी थोडेच असतात.परंतु बहुजन समाजाशी त्यांची एकतानता झालेली असेल, बहुजन समाजाला वरती नेण्यासाठी त्यांची जर धडपड चालू असेल,दोघांमधील अंतर कमी व्हावे म्हणून त्यांचे प्रयत्न चालू असतील तर एक स्थिर व अखंड प्रगतीशील संस्कृती निर्माण होते.असे नवनिर्मिती करणारे लोक थोडेसुद्धा समाजात नसतील तर तो समाज मरण पंथाला लागतो.व या संस्कृतीचा नाश होणे टळत नाही.परंतु नव निर्मिती करणारे हे मुठभर लोक आणि बहुजन समाज याना जोडणारी साखळी तुटली व सामाजिक संबंधांच्या दृष्टीने सगळा समाज एकजीव न राहता तुकडे पडू लागले,तरीही त्या संस्कृतीचा  र्‍हास होणे शक्य आहे.आणि तसे घडले तर ह्या पुढारलेल्या लहान वर्गाची नवनिर्मितीला आवश्यक असलेली प्रतिभा लोप पावते.व तो वर्ग वांझ व रुक्ष होतो."
               

No comments:

Post a Comment