Thursday 18 January 2024

मर्म बंधातली ठेव ही - ८

                                         मर्म बंधातली ठेव ही  -  ८

                       डॉ.अविनाश बिनीवाले यांना 'महाराष्ट्र भारतीय शिक्षण संस्थे'चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला.हा समारंभ वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या हॉलमध्ये होता.याच हॉलमध्ये माझा नातू आर्यचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला होता.मला त्याची आठवण झाली.त्याचे बासरीचे गुरु पंडित रमेश गुलानी यांच्या लहान मुलांपासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम होता.पंडित गुलानींचा तो लाडका विद्यार्थी होता.त्यावेळी तो नउ वर्षांचा असेल.

                     श्रद्धाला आम्ही दगदग करून कार्यक्रमाला येऊ नये असे वाटत होते पण नातवाचे कौतुक पाहायला जाण्याचा आम्हाला उत्साह होता.पहिल्या तीनचार मुलांचे बासरी वादन झाल्यावर आर्यचा नंबर आला. तो स्टेजवर चढत होता तेंव्हा मलाच धडधडत होते.त्याने अगदी आत्मविश्वासाने दोन गाणी वाजवली एक 'हम होंगे कामयाब' आणि दुसरे 'अजीब दास्ता है ये' टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यापेक्षाही त्याच्या गुरूंच्या चेहर्यावर दिसणारे कौतुकाचे भाव मोलाचे वाटले. त्याचे नाव पुकारल्यापासून ते भाव होते.

                     अगदी पहिल्या भेटीपासून हे गुरु शिष्य एकमेकांना आवडत होते.बासरी शिकणे हा आर्यचाच निर्णय होता. त्याच्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये संगीताच्या तासाला वेगवेगळ्या वाद्यांची ओळख करून दिली होती.आर्य बासरी आणण्यासाठी मागे लागला हे तात्पुरता खूळ असेल म्हणून अगदी खेळातली वाटणारी बासरी श्रद्धाने आणून दिली.आर्यने स्वत:च ट्यून बसवायला सुरु केली.जनगणमन बसवले.याला खरच आवड आहे हे लक्षात घेऊन गुरूंचा शोध चालू झाला आणि मायलेक नेण्या आणण्यास सोयीचे असलेल्या शिवाजी नगरच्या पंडित गुलानिंच्या पर्यंत पोचले.आकाशवाणीचे ते स्टाफ artist होते.निवृत्तीनंतरही आकाशवाणीच्या सामजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात ते सहभागी होत. नेत्रहीन होते.या गिफ्टेड कलाकाराचे  संगीत क्षेत्रात नाव होते. कसे कोण जाणे दोघांचे सूर पहिल्याच भेटीत जुळले.क्लास सुरु झाला.आर्य अनेक गाणी वाजवू लागला.कुणी वाजव म्हटल्यावर आनंदाने वाजवायचा कौतुक होऊ लागले.सोसायटीच्या कार्यक्रमात,शाळेत बासरीवादन होऊ लागले घरातल्यांच्या वाढदिवसाला Happy birthday to you ची धून वाजू लागली.

               सगळे छान चालले होते आणि श्रद्धा गोळीबार मैदानाला राहायला आली.क्लासला लांब जाणे शक्य नव्हते. जवळचा क्लास शोधायचा प्रयत्न झाला.पण आर्यला कोणीच पसंत पडत नव्हते.करोना नंतर गुरुनी ऑनलाईन क्लास सुरु केला.आर्य खुश झाला.पण त्याच्या आनंदावर विरजण पडणारी घटना घडली. १५ जून २० ला त्यांचे करोनाने निधन झाले.आर्यला हे सांगायला धीर होत नव्हता.सांगायला तर लागणारच होते.या छोट्या शिष्याने बासरी वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

            आता आर्य अकरावीत आहे.आयआयटीची तयारी करायच्या मागे लागला आहे.बासरी मागे पडली.माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला Happy birthday to you वाजवणारा आर्यचा व्हिडीओ आला.सुप्त रुपात बासरी जिवंत आहे याचा आनंद झाला.योग्य वेळी ती बाहेर येईल असा मला विश्वास आहे.