Friday 3 December 2021

माझे दूरस्थ विद्यार्थी - अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                                       माझे दूरस्थ विद्यार्थी  -  अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                      रामदास म्हात्रे यांच्यावरील सदर लेख १२ जानेवारी २००६ मध्ये लिहिलेला आहे.केसरी वर्तमानपत्रात आमच्या टीमवी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' हे सदर लिहित होते.हे विद्यार्थी सध्या काय करतात ते  शोधून त्यांच्या पुढील यशाबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहित होते.प्रत्येक अपंग दिनाला मला रामदास म्हात्रे त्यांची स्वप्ने आठवायची.त्यांचा माझ्याकडे असलेला फोन नंबर लागत नव्हता त्यांचा पत्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही.अचानक मला ते फेसबुकवर ते भेटले.मी त्यांचा फोन नंबर मागितला त्यांच्याशी बोलून लिहायचे होते.पण त्यांचा फोन मिळालाच नाही.काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शारदा वाडकर हिच्याशी बोलताना करोनामध्ये किती लोकांचे नाहक बळी गेले हे सांगताना रामदास म्हत्रेचे नाव घेतले गेले. माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होते. त्यांचा पत्ता  सापडला तोही असा.शारदा त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती.आज अपंग दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.                        

                            
                                        अपंगांचे खंबीर नेते
                         पुण्यातील कुमठेकर रोडवरील शिक्षण शास्त्र संस्थेचा हॉल खच्चून भरला होता ग.प्र.प्रधान, नारायण सुर्वे, शरदचंद्र गोखले अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर स्थानापन्नवर भेटले. झाली होती. निमित्त होते रामदास म्हात्रे यांच्या 'थोट्या' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. रामदास म्हात्रे आमचे बी.ए.चे विद्यार्थी म्हणून मी आवर्जून गेले होते.
                              कोकणातल्या खेड्यातील एका गरीब शेतमजुराच्या मुलाची शिक्षणासाठीची धडपड अचंबित करणारी होती. जगण्याच्या प्रत्येक क्षणाला समाजाने अव्हेरले, नाकारले तरी सर्वातुन वर उठून रामदास म्हात्रेनी समाजालाच भरभरून दिले होते. 
                                 पेण जवळील मळवली गावातील शेतमजुराच्या घरात जन्मलेले रामदास हे पाचवे अपत्य. ते पाच वर्षाचे असतानाच पोलिओंनी अपंगत्व आले आणि नंतर सगळं जगणंच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे झाले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे आपण धांडोरे पिटतो पण शिक्षणाच्या जबरदस्त ओढीने खुरडत घराचा उंबरठा ओलांडून जाणाऱ्या रामदासला अपंग म्हणून शिक्षकांनी प्रवेशच नाकारला. वडिलांना काही झाल्यास मी जबाबदारी घेईन असे लिहून द्यावे लागले. पाच मैलावरच्या शाळेत रामदास माकडासारखा सारख्या उड्या मारत जाई. पावसाळ्यात हात चिखलाने कोपरापर्यंत  बरबटलेले असत. साप अंगावरून जात. शाळे बरोबर शेतात ढेकळे फोडणे, लावणी करणे, गुराखी पण करणे अशी कामेही रामदास करी. यातूनही रामदास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होई. पुढे पुण्याला  शिक्षणासाठी जायचे खुळ डोक्यात शिरले. अशोक विद्यालयात धडपड करून प्रवेश मिळविला. तिथे राहायची मोफत सोय होती. जेवायला मिलो ची भाकरी मिळायची कोकणात दारिद्र्य असलं तरी रान मेवा भरपूर असे. पळून जावं वाटे पण शिक्षणाच्या ओढीने त्यावर मात केली. पुढे ज्ञानेश्वर वस्तीगृहात प्रवेश मिळाला. जीपीओ ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत खुरडत, तेथून न्यू इंग्लिश स्कूलला बसने जावे लागे. अपंग रामदाससाठी हे खूप कष्टाचे होते. एसएससीला बोरमाळ विकून आई ने पैसे भरले दहावीत ६५  टक्के गुण मिळाले. एस.पी.त सायन्सला प्रवेश घेतला. शिक्षणाच्या वाटेवर वेगळीच समस्या निर्माण झाली.भावाचे निधन झाले. गावाकडून पैसे येणे बंद झाले. त्याचा संसार हि उघड्यावर पडला. शिक्षण सोडून अर्थार्जन करावे लागले.
                                            रामदास ने निर्वाहासाठी आपली कामे सुरू केली.पुढे समाज कल्याण खात्यात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. येथेही अपंग म्हणून घेण्यास खळखळ होती. या काळात सेवा दलाशी संपर्क आला. एस. एम. जोशी, भाई वैद्य यांचा सहवास लाभला व्यक्तिमत्त्व विकसित झाले१९८१ मध्ये जागृत अपंग संघटनेची स्थापना केली. अपंग जागृतीसाठी लेखन, कृती सर्व मार्ग हाताळले.पु.ग. वैद्यांनी आपटे प्रशालेत संस्थेसाठी मोफत जागा दिली. अपंग जागृती करणे तसे सोपे नव्हते अपंगांचे पत्ते काढून घरी जायचे घरच्यांना पटवायचे स्त्रियांसाठी तर हे अधिक कठीण होते पण नोकरी सांभाळून झपाटल्यासारखे रामदास ने काम केले फलित म्हणून १९८१ मध्ये राज्य पुरस्कार १९८७  मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
                              अपंगांच्या हक्कासाठी लढायचे तर कायद्याचे शिक्षण हवे होते त्यासाठी पदवी नव्हती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदवी मिळाली आणि लगेच शाहू कॉलेजमध्ये सकाळच्या शाखेत प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज दिवसा नोकरी, संध्याकाळी संस्थेचे काम अशी कसरत सुरू झाली अपंगांचे विवाह, नोकऱ्या, प्रवेश, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे, न्यूनगंड नाहीसा करणे, समाजात अपंगांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणे हे सगळे म्हणजे कठीण खडकात बी पेरणे होते. कोकणातल्या निसर्गाने खडतरतेवर मात करावयाची दिलेले शिक्षण कामी आले. दुर्दम्य इच्छाशक्ती होती आज संस्थेच्या रोपट्याचा वृक्षासारखा विस्तार झाला आहे.४० अपंगांची निवासाची सोय आहे. संगणक, शिवणकाम असे स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण दिले जाते. रामदास ने अपंगांतून नेतृत्वाची पुढची फळी तयार केली आहे. संस्थेचा  डोलारा सांभाळताना  महाराष्ट्र अपंग विकलांग मंच, महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना यांच्या कार्याध्यक्ष पदांची धुरा ही आता रामदास म्हात्रे यांच्याकडे आहे. हे सर्व करताना अपंगांचे सोबती, अपंगाचे हक्क, सनद हे हँडबुक, गंगाजळी कादंबरी आणि भरपूर स्फुट लेखन म्हात्रे यांनी केले आहे.
 आज ते ऑफिस सुपरिटेंडेंट या पोस्टवर आहेत. धडधाकटांनाही लाजवेल असे  त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांच्या मित्रांच्या अव्यंग असलेल्या मावशीनीच त्यांच्याशी विवाह केला. त्या जिल्हापरिषदेच्या शिक्षिका आहेत. दोन मुलं उत्तम शाळेत शिकत आहेत स्वतःची कोणतीही गोष्ट बायको-मुलांना करावी लागू नये असा त्यांचा कटाक्ष असतो. पत्नीची शनिवारी सकाळची शाळा म्हणून घरातील स्वयंपाका पासून सर्व कामे करतात पण तरी अपंगांच्या बाबतीत समाजाच्या मानसिकतेबद्दल त्यांना खंत वाटते. ते म्हणतात कार्पोरेशन,  एटीएम सेंटर अशा अनेक ठिकाणी जाताना बिल्डिंगच्या रचनेत अपंगांचा विचार न केल्याने अडचणी येतात. इतरांवर अवलंबून राहावे लागते. रामदास मात्रे यांच्या जीवन कार्यातून धडधाकट माणसांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य आहे. अपंगा बद्दल च्या त्यांच्या कार्यासाठी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!