Sunday 17 October 2021

रिक्षावाले अरुण शिंदे - घरचा माणूस

                                              रिक्षावाले अरुण शिंदे  -  घरचा माणूस

                                 पुणेरी रिक्षा वाल्यांच्या बाबत नेहमी तक्रारीचा सूर असतो.आम्हाला मात्र नेहमी चांगलेच अनुभव आले.त्यातही अरुण शिंदे हे आमच्यासाठी घरचा माणूस आहेत.आम्ही दोघे जेष्ठ नागरिक असल्याने त्यातही माझ्या पतिना पार्किन्सन्स सारखा आजार असल्याने कोणीतरी मदतीला लागते.कोठेही जायचे असले तर आम्ही अरुण शिंदेना फोन करतो.जवळच्या  ATM मध्ये, किराणा माल, फळवाला,पिठाची गिरणी असे कोठेही अगदी छोट्या अंतरासाठी ते येतात. ते असले कि बिनधास्त वाटते काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी थांबत करतो.आम्हाला यासाठी वेळ लागतो पण त्यांची कधी कुरकुर नसते.उलट वस्तू. रिक्षात आणून ठेवणे, दळण गिरणीत ठेवणे अशी कामे ते न सांगता करतात.

रिक्षात वृध्द माणसे आहेत याचे त्याना भान असते.त्यात मला कमरेचा त्रास आहे ही जाणीव असल्याने ते अत्यंत सुरक्षित रिक्षा चालवतात.

 दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतरही ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळेनुसार हक्काने बोलावतो.एकदा सारसबागेत जायचे होते. त्यांनी बाजूच्या गेटने कमीत कमी पायर्या चढाव्या लागतील अशा ठिकाणा पर्यंत रिक्षा नेली. वयस्क माणसे पाहून बागेतही कोणी हरकत घेतली नाही.आमचे छान गणेश दर्शन झाले.जवळच एक शिव मंदिर आहे तेथेही बदल म्हणून त्यांना घेऊन जातो.घाई करू नका व्यवस्थित दर्शन घ्या असे सांगतात.

स्टेशन,विमानतळ अशा ठिकाणी पहाटे जायचे असेल तर अरुण शिंदेना रिक्षा सांगितली की अलार्मही न लावता बीनधास्त झोपता येते.

त्याना बोलावले की ते पाच मिनिटे आधीच येऊन थांबतात.बेल वाजवून मी आलो आहे. सावकाश आवरा काही घाई नाही.असे सांगतात..लगबगीने सामान घ्यायला येतात. कधी चहा घ्यायला थांबा म्हटले कि मात्र घाई करतात.कधीच थांबत नाहीत.मृदू आवाजात नम्रतेने बोलतात.

आमच्या साठी अडीनडीला उपयोगी पडणारा,आधार देणारा हा घरचा माणूस आहे.