Saturday 15 July 2023

मर्म बंधातली ठेव ही - ५

                                                      मर्म बंधातली ठेव ही - ५

                       आज मैत्रिणींच्या ग्रुपवर कोरांटीच्या फुलाचा फोटो आला आणि मला आर्यनी काढलेल्या एका फोटोची आठवण झाली.तो सात आठ वर्षाचा असेल.

आम्ही रस्त्यांनी चाललो होतो.रस्त्यात पडलेले एल फुल दाखवत आर्य म्हणाला 'आज्जी थांब थांब. किती सुंदर फुल आहे बघ'.माझ्या हातातील मोबाईल घेऊन त्यांनी फोटो काढला. फुल कोरांटीचे होते.आज ग्रुपवर आलेल्या रंगाचेच होते.आमच्या जवळ राहणाऱ्या ओबेरॉय यांच्याकडे कोरांटीची झाडे होती ती मी त्याला दाखवली.फुलांनी भरलेली झाडे पाहून तो हरकून गेला.लहनपाणापासून विविध रंगातील कोरांटी पाहिली होती.मला यात कधी सौंदर्य का दिसले नाही? आता आर्यनी म्हटल्यावर मला खरच सुंदर आहे की असे वाटले.

आमच्याकडे बेळगावला या फुलांना घोरटी म्हणतात.नवरात्रात पहिले दिवशी एक दुसरे दिवशी दोन अशा वाढत्या माळा घटावर सोडतात.त्या घोरटीच्या असायच्या.कारण याची पाने गळत नाहीत.फुले हलकीही असतात.त्याच्या कळ्यांच्या  केळीच्या दोर्यात वेण्या केल्या जायच्या.दुसरे दिवशी फुले फुलायची

 सुंदर फुल म्हणजे कधी कोरांटी असे मात्र डोळ्यासमोर आले नाही.गुलाब आणि सुंदर सुवासाची मोगरा,जाई,जुई,चाफा,निशिगंध यांचीच आठवण येते.भा.रा.तांबेनीही "मधु मागसी माझ्या" कवितेत "देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी" असे म्हटले त्यामुळे कोरांटीचे मनात जरा खालचेच स्थान असावे.आर्यची पाटी मात्र कोरी होती.उघड्या डोळ्यांनी तो आजूबाजूला पाहत होता.आमच्या बागेतील,समोरच्या सार्वजनिक बागेतील बारीक सारीक सौंदर्यस्थळे तो निरागसपणे दाखवायचा.नकळत मला संदेश जात होता उघड डोळे आणि आजूबाजूला बघ निट.त्याच्या सहवासात जगण्यात आलेला कोरडेपणा जात होता.