Thursday 10 August 2023

जीवेत शरद: शतम पराग

                                                    जीवेत शरद: शतम पराग

                   पराग,पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण,सुख समृद्धीचे जावो.

                बघता बघता पराग पन्नास वर्षाचा झाला.मला कॉलेजमध्ये असलेला पाठीवर सॅक घेतलेला पोरगेलासा पराग अजून आठवतो.लिहायला बसल्यावर अनेक आठवणी जाग्या झाल्या.जावई मुलासारखा असे अनेक जण म्हणतात. ज्यांना फक्त मुली आहेत अशावेळी तर हे नाते जोडले जातेच.पण मला मात्र असे ओढूनताणूनणून नाते जोडावे वाटत नाही.ज्याला नाव देता येत नाही असे पण छान आणि अत्यंत जवळचे नाते आमच्यात आहे.तो मला काकूच म्हणतो.तो जसे काही वेळा माझे कौतुक करतो.तसेच स्पष्टपणे चुकाही दाखवतो.एकदा तो मला म्हणाला काकू तुमचे सीरिअल बघणे फारच वाढलेले दिसतेय.त्यानंतर मी टीव्ही पाहणे थोडे कमी केले.त्याला ते माझे अध:पतन वाटत असावे. 

               लग्नाच्या आधीपासून सामाजिक शास्त्रे हा विषय आमच्यातील दुवा ठरला.त्यामुळे वैचारिक चर्चा होत.तो प्राध्यापक झाल्यावर आणखी जिव्हाळ्याचे विषय वाढले.लिखाण,संगीत हाही एक समान धागा.आई जसे आमचे काही वर्तमानपत्रात आले की जपून ठेवायची तसे मी त्याच्या लेखनाची कात्रणे जपून ठेवली आहेत.त्याचे भारतातील आणि अमेरिकेतील रीसर्च मॅग्झीन मध्ये लेखन छापून आले याचा मला अभिमान आहे पण त्याहीपेक्षा तरुण भारत पासून हिंदू सारख्या उच्च दर्जाच्या वर्तमानपत्रात त्याचे सर्वसामन्यांना आर्थिक साक्षर करणारे लेखन येते.तेंव्हा मला जास्त आनंद होतो.

           तो विकल्पवेध नावाच्या मासिकात काम करत होता तेंव्हा त्याने माझ्याकडून लेखन करवून घेतले. होते.याचवेळी तो प्राध्यापकीही करत होता.तो विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे.आता तर डीनही झाला आहे.त्याच्याकडे विद्यार्थी पीएचडी करतात.शिकवताना तो नवनवीन प्रयोग करतो.अमेरिकेतील विद्यापीठातील त्याचे ऑफिस पाहून आम्ही खुश झालो होतो.पिटूने तेथे काही कुंड्या नेवून ठेऊन ती आकर्षक केली होती.

          शिवाजीमराठा मधली खेड्यापाड्यातील पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी असोत की अमेरिकेतील आणि आता दिल्लीतील मोठ्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी असोत या सर्वाना तो आपलाच वाटतो. इतरांशी संवाद साधण्याचे त्याचे कौशल्य इतरत्रही तो वापरतो.त्यामुळे सर्वांवर त्याची प्रथमदर्शनी छाप पडते. ह्यांचे मित्र हेरेकर यांच्याकडे न्यू जर्सीला पराग घेऊन गेला होता.तेथेही त्यानाही परागने इम्प्रेस केले.

            पुण्यात आम्ही त्याच्याबरोबर गोव्याला गेलो होतो.वाटेत सरूकडे थांबा असतो.सरू नव्हती म्हणून मीनाकडे झाला.आम्ही मीनाकडे इतक्यांदा गेलो तरी वर जाऊन सर्व घर कधी पाहिले नाही. परागने मात्र ते केले.तो खुश झाला होता.त्याला विविध गोष्टींचे कुतूहल असते.कोठे जाईल तेथे तो लगेच मिक्स होतो. त्यामुळे ही तो सर्वाना आवडतो.

          अमेरिकेला आम्ही दोन महिने राहिलो तेंव्हा त्याचा जास्त सहवास मिळाला.विमानतळावर दोघे न्यायला आले होते.दोघांचे आनंदाने भरलेले चेहरे मला अजूनही आठवतात.त्या क्षणा पासून परत येइपर्यंतची आमची ट्रीप अत्यंत अविस्मरणीय झाली.पिट्टूनी  आम्हाला झेपेल,आवडेल अशी ठिकाणे निवडून नियोजन केले होते.तिचे थिसीसचे काही काम व्हायचे होते.परागला मात्र सुटी होती.त्यामुळे बर्याच वेळा पराग आमच्याबरोबर असायचा.त्यांनी छान खातिरदारी केली.

                आम्ही चौघांनी मिळून विविध विद्यापीठे, शाळा पाहिल्या.नायगारा ट्रीपही चौघांनी केली.त्यावेळचे क्षण नि क्षण आठवतात.परागच्या ड्रायव्हिंगमुळे आणि ड्रायव्हिंग करताना परागला Entertain  करण्यासाठी विविध भेंड्या आणि Gossips मुळे मजा यायची. 

          न्युबेडफर्डला त्यांचा Flat होता तेथे खाली एक थियेटर होते.कोणताही सिनेमा पहायचा तर आपल्याकडील सीडी नेऊन तो पाहता यायचा.तेथे आम्ही तिघांनी काही सिनेमी पाहिले.पराग तयार पाकिटे मिळतात त्याचे पॉपकॉरन करायचा आणि ते खात आम्ही पिक्चर पाहायचो.त्या थियेटरचा फायदा घेणारे फक्त आम्हीच असू.

        आम्ही बाख फ्लॉवर रेमेडीची बाखच्या पुस्तकातील Repertory मराठीत भाषांतरित  करण्याचे काम घेऊन गेलो होतो.ही १५० पानांची होती.मी शब्द सांगायची आणि हे सुवाच्य अक्षरात लिहायचे. एखाद्या शब्दाचा अर्थ आला नाही तर पराग डिक्शनरी पाहून नेमका शब्द सांगायचा.ही प्रोसेसही आम्ही खूप एन्जॉय केली.

            त्याला खाण्याची आवड असल्याने आपण अमेरिकेत त्याला काही करून घालू असे मला वाटायचे.किचन मध्ये दुसर्याची लुडबुड त्याला आवडायची नाही मला प्रत्यक्ष सांगू शकायचा नाही.पिटूकडे भुणभुण करायचा. शेवटी तिने दोघांना समोर बसवून सांगितले.मग तो मेन शेफ आणि मी त्याची असिस्टंट असे ठरले.सकाळीच विचारायचे काय आज्ञा? आणि तो सांगेल तेवढे मी करायची. भाज्या चिरणे,पोळ्या करणे अशी कामे मी करायची.तेथे खतखते,गड्डा दबदबित असे अस्सल बेळगावी पदार्थ आम्ही केले.त्याला सगळे सारस्वती पदार्थ आवडतात.आजही त्याचा फोन आला की समजावे कोठलीतरी रेसिपी पाहिजे.

            भारतात आल्यावर आता पुण्यात येणे आणि राहणे कमी झाले. तो खूप बिझी झाला आहे.पण पिटूशी बोलताना गप्पा ऐकणे त्याला आवडते.

          खर तर कितीतरी आठवणी आहेत.मलाच त्या नेमाक्या शब्दात मांडता येत नाही आहेत.पराग, काही गोष्टी सांगायच्या आहेत.गाण्याचा रियाज सोडू नकोस आणि सोशल मिडीयावर सत्य असली तरी स्फोटक विधाने करू नकोस.व्यायामाचा आळस करू नकोस.

 आनंदी रहा.यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत कर.जीवेत शरद: शतम.