Sunday 25 August 2019

रेडिएशनचा आनंददायी अनुभव

                                         रेडिएशनचा आनंददायी अनुभव.
                    'कॅन्सर मग नो अन्सर!' आज विज्ञानाने कॅन्सरसाठी उत्तरे शोधून हे विधान खोटे ठरवले असले तरी समाज मनात मात्र कॅन्सर या नावाचा घेतलेला धसका आणि भ्रामक समजुती तशाच आहेत.हॅरी पॉटर मधल्या व्हिलन व्होल्डमार्टचा दरारा इतका असतो की त्याचे  नाव न घेता He who must not be named संबोधले जाते तसेच मला कॅन्सरबाबत समाजात दरारा असल्याचे जाणवले.लोक नाव देखील उच्चारत नाहीत.
 कॅन्सर माझ्यापर्यंत पोचला आणि त्यातले वास्तव इतके भयानक नाही हे जाणवले.Oncologist ची पायरी चढल्यावर त्यातही किमो,रेडीएशन, सर्जरी अशा तीन शाखांचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे समजले.पेशंटच्या आजाराचे स्वरूप अवस्था,वय अशा विविध गोष्टी विचारात घेऊन उपचार ठरवले जातात.माझ्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या एकत्र विचारातून रेडीएशनची निवड झाली.
तुम्हाला ५ आठवडे सोमवार ते शुक्रवार रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल. असे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा 'बापरे इतके दिवस घर ते रूबी हॉस्पिटल करायचे म्हणजे शींगरू मेल हेलपाट्यांनी असंच होणार' या कल्पनेनीच मी दडपून गेले.पण बघता बघता रेडिएशन थेरपी चे ५ आठवडे संपले देखील आणि  प्रत्यक्षात हा अनुभव आनंददायी ठरला.ही आनंदाची लागण हळुहळु झाली.माझ्या  अनुभवावरून ती इतरांना सुरूवातीपासून व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
पहिल्या दिवशी रूबीच्या कॅन्सर सेंटरमध्ये शिरतांना मनात अनामिक हुरहुर,धास्ती होती.आत शिरल्यावर कॅन्सरच्या खुणा दाखवणारे अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी हॉल भरलेला होता.आता मीही एक कॅन्सर पेशंट आहे या वास्तवाने मन अधिकच दडपून गेले.
Oncologist Doctor मानसी मुन्शी यांच्या प्रसन्नचित्त आणि आश्वासक दर्शनाने दडपण थोडे कमी झाले.
रेडिएशनचा पहिला दिवस.तळघरातल्या तळघरात रेडिएशन टेबलवर माझी पोझीशन adjust झाल्यावर आरामसे पडे रहो.हिलना मत असे सांगण्यात आले.आता मी एकटीच तेथे होते.मी डोळे गच्च मिटून घेतले.भोवती फिरणाऱ्या मशीनचा ईरीटेटींग आवाज येत होता.श्वासोच्छ्वाकडे लक्ष देणे,ते मोजणे सुरू केले.२५० श्वास झाले आणि 'उठो आपका हो गया' सीस्टर सांगत होत्या.उठल्यावर थोडे गरगरत आहे वाटले.सीस्टरनी हात धरून वर सोडले.
दुसरे दिवशी कानात कापसाचे बोळे घालून आले.डोळे गच्च मिटलेलेच.
तिसरे दिवशी भरपूर पाऊस आणि हवेत गारवा.त्यात एसी.आणि तो सेंट्रलाईज असल्याने कमी करता न येणारा.मला हुडहुडी भरली.हातपाय थंड पडले.उठल्यावर पायात बुट घालता येईनात.दुसऱ्या दिवशी मी पायात मोजे आणि डोक्याला रूमाल बांधून आले.न सांगताच सीस्टरनी हळुवारपणे  पायावर एक बेडशीट ची घडी आणि त्यावर blanket घातले.छातीवर blanket ची घडी घातली.उब आली.तिची स्नेहार्द नजर प्रेमळ स्पर्श सुखावून गेला.आज माझे डोळे न कळत उघडे राहिले.कानात बोळे घालायला ही विसरले होते.प्रथमच  छतावर निळ्याशार आकाशात शुभ्र पिंजलेल्या कापसासारखे ढग दिसले.
मी डोळे उघडेच ठेवले.छतावरचे ढग,आकाश सुखावू लागले.रेडिएशन प्रक्रिया करणारी यंत्रे रोजच्या सारखाच आवाज करत होती.पण त्यांने इरीटेड न होता मला त्यात एक लय,ताल जाणवू लागला.आणि शब्दांकीत होऊन ऐकु येऊ लागला.सीस्टर अनीस आणि टेक्नीशीयन काशीनाथ आत आले.नेहमीप्रमाणे मला उठून बसण्यासाठी आधार दिला.आज हे दोघेही मला एंजल वाटत होते.
चक्कर आती है?अनीसने विचारले.मी मानेनेच नकार दिला.प्रथमच मी रेडिएशन हॉल स्वच्छ नजरेने पाहिला.समोरच्या मोठ्या भिंतीवर पाईन, चिनार वृक्ष होते.रेडिएशनला येणाऱ्यांचे मन प्रसन्न
राहावे असा प्रयत्न  होता.आधाराशिवाय वर आले.
 आता रोज रेडिएशन ला येतांना पाषाण ते रूबी पर्यंतच्या रस्त्यावरील हिरवीगार झाडी,मधुन मधुन फुललेले गुलमोहोर दिसु लागले.कुठेतरी सहलीला चाललोय असे वाटू लागले.खरे तर सर्व तेच होते.मी घट्ट मिटलेले डोळे उघडल्यावर मनाची कवाडेही उघडली.
रेडिएशन प्रक्रिया यांत्रिक न राहता  चैतन्यमय होऊ लागली.सीस्टर अनीसचे प्रेमाने हसून स्वागत करणे,कैसी हो? अशी विचारपूस करणे, हळुवार पणे ब्लडप्रेशर घेणे.मनापर्यंत पोचू लागले.तंत्रज्ञ काशीनाथ मधला सह्रदय माणूस दिसू लागला.रेडिएशन बेड,यंत्रेही सजीव वाटू लागली.रेडिएशन प्रक्रिया आनंददायी झाली.यानंतरच्या दोन Brachy ही सहजपणे पार पडल्या.भिती,हुरहुर अशा नकारात्मक भावना गेल्या.
   आजारावषयी,त्यावरचे उपचार आणि साईड इफेक्ट विषयी इतके गैरसमज,भ्रामक समजुती आहेत.की त्या घाबरवून सोडतात.आणि आजारापेक्षा त्याच नुकसान करतात.माझे चक्कर येणे हे भितीतूनच होते असे मी आता म्हणू शकते.
अनीसनी ठेवलेल्या ब्लडप्रेशर नोंदी पाहिल्या तरी लक्षात येईल की सुरूवातीला बीपी थोडे हाय असायचे ते १२० /८० असू लागले.आनंदी असण्याने उपचाराला ही चांगला प्रतिसाद मिळत असणार नक्की.आपल्या मनातील वृथा भिती टाकून आनंदाने उपचाराला सामोरे जा असे मी माझ्या अनुभवावरून सांगु शकते.
 फोटो १ - रेडीएशन हॉलमध्ये सिस्टर अनिस आणि टेकनिशीएन काशिनाथ सह
फोटो २ - माझ्या आधी रेडीएशन घेऊन हसतमुखाने बाहेर पडणाऱ्या नीलिमा देसाई




रेडिएशन चालू असताना, यंत्रांच्या आवाजातून मला ऐकू आलेले शब्द आणि स्वर. मी ते माझ्या आवाजात रेकॉर्ड केले ते असे -


Saturday 24 August 2019

टोपणनावाची गोष्ट

                                                 टोपणनावाची गोष्ट
                          काल मुलीकडे फोन केला तर तिच्या भाच्याने उचलला.आणि झेन आज्जीचा फोन आहे सांगत आपल्या आजोबाना दिला.झेन आज्जी हे मला माझ्या नातवाने दिलेले टोपण नाव.लहानपणापासून मला कोणतेच टोपण नाव नव्हते. ते नातवांनी बहाल केले.माझा नातू क्षितीज त्याच्या बाबांच्या आई वडिलाना आज्जी, अब्बू म्हणायचा  मग आम्हाला काय म्हणायचे? लहानपणापासून त्याला गाड्यांची आवड होती.तशी हल्ली बहुतेक लहान मुलाना असते. आमच्याकडे झेन होती म्हणून ह्यांना तो झेन अब्बू म्हणायला लागला.आणि मी मग झेन आज्जी झाले.माझ्या मुलीच्या सासरी सर्वांच्या तोंडी हेच नाव झाले.
माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.घरी गाडी असल्यावर ती चालवण्याचा मोह व्हायचा म्हणून शेवटी गाडी विकली.
आम्हाला टोपण नाव देणारा नातू आता इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.आता तो स्वत: गाडी चालवतो.
झेन गेली तरी आम्हाला अजून तो आणि  इतरही झेन आज्जी, झेन अब्बुच म्हणतात.हे नाव आम्हाला चिकटलेलेच राहिले आणि राहणार. 
(महारष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले.)