Tuesday 5 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ७

                                                     मर्म बंधातली ठेव ही - ७

                      अंजली महाजनची तब्येत बरी नव्हती.मी भेटायला गेले होते.तेथे आर्यची आठवण निघाली.त्याचे काय झाले

एकदा दहा साडेदहालाच अंजलीचा फोन आला.आज पावभाजी केले.केशवराव काका, काकुना बोलाव म्हणत आहेत तर तुम्ही येता का? अंजलीचे तीन जिने चढून जायचे माझ्या जीवावर आले होते.पण आमचे बोलणे ऐकून आर्य म्हणाला आज्जी पाव भाजी आहे नको का म्हणतेस जाऊया ना.अंजलीने ते ऐकले आणि ती म्हणाली पहा तुमचा नातूही म्हणतोय,केशाव्रव्ही आग्रह  करत आहेत,तुम्ही याच.आर्यसाठी  पार्किन्सन मित्रमंडळाच्या माझ्या मित्र मैत्रिणी घरच्याच होत्या.शेवटी आम्ही पावभाजी खायला गेलो.

                    अंजलीकडे  तिच्या नातवासाठी ठेवलेले खेळ होते.केशवरावांच्या बरोबर कॅरम खेळून झाले.अंजलीची उर्जा आणि आर्यची उर्जा घर दणाणून गेले होते.केशवराव खुश होते.इतक्यात आर्यचे लक्ष व्हीलचेअरकडे गेले.अंजलीने शंभरीच्या सासू बाईंसाठी कमोड असलेली व्हीलचेअर घेतली होती. त्यांच्यासाठी ती सोयीची होती.त्या ती वापरायला अजिबात तयार नव्हत्या.नवी कोरी व्हीलचेअर तशीच पडून होती.गरज असून व्हीलचेअर वापरण्यास तयार नसलेल्या अनेक शुभार्थीबद्दल आमची चर्चा चालू झाली.

                     उतारवयाच्या अनेकांना व्हीलचेअर पाहिली की निगेटिव्ह फिलिंग येते.कितीही सोयीचे असले तरी ती वापरताना आजार,अवलंबित्व याच भावना प्रकर्षाने येतात.लहान मुले मात्र निरागस असतात.त्यांच्या साठी ते खेळणेच.मी बसू का यावर असे  अंजलीला विचारत आर्य त्यावर बसलाही.घरभर त्यावरून फिरु लागला.

                     अंजलीला त्यांनी वापरत नसाल तर OLX वर विकून का टाकत नाही असा सल्लाही दिला.त्याचा सल्ला ऐकून आम्ही खूप हसलो.आमची व्हीलचेअर बाबतीतील चाललेली गंभीर चर्चा त्याच्या गावीही नव्हती. 

 

Monday 4 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ६

                                                        मर्म बंधातली ठेव ही -  ६

                     आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला कार पार्कमध्ये दोन खांबाना कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत.मी कपडे वाळत घालत होते आणि आर्य खुर्चीवर चढून पाय वर करून काहीतरी कारभार करत होता.मी त्याला पडशील उतर खाली म्हणत होते.तो म्हणाला, 'सरप्राईज आहे आज्जी' त्यांनी खुर्चीवरून उडी मारली आणि मोबाईल मध्ये घेतलेला फोटो दाखवला.

 त्यांनी काढलेला फोटो पाहून मी थक्क झाले.दोन दोर्यांच्या मधल्या फटीत बरेच महिने एक पक्षांनी बांधलेले छोटे घरटे होते.त्या द्रोणाच्या आकाराच्या घरट्यात दोन छोटी अंडी होती.इतके दिवस घरटी होती पण त्याची काहीच अडचण नसल्याने मी ते काढून टाकले नव्हते.त्यात अंडी असतील का असे कुतूहलही मला वाटले नव्हते.

काही दिवसांनी तो सांगत आला अंड्यातून पिलू बाहेर आले.त्याचा त्यंनी फोटो काढून आणला होता.पिलांची आई कधी येते पिलांना चारा घालते हे पाहण्यात तो रंगून जाई.नंतर पिले उडून कधी गेली समजलेच नाही.घरटे रिकामे होते.

यूएन मिशनवर ऑफ्रिकेत असलेल्या त्याच्या बाबांची पुण्यात बदली झाली.आणि गोळीबार मैदानातील Family accommodation वाले घर बदलून आर्य आता खडकीला राहायला गेला.घर सोडून जायच्या दिवशी काही सामान टाकायला श्रद्धा आली होती.खूप घाईत होती.आर्य पळत पळत मागच्या बाजूला गेला.आई अरे लवकर चल अशा हाका मारत होती.मी त्याच्या मागोमाग गेले तर खुर्चीवर चढून त्यांनी घरटे काढले होते. त्याच्या हातात ते रिकामे घरटे होते.

हल्ली बाईच कपडे वळत घालण्याचे काम करते.माझे मागे जाणे होत नाही.काल काही कामासाठी गेले तर मला तसेच घरटे त्या ठिकाणी दिसले.आर्यची प्रकर्षाने आठवण झाली.

 

No photo description available.No photo description available.