Tuesday 22 December 2015

डॉक्टर भारती विकास आमटे - सहवास हवासा.

            


फोटो सौजन्य : अरुण कुलकर्णी


   काही व्यक्तींच्या आपल्या आयुष्यात असण्याने खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटते.मला अस श्रीमंत करणार्‍या अनेक व्यक्ती आहेत.डॉक्टर भारती विकास आमटे हे त्यातलं एक महत्वाच नाव.खर तर भारती ताईंची आणि माझी ओळख ३/४ वर्षातलीच पण अस वाटत, अनेक वर्षापासुन आम्ही एकमेकीना ओळखतो.भारतीताईना मी प्रथम पाहिलं ते नोव्हेंबर २०११ मध्ये आनंदवनच्या माझ्या पहिल्या भेटीत.आनंदवन पाह्ण्याच कित्येक दिवसाच स्वप्न साठीनंतर पुर होत होत. जोत्स्ना ओकच्या  स्वरूप ट्रॅव्हलतर्फे आठ दिवसाची आनंदवन,हेमलकसा अशी सहल होती
                 पहिल्या दिवशीच गेस्ट कँटीन जवळच्या काचेच्या ऑफिसमध्ये डॉक्टर विकास आमटे यांच्याशी  विविध ठिकाणाहून आनंदवन पाहायला आलेल्यांची  भेट होती.टेबलभोवती गोल खुर्च्या मांडल्या होत्या.इस्त्रीच्या पांढर्‍याशुभ्र झब्बा पायजम्यात विकास आमटे अवतीर्ण झाले.ते आनंदवनात विकासभाऊ म्हणून ओळखले जातात.जोत्स्नाक्डून त्यांच्याबद्दल खूप ऐकल होत.ते आले,ते बोलले आणि त्यांनी जिंकले. अशी सर्व उपस्थितांची परिस्थिती होती. मलाही आनंदवनला आल्याचे श्रम सार्थकी लागले.आता पुढच काही नाही झेपल तरी काही वाटणार नाही अस वाटत होत.आनंदवनची  निर्मिती, बाबा, ताईनी त्यासाठी घेतलेले कष्ट स्वत: आणि भाऊ प्रकाश याचं बालपण,शिक्षण यावर ते  भरभरून बोलत होते.कोणताही मुलाहिजा न ठेवता समाजातील अनिष्ठ गोष्टी, राजकारणी,भ्रष्टाचारी यांच्यावर कोरडे ओढत होते.शेवटी गाडी स्वत:च्या लग्नावर आली.
                   धाकट्या भावाच्या प्रेमकहाणीत मध्यस्ती केली.विकास यांच्या लग्नासाठी मात्र जगदीश गोडबोले आणि पु.ल.देशपांडे यांनी रोहिणी मध्ये जाहिरात दिली'.बाबा आमटेना सून हवी'. रोहिणीने ती मोफत छापली.जात धर्माची अट नव्हती.डॉक्टर असण्याची मात्र अट होती.५०० रुपये मानधनावर कार्यकर्ता म्हणून नेमणूक होणार होती.पण कुणीही पुढे आले नाही.हे सांगत असतानाच एक शालीन,सोज्वळ सौंदर्याच प्रतिक अशा  स्त्रीने  प्रवेश केला. 'आल्या पहा आमच्या गृहलक्ष्मी ' असा विकासभाऊनी परिचय करून दिला.एम.बी.बी.एस.डॉक्टर आहेत गोल्डमेडल मिळवलं आहे.औरंगाबादचे माजी खासदार भाऊ वैशंपायन यांच्या त्या कन्या असल्याचीही माहिती दिली.औरंगाबादला लग्नाला जाताना बाबांनी खाजगी काम म्हणून आनंदवनची गाडी  न वापरता नटराज टूर्सने वर्‍हाड औरंगाबादला नेल.भारती ताईंची ही पहिली ओळख,दुरूनच झालेली.विकास भाऊंच्या बोलण्याच गारुड उतरलं नव्हत तरीही भारतीताईंचा नंदादीपासारखा शांत, अबोल वावर उपस्थितांवर प्रभाव टाकून गेला.

                   दुसर्‍यांदा  भारती ताईना पाहिलं ते याच सहलीत स्वरानंदवन या आनंदवनच्या ऑर्केस्ट्राच्या स्टेजवर. आनंदवनच्या अद्ययावत आडीटोरियममध्ये आलेल्या पर्यटकांसाठी एक  दिवस या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो.भारती ताईंच वेगळचं रूप तिथ पहायला मिळाल.स्टेजवर दोन अंध मुलींबरोबर त्या आल्या. आणि  बाबांच्या  'ज्वाला आणि फुले ' मधील 'थांबला न सूर्य कधी थांबली न धारा' सुरेल आवाजात गायल.भारती ताईंबरोबर त्या मुली आणि इतर सर्वही घरातल्या व्यक्तीबरोबर वावराव तशा सहजपणे वावरत होते आनंदवनची ही खासियत आहे इथ कोणी लहान मोठ्ठ, मालक नोकर अस काही नसत.सगळ्यांच्या वागण्यात एक सहजता मोकळेपणा असतो हे पहिल्याच दिवशी लक्षात आल होत.
                  सहल संपवून परत निघायची वेळ आली.मन मात्र आनंदवनात रेंगाळत होत. आदल्या दिवशी जोत्स्ना, मी आणि माझी मैत्रीण निरुपमाला भारतीताईंच्याकडे घेऊन गेली. आम्ही त्याना आमच्या पुष्पौषधीच्या अभ्यासाविषयी सांगाव अस तिला वाटत होत.आम्ही मात्र जायला कचरत होतो.हा विषय शिकायला आम्ही आता कोठे सुरुवात केली होती. त्या मोठ्या डॉक्टर आणि आम्ही काय त्यांच्याशी बोलणार.पण प्रत्यक्ष भारतीताईंशी बोलताना सुसंवादाला कधी सुरुवात झाली समजलच नाही.भारतीताई अ‍ॅलोपाथीच्या डॉक्टर असल्या तरी इतर पूरक उपचारपद्धतीबद्दल त्याना उत्सुकता आहे.माहितीही आहे.पुष्पौषधीबद्दल त्यांनी आस्थेने चौकशी केली.आनंदवनाला पुष्पौषधी शिकवायला येण्याच आमंत्रणही दिल.
                  निघायच्या दिवशी भारतीताईंच तिसरच रूप पहायला मिळाल.आणि ओळख वाढत गेली तसतसे व्यक्तिमत्वाचे आवाक करणारे अनेक पैलू उलगडत गेले.निघण्यापूर्वी तासभर आधी आमच्यातील वंदना दगडाला ठेचकाळून पडली डोक्याला खोक पडली.विकासभाऊ आमच्या समवेतच होते. त्यांनी फोन केला आणि पाच मिनिटाच्या आत भारतीताई अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन हजर झाल्या. वंदनाला धीर दिला.हॉस्पिटलमध्ये नेऊन तातडीचे उपचार केले.आम्हा सर्वांसाठी त्याचं हे रूप आश्वासक होत.
                 पुण्याला परत आल्यावर कृतज्ञता म्हणून मी आणि निरुपमानी पुष्पौषधी वापरून तयार केलेलं एक किलो मलम -ज्याला आम्ही जादूच मलम म्हणतो ते तयार केल आणि जोत्स्नाच्या दुसर्‍या ट्रीपबरोबर पाठवले.बरोबर आनंदवन पाहून आम्हाला काय वाटले तो अनुभव सांगणारे पत्रही.लागलीच भारती ताईचे भेटकार्डासह  एक सुंदर अक्षरातले पत्र आले.त्यांनी पत्रात लिहील होत,
' तुमचे पत्र व सोबतची औषधे मिळाली.कृतज्ञ आहे.कै.ती.बाबा असच म्हणायचे की प्रभूचे हजार हात माझ्या कामाला लागले म्हणून एवढ काम उभं राहिल त्याचा प्रत्यय आम्हाला असा येत असतो.'आमच्या अत्यंत किरकोळ भेटीला त्यांनी इतक महत्व दिल होत.आनंदवनात तुमची भेट किती मोठ्ठी किंवा छोटी आहे यापेक्षा देणार्‍याच्या भावनाना महत्व दिल जात.
                 नंतर फोनवरही पुष्पौषधीसंबंधी बोलण होत राहील.निरुपमा आणि मी अस त्यासाठी आनंदवनला जाणार होतो.निरुपमा ६ महिन्यासाठी अमेरिकेला गेल्याने मी एकटीनेच जायचं ठरल.प्रवासाच्या बाबतीत मला एकटीने जाण्याचा आत्मविश्वास नव्हता.आणि इतके दिवस पार्किन्सन्स असलेल्या नवर्‍याला एकट सोडून जाणही प्रशस्त वाटत नव्हत. माझ्या नवर्‍यालाही आनंदवनला पुन्हा जाण आवडणार  होत.त्यामुळे त्यांनीही माझ्याबरोबर यायचं ठरलं.भारतीताईनीही' काही नाही जमेल तुम्हाला' हे इतक्या ठामपणे सांगितलं की मला नाही म्हणण शक्य झाल नाही.फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतीताई नेत्र शिबीर,इतर काही उपक्रमात व्यस्त होत्या.सलग निदान १० दिवस तरी याव अस त्याना वाटत होत.सर्वांच्या सोयीनी २९ फेब्रुवारी जाण्याची तारीख ठरली.गरीबरथच आरक्षण झाल.वर्ध्याला त्या गाडी पाठवणार होत्या. यांच्यासाठी व्हीलचेअर लागेल का? असही त्यांनी विचारलं.बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेऊन आस्थेनी विचारपूस करण्याची त्यांची वृत्ती नंतर वेळोवेळी प्रत्ययास आली.
                  वर्ध्याला आलो तर न्यायला गाडी आलेलीच होती. आमच्याच गाडीतून आनंदवनचे कार्यकर्ते आणि  तिथल्या अंधशाळेचे शाळेचे माजी प्रिन्सिपॉल कडू सर आले होते.ते थेट बसस्टँडवर चालले होते.आम्हाला न्यायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरनी त्याना बोलावलं.भारती वहिनींच्या पाहुण्या अशी आमची ओळख करून दिली.कडू सरांकडून वर्ध्याहून आनंदवनसाठी बस असल्याच समजल.ते ऐकून गाडी पाठऊ नका आम्ही बसनी येतो अस सांगायला पाहिजे होत अस वाटल.
                 लोटीराममध्ये २५ नंबरची रूम आम्हाला मिळाली होती.भारतीताईना फोन केला त्या म्हणाल्या'.तुम्ही आलात का पहायला आताच मी तिथ येऊन गेले.येतेच दोन मिनिटात' खरोखर दोन मिनिटात त्या आल्याही.त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाता जाता वाटेत स्वयंपाकघराशी थांबावं लागल.कामाच्या वाटणीवरून काहीतरी कुरबुर चालली होती.भारतीताईंनी चुटकीसरशी प्रश्न सोडवला.सगळेजण चुपचाप कामाला लागले.कॅन्टीनमध्ये चहा पोहे खाताखाता पुढील कार्यक्रमाची आखणी झाली.रोज संध्याकाळी ५.३० ला व्याख्यान द्यायचं ठरल.५.१५ ला त्यांचा फोन आला व्याख्यानापूर्वी लाईट काही खायचं आहे का? ५.२५ ला भारतीताई स्वत: न्यायला आल्या.मलाच अवघडल्यासारख झाल.या सर्वात कुठही उपचार नव्हता तर अगत्य आणि आपलेपणा होता.
                 लोटीरामला लागुनच असलेल्या श्री शिर्डी साईबाबा दवाखान्यात व्याख्यानाची सोय केली होती.इथ भारती ताई वैद्यकीय अधिकारी आणि अ‍ॅडमिनीस्ट्रेटर  म्हणून काम पहातात.दवाखान्याच्या बाहेर सुंदर हस्ताक्षरात बोर्ड लिहून ठेवलेला होता.खोलीत सतरंजा अंथरलेल्या होत्या.काही खुर्चा ठेवलेल्या होत्या.टेबलवर आनंदवनातील फुलांची फुलदाणी.आत शिरल्या शिरल्या मन प्रसन्न झाल.इथ अनेक उपक्रम सतत चालू असतात भारतीताईंच्या हाताखाली कार्यक्रमांच नियोजन करण्यात मंडळी तयार झाली आहेत.प्रत्येक गोष्टीत भारतीताईंच बारीक लक्ष असत.
                 व्याख्यानाला विविध क्षेत्रातील विविध वयोगटातील स्त्रीपुरुष होते.इंजिनिअर, होमिओपथी डॉक्टर,शिक्षक,गृहिणी,व्यावसायिक; मुख्य   म्हणजे भरपूर वाचन असलेल्या,पर्यायी उपचार पद्धतीचे ज्ञान असलेल्या विदुषी डॉक्टर भारतीताई.त्यांच्या असण्याच मनावर दडपण होत.त्यासाठी पुष्पौषधीमधील लार्च,मिम्युलस,व्हाईटचेस्टनट ही औषधे मी स्वत: घेतली होती.सुरुवातीला ओळखी झाल्या.माझा प्रवासाचा शीण अजून गेला नव्हता. व्याख्यान देताना  थकवा येऊ नये म्हणून मी पाण्यात पुष्पौषधीमधील ऑलिव्हचे थंब टाकणार होते.सर्वांच्या देखतच मी ते टाकले आणि विचारल ' कुणाला थकवा वाटतो का?कोणी स्वत:वर प्रयोग करायला तयार आहे का?' भारतीताईनीच हात वर केला.त्यांच्या पाण्यात थेंब टाकले.त्याना छान वाटले.मग रोजच त्या पाण्यात ऑलिव्ह घालू लागल्या.त्यांच्या असण्याने व्याख्यानाची रंगत वाढत होती.विविध शारीरिक आजार आणि अ‍ॅनॉटॉमीवर त्यांच्या कडून इनपुट मिळत.यात तज्ज्ञ असल्याचा भाव कोठेही नसे एक जिज्ञासू  विद्यार्थिनी म्हणून त्या व्याख्यान ऐकत..हळूहळू त्यांच्या बद्दलची भीड चेपून मैत्रीत कधी रुपांतर झाल समजलच नाही.
                       व्याख्यान संपल्यावर.कॅन्टीनकडे चाललो होतो.विकासभाऊंच लेक्चर सुरु होत. भारतीताई दिसल्यावर त्यांच्याकडे माईक देऊन ते दुसर्‍या कामाला निघून गेले.थकलेल्या भारतीताईनी समर्थपणे पुढे संभाषण चालू केल.आनंदवनमध्ये अस पडेल ते काम प्रत्येकजण करत असतात.
                        दुसर्‍या दिवसापासून भारतीताईंबरोबर ओपीडीत बसण सुरु झाल.हा एक समृद्ध करणारा अनुभव होता.सल्ल्यासाठी येणार्‍यात अंध,मुके,बहिरे,अपंग,लहान मुले,वृद्ध  असे विविध पेशंट होते.एका मुकी मुलगी काय सांगते आहे ते त्याना समजत नव्हत. मग रांगेत असलेल्यांपैकी मुकबधीर शाळेत काम करणार्‍या बाई  होत्या त्याना त्यांनी बोलवून घेतलं.मध्ये रजा मागायला एक बाई आल्या.तिला रजा मिळणार नाही सांगितलं तरीही तीने रजा द्याना अस टुमण लावलं होत. आणि भारतीताई त्यांच्या म्हणण्यावर ठाम होत्या. आणि गेलीस तर पुन्हा यायचं नाही असही बजावलं.आनंदवनातील प्रत्येक व्यक्तीबद्दल कोण कामाच आहे, कोण चुकार आहे, कोण बहाणे करत,कोणाला कस हाताळायच, कोणाबद्दल किती  सहानुभूती बाळगायची याच नेमक भान त्याना असल्याच पुढे विविध प्रसंगातून लक्षात आल.मध्येच   अर्टीफिशिअल लिंब सेटरचा माणूस आला त्यांचे प्रश्न सोडऊन झाले.एकीकडे पेशंट तपासण सुरूच होत. अ‍ॅलोपाथीच्या औषधाबरोबर आहारविषयक सल्ला,कोणाला तुळस,मध अशी घरगुती औषध,आवश्यक तेथे ताबडतोब वर्ध्याला सेवाग्राममध्ये जाण्याचा सल्ला त्या देत होत्या.यातच मधून मधून माझ्याशी चर्चा.भारतीताईंची आपल्या विषयावर उत्तम पकड आहे.एम.बी.बी.एस. करताना उत्तम शिक्षक मिळाल्याने हे साध्य झाल अस त्या सांगतात.विषयावर उत्तम पकड असल्याने अ‍ॅलोपाथीच्या सामर्थ्याची आणि मर्यादांचीही त्याना जाणीव आहे.
                        रोज ओपीडीत नवनवीन किस्से असायचे.औषधोपचाराबरोबर न्यायदान,विवध समस्या सोडवण चालू असत. हे करताना त्या तडजोड स्वीकारत नाहीत काही कठोर निर्णय घ्यायचे झाले तर ते काम भारतीताईंकडे येत.एकदा ओपीडीत नेहमी शांत असणार्‍या भारतीताईंच चंडीच रूप पहायला मिळाल.एक विवाहित स्त्री तक्रार घेऊन आल्या होत्या.कामावरून परतताना आनंदवनात काम करणारा एक माणूस तिची छेड काढत होता.तिचा नवरा आणि ती तक्रार घेऊन आली होती.भारतीताईनी त्या छेड काढणार्‍या माणसालाही बोलऊन घेतलं.तक्रारीबद्दल शहानिशा केली.झाल्या प्रकाराने त्या खूप चिडल्या होत्या.म्हणाल्या, 'बाबा असते तर त्यांनी तुला ताबडतोब हाकलून दिल असत.- बाबा असते तर हे वाक्य त्यांच्या बोलण्यात नेहमी  येत असत.त्याचा या महिन्याचा पगार न देण्याच फर्मान निघाल.मंडळी निघून गेली.लगेचच त्या शांतपणे पुढच्या पेशंटकडे वळल्या.
                       त्यांच्यातल्या डॉक्टरबरोबर संवेदनाशील आणि अगत्यशील माणूस सदैव जागा असतो.डॉक्टर लहाने यांच्या  नेत्र शिबिरात इतरांबरोबर रात्रंदिवस स्वत: काम करूनही न थकता या सर्वाना आग्रहाने चार घास खाऊ घालतील,माझ्यासारख्या सर्व सामान्य व्यक्तीच्या गरजांकडेही तितक्याच ममतेने लक्ष घालतील.माझ्या मुक्कामात मला हा प्रत्यय वेळोवेळी आला.मार्च महिना.उन्हाळा सुरु झाल्याच्या खुणा शरीर दाखवत होत.माझ्या डोळ्याची आग होत होती.भारतीताईनी गुलाबाच्या पाकळ्या पाठवल्या.पाण्यात टाकून त्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगितल.बाटलीतून ताकही पाठवलं.पोटात आग पडल्यासारखं वाटत होत.'.कॅन्टीनमधल जेवण तुम्हाला तिखट पडत. उद्यापासून उत्तरायण(आनंदवनमध्ये वृद्धांसाठी असलेली व्यवस्था.)मधल्या लोकांच्याबरोबर तिथल्या स्वयंपाकघरात जेवायचं.' भारतीताईंची आज्ञा झाली.दुपारी दवाखान्यातील भारतीताईंचे सहकारी विठ्ठल आले..'भारतीताईनी मड थेरपी करायला सांगितले.' म्हणत त्यांनी ती केलीही..भारतीताईनी सहकार्‍यानाही पूरक उपचार करण्यात योग्य त्या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पाठवून किंवा आनंदवनात तज्ज्ञ बोलवून तयार केल आहे.स्वत:ही निसर्गोपचार,होमिओपाथी,रेकी,अ‍ॅक्युप्रेशर यांचा  अभ्यास केला आहे.त्या योगशिक्षकही आहेत.आधुनिक वैद्यकाच बोट केंव्हा घट्ट धरायचं. पूरक उपचार केंव्हा,आणि किती वापरायचे याचे त्याना ज्ञान आहे. आणि भानही आहे.लेक्चर संपउन परतताना होणार्‍या गप्पातून त्यांची ही बहुश्रुतता लक्षात यायची.
                                     एकदा अशाच गपा चालल्या होत्या आणि त्या एकदम थबकल्या.'तुम्हाला सुगंध आला?' मी नकारार्थी मान हलवली.त्या मात्र तो सुगंध भरभरून घेत होत्या.तो कोणत्या फुलांचा आहे ते सांगत होत्या.त्यावेळचा त्यांचा खुललेला चेहरा अजून मला डोळ्यासमोर येतो.हल्ली त्यांची  फेसबुकवर अनेक  छायाचित्र असतात.ती पाहून माझ्या मेंदूने क्लिक केलेल्या त्यांच्या अशा विविध भाव मुद्रा माझ्या डोळ्यासमोर येतात आणि एवढ्या मुक्कामात मी त्यांचा एकही फोटो काढला नाही याची खंत  वाटते..त्याचं निसर्गाच आणि निसर्गाबद्दलच वाचन माझ्या हळूहळू लक्षात यायला लागल होत.त्याहिपेक्षा महत्वाच म्हणजे आपली पंचेंद्रिय,संवेदना किती बोथट झाल्या आहेत हेही समजत होत. त्यांच्याबरोबर वावरताना आपण किती खुजा आहोत आणि त्यांचा सहवास आपल्याला मिळतोय म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत अशा संमिश्र भावना असायच्या.त्यांच्या घरी ब्रेकफास्टला गेलेल्यावेळी त्यांच्या विविध पातळ्यांवरील व्यासंगाचा प्रत्यय आला.
                                रविवारी ओपीडी नसल्याने थोड निवांत होत.त्यांनी आम्हा दोघानाही घरी ब्रेकफास्टला बोलावलं.मुलगी शीतल, सून पल्लवी यांची ओळख झाली.भारतीताईंशी साहित्य,संगीत,सिनेक्षेत्र,समाजजीवन अशा विविध विषयावर मनमोकळ्या गप्पा झाल्या.त्याचं वाचन अफाट आहे.पुस्तकांचा संग्रहही मोठ्ठा आहे.आमच्या जेष्ठ नागरिक संघात महिला दिनानिमित्त्त्याने एक कार्यक्रम ठेवला होता.आम्ही पुण्यात पोचणार त्यादिवशीच तो होता.सभासद महिलांनी कर्तुत्ववान महिला निवडून तिच्यावर बोलायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई निवडल्या होत्या. आनंदवनमध्ये कॉलेज असल्याने तिथ त्यांच्यावरची पुस्तक मिळतील अस वाटल होत.मी याबाबत भारतीताईना सांगितलं त्या म्हणाल्या' माझ्याकडे आहेत ना मी देते.'खर तर त्यांची जागा बदलल्याने पुस्तक शोधण जिकिरीच होत.त्यांच्या व्यापातून त्याना तो त्रास व्हावा अस मला वाटत नव्हत.त्याना मात्र यात आनंद वाटत होता.संध्याकाळपर्यंत त्यांनी या दोघींवरची भरपूर पुस्तक माझ्या पर्यंत पोचवली.मी काही फ्लॉवर रेमेडीवर पुस्तक नेली होती.संध्याकाळी त्या न्यायला आल्या तर पुस्तक वाचून परतही दिली.
                                 लोटीराममधून बाहेर पडलो तर प्रभाताई चाफेकर,बाबांच्या मानसकन्या आणि  त्यांचे पती आणि काही पुण्याची मंडळीं येत होती.भारतीताईनी तेथेच वाकून  नमस्कार केला.प्रभाताई त्यादिवशी व्याख्यानालाही आल्या.वीस वर्षापूर्वीच त्या पुष्पौषधी शिकल्या होत्या.तेंव्हापासून त्या यशस्वीपणे वापरही करतात.त्यांच्या कडून भारतीताईंच खूप कौतुक ऐकल.
                               दुसर्‍या दिवशी होळी आणि नंतर रंगपंचमीला वर्ग घ्यायचा नाही अस ठरत होत. पण सर्वाना पुष्पौषधीची आवड निर्माण झाली होती.सर्वजण म्हणाले होळीला सकाळी सहा  ते आठ आम्ही येऊ.रंगपंचमी तर सकाळीच संपते.त्यांमुळे काही प्रश्न नाही.भारती ताई म्हणाल्या,' होळीला मात्र मला लवकर निघाव लागेल पोळ्या करायच्या असतात.' हे सांगताना त्यांचा चेहरा खुलला होता.मलाही त्यांनी पोळ्या लाटायला आमंत्रण दिल.लोटीरामच्या जवळच स्वयंपाकघर आहे.आदल्यादिवाशिपासूनच पुरणाचा वास सुटला होता.
                             दुसर्‍या दिवशी सकाळी सहापुर्वीच दीपकशिव न्यायला आले'.भारतीताई येऊ शकणार नाहीत.त्याना बर नाही त्यांनी मला फोन करून तुम्हाला घेऊन यायला सांगितलं.' वर्ग सुरु झाला तर ५/१० मिनिटात भारतीताई आल्याच.'मला राहवलं नाही म्हणून आले' म्हणाल्या.पूर्णवेळ थांबल्याही.
                            लेक्चर संपवून मीही स्वयंपाकघरात जायच ठरवल.इथल  स्वयंपाकघर ऐसपैस आहे.डायनींग हॉल, खोल्या आणि महत्वाचे म्हणजे लोकांची मन - सगळच ऐसपैस आहे.
स्वयंपाकघरात भारतीताईंसकट अनेक स्त्रिया होत्या. आनंदवनातील होत्याच शिवाय पाहुण्या आलेल्या प्रभाताई,गितांजलीही होत्या. मोठा गॅस होता. डोश्याचा असतो तसा मोठा तवा होता. ५/६जणी पुरणाच सारण भरुन गोळा तयार करत होत्या. ५/६जणी पोळ्या लाटत होत्या. आणि एकटी पोळ्या भाजत होती. एकवेळी ५/६पोळ्या भाजल्या जात होत्या. हे करताना गाणी, गप्पाही.भारतीताईनी 'वक्तने किया क्या हसी सितम' म्हटलं.एका टीव्ही चॅनलचे लोक मुलाखतीसाठी आल्याने भारतीताईना मधेच जाव लागल. बघता बघता ९/१० किलोच्या पोळ्या झाल्याही. जेवण तयारच होत.उत्तरायणमधल्या जेष्ठ नागरीकांची १० वाजता जेवणाचची बेल असते. आम्हीही ११.३०ला पुरणपोळीच सुग्रास जेवण जेवलो.गरमागरम पुरण पोळीवर आनंदवनातच तयार झालेल साजुक तुप. मला हरबर्‍याच्या डाळीचा त्रास होतो म्हणून भारतीताईंनी लक्षात ठेऊन तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या वाढल्या.
                               परतीचा दिवस जवळ आला.छान माहेरपणाच झाल होत.समारोपाच्या दिवशी डॉक्टर पोळ अध्यक्ष म्हणून आले होते.प्रभाताईही होत्या.कार्यक्रम हृद्य झाला.उगाच खोट खोट कौतुक नाही जे जस वाटल तस विद्यार्थी आपल्या मनोगतात सांगत होते.भारतीताईनी हा ग्रुप उत्तम नांगरणी  करून छान  तयार केलाय.त्यामुळे पेरलेल छान उगवत.फार थोड्या वेळात त्यांनी पुष्पौषधीच ज्ञान चांगल्याप्रकारे  आत्मसात केल.भारतीताईंमुळे त्यांच्यापर्यंत अस विविध प्रकारच ज्ञान येत याबद्दल त्याना कृतज्ञता वाटत होती.पाहुण्याना आणि आम्हाला दोघाना आनंदवनातल्या पानाफुलांपासून तयार केलेले पुष्पगुच्छ दिले.भारतीताईनी साडी आणि नारळांनी ओटी भरली.मला अवघडल्यासारखे झाले.प्रभाताई म्हणाल्या,'भारतींनी दिलेली साडी म्हणजे प्रसाद असतो.ती नेसल्यावर कोणतीही कामे सहजा सहजी होतात.'मी अशा गोष्टी मानणार्‍यातली नाही.पण ती साडी नेसली की मला मायेची उब जाणवते. कॉन्फिडन्ट वाटत.
                          निघायच्या दिवशी जेऊन दुपारी एक पर्यंत नागपूरला जायचं होत. भारतीताईंच्याकडे मुलीच्या सासरच्या कडचे पाहुणे आले होते.ते अह्दाबाद्ला जायचे होते.त्या गडबडीतही मी पर्किन्सन्स सपोर्ट ग्रुपचे काम करते हे माहित असल्याने त्या आनंदवन मधील १२व्या वर्षी जिला पीडी झाला आहे अशा मंजुळाला मला दाखवायला घेऊन आल्या होत्या.भारतीताई किती जणांच्या किती गोष्टी लक्षात ठेवतात याच मला अप्रूप वाटलं.गाडीत बसायच्यावेळी त्यांनी पटकन पोळीभाजीचा डबा दिला.तुम्हाला बाहेरच खाण झेपत नाही म्हणून दिला म्हणाल्या.वाटल होत आता पुन्हा भेट नाही व्हायची . पण आमचे काय ऋणानुबंध माहित नाही पुनःपुन्हा भेटी होत राहिल्या.
                          १ ऑगस्टला डॉक्टर विकास आमटे आणि प्रकाश आमटे याना मानाचा लोकमान्य पुरस्कार मिळाला.भारतीताईही आल्या होत्या.पुण्यात टिळकस्मारक मध्ये समारंभ झाला.मी आणि निरुपमा गेलो होतो.समारंभानंतर त्या सर्वाना भेटण्यासाठी झुंबड उडाली होती.आम्हीही गेलो.इतक्या गर्दीतही त्यांनी निरुपमा अमेरिकेहून कधी आली विचारल.माझा हात हातात घेऊन म्हणाल्या खूप बोलायचं आहे आता फोनवरच बोलू.
                         गणेश कलाक्रीडा मध्ये स्वरानंदवनचा दिवाळी पहाटचा  कार्यक्रम झाला.त्यात भारतीताईंचा सहभाग होता.स्वरानंदवनच्या उभारणीत त्यांचा हात आहे तसच तो उत्तम होतोय ना याकडे त्याचं बारकाईन लक्ष असत.कॉलेजजीवनात वक्तृत्व आणि स्टेज गाजविलेल्या ताईंच आनंदवनच्या कामात स्टेज मागेच पडल होत.३५ वर्षांनी मोठ्या समारंभाच्या स्टेजवर आल्याच त्यांनी सांगितलं.बाबांच्या आठवणीनी त्या सदगदित झाल्या होत्या. त्यांच्या  भावपूर्ण भाषणाने लोक प्रभावित झाले.मोगरा फुलला हे बाबाना आवडणार गीत त्यांनी गायलं.शेवटी त्या विलासभाऊ आणि स्वरानंदवनच्या चमूने गायलेल्या गाण्याने सर्वांची दिवाळी संस्मरणीय केली.आम्ही दोघे शेवटी त्याना भेटायला गेलो तर त्यांनी मला मिठीच मारली.याना वाकून नमस्कार केला.
                     फोनवर संपर्क असायचा.पुष्पौषधीचा उजळणी वर्ग घ्यावा अस त्याना वाटत होत.पर्किन्सन्सच्या लोकांची आम्ही आनंदवनला सहल नेणार होतो.निरुपमा आणि प्रकाश जोशी आमच्याबरोबर मदतीसाठी येणार होते सहलीला जोडून आम्ही दोघींनी उजळणी वर्ग घ्यायला जायचं ठरलं.पण त्यावेळी भारतीताईना नाशीकला जाव लागणार होत म्हणून आमचा उजळणी वर्ग रद्द झाला.आनंदवनात जायचं आणि भारतीताई नसणार याच वाईट वाटल.ठरल्याप्रमाणे आम्ही आनंदावनला पोचलो विकासभाऊंच व्याख्यान सुरु होत.आणि तेथे भारतीताईना  पाहून आम्ही चकितच झालो.काही कारणांनी त्या नाशिकला गेल्या नाहीत.जेवण घेऊन आमची सहल हेमलकसाला जाणार होती.भारतीताईंनी आम्हाला पुष्पौषधी उजळणीवर्ग घेण्यासाठी राहण्याचा आग्रह केला.सहलीला आलेल्या सर्वांनी आम्हाला परवानगी दिली.आम्हालाही .भारतीताईंचा सहवास हवाच होता.आम्ही दोघी राहिलो.भारतीताईंच्या सक्षम यंत्रणेद्वारे पटापट निरोप गेले. आणि व्याख्यानाला संध्याकाळपर्यंत १५/२० जण हजर झाले.काही जुने काही नवे.यावेळी त्या थोड्या हळव्या झाल्या होत्या.सून पल्लवी डिलिव्हरीसाठी माहेरी चालली होती बरोबर नात अस्मीही जाणार होती.अस्मीही सारखी त्याना चिकटून होती.पल्लवीची आई तिला न्यायला आल्या होत्या.या गडबडीतही आमच्या पार्किन्सन्स गटाला त्या आवर्जून भेटायला आल्या होत्या. पुष्पौषधी वर्ग सोडल्यास त्यांचा सहवास मात्र फारसा मिळाला नाही मिळाला नाही.ही उणीव त्यांच्या पुणे भेटीत भरून निघाली.
                                  गोंदवल्याला जाताना त्यांचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता आमच्याकडे रहायला आल्या.मला अजूनही हे स्वप्न असल्यासारखे वाटते.पूर्ण दिवस त्यांचा सहवास मिळाला.आमचा हास्यक्लब,गाण्याचा क्लास सर्वात त्यांनी सहभाग घेतला.खूप गप्पा झाल्या.गाण्याच्या क्लासमध्ये तर दोन गाणीही म्हटली.त्यांच्या साधेपणामुळे सर्वजण प्रभावित झाले.ज्वाला आणि फुलेची सीडी झाली आहे.त्यात त्यांची दोनगीते गायिली असल्याच चाली दिल्या असल्याच समजल.
                                   भारतीभारतीताईंच व्यक्तीमत्व खर तर चतुरस्त्र आहे.  उत्तम गायिका, संगीतकार, लेखिका, समिक्षक,संशोधक,वैद्यकीय क्षेत्रात शिक्षक अस कोणत्याही क्षेत्रात त्या अत्युच्च शिखर गाठू शकल्या असत्या. पण त्यांनी आनंदवनची सून बनून सर्व आयुष्य आनंदवनला देण पसंत केल.पडद्यामागे राहून आनंदवनच्या विविध कार्याची धुरा समर्थपणे पेलली.आता आनंदवनचा कारभार पहाण्यासाठी मुलगा, सून,मुलगी, जावई सज्ज झाले आहेत भारती ताईना  आपल्या आवडत्या छंदाना वेळ द्यायला फुरसद मिळू शकेल.आणि हे करण्यासाठी त्याना उत्तम आरोग्य लाभाव ही शुभेच्छा!