Friday 27 May 2022

आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                                आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                   आज आमच्या लग्नाला ५२ वर्षे झाली.पहिली २९ वर्षे या सहजीवनात आम्ही दोघेच होतो.गेली २३ वर्षे मात्र पार्किन्सन्स मित्र घुसला आहे.आमचे सहजीवन एक उघडे पुस्तक बनले आहे. निमित्तानिमित्ताने पार्किन्सन्सने आमच्याबद्दल खूप लिहायला लावले आम्हाला बदलवून टाकले. आज जरा त्याला न जुमानता आधीच्या २९ वर्षात रमावे असे वाटले.

                  नुकतीच बी.ए.झाले होते.अजून शिकायची इच्छा होती.पण पहिल्याच कांदेपोहे कार्यक्रमात लग्न जमले.शोभना रामचंद्र देशपांडेची शोभना गोपाळ तीर्थळी झाले.विवाहानंतर पुण्यात आलो.टिमवी कॉलनित मेजर दामले यांच्या विकास बंगल्यात ह्यांनी आधीच जागा घेऊन ठेवली होती.मोठ्या घरातून दोन खोल्यात रहायचे? पण त्या दोन खोल्या राहिल्याच नाहीत.दामले बाबा,दामले वहिनी,त्यांचा अख्खा बंगला,बाग आणि त्यांचे सर्व कुटुंबीय बघता बघता आमचेही झाले.प्रेम,धाक,त्याचबरोबर आम्हाला आणि आमच्या मुलीनाही उत्तम संस्कार मिळाले.मुलींसाठी समोर महराष्ट्र मंडळ शाळा,व्यायाम शाळा,कॉलनीतले वातावरण कुटुंबासारखे होते.मैत्रिणी मिळाल्या.वैदिक संशोधन मंडळाची लायब्ररी मिळाली.आणि छोट्या गावातून आलेली बुजरी,बेळगावी भाषा बोलणारी मी बघता बघता पुणेरी झाले.

                हे किर्लोस्कर न्यूमॅटीक मध्ये सर्व्हिसला होते.सकाळी सातला जायचे यायची वेळ नसायची.सुटीच्या दिवशी मात्र मोटारसायकलवर भटकणे व्हायचे. कात्रज, थेऊर, ओळखीच्या, नात्यातील लोकांकडे जाणे व्हायचे.कधी चक्क  मुंबईलाही.हे खूप वेगाने मोटार सायकल चालवायचे.ह्यांचे मित्र म्हणायचे वहिनी तुम्हाला भीती वाटत नाही का? पण मी आधी कधी अशी दुचाकी वाहनाच्या मागे न बसल्याने मला वेग काय असतो माहीतच नव्हते.सोनाली आणि देवयानी झाल्यावरही आम्ही त्या दोघींना घेऊन शिवाय सामान असे मोटार सायकलवर खूप फिरलो.श्रद्धाच्या वेळी पोटात कळा सुरु झाल्यावर आम्ही मोटार सायकलवर कर्वे रोडला डॉ.तेलंग यांच्या दवाखान्यात गेलो होतो.आजुबाजुचे म्हणायचे जावानी तुमच्यावर जाहिरात करायला पाहिजे.

              आम्हाला दोघानाही माणसांची आवड आणि साधेपणा हे साम्य सोडता आमच्या व्यक्तीमत्वात खूप फरक.हे नीटनेटके राहणारे मी थोडी गबाळी.मी सर्वांची सदैव काळजी करणारी तर हे बिनधास्त.मला हेच हवे तेच हवे,प्रत्येक गोष्ट हातात देणे अशी ह्यांची नवरेगिरी अजिबात नव्हती.स्त्री, पुरुष समानता अशा पोकळ गप्पा नव्हत्या पण प्रत्यक्षात आचरण मात्र समानतेचे.मला एकटी बाहेर जाण्याची, रस्ता क्रॉस करायची ही भीती वाटायची. याबाबत मात्र त्यांनी सक्ती केली.एकटी बाहेर जायला भाग पाडले.माझ्या मोठ्या बहिणींना माहेरी सोडायला जावे लागायचे आणि वडील परत पोचवायला यायचे माझ्या बाबतीत त्यांनी या दोन्ही गोष्टी बंद केल्या.मी तिन्ही मुलीना घेऊन रेल्वेने पुणे, मिरज आणि पहाटे झोपेत असलेल्या मुलीना उठवून गाडी बदलून मिरज ते खानापूर असे प्रवास सहजपणे करू लागले.रिझर्वेशनही मीच करून आणायचे.आधी राग यायचा पण माझ्याही नकळत त्यांनी मला आत्म निर्भर केले. त्यांनी कंपनीला वाहून घेतलेले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी,मुलींची आजारपण,शाळा प्रवेश,अभ्यास सर्व माझ्याकडे. मी नोकरी करत नसल्याने मलाही ती माझीच जबाबदारी वाटत होती.

               हे अचानक पूर्वकल्पना न देता कोणालाही जेवायला घेवून यायचे.कधीकधी कोणाला बोलावून ठेवायचे आणि स्वत: ऑफिसमधून खूप उशीरा यायचे.त्या लोकांशी बोलत मला स्वयंपाक करावा लागत असे.एकीकडे अजून का आले नाहीत. मोटारसायकलला अपघात तर झाला नाही न या काळजीत मी असे.एकदा तर हे येताना चिकन घेऊन येणार होते.पाहुणे आले. माझा चिकनची पूर्व तयारीसह  सर्व स्वयंपाक झाला तरी यांचा पत्ता नाही मला कानकोंड्यासारखे झाले. शेवटी हे आले अशा वेळी राग येण्यापेक्षा सुखरूप आहेत यामुळे हुश्श व्हायचे.यांच्या अनेक मित्राना या आठवणी नक्की असतील.

               आमच्या दोन खोल्यांच्या घरात पाहुण्यांची सारखी वर्दळ असे.पार्ट्या,नातेवायिक,ओळखीचे असे अनेकांचे कान्देपोह्याचे कार्यक्रम,साखरपुडा,लग्नाचे वऱ्हाड राहणे अशा अनेक गोष्टी व्हायच्या अर्थात यासाठी दामले बाबा वहिनी यांचे सहकार्य असे,आमच्या दोन खोल्या आणि बंगला यात मध्ये दार होते ते दिवसभर उघडे असायचे त्यांच्या हॉलमध्ये मोट्ठे कार्यक्रम व्हायचे जास्त पाहुणे आले की त्यांची वरची केबिन,जास्तीच्या गाद्या सर्व मिळायचे.आम्ही स्वत:च्या बंगल्यात जाईपर्यंत आमच्याकडे टी.व्ही.नव्हता.आम्ही सर्व बाबांकडेच टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचो.छोट्या खोलीत अंतर कमी असल्याने मुलींच्या डोळ्यावर परिणाम होईल असे बाबा म्हणायचे. १९७८ मध्ये यांचे आईवडील बेळगाव सोडून कायमचे आमच्याकडे आले.आम्ही मोट्ठे घर बघत होतो.एकीकडे बंगला बांधणे आणि मोठ्या घराचे डीपॉझीट,भाडे परवडणारे नव्हते.आता बंगला बांधताय तर तेथेच जा एकदम असे वहिनीनीनी पटवले.मालक आणि भाडेकरू यांच्यात साप,मुंगुस रिलेशन असते.पण आमचे तसे नव्हते.या संबंधावर वेगळा लेख लिहायला हवा.त्यांच्यामुळे अनेक कटू प्रसंगातून जावे लागले तरी आमच्या सहजीवनाला तडा न जाता ते अधिक घट्ट झाले.प्रेम विश्वास,निष्ठा अधिक पिळदार झाल्या.

             याच काळात मी टीमवी तून एम.ए.केले.संध्याकाळी क्लास असायचे.मुली त्यावेळी समोर व्यायाम शाळेत जायच्या.प्रत्येकांनी सारखे काहीना कामात असलेले याना आवडायचे.मी काही शिकण्यासाठी त्यांचा विरोध नव्हता.बायकोने सारखे घरात अडकून राहायला हवे असे वाटत नसे.मी एमफिल,पीएचडी करताना त्यांचा अहं आड आला नव्हता.उलट अभिमानच असायचा.बायकोला स्वातंत्र्य देतो असा आवही नसायचा.ते स्वत: डिप्लोमा इंजिनीअर होते. त्यांच्या कामानी त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.जनरल मॅनेजर पदापर्यंत ते पोचले होते.

              १९८२ मध्ये आम्ही स्वत:च्या बंगल्यात राहायला आलो.दामलेंचे घर सोडताना मी आणि वहिनी खूप रडलो होतो.आता मुलीही मोठ्या झाल्या होत्या.रस्ता ओलांडला की शाळा नव्हती.धाकटी दीड वर्षाचीच होती.मोठ्या दोघींना बसने शाळेतून यायला खूप वेळ व्ह्यायचा. ज्ञान प्रबोधिनीत जात त्यामुळे त्यांचे इतरही उपक्रम असत. पण ह्यांचे सातच्या आत घरात असे अजिबात नव्हते. गावाबाहेर घर. सामसूम असायची मला खूप काळजी वाटायची परंतु ह्यांचे म्हणणे असायचे लाखात एखादे उदाहरण घडते म्हणून मुलीना डांबून ठेवायच्या का? माझ्याप्रमाणेच ह्यांनी दिलेली मोकळीक आणि प्रबोधिनी यामुळे या मुलीही आत्मनिर्भर झाल्या.सायकलवर शाळेत आणि पुढे कॉलेजलाही जायच्या.कायदा मोडून १८ वर्षाच्या आत टूव्हीलर द्यायची नाही असे आम्हला वाटायचे. आम्ही दोघे कायम जमिनीवर असल्याने मुलींच्यावरही तेच संस्कार झाले.

            बंगल्याचे अर्धेमुर्धे काम झाले होते.बंगला बांधतानाही ह्यांनी घराची अनेक कामे मलाच करायला लावली.रिक्षाला खूप पैसे पडतात अशी माझी कुरकुर असायची पण हे म्हणायचे मी सुटी घेऊन पगार बुडवण्यापेक्षा रिक्षा परवडते.गुरुवारी ह्याना सुटी.तेंव्हा मात्र आम्ही बाहेर पडायचो.अनेक नर्सरीमधून झाडे आणली सुंदर बाग झाली.बागेची निगराणी सासरे आवडीने करायचे.येथे रस्ते झाले नव्हते,रिक्षावाले येत नसत.याना समाजकार्याची आवड येथल्या काही लोकांनी मिळून 'विकास समिती' स्थापन केली.यातून आजूबाजूची अनेक माणसे जोडली गेली.

             नवीन बंगल्यात आल्यावर श्रद्धा थोडी मोठ्ठी झाली आणि मी आयआयइत (भारतीय शिक्षण संस्था ) एमफिलला प्रवेश घेतला.दोन बस बदलून जावे लागत असे.मी आणि मुली एकाच वेळी बसने निघायचो. ह्याना गुरुवारी सुटी असायची. सुटीच्या दिवशी ते मला सोडायला आणि आणायला टू व्हिलरवर कोथरूडला यायचे.माझे लेक्चर चालू असले तर थांबून राहायचे.तिथल्या कर्मचार्यांशी त्यांची मैत्री झाली होती.प्रथम दर्शनी इम्प्रेशन पडणे हे त्यांचे वैशिष्ठ आहे. ते मलाच लिफ्ट द्यायचे असे नाही तर ऑफिसमधले वर्कर्स,वाटेत कोणी ओळखीचे दिसले तर थांबून लिफ्ट द्यायचे.आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीकडे जात,धर्म,वय,आर्थिक परिस्थिती, शिक्षण अशी कोणतीच लेबले न लावता माणूस म्हणून पाहतो.त्यामुळे आमचा सर्व स्तरातील लोकसंग्रह मोठ्ठा आहे.सपोर्ट सिस्टीम मोठ्ठी आहे.आमच्या सहजीवनातील हे मोट्ठे संचित आहे.ही इन्व्हेस्टमेंट आमच्या सेकण्ड इनिंगमध्ये उपयोगी पडत आहे.   

             आमच्या सहजीवनात यांनी गजरा आणणे,वाढदिवसाला भेटी देणे असे काही नव्हते.Romantic असे आमचे कपल नाही.गोतावळा जमा करण्यातच आम्हा दोघानाही आनंद असायचा.मी लग्नानंतर १५ वर्षांनी टीमवीत नोकरीला लागले.मे महिन्यात परीक्षा घ्यायला जावे लागे.लग्नाच्या वाढदिवसाला नेमके आम्ही एकत्र नसायचो.आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला हे इटलीला आणि मी कोल्हापूरला होते.माझ्या मुलीच्या सासुबाईना याचे खूप वाईट वाटले होते.

             यांनी कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास खूप केला त्यावेळी मात्र आमच्यासाठी तिथल्या खास वस्तू हे आणायचे. एकमेकाना आम्ही मोठ्ठी मोठ्ठी पत्रे लिहायचो.आमच्यात धुसपूस भांडणे असे नसायचे. याला कारण ही हेच. मी कधी आरडाओरडा  केला तर ते प्रत्युत्तर द्यायचे नाहीत.मी अपोआप गप्प व्हायची.मी वृत्तपत्रात,मासिकात लेखन करायची ते त्याना आवडायचे.माझे अक्षर चांगले नसल्याने पहिली कथा छापून आली तर माझे आडनाव तीर्थकी लिहिले होते. मग हे, कोठे लेखन पाठवायचे तर सुंदर अक्षरात लिहून द्यायला लागले.एका समजशास्त्र परिषदेसाठी माझा तेथे वाचण्या साठीचा रिसर्च पेपरही त्यांनी सुंदर अक्षरात लिहून दिला.त्याचे खूप कौतुक झाले. तोवर ते निवृत्त झाले होते.ते स्वत: कार ड्राईव्ह करत रत्नागिरीला आले होते.त्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो.आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आमचे दोन दिवसाचे संपर्क सत्र होते तर ते तेथेही आले.त्यांच्या अशा माझ्या नोकरीतील पूर्ण सहकार्याची आठवण आजही माझे सहकारी काढतात.

               मला नोकरीच्या निमित्ताने संपर्क सत्रांना,परीक्षेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जावे लागे.खरे तर यापूर्वी १५ वर्षे मी पूर्ण वेळ दिमतीला असण्याची सर्वाना सवय होती.परंतु माझ्या नोकरीतील कामांमुळे आमच्या सहजीवनात कोणताही ताण तणाव आला नाही.कोणतीही कुरकुर न करता सासरे,हे आणि मुली व्यवस्थित निभावून नेत.

                या सर्व काळात सासू,सासर्यांचे आजारपण, मृत्यू,मुलींची शिक्षणे,लग्ने,नातवंडांचे आगमन अशा अनेक गोष्टी घडल्या. चारचाकी आली.मुलींसह अलिबाग,गोवा,खिदरापूर,लोणावळा अशी भ्रमंती होत राहिली.आमची अमेरिका ट्रीप झाली.केरळ झाले.केसरीबरोबर नैनिताल,काश्मीर झाले.आता खूप फिरायचे ठरवले होते. पण माझे कमरेचे दुखणे सुरु झाले आणि ते शक्य झाले नाही.

               २९ वर्षांचा काळ खूप मोठ्ठा आहे.अनेकानेक आठवणीत रमले पण ते लिखाणात नेमकेपणाने आणणे काही जमले नाही.आम्हाला बरेच जण विचारतात तुमचे लव्हमॅरेज का? ठरवून केलेले लग्न एक मटकाच असतो असे म्हटले जाते.आम्हाला तो लागला.आमचे जीवन कृतार्थ,समाधानी,आनंदी आहे.सगळे काही आलबेल होते असे नाही थोडा खट्टा थोडा मिठा असतेच पण आमचा सहजीवनाचा पाया श्रद्धा,प्रेम विश्वास,निष्ठा यांच्या भक्कम पायावर उभा असल्याने त्याला तडा गेला नाही.वेळोवेळी प्रतीकुलतेला अनुकुलतेत बदलून घेणे आम्हाला जमत गेले.जुन्या जखमा व्रणसुद्धा न ठेवता भरून आल्या.काही जण आमच्या सहजीवनाला रोलमॉडेल मानतात.त्यामुळे इतरांनाही आमचे सहजीवन यशस्वी वाटत असावे. 

             आत्ता तेवीस वर्षे पार्किन्सन्स आमच्यात घुसला आहे.आमच्या निवृत्तीनंतर कामाची क्षेत्रे वेगळी असल्याने वाटा बदलल्या असत्या.पण पार्किन्सन्सने आम्हाला त्याच्या भोवतीच घोटाळत ठेवले आहे. ही प्रतीकुलताही आम्हाला अनुकुलतेत बदलायला जमले आहे.याला आपल्यात सामावून कसे घ्यायचे आणि त्याच्यासह आनंदी कसे राहायचे हे इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत पोचवायचे हे आमचे जीवन ध्येय बनले आहे. 

               पाहिलत या पार्किन्सनला थोडा वेळ बाजूला ठेवायचे ठरवले होते पण नकळत आलाच.आता सहजीवनाचा भागच झालाय. ये बाबा.