Friday 11 October 2019

असाही अनुभव

                      कालचीच गोष्ट.मी डॉक्टरकडे गेले होते हे घरी एकटेच होते.आणि गॅस सिलेंडर आला.खर तर मी गॅससाठी नंबर लावला आणि दोनचार दिवसांनी गॅस येईल असा मेसेज आला तेंव्हा आम्ही मुलीकडे होतो. मला वाटले आता पुन्हा नंबर लावावा लागणार.मी डॉक्टरकडून आल्यावर नंबर लावायच्या विचारात होते आणि गॅस आला होता.गॅसवाल्या माणसांनी गॅस दिला आणि  कार्ड, पैसे देणे आपल्याला शक्य नाही असे माझ्या यजमानांच्या लक्षात आले.त्यांनी सांगितले १० /१५ मिनिटात माझी पत्नी येईल आणि पैसे देईल.मी पैसे घ्यायला नंतर येतो म्हणून गॅसवाला गेला.आम्ही उशीरापर्यंत वाट पाहिली पण तो आलाच नाही. आज संध्याकाळी तो पैसे न्यायला आला.मी त्याला म्हटले काल तुमचा हिशोब द्यावा लागला असेल ना? तो 'म्हणाला मी माझ्याकडचे पैसे दिले.आज्जी नेहमीची माणसे पैसे कुठे जातात?' मला त्याचे कौतुक वाटले.त्याचे नाव अमजत खिलजी.अनुभव शेअर करावासा वाटला.          

Sunday 25 August 2019

रेडिएशनचा आनंददायी अनुभव

                                         रेडिएशनचा आनंददायी अनुभव.
                    'कॅन्सर मग नो अन्सर!' आज विज्ञानाने कॅन्सरसाठी उत्तरे शोधून हे विधान खोटे ठरवले असले तरी समाज मनात मात्र कॅन्सर या नावाचा घेतलेला धसका आणि भ्रामक समजुती तशाच आहेत.हॅरी पॉटर मधल्या व्हिलन व्होल्डमार्टचा दरारा इतका असतो की त्याचे  नाव न घेता He who must not be named संबोधले जाते तसेच मला कॅन्सरबाबत समाजात दरारा असल्याचे जाणवले.लोक नाव देखील उच्चारत नाहीत.
 कॅन्सर माझ्यापर्यंत पोचला आणि त्यातले वास्तव इतके भयानक नाही हे जाणवले.Oncologist ची पायरी चढल्यावर त्यातही किमो,रेडीएशन, सर्जरी अशा तीन शाखांचे वेगवेगळे तज्ज्ञ असतात हे समजले.पेशंटच्या आजाराचे स्वरूप अवस्था,वय अशा विविध गोष्टी विचारात घेऊन उपचार ठरवले जातात.माझ्यासाठी सर्व तज्ज्ञांच्या एकत्र विचारातून रेडीएशनची निवड झाली.
तुम्हाला ५ आठवडे सोमवार ते शुक्रवार रेडिएशन थेरपी घ्यावी लागेल. असे डॉक्टरांनी सांगितले तेंव्हा 'बापरे इतके दिवस घर ते रूबी हॉस्पिटल करायचे म्हणजे शींगरू मेल हेलपाट्यांनी असंच होणार' या कल्पनेनीच मी दडपून गेले.पण बघता बघता रेडिएशन थेरपी चे ५ आठवडे संपले देखील आणि  प्रत्यक्षात हा अनुभव आनंददायी ठरला.ही आनंदाची लागण हळुहळु झाली.माझ्या  अनुभवावरून ती इतरांना सुरूवातीपासून व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच.
पहिल्या दिवशी रूबीच्या कॅन्सर सेंटरमध्ये शिरतांना मनात अनामिक हुरहुर,धास्ती होती.आत शिरल्यावर कॅन्सरच्या खुणा दाखवणारे अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी हॉल भरलेला होता.आता मीही एक कॅन्सर पेशंट आहे या वास्तवाने मन अधिकच दडपून गेले.
Oncologist Doctor मानसी मुन्शी यांच्या प्रसन्नचित्त आणि आश्वासक दर्शनाने दडपण थोडे कमी झाले.
रेडिएशनचा पहिला दिवस.तळघरातल्या तळघरात रेडिएशन टेबलवर माझी पोझीशन adjust झाल्यावर आरामसे पडे रहो.हिलना मत असे सांगण्यात आले.आता मी एकटीच तेथे होते.मी डोळे गच्च मिटून घेतले.भोवती फिरणाऱ्या मशीनचा ईरीटेटींग आवाज येत होता.श्वासोच्छ्वाकडे लक्ष देणे,ते मोजणे सुरू केले.२५० श्वास झाले आणि 'उठो आपका हो गया' सीस्टर सांगत होत्या.उठल्यावर थोडे गरगरत आहे वाटले.सीस्टरनी हात धरून वर सोडले.
दुसरे दिवशी कानात कापसाचे बोळे घालून आले.डोळे गच्च मिटलेलेच.
तिसरे दिवशी भरपूर पाऊस आणि हवेत गारवा.त्यात एसी.आणि तो सेंट्रलाईज असल्याने कमी करता न येणारा.मला हुडहुडी भरली.हातपाय थंड पडले.उठल्यावर पायात बुट घालता येईनात.दुसऱ्या दिवशी मी पायात मोजे आणि डोक्याला रूमाल बांधून आले.न सांगताच सीस्टरनी हळुवारपणे  पायावर एक बेडशीट ची घडी आणि त्यावर blanket घातले.छातीवर blanket ची घडी घातली.उब आली.तिची स्नेहार्द नजर प्रेमळ स्पर्श सुखावून गेला.आज माझे डोळे न कळत उघडे राहिले.कानात बोळे घालायला ही विसरले होते.प्रथमच  छतावर निळ्याशार आकाशात शुभ्र पिंजलेल्या कापसासारखे ढग दिसले.
मी डोळे उघडेच ठेवले.छतावरचे ढग,आकाश सुखावू लागले.रेडिएशन प्रक्रिया करणारी यंत्रे रोजच्या सारखाच आवाज करत होती.पण त्यांने इरीटेड न होता मला त्यात एक लय,ताल जाणवू लागला.आणि शब्दांकीत होऊन ऐकु येऊ लागला.सीस्टर अनीस आणि टेक्नीशीयन काशीनाथ आत आले.नेहमीप्रमाणे मला उठून बसण्यासाठी आधार दिला.आज हे दोघेही मला एंजल वाटत होते.
चक्कर आती है?अनीसने विचारले.मी मानेनेच नकार दिला.प्रथमच मी रेडिएशन हॉल स्वच्छ नजरेने पाहिला.समोरच्या मोठ्या भिंतीवर पाईन, चिनार वृक्ष होते.रेडिएशनला येणाऱ्यांचे मन प्रसन्न
राहावे असा प्रयत्न  होता.आधाराशिवाय वर आले.
 आता रोज रेडिएशन ला येतांना पाषाण ते रूबी पर्यंतच्या रस्त्यावरील हिरवीगार झाडी,मधुन मधुन फुललेले गुलमोहोर दिसु लागले.कुठेतरी सहलीला चाललोय असे वाटू लागले.खरे तर सर्व तेच होते.मी घट्ट मिटलेले डोळे उघडल्यावर मनाची कवाडेही उघडली.
रेडिएशन प्रक्रिया यांत्रिक न राहता  चैतन्यमय होऊ लागली.सीस्टर अनीसचे प्रेमाने हसून स्वागत करणे,कैसी हो? अशी विचारपूस करणे, हळुवार पणे ब्लडप्रेशर घेणे.मनापर्यंत पोचू लागले.तंत्रज्ञ काशीनाथ मधला सह्रदय माणूस दिसू लागला.रेडिएशन बेड,यंत्रेही सजीव वाटू लागली.रेडिएशन प्रक्रिया आनंददायी झाली.यानंतरच्या दोन Brachy ही सहजपणे पार पडल्या.भिती,हुरहुर अशा नकारात्मक भावना गेल्या.
   आजारावषयी,त्यावरचे उपचार आणि साईड इफेक्ट विषयी इतके गैरसमज,भ्रामक समजुती आहेत.की त्या घाबरवून सोडतात.आणि आजारापेक्षा त्याच नुकसान करतात.माझे चक्कर येणे हे भितीतूनच होते असे मी आता म्हणू शकते.
अनीसनी ठेवलेल्या ब्लडप्रेशर नोंदी पाहिल्या तरी लक्षात येईल की सुरूवातीला बीपी थोडे हाय असायचे ते १२० /८० असू लागले.आनंदी असण्याने उपचाराला ही चांगला प्रतिसाद मिळत असणार नक्की.आपल्या मनातील वृथा भिती टाकून आनंदाने उपचाराला सामोरे जा असे मी माझ्या अनुभवावरून सांगु शकते.
 फोटो १ - रेडीएशन हॉलमध्ये सिस्टर अनिस आणि टेकनिशीएन काशिनाथ सह
फोटो २ - माझ्या आधी रेडीएशन घेऊन हसतमुखाने बाहेर पडणाऱ्या नीलिमा देसाई




रेडिएशन चालू असताना, यंत्रांच्या आवाजातून मला ऐकू आलेले शब्द आणि स्वर. मी ते माझ्या आवाजात रेकॉर्ड केले ते असे -


Saturday 24 August 2019

टोपणनावाची गोष्ट

                                                 टोपणनावाची गोष्ट
                          काल मुलीकडे फोन केला तर तिच्या भाच्याने उचलला.आणि झेन आज्जीचा फोन आहे सांगत आपल्या आजोबाना दिला.झेन आज्जी हे मला माझ्या नातवाने दिलेले टोपण नाव.लहानपणापासून मला कोणतेच टोपण नाव नव्हते. ते नातवांनी बहाल केले.माझा नातू क्षितीज त्याच्या बाबांच्या आई वडिलाना आज्जी, अब्बू म्हणायचा  मग आम्हाला काय म्हणायचे? लहानपणापासून त्याला गाड्यांची आवड होती.तशी हल्ली बहुतेक लहान मुलाना असते. आमच्याकडे झेन होती म्हणून ह्यांना तो झेन अब्बू म्हणायला लागला.आणि मी मग झेन आज्जी झाले.माझ्या मुलीच्या सासरी सर्वांच्या तोंडी हेच नाव झाले.
माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.घरी गाडी असल्यावर ती चालवण्याचा मोह व्हायचा म्हणून शेवटी गाडी विकली.
आम्हाला टोपण नाव देणारा नातू आता इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.आता तो स्वत: गाडी चालवतो.
झेन गेली तरी आम्हाला अजून तो आणि  इतरही झेन आज्जी, झेन अब्बुच म्हणतात.हे नाव आम्हाला चिकटलेलेच राहिले आणि राहणार. 
(महारष्ट्र टाईम्स मध्ये छापून आले.)

Friday 8 March 2019

महिला दिनानिमित्ताने

                               जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांच्याब्द्द्लाचा लेख प्रसिद्ध केला होता आज महिला दिनाच्या निमित्ताने बहिणाबाईना अभिवादन.


           ही म्हणजे कविता. हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे तिच्या कवितेबद्दल बोलायचं
.' कवितेचे दळण दळून अनेकांनी मांडले पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचे जीवन भरडले जात असताना त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी एखादी' असं पु ल देशपांडे म्हणतात
           'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावणारा चमत्कार आहे' असं आचार्य अत्रे म्हणतात
अनेकानेक विचारवंत तिची स्तुती करताना थकले नाहीत. नमुन्यासाठी वरील दोन उदाहरणे पुरेशी आहेत
               हा चमत्कार घडला तरी कसा ती म्हणते
                'माझी माय सरोसती मला शिकवते बोली
               लेक बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली'
ही गुपित बाहेर कशी  येतात, ऐका.
             ' अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी
              तसं तसं माझं गाणं पोटातून येत होटी'
 विठोबाच,रामाच मंदिर याच माझ्या शाळा असं ती म्हणते.. निसर्गातही तिला मग भजन दिसतं. तानक्या सोपानाला हऱ्यात निजवून तो हारा डोक्यावर घेऊन ती शेतात निघायची तिच्याबरोबर तिचं काव्यही
विषय पुरवायला आजूबाजूचा निसर्ग माणस होतीच.  ' ऊन वार्‍याशी खेळता एका एका कोंबातून
                    पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
                     टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी'
  घरी आल्यावर तव्यावर भाकरी टाकताना ही हिला काव्य सूचाटे.
                   'बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
                    आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर
                   ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार
                  देतो दुःखाले होकार आणि सुखाले नकार'
             एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान सारखी हिच्या मुखातून सुभाषित बाहेर पडतात
                 - ज्यातून कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणू नये ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये
                    - इमानाला जो विसरतो त्याला नेक म्हणू नये
                     जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये

                      ' आला सास गेला सास देवा तुझं र तंतर
                       अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर'
 असं जगण्या-मरण्याचा तत्वज्ञान समजल्यामुळे ती पतिनिधनानंतर रडत बसत नाही
                   ' जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतुत
                      तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ
                      नका नका आया बाया करू माझी कीव
                      झालं माझं समाधान आता माझे मला जीव'
 प्रत्यक्षातही तिने  मोठ्या धिराने दोन लहान मुलांना वाढवलं, घडवलं.
                    ' येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
                       काम करता करता देख देवाजीच रूप' असं म्हणत ती काम रेटत राहिली. कामाच्या रगाड्यात ती सहजपणे आजूबाजूचे बदल न्याहाळत होती कवितेतून मांडत होती नुकताच छापखाना सुरू झाला होता,
                    ' माणसा परी माणूस राहतो रे येडजना
                     होतो छापिसनी कोरा कागद शहाणा'
 प्लेगची साथ आली त्याबद्दल ती म्हणते,
                   ' पिलोक पिलोक आल्या पिलोका च्या गाठी
                      उजाडलं गाव खया मयामधी भेटी'
 माणसाच्या स्वार्थाची तिला चीड .येते.
                   'अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?' असं ती विचारते
                     ' जवा ईमान सचोटी पापामध्ये बुडाली
                       तेव्हा याच माणसाने किल्ल्याकुलूप घडले.
                      किल्ल्या राह्यल्या ठिकाणी जवा तिजोऱ्या फोडल्या.
                       तवा याच माणसाने   बेड्या लोखंडी  gघडल्या.
  अशा या   माणसाचा मनाबद्दल ती म्हणते,'
                      मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
                      किती हाकला हाकला फिरी येते पिकावर
                      मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर
                      आरे इचू साप बरा तयाले उतारे मनतर
                      मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
                     आता व्हत भुइवर गेल गेल आभाळात
                      मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
                      मन केवढं केवढं आभायात बी मायेना
                 संत-महात्म्यांच्या रांगेत बसणारी असं हे मनाचं वर्णन.
        देव कुठे याबाबत ही ही अडाणी बाई एखाद्या तत्वज्ञाना शोभेल असं काव्य लिहिते.
                 ' सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला
                   अरे सोतामदी  त्याला देव दिसला दिसला
                    स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला
                    अरे दगडात त्याले  देव दिसला दिसला
                    डोये मिटले मिटले स्वतःला विसरला
                   अरे अंधारात त्याला देव दिसला दिसला
                    देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया माझार
                    देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार'
 तिचं जगणं एक कविता होती. तीच मोल न समजल्याने काळाच्या ओघात बरच काव्य नष्ट झालं. थोडफार मुलांनी लिहून ठेवलं ते आज उपलब्ध आहे तेच इतकं अनमोल सर्व उपलब्ध झाला असता तर? बहिणाई तुझ्या जगण्याला, तुझ्या काव्याला आणि तुला सलाम

                     

Tuesday 12 February 2019

ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी लेखिका - प्रतिभा रानडे - पुस्तक परिचय

  •            नोव्हेंबर १९९८ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशी झाली.अवघ्या सह महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.दरम्यानच्या काळात या दोघींमधल्या गप्पा चालूच होत्या.त्यातला महत्वाचा वाटणारा भाग लेखिका आणि प्रकाशक यांनी तत्परतेने दुसऱ्या आवृत्तीत वाचकांना उपलब्ध करून दिला.
                        या   गप्पा आहेत दोन प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या विदुषी मधील त्यातील एक दुर्गाबाई या खाष्ट विदुषी म्हणून सर्वांना परिचित आहेत. शिवाय त्या मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ लोकसाहित्याच्या भाष्यकार, ललित लेखिका .संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन अशा विविध भाषेत निष्णात आहेत ७० वर्षे त्या विविध विषयावर लेखन करीत आहेत. दुसऱ्या विदुषी प्रतिभा रानडे  प्रथितयश लेखिका आहेत, जिज्ञासू आहेत अभ्यासू आहेत, देश विदेश फिरलेल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी सभोवतालचं जग न्याहाळताना जे जाणवलं त्यावर धीटपणे आपली मतं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलेली आहेत बदनसीब, अफगाण डायरी, स्त्री प्रश्नांची चर्चा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांचा अभ्यास या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या दोन विदुषी मधील गप्पा असूनही विद्वज्जड , तर्ककर्कश नाहीत, चौकटीबद्ध ही नाहीत. आहे ती चौकट ऐसपैस शब्द वापरून त्यांनी लवचिक करून घेतली आहे एकनाथांनी भारूडातून जसे सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचवले तसे प्रतिभाताईंनी दुर्गाबाईंचा व्यासंग, ज्ञानसाधना, तत्वचिंतन, संशोधन, निसर्गाचे हळुवार वर्णन करत त्याचा घेतलेला शोध हे सर्व काही गप्पांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, समाजसेवक, सर्वसामान्य या सर्वांनाच भावेल असे हे पुस्तक आहे
                           पुस्तकाची विभागणी पाच प्रकरणात केलेली आहे. पहिल्या भागात संस्कृती शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, वाटचाल, मीथक कथांचे समाजाच्या दृष्टीने महत्त्व, दशावतार कल्पना, तांत्रिक पंथ याबाबतच्या गप्पा आहेत पाषाणयुगापासून आज पर्यंतच्या संस्कृतीबाबत चर्चा करताना शेवटी मुक्त विचार हा संस्कृतीचा आधार आहे असे मत दुर्गाबाई व्यक्त करतात. यापुढे म्हणतात मुक्त विचारांची जपणूक करणे हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. विचारवंत लेखकावर कोणतीही बंधने आली की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते ती येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य सुस्थिती राजकीय स्थिरता या गोष्टी आवश्यक. संस्कृतीच्या साखळीत एकातून दुसरे निघत वाढत गेले पण प्रत्येक टप्प्यावर निसर्गाशी नातं कुठे तुटलं नाही आजच्या काळात मात्र आपण निसर्गाशी नातं तोडत आहोत माणूस सारखा निसर्गाला ओरबाडून घेतोय याची त्यांना खंत वाटते. संस्कृती वरून गप्पांचा ओघ  मिथककथा कडे येतो. त्यांच्या मते समाजाची सांघिक जाणिव, संवेदना या मिथककथातून प्रगट केल्या जातात. जगात प्रथम मिथक कथा भारतात रचल्या गेल्या आणि तेथून त्या जगभर पसरल्या मिथककथातून  अध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. जीवनाचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न असतो. दुर्गाबाईंनी वाचायला सांगितलेल्या' पावर ऑफ मीथ' चा हवाला देऊन प्रतिभाताई सांगतात अमेरिकन समाजात मोठ्या प्रमाणात हिंसा व क्रौर्य आहे. याचे कारण त्यांच्याकडे सशक्त समृद्ध अशा मिथक कथा नाहीत. गप्पांमध्ये मग दशावतार, विठोबा, पदूबाई, जगन्नाथ पुरी ची लक्ष्मी, सावित्री इत्यादी मिथककथा येतात व वाचकांची उत्कंठा वाढवत जातात या कथा सांगताना साहित्यात नित्य कथा रचण्याची शक्ती ज्याप्रमाणे अधिक आणि सातत्याने चालते त्या प्रमाणात ते साहित्य समाज अधिक चैतन्यमय वर्धिष्णू असतो, असे भाष्यही त्या  करतात पुढे संस्कृतीचा महत्त्वाचा भाग अशा तांत्रिक पंथाची चर्चा सुरू होते.