Sunday 17 March 2024

मर्म बंधातली ठेव ही - १०

                                            मर्म बंधातली ठेव ही  -  ९

                         फेसबुक मेमरीत आर्यचा Fancy dress मधील 'कोलगेट पेस्ट' बनलेला फोटो आला आणि मी त्याच्या जुनिअर केजीच्या गॅदरिंगमध्ये पोचले.त्यावेळी तो मंडाले लाईन आर्मी क्वार्टर मध्ये राहायचा. भोसले नगरच्या डेकेअर सेंटर कम केजी स्कूल मध्ये जायचा.त्याच्या गॅदरिंग,ग्रांडपेरंट डे अशा सर्व कार्यक्रमाना आम्ही जायचो.तो नर्सरीत असताना थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही गेलो.कार्यक्रम संपत आला तरी आर्य स्टेजवर येत नव्हता. श्रद्धा पाहायला गेली तर टीचर म्हणाल्या तो स्टेजवर जायला तयारच नाही.आम्ही इतक्या लांबून आलो आणि आमचा विरस झाला असे श्रद्धाला वाटले.आम्ही मात्र इतर मुलांचे कार्यक्रम एन्जॉय केले होते.लेकीचा आणि नातवाचा सहवास मिळाला यांनीही खुश होतो.तो दुपारी झोपला नव्हता आणि त्यावेळी तो झोपेला आला होता असे मला लक्षात आले.

                     दुसर्या वर्षीच्या  गॅदरिंगला आम्ही सकाळीच गेलो मी पुष्पौषधीचे प्रयोग नुकतेच करत होते.त्याला सकाळी पासून लार्च आणि मिम्युलस ही भीती घालवणारी आणि आत्मविश्वास आणणारी औषधे दिली.तो एका ग्रुप डान्समध्ये होता. कसाबसा स्टेजवर आला रडत रडत परफॉर्म करून गेला.मी आधी विंगेत त्याला भेटायला गेले होते.तेथे लहान मुले,पालक,शिक्षक असा एकच गलबला होता.वेगळ्या मोठ्या शाळेच्या हॉलमध्ये   गॅदरिंग होते..मी गेल्यावर त्याने माझा हात घट्ट धरला.त्याला भीती पेक्षा असुरक्षितता वाटते असे लक्षात आले.तिसऱ्या वर्षी मी दोन दिवस आधीच जाऊन राहिले.त्याला आधीच्या औषधाबरोबर असुरक्षिततेसाठी पुष्पौषधी दिली.स्टेजवर बोलायचेही होते.त्याचे पाठांतर छान झाले होते.श्रद्धानी त्याला कोलगेट पेस्ट बनवले होते.मी त्याला दुपारी दिडदोनलाच गोष्ट सांगत झोपवले होते.जाताना तो अगदी फ्रेश होता.मलाच टेन्शन होते.तो ऐटीत स्टेजवर आला I am Colgate हे पहिले वाक्य धीटपणे म्हटल्यावर मलाच हुश्श झाले.पुढचे सर्व निट म्हणून नमस्कार करून तो विंगेत आला.टाळ्यांचा कडकडाट झाला.

             त्यानंतर शाळेत,गणपती उत्सवात त्यांनी कविता,बासरीवादन, गीटार वादन असे अनेक कार्यक्रम केले.इंटरस्कूल क्विज काम्पीटेशन मध्ये शाळेला करंडक मिळवून दिला.हे सर्व माझ्या पुष्पौषधीशिवाय बर का! आता त्याची गगन भरारी चालूच आहे.अशीच राहूदे यासाठी खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.

May be an image of 2 people, people smiling and text


                   

   

Thursday 1 February 2024

मर्म बंधातली ठेव ही - ९

                                                   मर्म बंधातली ठेव ही  -  ९

                     सोबतचे फोटो ओळखता येतात का कुठले आहेत ते? आपल्या पुण्यातीलच आहेत.'आपले पुणे' या फेसबुक ग्रुपमध्ये खूप वर्षापूर्वीच्या पुण्याचे फोटो येत असतात.बदललेले पुणे पाहून गंमत वाटते.हे फोटो ६/७ वर्षापूर्वीचे आहे. पण फोटोत दिसणारे पुणे आता तसे राहिले नाही.बऱ्याच दिवसांनी स्वारगेट जवळच्या ओव्हरब्रिज वरून जाण्याचा प्रसंग आला आणि आर्यने काढलेले हे फोटो आठवले.

                   आठ वर्षाचा आर्य शाळेतून आलेला असायचा.त्याला जेवायला घालून लगेच पार्किन्सन मित्रमंडळाच्या सभेला आम्हाला जायचे असायचे. रिक्षात त्याचे अखंड बडबडी बरोबर अनेक उद्योग चालायचे.त्यातला मोबाईलवर फोटो काढणे हा असायचा.त्याचे फोटो पाहिल्यावर हे पुण्याच्या गजबज असलेल्या ठिकाणचे आहेत असे वाटतच नाही.सुंदर निसर्ग दिसतो. आता त्याच ठिकाणी मेट्रोचे काम चालले आहे.त्याचे दर्शन होते.एकुणात बदलाचा वेग वाढला आहे हे खरे.

 May be an image of horizon, fog and tree

May be an image of fog and tree

May be an image of tree, horizon and fog

                 May be an image of fog, tree and horizon

Thursday 18 January 2024

मर्म बंधातली ठेव ही - ८

                                         मर्म बंधातली ठेव ही  -  ८

                       डॉ.अविनाश बिनीवाले यांना 'महाराष्ट्र भारतीय शिक्षण संस्थे'चा जीवन गौरव पुरस्कार मिळाला.हा समारंभ वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या हॉलमध्ये होता.याच हॉलमध्ये माझा नातू आर्यचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला होता.मला त्याची आठवण झाली.त्याचे बासरीचे गुरु पंडित रमेश गुलानी यांच्या लहान मुलांपासून ८० वर्षांच्या आजोबापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा तो कार्यक्रम होता.पंडित गुलानींचा तो लाडका विद्यार्थी होता.त्यावेळी तो नउ वर्षांचा असेल.

                     श्रद्धाला आम्ही दगदग करून कार्यक्रमाला येऊ नये असे वाटत होते पण नातवाचे कौतुक पाहायला जाण्याचा आम्हाला उत्साह होता.पहिल्या तीनचार मुलांचे बासरी वादन झाल्यावर आर्यचा नंबर आला. तो स्टेजवर चढत होता तेंव्हा मलाच धडधडत होते.त्याने अगदी आत्मविश्वासाने दोन गाणी वाजवली एक 'हम होंगे कामयाब' आणि दुसरे 'अजीब दास्ता है ये' टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यापेक्षाही त्याच्या गुरूंच्या चेहर्यावर दिसणारे कौतुकाचे भाव मोलाचे वाटले. त्याचे नाव पुकारल्यापासून ते भाव होते.

                     अगदी पहिल्या भेटीपासून हे गुरु शिष्य एकमेकांना आवडत होते.बासरी शिकणे हा आर्यचाच निर्णय होता. त्याच्या आर्मी पब्लिक स्कूल मध्ये संगीताच्या तासाला वेगवेगळ्या वाद्यांची ओळख करून दिली होती.आर्य बासरी आणण्यासाठी मागे लागला हे तात्पुरता खूळ असेल म्हणून अगदी खेळातली वाटणारी बासरी श्रद्धाने आणून दिली.आर्यने स्वत:च ट्यून बसवायला सुरु केली.जनगणमन बसवले.याला खरच आवड आहे हे लक्षात घेऊन गुरूंचा शोध चालू झाला आणि मायलेक नेण्या आणण्यास सोयीचे असलेल्या शिवाजी नगरच्या पंडित गुलानिंच्या पर्यंत पोचले.आकाशवाणीचे ते स्टाफ artist होते.निवृत्तीनंतरही आकाशवाणीच्या सामजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात ते सहभागी होत. नेत्रहीन होते.या गिफ्टेड कलाकाराचे  संगीत क्षेत्रात नाव होते. कसे कोण जाणे दोघांचे सूर पहिल्याच भेटीत जुळले.क्लास सुरु झाला.आर्य अनेक गाणी वाजवू लागला.कुणी वाजव म्हटल्यावर आनंदाने वाजवायचा कौतुक होऊ लागले.सोसायटीच्या कार्यक्रमात,शाळेत बासरीवादन होऊ लागले घरातल्यांच्या वाढदिवसाला Happy birthday to you ची धून वाजू लागली.

               सगळे छान चालले होते आणि श्रद्धा गोळीबार मैदानाला राहायला आली.क्लासला लांब जाणे शक्य नव्हते. जवळचा क्लास शोधायचा प्रयत्न झाला.पण आर्यला कोणीच पसंत पडत नव्हते.करोना नंतर गुरुनी ऑनलाईन क्लास सुरु केला.आर्य खुश झाला.पण त्याच्या आनंदावर विरजण पडणारी घटना घडली. १५ जून २० ला त्यांचे करोनाने निधन झाले.आर्यला हे सांगायला धीर होत नव्हता.सांगायला तर लागणारच होते.या छोट्या शिष्याने बासरी वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

            आता आर्य अकरावीत आहे.आयआयटीची तयारी करायच्या मागे लागला आहे.बासरी मागे पडली.माझ्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला Happy birthday to you वाजवणारा आर्यचा व्हिडीओ आला.सुप्त रुपात बासरी जिवंत आहे याचा आनंद झाला.योग्य वेळी ती बाहेर येईल असा मला विश्वास आहे.