Wednesday 11 October 2017

माझे दूरस्थ विद्यार्थी - हनुमंत गवळी

                      

   बऱ्याच वर्षानी हनुमंत गवळी यांचा फोन आला भेटायला येऊ का? प्रत्येकवेळी ते आले की त्यांच्या एका नव्या उद्योगात भर पडलेली असते.पुस्त्क प्रकाशन,पुस्तक विक्री हे सर्व बंद केल्याचे त्यांनी सांगितले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातल्या वंचित घटकापर्यंत मोफत पुस्तके वाटत ते फिरत असतात.अपंग संस्था,येरवडा जेल,अंधशाळा,जव्हार येथील आदिवासी भाग येथे त्यांचा संचार असतो.
                          सध्या त्यांनी एका वेगळ्याच सामाजिक कामाचा वसा घेतलाय.लष्कर परिसरातील सैनीकी महाविद्यालय परिसरात ते फिरायला जात तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की  कमांड हॉस्पिटलमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, ,लातूर अशा विविध जिल्ह्यातून उपचारासाठी लोक येतात.अंध,अपंग,वृद्ध येतात.हॉस्पिटलचा पसारा मोठ्ठा,भाषेचा प्रश्न. त्यामुळे गोंधळून जातात.ही समस्या लक्षात घेऊन ते गरजू पेशंटना मार्गदर्शन करतात.आपल्या दुचाकीवर बसवून योग्य त्या विभागात पोचवतात.हिंदी भाषिक डॉक्टर,वैद्यकीय अधिकारी यांच्यात संवाद साधून देण्यासाठी दुभाषे बनतात. एखाद्याला काही खायची इच्छा झाल्यास स्वत: पुरवतात.ही त्यांची सेवा गेली दहा वर्षे चालू आहे. त्यांच्यावर लिहिलेला.केसरीमधील उत्तुंग भरारी या सदरातील लेख  येथे देत आहे.
                                                     नांगर,लेथ लेखणी 
                       आमचे अनेक विद्यार्थी पहिले की मला नेहमी प्रश्न पडतो,यांच्यात इतका उत्साह,इतकी उर्जा येते कुठून?कामाचे व्याप सांभाळून बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही पदरमोड करून समजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती,आजूबाजूचे चंगळवादी स्वार्थी जग पाहताना सुखावणारी वाटते.आमचे विद्यार्थी  हनुमंत गवळी त्यातील एक.आता ते आमचे विद्यार्थी नसले तरी विद्यापीठच्या ग्रंथालयात प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते म्हणून त्यांची नेहमी फेरी असते.आले की भेटून जातात आणि त्यांच्या नव्या कामाची माहिती मिळते.नांगर लेथ,लेखणी सर्व हाताळलेल्या गवळीनी अनेक चढउतार पहिले; पण समाजाभिमुखता सोडली नाही.याबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक वाटते.
                                             त्यांचे कुटुंब पुण्याच्या आताच्या फातिमानगर भागात सरदार बावडेकर यांचे कुळएकत्र कुटुंब होते म्हणून काम करीत असे..आईवडील अशिक्षित पण मुलांना शाळेत घातले.शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर शेतीची कामे करावी लागत.शेळ्या,मेंढ्या राखणे,जनावरांना पाणी घालणे.गाजराचा पाला काढणे,गाजरे धुऊन मंडइत नेणे,ज्वारी,बाजरी काढणी... अशी अनेक कामे करावी लागत.हे करताच सातवी पर्यंत महानगरपालीकेच्या शाळेत आणि नंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षण झाले.ल.न. कानडेयांच्यासारख्या शिक्षकांकडून लहानपणीच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मिळाला.लिखाणाची प्रेरणाही मिळाली.चुलतभाऊ आयटीआय झालेला.गवळीनाही घरच्यांनी तंत्रज्ञ होण्याचा मार्ग दाखविला.
                                    २१ वर्षे किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये काम केले.मिलिंग मशीन,लेथ मशीन,ड्रिलिंग मशीन असे सर्व हाताळले.पण मुळातला लेखक ,कवी सतत जागृत होता.
'लोहाला कापताना मोहाला त्यागितो मी
गतीला रोखताना मातीला जाणतो मी'
असा तो कवितेतून प्रगट झाला.कारखान्यात रात्रपाळी करावी लागे.पण ती आपत्ती न मानता संधी मानून त्याचा उपयोग इतर छंद जोपासण्यासाठी,व्यवसायासाठी केला
                               .वाचनाची प्रचंड आवड असल्याने नगरवाचन मंदिरासारख्या जुन्या संस्थेशी सतत संपर्क राहिला.हद्प्सार्मध्ये ललित वैचारिक साहित्य मिळेल असे पुस्तकाचे दुकान नव्हते.गवळीनी स्वत:च असे दुकान काढले.एकीकडे स्वराज्य,प्रभात,विशाल सह्याद्रीत स्फुट लेखन चालू होते.त्यास बक्षिसेही मिळत होती.साहित्याच्या ओढीने आणि पुस्तक विक्रीच्या निमित्ताने साहित्य संमेलनाला जाणे सुरु झाले.गं.बा.सरदार,ग.ना.जोगळेकर,ग.ल.ठोकळ,अनिल अवचट,म.श्री.दीक्षित,न.म.जोशी अशा प्रतिथयश लेखक,साहित्यिकांशी ओळख झाली.त्यांच्याशी चर्चेतून वैचारिक प्रगल्भता वाढत गेली.प्रतिभा विकसित होत गेली.कृषिराज कादंबरीचा जन्म झाला.प्रकाशनासाठी इथे तिथे न जाता स्वत:च प्रेरणा प्रकाशन सुरु केले.खर्चासाठी बायकोच्या बांगड्या गहाण टाकल्या.महापौरांच्या हस्ते झोकात प्रकाशन झाले.
                             वाचनातून अनेक मानव रत्ने सापडत होती.लोकांपर्यंत विशेषत: संस्कारक्षम वयाच्या मुलांपर्यंत पोचावावीशी वाटत होती.यातून मानवरत्न या पुस्तकाचा जन्म झाला.या पुस्तकाला १९८४ चा  वाङमय निर्मितीचा राज्य पुरस्कार मिळाला.अर्थात गवळी यांचे काम पुरस्कारासाठी नव्हते.तर कर्तव्य भावनेतून होते.त्यामुळे जागतिक कीर्तीचे प्रज्ञावंत या पुस्तकाची निर्मिती झाली.याशिवाय वि.दा.सावरकर,विनोबा भावे,सावित्रीबाईफुले यांच्यावर छोट्या छोट्या पुस्तिका लिहिल्या.काही इतरांची पुस्तकेही प्रकाशित केली यातही पर्यावरण,विज्ञान असे समाज जागृती करणारेच विषय होते.
                              एकीकडे नोकरी,रात्रपाळ्या, दुसरीकडे लेखन,त्यासठी वाचन,प्रकाशन,वितरण यासाठी उन्हातान्हात फिरावे लागे.उन्हाळ्यात घरच्या उसाच्या गुऱ्हाळावर काम करावे लागे.पण गवळी एव्हढ्यावरच तृप्त नव्हते.त्यांची समाजाभिमुखता,समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा बोलघेवडी नव्हती.तर कृतीशील होती.बाबा आढाव,अनिल अवचट,विकास वाघ,रा.प.नेने यांच्याशी संपर्क आला.एक गाव एक पाणवठा,दलित प्रश्न,देवदासी परिषद,शेतकरी परिषद,दुष्काळासाठी सर्व्हे यात कृतीशील सहभाग घेतला.
                              या सर्व गोष्टी नोकरी सांभाळून करायच्या तर तारेवरची कसरत होती.झोप अपुरी व्हायची घरातही अनेक दु:खाच्या,संकटाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.मुलाचे निधन झाले.नोकरी की व्यवसाय आणि सामजिक प्रश्न असा प्रश्न होता.गवळीनी नोकरी सोडण्याचा इतरांना अव्यवहार्य वाटणारा निर्णय घेतला.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील दूरशिक्षणाद्वारे बी.ए.अभ्यासक्रमास प्रवेश याच काळातला. किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्येअसताना सासवड येथे श्री तीर्थळी यांच्याशी घनिष्ठ संबंध आला.त्यांनीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा रस्ता दाखविला.
                            ज्ञान मिळवण्यासाठी पदवीची काय गरज असे वाटे.म्हणून तसा प्रयत्नही केला नव्हता.पण बी.ए.च्या अभ्यासक्रमामुळे नवीन ज्ञानाची ओळख झाली.ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.आजही मेळघाट गट,सदाचार भारती अशा संस्थांशी ते संबंधित आहेत
'.देश माझा मी देशाचा हा विचारच आता नाही.
माझा मी सुखी राही एव्हढच मी पाही.'अशी वृत्ती पाहून त्यांना यातना होतात.प्रत्येकाने मेळघाट सारख्या एखाद्या संस्थेशी संबंधित असावे असे त्यांना वाटते.हा विचार लेखन,प्रकाशन,व कृतीद्वारे समाजात रुजविणे हे त्यांचे काम अखंड चालू आहे.
(सदर लेख केसरी दिनांक ९ मार्च २००६ मध्ये पूर्व प्रकाशित.)