Sunday 10 August 2014

प्रसिद्धी पराङमुख,परोपकारी रामचंद्र देशपांडे.

( ४ डिसेंबर १९९२च्या बेळगाव तरुण भारत अंकात आलेला लेख  जसाच्या तसा देत आहे.)
खानापूर तालुक्यातील विकासात अनेकांचे योगदान आहे.त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे रामचंद्र विष्णुपंत देशपांडे.समाजात ते परिचित आहेत ते मात्र रामभाऊ या नावाने.नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पुरी केली.त्यांची प्रसिद्धी पराङमुख वृत्ती माहित असल्याने त्यांच्या मुला नातवंडानीच त्यांनाही न सांगता एकत्र जमून घरगुती स्वरूपात अनौपचारिक रीतीने पंचाहत्तरी सोहळा पार पाडला.त्या निमित्त्याने त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला करून देणे आवश्यक आहे.
 


        खानापूर अर्बन बँकेच्या १९७२ साली झालेल्या सुवर्ण महोत्सवी समारंभात महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब भारदे व कै.बाबुराव ठाकूर यांच्या समवेत रामभाऊ देशपांडे


जीवन परिचय
रामचंद्र देशपांडे तथा आण्णांचा जन्म११ ऑगष्ट १९१७ साली झाला.लहानपणीचा वडिलांचे कृपाछत्र  हरपले.आईनी सांभाळ केला.मुलाकीपर्यन्तचे शिक्षण कसेबसे घेता आले.पुढे शिक्षणाची सोय नव्हती.घरची जबाबदारीही तेराव्या वर्षीच स्वीकारावी लागली.परंपरेने कुलकर्णीपद चालून आलेले.अंकले ह्सनवाडी,खेमेवाडी या गावाचे कुलकर्णीपद होते.ते काम १९४५ डिसेंबरपर्यंत केले.या काळात ब्रिटीश सरकारची सक्तीची लेव्ही वसुली सुरु झाली.गरिबांच्या कडून सक्तीने लेव्ही घेणे न  पटल्याने कुलकर्णीपदाचा राजीनामा दिला.
राजकीय सहभाग
सार्वजनिक कामाची आवड रक्तातच भिनलेली.ती स्वस्थ बसू देईना.१९४५ साली लोकल बोर्डाच्या निवडणुकीला उभे राहिले.आणि निवडूनही आले.पदाचा उपयोग खानापूर तालुक्याच्या मागासलेल्या पश्चिम भागाच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात केला.हे कार्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता आपल्या पत्नीलाही निवडणुकीस उभे राहण्यास प्रवृत्त केले.त्या काळात हे विशेष म्हणावे लागेल ग्रामपंचायतीचेही ते काही काळ सदस्य होते.खानापूर येथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली त्याचे ते खजिनदार होते.संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या वेळी सत्याग्रहीना आमच्या घरी जेवण असायचे हे मला आठवते.
अर्बन बँकेतील कार्य
खानापूरच्या आर्थिक विकासात खानापूरच्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मोठ्ठा वाटा आहे.अर्बन बँकेच्या उभारणीत आणि प्रगतीत आण्णांचा सिंहाचा वाटा आहे.१९५१ ते १९८० पर्यंत ते अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर होते.त्यामध्ये सहा वर्षे चेअरमन म्हणूनही काम केले.त्यांच्याच अध्यक्ष पदाच्या काळात बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला.तो यशस्वी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आम्ही पाहिलेले आहेत.बँकेला इमारत नव्हती.इमारतीसाठी जागा मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.१९५५ मध्ये इमारत बांधून घेतली.
साखर कारखान्याची सुरुवात
अर्बन बँकेचे चेअरमन असताना खानापूर तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सहकारी तत्वावर कारखानदारी सुरु करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पहिली बैठक बोलाविली.यातून सहकारी तत्वावर कारखाना उभारण्याची कल्पनापुढे आली.केवळ कल्पना मांडून न थांबता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कै.निळकंठराव सरदेसाई यांच्या बरोबरीने कार्य केले.सुरुवातीची काही वर्षे ते या कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते पुढे डोळ्याचा त्रास सुरु झाल्याने पदाचा राजीनामा दिला.
धार्मिक व सामाजिक कार्य
आण्णा प्रथमपासून धार्मिक वृत्तीचे परंतु ही धार्मिक वृत्ती कर्मकांडाकडे झुकणारी नाही तर भक्तिमार्गावर भर देणारी.नैतिकता जोपासणारी आहे.वारकरी संप्रदायाचा अधिक प्रभाव आहे.पंढरीची वारी त्यांनी कधी केली नाही.'येथेच पंढरपूर' या वृत्तीने खानापूरचे विठ्ठल मंदिर व पांडुरंग हेच अधिक जवळचे वाटले.या संदर्भात पुरोगामीपणाचा कुठेच गाजावाजा न करता अनेक जातीच्या लोकांशी त्यांचे जवळीकीचे संबंध होते.भक्ती मार्गातील त्यांच्या भजनी मंडळाबरोबर असताना त्यांनी सार्वजनिक जीवनातील मोठेपणा नेहमीच बाजूला ठेवला.
१९३८ पासून ते देवस्थान कमिटीवर होते.१९४८ साली कम्प्लीट देवास्थान कमितीचे ट्रस्टी म्हणून काम केले.१९५५ पर्यंत रवळनाथ देवस्थान कमिटीचे चेअरमन व गेली ४५ वर्षे पांडुरंग देवस्थान कमिटीचे चेअरमन आहेत.अत्यंत कमी उत्पनात देवस्थानचा सर्व कारभार सांभाळणे,कीर्तने,पुराण,काकड आरती,इ.पूर्वापार गोष्टी चालू ठेवणे हे अत्यंत जिकीरीचे काम.परंतु गेली ४५ वर्षे ते हे काम कोणतीही तक्रार न करता गाजावाजा न करता करत आले आहेत.
आज सार्वजनिक कामात सहभागी होणार्‍यांनी पदरी माया जोडण्याचा जमाना सुरु होत आहे.आण्णांनी मात्र सार्वजनिक कामात पदरमोडच अधिक केली.तालुक्याच्या ठिकाणी कामास येणारे अनेक लोक आमच्याकडे राहावयास असत.कीर्तनकार पुराणिक यांची जेवणाची सोय नसेल तर तीही अनेकवेळा आमच्याकडे असे.आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असे नाही.तरीही अनेकाना शिक्षणात सहकार्य,लग्नकार्यात सहकार्य,ज्यांचे मागेपुढे कोणी नाही,गरिबीमुळे ऐपत नाही अशांच्या अंतिम संस्कारांसाठी सहकार्य इ.मध्येंआण्णांचा नेहमी पुढाकार असे.त्यांनी कुणाला किती मदत केली याचा हिशोब कधी ठेवला नाही.परंतु आण्णांनी केलेल्या मदतीमुळेआयुष्यात पुढे आल्याचे स्मरण ठेऊन त्या व्यक्ती जेंव्हा सांगतात तेंव्हाच ते समजते.भांडे मिटवणे,एकमेकातील गैरसमज दूर करणे यासाठी मध्यस्ताची भूमिका निभावताना त्याना अनेकवेळा पाहिलं आहे.त्यांच्या सर्व कार्यात आईनेही विना तक्रार सहाय्य केले.आजही त्यांची अशी कामे चालूच असतात.आम्ही पुण्यामुंबईला राहणारी मुले,मुली,नातवंडे त्याना व्यवहारी होण्याचा सल्ला देत असतो,परंतु त्यांच्यात काही फरक पडत नाही.
व्यक्तिमत्वाचे पैलू
आज आपल्या नातेवाईकाना आपल्या क्षेत्रात पुढे आणून घराणेशाही चालू ठेवण्याचे युग आहे.परंतु आण्णांनी मात्र आपल्या प्रतिष्ठेचा स्वत:च्या फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही.आम्हाला नोकर्‍या मिळवून देण्यासाठीही त्यांनी हे केले नाही.खर तर त्यांच्या एका शब्दावर ही कामे झाली असती.त्यावेळी त्यांचा राग आला तरी याद्वारे शुद्ध चारीत्र्याचा त्यांनी आदर्श घालून दिला हे आज जाणवते.कर्मण्ये वाधिकारस्ते हा गीतेचा संदेश त्यांनी जीवनात प्रत्यक्षात उतरविला असे मला त्यांचे जीवन चरित्र पाहताना वाटते.त्यांचा धोरणीपणा,दिलदारपणा,बुद्धिमत्ता,कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची वृत्ती,निरपेक्ष प्रेम करण्याची वृत्ती,आधुनिक काळाशी जमवून घेण्याची वृत्ती,या सर्वाबाबताच्या अनेक आठवणी आहेत.परंतु हे सर्व लेखाच्या व्याप्तीत मावणे कठीण.यासाठी पुस्तकच लिहायला हवे.
आज त्यांची मुले मुली नातवंडे,वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात यश मिळवत आहेत.सर्वांनाच आण्णांबद्दल अपरंपार आदर आहे.आण्णांचा आशीर्वाद व पुण्याई पाठीशी आहे म्हणून आम्ही सुखी आहोत अशी माझी भावना आहे.त्याना दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
( आज आण्णा आमच्यात नाहीत.परंतु आठवणी आहेत.११ ऑगष्ट या जन्मदिनी त्याना आदरांजली सर्व लेकीसुना,मुलगे जावई,नातवंडे,  पणतवंडे या सर्वाना आण्णांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून हा जुना लेख  देत आहे.)