Sunday 8 March 2020

मी तीन मुलींची आई

                                               मी तीन मुलींची आई
"मुलं किती तुम्हाला?
"तीन मुली"
 'आणि मुलगा?' 
मला तिसरी मुलगी झाल्यापासून आतापर्यंत  अगणित वेळा अनेकांनी हा प्रश्न विचारला त्यात स्त्री-पुरुष ग्रामीण भागातले, शहरी भागातले तरुण, वृद्ध सर्व तऱ्हेचे लोक होते आजतागायत असा प्रतिप्रश्न का विचारला जातो हे मला समजले नाही मुलगा असता तर लपून का ठेवले असते.
 मी तीन मुलींची आई असल्याने मुलगी आणि मुलगा यातील भेद समाजमनात किती ठासून भरलेला आहे हे वेळोवेळी प्रत्ययास येते.महिला दिनानिमित्ताने तो लिहावासा वाटला.
मी स्वत: मुलगी म्हणून भोगाव्या लागलेल्या समस्यांमुळे माझ्या मनात अशा असमानतेबद्दल थोडी तिडीक होतीच,त्यामुळे वेळोवेळी या असमानतेचे दर्शन खटकत राहिले.याची सुरुवात तिसऱ्या मुलीच्या डिलिव्हरीच्या क्षणापासूनच झाली.डिलिव्हरी झाल्याझाल्या डॉक्टर ज्या स्वरात मुलगी झाली हो तुम्हाला म्हणाले त्यात 'अरेरे' मला त्या दमलेल्या क्षणीही जाणवले  आणि थोडा राग आला.तिसरी मुलगी आठ पौंडाची भरपूर जावळ असलेली एक बट तर कपाळावर आलेली आणि पाहता क्षणी उचलून घ्यावी अशी वाटणारी गोड होती.डॉक्टर व्हिजिटला आले कि तिला उचलून घेत.गोड आहे हो तुमची मुलगी म्हणत.असे असले तरी भेटायला येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला मी किती 'बिचारी' चा भाव जाणवे मी इतकी आनंदी कशी याचे आश्चर्यही जाणवे.
माझा ब्लडग्रुप RH - आहे हे मला या प्रेग्नन्सीतच समजले होते.अशावेळी मुलीचा ग्रुप Positive असला तर आईला पुढच्या मुलाच्यावेली धोका नको म्हणून एक इंजेक्शन घ्यावे लागते.मुलीचा ब्लड ग्रुप पाहण्यासाठी नर्स आल्यावर मी म्हटले अहो आता मला चान्स घ्यायचा नाही तर याची गरज नाही. नर्स म्हणाली.आता मुलगी झाली ना विचार बदलला असेल असे वाटले.मी सांगितले माझा विचार बदलला नाही तर ती मला घाई करू नका होईल मुलगा असे समजावत होती.
मला मुलगी झाली त्यापेक्षा मी पुढे चान्स न घेण्याचा निर्णय घेतला याचाच सर्व वडीलधार्यांना राग आला होता.सर्वांच्या विरोधात जाऊन आम्ही दोघांनी एकमताने निर्णय घेतला.माझ्या सासुबाईनी तर बोलणे सोडले मुलीला त्या हातही लावत नसत सासर्यानाही त्याबाबत सक्त ताकीद होती. पण ही तिसरी इतकी गोड होती त्यांचा निर्णय कधी बारगळला हे त्यानाही समजले नाही.उलट ती त्यांची सर्वात लाडकी नात झाली.
असे अनेक अनुभव येताच राहिले.
 आमच्या जवळच्या एका नवीनच आलेल्या डॉक्टरांच्याकडे आजारी असेल तर मुलीला घेऊन जाई.त्यांचा मुलगा माझ्या मुली एवढाच. त्या म्हणाल्या तुम्ही ऑपरेशनची उगीच घाई केली.मी तुम्हाला आयुर्वेदीक उपचार केले असते मला पहा त्या उपचारानीच मुलगा झाला.मुलगा हवाच हा अट्टाहास मी असा विविध स्तरात पाहिला. 
आमच्या जवळ एक टेलिफोन्स मधले उच्चाधिकारी राहत होते.ते Tata Institute of Social Science चे एमएसडब्ल्यू चे पहिल्या batch चे विद्यार्थी होते.त्यांची मुलगी आली होती म्हणून त्यांनी गप्पा मारायला बोलावले.ते मुलीला म्हणले," यांच्याबाबत एक Tragedy  आहे." आता हे काय सांगणार म्हणून मी जीवाचा कान करून ऐकत होते.कारण माझ्या आयुष्यात असे काहीच झाले नव्हते.ते म्हणाले, 'अग यांना तीन मुली आहेत मुलगा नाही.मला इतका संताप आला मनातल्या मनात मी कपाळाला हात लावला.तडक उठून निघावे वाटले पण मी संताप आवरून कशीबशी पाच मिनिट बसले  
ओटी भरणे,बारसे अशा प्रसंगी सुरुवातीला.माझ्याकडून ओटी भरणे नको असल्याचे मला अनेक ठिकाणी जाणवले त्यानंतर मी उपयुक्त पुस्तके भेट द्यायला सुरुवात केली.मुल नसणाऱ्याना तर किती अपमान सहन करावा लागत असेल कल्पनाच करवत नाही.मला कधी अपमान वाटला नाही पण अशा भ्रामक समजुतीतून लोक कधी बाहेर पडणार याची खंत वाटायची.
आमच्या एका नात्यातल्या मुलाला मुलगी पाहताना एक मुलाला आवडलेली मुलगी केवळ त्या तीन बहिणी आहेत म्हणून नाकारली.आईला मुली म्हणजे हिलाही मुलीच होतील आणि आईवडिलांची जबाबदारी त्यांच्या शेवटच्या काळात घ्यावी लागेल असा दूरदर्शी विचार होता.पण यामुळे माझ्या मुलींची लग्ने जमण्यात  ही समस्या निर्माण होणार अशी भीती माझ्या मानत निर्माण झाली एवढे मात्र खरे.पण तसे झाले नाही दोन मुलीनी आपली लग्ने आपणच जमविली.एकीचे आम्ही जमवले पण ती माणसे कोत्या विचारांची नव्हती.उलट आत्ताच्या माझ्या आजारपणात मी मुलीकडे राहिले.पूर्ण बरे झाल्याशिवाय जायचे नाही अशी मुलीच्या सासूची ताकीद होती.
आम्हाला मात्र मुलगा नाही याची खंत आजतागायत वाटली नाही.त्यांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिले त्यांच्यावर विश्वास ठेवला.त्या म्हणजे  आमचा मुलगाच आहेत असाही विचार केला नाही.त्याना माणूस म्हणूनच वाढविले.त्यानाही आपल्याला भाऊ नाही याची खंत कधी वाटली नाही.मावस आत्ये,मामे,चुलत अशा सर्व भाऊ  होतेच.भाऊ नाही म्हणू आवर्जून त्यांच्याकडून ओवाळणी मिळायची. मानलेला भाऊ किंवा मुलगा अशी काही नाती नव्हती.
 आम्ही नवीन बंगल्यात राहायला आलो तेंव्हा आमच्या आजूबाजूला कोणीच नव्हते इतर बंगले होत होते त्याचे लमाणी Watchman होते.त्यातील एकाला तिसरी मुलगी झाली.नवरा दारू पिऊन मुलगी झाली म्हणून मारायचा.त्याचा भाऊ आमच्या शेजारी Watchman होता.तो त्याला सांगत होता".साहेबाला तीन मुली .तो मारतोय का बाईना? त्याची मुलगी मुक्त्याली काही दिवसापूर्वी भेटली तिचे लग्न झाले होते आणि ती मला अभिमानाने .तीन मुली झाल्यावर ऑपरेशन केले असे सांगत होती..एक मुलगी मुकबधीर होती तिला तिने विशेष शाळेत घातले होते.मला तिचे खूपच कौतुक वाटले.संस्कार असे इतक्या अशिक्षित माणसातही झिरपू शकतात.
आता मला एक वेगळाच अनुभव येत आहे.आमच्या परिचयातले बरेच जण म्हणतात "बरे आहे तुम्हाला मुलगा नाही.सुना आल्या की मुले आपली राहत नाहीत.मुलीना प्रेम असते'.अर्थात त्यांच्या मुलाला त्यांना मुलगी नाही तर मुलगाच व्हायला हवे असते.
आता माझ्या तीनही मुली आमच्या अभिमानाचा विषय आहेत.भाराऊन जावे असेअनेक क्षण त्यांनी दिले त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यानी Excellence प्राप्त केला आहे. 
मोठ्ठी आर्किटेक्ट आहे. हैद्राबाद आयआयटीच्या होस्टेलचे,कोइमतुरच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तिचे काम पाहताना अभिमान वाटतो.तिला सुरुची पुरस्कार मिळाला त्यापेक्षाही तिच्या कमिन्स कॉलेजच्या विद्यार्र्थीनीनी तिचे भरभरून केलेले कौतुक मला सुखाऊन जाते.दुसरीनी कोलंबिया युनिव्हर्सिटीसारख्या प्रतिष्ठीत विद्यापीठांत पीएचडी केले.तिला 'लाईन वन विदाऊट एनी चेंजेस' ही क्वचित मिळणारी गेड मिळाली.तिचे प्रकाशित झालेले पुस्तक' Outstanding academic title'  म्हणून' American Library Association ' ने निवडले.धाकटीला डिप्लोमा इंजिनिअरिंगला गोल्ड मेडल मिळाले आणि COEP त प्रवेश मिळाला हे मला सुखावणारे होते.ती आर्मी कल्चर  आणि कार्पोरेट कल्चर या दोन्ही  भीन्न वातावरणात  यशस्वीपणे वावरत आहे.नवऱ्याच्या बदल्यांमुळे नवीन घरे, नवीन गावे, मुलाच्या नवीन शाळा,तिच्या नवीन नोकऱ्या अशा  सततच्या  बदलांना, यातून निर्माण होणाऱ्या ताणतणावाना यशस्वीपणे सामोरी जात  आहे.
 माझ्या कॅन्सरच्या काळात तिघींनी एकत्र येऊन तन.मन धनानी  माझा आजार हाताळला.मला १००% कम्फर्ट आणि झिरो टक्के इनकन्व्हीनीअन्स कसा असेल हे पाहिले.याचबरोबर माझ्या नवऱ्याचा पार्किन्सन्सही सांभाळला.
आज मी तीन मुलींची आई असून बिचारीची नशीबवान मानली जाऊ लागलेय.
असे असूनही समाजमनात हळू हळू भिनत गेलेली मुलगा आणि मुलगी यातली असमानता गेलीय असे मात्र म्हणवत नाही .माझ्या मुली माझ्यासाठी खर्च करतात तेंव्हा मला अवघड वाटते.त्यांच्या घरी राहणे अवघड वाटते  याबाबतीत माझ्या आईच्या काळातच मी असते.आणि स्वत:ला समनतेची पुरस्कर्ती म्हणणाऱ्या माझ्या मनातही माझ्या घडणीतून  असमानता छुप्या रीतीने चिकटून बसली आहे का अशी मला शंका येते.ही विषवल्ली किती पिढ्यापर्यंत दाबा धरून असेल माहित नाही.
ती लवकरात लवकर मुळासकट उखडली जावो ही महिलादिनी सदिच्छा.