Tuesday 12 February 2019

ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी लेखिका - प्रतिभा रानडे - पुस्तक परिचय

  •            नोव्हेंबर १९९८ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशी झाली.अवघ्या सह महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.दरम्यानच्या काळात या दोघींमधल्या गप्पा चालूच होत्या.त्यातला महत्वाचा वाटणारा भाग लेखिका आणि प्रकाशक यांनी तत्परतेने दुसऱ्या आवृत्तीत वाचकांना उपलब्ध करून दिला.
                        या   गप्पा आहेत दोन प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या विदुषी मधील त्यातील एक दुर्गाबाई या खाष्ट विदुषी म्हणून सर्वांना परिचित आहेत. शिवाय त्या मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ लोकसाहित्याच्या भाष्यकार, ललित लेखिका .संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन अशा विविध भाषेत निष्णात आहेत ७० वर्षे त्या विविध विषयावर लेखन करीत आहेत. दुसऱ्या विदुषी प्रतिभा रानडे  प्रथितयश लेखिका आहेत, जिज्ञासू आहेत अभ्यासू आहेत, देश विदेश फिरलेल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी सभोवतालचं जग न्याहाळताना जे जाणवलं त्यावर धीटपणे आपली मतं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलेली आहेत बदनसीब, अफगाण डायरी, स्त्री प्रश्नांची चर्चा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांचा अभ्यास या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या दोन विदुषी मधील गप्पा असूनही विद्वज्जड , तर्ककर्कश नाहीत, चौकटीबद्ध ही नाहीत. आहे ती चौकट ऐसपैस शब्द वापरून त्यांनी लवचिक करून घेतली आहे एकनाथांनी भारूडातून जसे सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचवले तसे प्रतिभाताईंनी दुर्गाबाईंचा व्यासंग, ज्ञानसाधना, तत्वचिंतन, संशोधन, निसर्गाचे हळुवार वर्णन करत त्याचा घेतलेला शोध हे सर्व काही गप्पांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, समाजसेवक, सर्वसामान्य या सर्वांनाच भावेल असे हे पुस्तक आहे
                           पुस्तकाची विभागणी पाच प्रकरणात केलेली आहे. पहिल्या भागात संस्कृती शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, वाटचाल, मीथक कथांचे समाजाच्या दृष्टीने महत्त्व, दशावतार कल्पना, तांत्रिक पंथ याबाबतच्या गप्पा आहेत पाषाणयुगापासून आज पर्यंतच्या संस्कृतीबाबत चर्चा करताना शेवटी मुक्त विचार हा संस्कृतीचा आधार आहे असे मत दुर्गाबाई व्यक्त करतात. यापुढे म्हणतात मुक्त विचारांची जपणूक करणे हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. विचारवंत लेखकावर कोणतीही बंधने आली की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते ती येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य सुस्थिती राजकीय स्थिरता या गोष्टी आवश्यक. संस्कृतीच्या साखळीत एकातून दुसरे निघत वाढत गेले पण प्रत्येक टप्प्यावर निसर्गाशी नातं कुठे तुटलं नाही आजच्या काळात मात्र आपण निसर्गाशी नातं तोडत आहोत माणूस सारखा निसर्गाला ओरबाडून घेतोय याची त्यांना खंत वाटते. संस्कृती वरून गप्पांचा ओघ  मिथककथा कडे येतो. त्यांच्या मते समाजाची सांघिक जाणिव, संवेदना या मिथककथातून प्रगट केल्या जातात. जगात प्रथम मिथक कथा भारतात रचल्या गेल्या आणि तेथून त्या जगभर पसरल्या मिथककथातून  अध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. जीवनाचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न असतो. दुर्गाबाईंनी वाचायला सांगितलेल्या' पावर ऑफ मीथ' चा हवाला देऊन प्रतिभाताई सांगतात अमेरिकन समाजात मोठ्या प्रमाणात हिंसा व क्रौर्य आहे. याचे कारण त्यांच्याकडे सशक्त समृद्ध अशा मिथक कथा नाहीत. गप्पांमध्ये मग दशावतार, विठोबा, पदूबाई, जगन्नाथ पुरी ची लक्ष्मी, सावित्री इत्यादी मिथककथा येतात व वाचकांची उत्कंठा वाढवत जातात या कथा सांगताना साहित्यात नित्य कथा रचण्याची शक्ती ज्याप्रमाणे अधिक आणि सातत्याने चालते त्या प्रमाणात ते साहित्य समाज अधिक चैतन्यमय वर्धिष्णू असतो, असे भाष्यही त्या  करतात पुढे संस्कृतीचा महत्त्वाचा भाग अशा तांत्रिक पंथाची चर्चा सुरू होते.