Friday 9 December 2022

मर्म बंधातली ठेव ही १

                                              मर्म बंधातली ठेव ही १

                      माझी मैत्रीण तिच्या नातवाच्या Grand parents day ला गेली होती.त्याचे फोटो तिने टाकले होते.ती खूप खुश होती.मला माझ्या नातवाच्या आर्यच्या Grand parents day ला गेले होते त्याची आठवण झाली.नातू आता दहावीत आहे.पण मला अगदी काल परवा घडल्यासारखा तो दिवस आठवतो.त्याचे पाळणाघर आणि नर्सरी एकच होती.छोटी,छोटी मुले आणि त्यांचे आज्जी, आजोबा.वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारलेले. प्रत्येक आज्जी-आजोबा आणि त्यांचे नातवंड याना बोलावले जात होते आणि त्यांच्या नातवंडानी तयार केलेल्या वस्तू नातवंडाकडूनच भेट दिल्या जात होत्या.एक निळ्या कापडावर फुल आणि पान  पेंट केलेले मोबाईल कव्हर आणि एक लाल रंगाची पिशवी भेट दिली गेली. पिशवीवर नातवाच्या हातांचे रंगीत ठसे घेऊन डिझाईन केले होते.खरे तर हे करवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते.

                  मोबाईल कव्हर हरवली. एखादा दागिना हरवावा तेवढे याचे दु:ख होते.पिशवी मात्र अजून छान आहे.किती वेळा धुतली तरी लाल रंग आणि डिझाईन अजून हालले नाही.मी जिकडे तिकडे ती घेऊन मिरवत असते.वाचनालयात पुस्तके आणणे,दुध आणणे,बागेत जाणे अशा कोणत्याही कामाला मी तीच वापरते.कोणी विचारो न विचारो मी आवर्जून सांगते याच्यावर हाताचे ठसे आहेत ते माझ्या नातवाचे आहेत. त्यांनी हे पेंट केले आहे.हे सांगताना मीच आठवणीत रमून जाते मला छान वाटते.काही काही जणांना तर दोन तीन वेळा हे सांगितले असण्याची शक्यता आहे.पण मला कोण काय म्हणेल याचे फारसे काही वाटत नाही.मला सांगताना आनंद मिळतो हे महत्वाचे.आर्यच्या अशा कितीतरी छोट्या छोट्या आठवणी माझ्या 'मर्म बंधातली ठेव' आहेत.आता सांगेन एकेक.

May be an image of 3 people and people smiling

Sunday 13 November 2022

आनंदी वृद्धत्व - ९

                                               आनंदी वृद्धत्व -  ९

                       भाऊराव रामजी कदम यांची आमच्या कुटुंबाशी ओळख झाल्याला २३/ २४ वर्षे झाली.निवृत्तीनंतर त्यांनी शिवशंकर सभागृहात योगासन क्लास सुरु केला. आम्हीही तीर्थळीना पार्किन्सनचे निदान झाल्यावर तेथेच योगासन क्लास सुरु केला.आमच्याच भागात राहणारे आणि त्यात बेळगावचे त्यामुळे लगेच मैत्रीत रुपांतर झाले.तरतरीत,हसतमुख चेहरा,बोलण्यात मार्दव.कोणाशीही सहज मैत्री होईल असेच व्यक्तिमत्व.योगासनाचे क्लास घेणारे सर आले नाहीत तर कदम क्लास घ्यायचे.रोजच्या रोज क्लासहून गेल्यावर कोणती आसने केली. ती कशी करायची,त्याचा उपयोग याची डायरीत नोंद करत.मनापासून समजून घेत.त्यामुळे वर्षभरातच ते शिक्षक होण्याइतके तरबेज झाले होते.त्यांचे शरीर अत्यंत लवचिक. कोणतीही आसने सहज करायचे.आता कदम सर ८४ वर्षांचे आहेत पण आम्ही त्यांना प्रथम पहिले तसेच आहेत.नियंत्रणात असलेला डायबेटीस वगळता तब्येत ठणठणीत आहे.अजूनही सर्व आसने सहजपणे करतात.पुण्यात असतात तेंव्हा आमच्या जवळच्याच बागेत सूर्यनमस्कार ,आसने शिकवताना दिसतात.पुण्यात असतात तेंव्हा असे म्हणायचे कारण दोन मुले, एक मुलगी आणि बेळगावला स्वगृही अशी त्यांची फिरस्ती चालू असते.विशेष म्हणजे पत्त्त्यातील ज्योकर सारखे ते कुठेही सामावून जातात.

                    बेळगावला इंटर सायन्स नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.पीडब्ल्यूडीमध्ये  नोकरीला लागले.काही दिवस इरीगेशनलाही होते. कोकड,अलिबाग,आटपाडी टॅंक, वीर धरण,रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या.गुणवत्तेत तडजोड नाही यासाठी स्ट्रीक्ट,हव्या तेथे सवलती द्यायच्या.असा त्यांचा कामाचा खाक्या होता.क्लास वन ऑफिसर म्हणून ते निवृत्त झाले.सर्व ठिकाणी अनेक माणसे जोडली. आजही त्या सर्वांशी लागेबांधे आहेत.माणसे जोडणे ही त्यांची खासियत आहे. शिवशंकर सोडून खूप दिवस झाले तरी त्यावेळच्या सर्वांशी संबंध आहेत. आमच्या समोरच्या बागेतही कदम सर्वांचे मित्र आहेत.

                   मध्यंतरी बरेच दिवस ते दिसले नाहीत. आणि दिसले तेंव्हा चेहर्यावरचे हास्य लोपले होते.काहीतरी आघात झाल्यासारखा चेहरा झाला होता.आणि खरेच तसे झाले होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.त्याना सांगताना रडू आवरत नव्हते.त्या बरेच दिवस बेडरीडन होत्या.त्या काळात ते बेळगावला होते.त्यांच्या सेवेसाठी केअरटेकर  मिळत नव्हती.ए टू झेड सर्व मी करत होतो असे ते सांगत होते.माझ्यासाठीही हे धक्कादायक होते.मी त्याना फ्लॉवर रेमेडीतले रेस्क्क्यू रेमेडी दिले.दोनचार दिवसातच ते म्हणाले मला तुमच्या औषधाने बरे वाटत आहे.नातवंडे,मुले, सुना यांच्या सहवासात लवकरच ते पूर्व पदावर आले.              

             त्यांची मुले, सुना सर्व उच्चशिक्षित आहेत त्यांच्याबद्दल सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो.मुलगी कार्व्याला असते. तिने बंगला बांधला.वास्तूशांतीला ते गेले होते.बंगल्याचे, मुलीच्या संसाराचे भरभरून कौतुक करत होते.मुलीसार्खेच सुनांचे ही कौतुक सांगताना ते थकत नाहीत.एक सून एम.ए.डी.एड.तर एक एम.ए.बी.एड आहे.एम.ए.ला तिला डीस्टिंगशन मिळाले आहे. अशी माहिती ते पुरवत असतात.हास्यक्लबमध्ये वाढदिवस साजरे केले जातात.त्यांच्या सुनेची सकाळी लवकर शाळा असते पण त्यापूर्वी तिने सासर्यांच्या वाढदिवसासाठी ५० लोकांसाठी शिरा करून दिला होता.अशा छोट्या छोट्या गोष्टी नातेसंबंधातील घट्ट विण दाखवतात.कुटुंबियातील सर्वांशी मिळून मिसळून वागल्यास कुटुंबीयांनाही वृद्ध हवेसेच वाटतात.आनंद द्यावा आनंद घ्यावा हेच खरे.

              कदम असेच आनंदी रहा आणि आनंद वाटा.

 

                  


                     

 

                  

Thursday 10 November 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - प्रा.माया नलावडे

                                  माझे दूरस्थ विद्यार्थी  -  प्रा.माया नलावडे

                मी विजय भांडार मध्ये खरेदी करत होते.आणि मॅडम असा मागून आवाज आला.मी चमकून मागे पाहिले.माया नलावडे हाक मारत होती.माया माझी विद्यार्थिनी. आनंदाने तिचा चेहरा फुलला होता.ती शेजारच्या दुकानात खरेदी करत होती आणि तेथे तिला माझा आवाज आला.भर रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या त्या दुकानात आणि शेजारच्या दुकानात खूप गर्दी असते त्यातून तिने माझा आवज ओळखला याचा आनंदही झाला आणि मी किती मोठ्या आवाजात बोलत होते हे जाणवून थोडी खजीलही झाले. स्वत:ची खरेदी अर्धवट सोडून ती आली होती.मी २००७ ला टिळक विद्यापीठातून निवृत्त झाल्यावर खूप वर्षांनी आमची गाठभेट होत होती.आम्ही दोघी खरेदी सोडून कितीतरी वेळ बोलत होतो.ती डीएसडब्ल्यू झालेले मला माहित होते त्यानंतर ती उच्च द्वितीय श्रेणीत एमएसब्ल्यू झाली.यासाठी कुटुंब न्यायालय आणि कामायनी मूक बधीर विद्यालय येथे फिल्डवर्क करून उत्तम अनुभव मिळवला होता.बाया कर्वे अभ्यास केंद्रातून Child Abuse - Prevention & Cure हा अभ्यासक्रमातती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती.महाराष्ट्र शासनाचा MSCIT अभ्यासक्रम आणि बी.एड. ही केले होते.एकुणात बी.ए. झाल्यावर तिने विविध अभ्यासक्रम करण्याचा धडाका लावला होता.टिळक विद्यापिठात ती फिल्ड सुपरवायझर फॅकल्टी म्हणून काम करत होती.जेथे शिकली तेथेच ती आता प्राध्यापक आहे. हे  सांगताना तिचा चेहरा अभिमानाने फुलला होता.विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्य केले.

                      इतर सह विद्यार्थ्यांनाबद्दलही तिने बरीच माहिती पुरवली प्रत्येकजण आपापाल्या क्षेत्रात पुढे गेले होते.फोनची देवाणघेवाण झाली.यानंतर Whats app वर आम्ही भेटू लागलो.इतर मैत्रिणींचे तिने फोन पाठवले.तिची प्रगतीही कळू लागली. आता सावित्रीबाई फुले विद्यापीठातून एम.एड.झाली आहे.पीएचडी करण्याची तिची तयारी चालली आहे.करोना काळात तिने विद्यापीठासाठी व्हिडिओ लेक्चर दिली.एक दिवशी टिळक विद्यापीठाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निघालेल्या गौरव ग्रंथात तिचे यशस्वी माजी विद्यार्थिनी म्हणून आलेले मनोगत तिने पाठवले.बरोबर व्हाईस मेसेज होता.आज पर्यतच्या वाटचालीत तुम्ही विद्यार्थ्यांना करंगळीला धरून,धरून  चालवले आणि तीच पावती आज पाठवत आहे.यात आपला सिंहाचा वाटा आहे असे सांगत तिनी आभार मानले होते.खरे तर तिचे कष्ट,जिद्द यात महत्वाची होती.

                काही मोजक्या मनोगतात तिची निवड झालेली पाहून मला ही तिचा खूप अभिमान वाटला.तिचा बॅंकबेन्चर ते प्राघ्यापक हा प्रवास शिक्षक म्हणून मला निश्चितच सुखावणारा होता.तिच्याविषयी केसरीमध्ये २००५ साली लिहिलेला लेख येथे देत आहे.तो वाचल्यावर तिची वाटचाल नक्कीच प्रेरणादायी वाटेल

  • "माया नलावडे मुक्त मधून पदवीधर होऊन तीन वर्षे उलटून गेली.आता ती पुणे विद्यापीठातून एम.ए. ही झाली आहे पण कोणत्याही कामासाठी आम्ही तिला हक्काने बोलावतो. तीही हजर होते. तेही कामाचा व्याप सांभाळून. ती दिवसभर ट्युशन घेते, मराठी विद्यार्थ्यांना मराठी शिकवते, तिच्या शाळेच्या शिक्षकांना आणि तिला शाळेपासून ओळखणाऱ्यांना मात्र हे अजिबात खरे वाटणार नाही. कारण त्यांच्या मनात तिची बॅकबेंचर, शाळा बुडवणारी, अभ्यासात रस नसणारी अशीच प्रतिमा आहे. मुक्त विद्या केंद्रात बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांत आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ न शकलेल्यांचे प्रमाण अधिक असते. माया मात्र याला अपवाद होती. अत्यंत सुस्थितीतील कुटुंब. घरातले सर्व उच्चशिक्षित, हिला मात्र शिक्षणात अजिबात रस नव्हता. खेळात मात्र विशेष रस. कबड्डीमध्ये आंतरशालेय स्पर्धात भाग घ्यावयाचा त्यासाठी वेळोवेळी गावाला जावे लागे. त्यामुळे शाळा बुडे पण मायाला त्याचे फारसे दुःखही नव्हते. अभ्यासात मागे असलेल्या मायाने खेळात मात्र खूपच प्रगती केली. कबड्डी व सॉफ्टबॉल ची तर ती राष्ट्रीय खेळाडू होती. विशेष कामगिरीबद्दल दोनदा महापौर पदकाचा मानही मिळाला. 
                      सगळे कसे छान चालले होते आणि १९८८ मध्ये वडिलांचे निधन झाले. खेळ, शिक्षण सर्वांनाच पूर्णविराम मिळाला. वास्तवाचे चटके बसायला लागले. आजूबाजूच्या मराठी मुलांना मराठी भाषा शिकवण्याचे काम सुरू केले. दिवसभर वेगवेगळ्या वर्गांना शिकवायची. पाहता पाहता दहा वर्षे गेली. तिच्या विद्यार्थिनी पुढे उच्च शिक्षण घेत कोणी डॉक्टर झाल्या, कोणी इंजिनियर झाल्या, प्राध्यापक झाल्या. त्यांची शिक्षिका मात्र पदवीधर ही नव्हती. मायाला हळूहळू याची खंत वाटायला लागली. दहावीनंतर पंधरा वर्षाची गॅप झालेली. ट्युशन्स होत्याच. पदवीधर होण्याची इच्छा मनातच राहिली.
                    अशातच टिळक विद्यापीठाची जाहिरात पाहिली व प्रवेश घेतला. प्रवेश घेतला खरा पण आई आजारी पडली. दिवस रात्र आईची सेवा करणे चालू झाले. पण आता मायाने पदवीधर होण्याचा चंगच बांधला होता. बॅकबेंचर माया आता बदलायला लागली. शंका विचारायला लागली. उत्तरे द्यायला लागली. तिची उपस्थिती आता शंभर टक्के होती. वाचनालयात येऊन ती अभ्यास करायची. मुक्त मध्ये सीनियर विद्यार्थिनी म्हणून सर्व प्राध्यापकांना ती   माहिती झाली. शालेय जीवनातील माया आणि मुक्त मधली माया यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. सर्व शक्यता असूनही तिला शिक्षणाचे महत्त्व समजले नव्हते. आता मात्र ते पुरते उमगले होते. दोन वर्षे यात गेली. घर, अभ्यास, ट्युशन्स, आईची सेवा असा अति कामाचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिसऱ्या वर्षात तिला स्पोंडीलाइटिसचा त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी  लिहिणे, वाचणे काही काळ बंद ठेवायला सांगितले पण तिने या सर्वांवर मात केली. ती पदवीधर झाली. आता तिला शिक्षणाची गोडी लागली होती तिने पुणे विद्यापीठात एम.ए.साठी प्रवेश घेतला. ती सेकंड क्लासमध्ये एम.ए. झाली. नातेवाईकांना घरच्यांना खूप आनंद झाला. दूर शिक्षणाद्वारे झालेले तिचे बी.ए. अनेकांना फार महत्त्वाचे वाटत नसावे. कदाचित माया बी.ए. करते म्हणजे काहीतरी थातूरमातूर असेल असा समज ( गैर )असेल पुणे विद्यापीठाच्या एम. ए. नी मात्र त्यांचा समज दूर झाला. 
                          दूर शिक्षणाबाबतचे समाजातले गैरसमज पाहून मायाला वाईट वाटते. आमचे नाणे खणखणीत आहे असे ती सर्वांना ठासून सांगते. तिच्या विद्यार्थ्यांना आता ती जास्त चांगले शिकवू शकते असे तिला वाटते. मुक्तच्या एम. एस. डब्ल्यू. ला ती आता प्रवेश घेणार आहे. स्वतःचे नातेवाईक व इतरांनाही प्रवेश घेण्यास ती प्रवृत्त करते. त्यांना मार्गदर्शन करते. मुक्त विद्या केंद्राच्या विविध उपक्रमाला आम्ही तिला हक्काने बोलवतो. घरचे काम असल्यासारखे तीही येते. प्रथम वर्षाचे विद्यार्थी थोडे घाबरलेले, साशंक असतात. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आम्ही बोलावतो याचा चांगला परिणाम होतो. अशा विद्यार्थ्यात पहिले हक्काचे नाव मायाचे असते. सतत हसत असणारी माया अनुभव सांगते तेव्हा तिच्या शरीराचा कणकण बोलत असतो. तिचे बिन मुखवट्याचे हृदयापासून केलेले कथन विद्यार्थ्यांना भावते. निवासी संपर्क सत्रात योगासने शिकवायला ती येते. हे सर्व कोणतेही मानधनाच्या अपेक्षेशिवाय. शिक्षण घेणे आणि जे मिळवले ते पुढच्या पिढीला देण्याची प्रक्रिया तिला इमाने इतबारे अखंडपणे चालू ठेवायची आहे. गुरु ऋणातून उतराई होण्याचा हा उत्तम मार्ग आहे असे तिला वाटते. ती ज्यांना शिकवते ते विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होतात तेव्हा तिला कृतार्थ वाटते. आणि मायाचे हे घडणे फुलणे पाहून आम्हाला कृतार्थता वाटत"

May be an image of 1 person, standing and indoor         


                       

                  

                  

                 

Tuesday 18 October 2022

डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                                           डॉ.विद्या रवींद्र जोशी.

                  आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळ ग्रुपवर 'प्राउड ऑफ यु' असे म्हणावे असे अनेक चमचमते तारे आहेत.डॉ.विद्या रविंद्र जोशी या त्यातील एक.एका लेखात न सामावणारे, चरित्र लिहायला हवे असा त्यांचा जीवन प्रवास आहे.यापूर्वी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.ती आवर्जून वाचावी.येथे आजारानी त्यांच्या घेतलेल्या कठीण परीक्षा आणि त्यावर त्यांनी केलेली मात यावरच भर दिला आहे.

               १०१२ मध्ये त्यांच्या कर्करोगाचे निदान झाले त्या आधी विद्याताई सातवे अस्मानपे होत्या.कारण त्या मुलीकडे अमेरिकेला चालल्या होत्या.स्वत: डॉक्टर,आहारतज्ज्ञ. मुलीचे बाळंतपणाचा आनंद लुटायची स्वप्ने पाहत होत्या.विद्याताई डॉक्टर.चेंबूरच्या साहित्य-संस्कृती, अध्यात्मिक क्षेत्रात विविध संस्थांच्या स्थापनेत आणि कार्यात  पुढाकार असलेल्या. तरी व्यवसाय आणि हे सामजिक कार्य करताना  त्यांनी घर संसार यालाही महत्व दिले होते.ते आणि त्यांचे  Dentist पती यांनी घराजवळचे पॉलीक्लिनिक निवडले होते कामाच्या वेळा मुलांना पाहता येईल अशा adjust केल्या होत्या.प्रॅक्टिस उत्तम चालत होती.रात्री दोनपर्यंत पेशंट यायचे.पेशंट आल्याने रात्री उठावे लागले हे रोजचे असायचे.पण आता मात्र त्यांच्यातल्या आईने मात केली होती.त्यांची अमेरिकेची तिकिटे काढून झाली होती.बॅगा भरणे चालू होते.त्याच वेळी जांघेत एक बारीक गाठ दिसली बायोप्सी,पेट स्कॅन असे सोपस्कार झाले. लीम्फोमाचे (लसिका पेशी) कॅन्सरचे निदान झाले.स्कॅनमध्ये जबड्याखालीही छोटी गाठ दिसत होती चवथी स्टेज आहे असे सांगण्यात आले.अमेरिकेची तिकिटे रद्द झाली.सापशिडीच्या खेळात अगदी १००व्या घराच्या जवळ यावे आणि ९९ ला सापाच्या तोंडाकडे येऊन एकदम खाली घसरावे तसे झाले.१४ साला पर्यंत २२/२३ किमो झाल्या.  

           नातीचे बाळंतपण झालेच नाही पण चार महिन्याच्या नातीला घेऊन मुलगी भारतात आली ती रात्री येणार होती.किमो चालूच होती.सकाळी मराठी साहित्य रसिक मंडळाचे साहित्य संमेलन होते.सर्वांचे म्हणणे पडले,तुम्ही अध्यक्ष आहात तर १५ मिनिटे तरी येऊन जा. रिक्षातून अगदी १५ मिनिटेच जाऊन आल्या.  त्या दिवशीच दुपारी डोळे सुजायला लागले.हे साधेसुधे डोळे येणे नव्हते तर इतरना लगेच लागण होणारे व्हायरल होते. डॉक्टर पतिना ती झालीच.दोघांनी दीड महिना एका खोली कोंडून घेतले.मुलगी आली खालीच असणाऱ्या आत्याकडे राहिली.लांबून मुलीला दाखवले. किती यातना झाल्या असतील.पण नशिबाने हुलकावणी देण्याचा हा पहिला प्रसंग नव्हता.

             प्रथम पासून धाडसी वृत्ती,कॉलेजमध्ये असताना NCC च्या G १,G२ पर्रीक्षा दिल्या होत्या.रायफल युनिटमध्ये होत्या. mountaineering सिलेक्शन झाले होते.पण वडिलांनी परमिशन दिली नाही. AFMC साठी प्रयत्न केला होता.परीक्षा मुलाखत या कठीण परीक्षा पास झाल्या होत्या.या दोन्ही वेळी त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि मध्यमवर्गीय मानसिकता आड आल्या आणि नशिबानी हुलकावणी दिली.अनेक वर्ष याचा सल होता.असे असले तरी अशा प्रसंगाला तोंड देण्यासाठी असो किंवा आजाराशी लढा देणे असो त्यांची खिलाडीवृत्ती आणि नंतरच्या काळात भिनलेले अध्यात्म कामी आले.

          एकीकडे किमो चालू असताना पुस्तकांचे काम चालूच होते १३ साली आरोग्यासाठी मनाचे श्लोक्चे १३ व्हिडिओ केले.‘आरोग्यासाठी मनाचे श्लोक’, ‘आत्माराम’, ‘दास सर्वोत्तमाचा’ ही प्रकाशित होत असलेली कादंबरी आणि ‘दासबोध जीवनाचा मार्गदर्शक’ ही पुस्तके लिहून तयार झाली. रामदासांवरील कादंबरी लिहिण्यासाठी त्यांच्या जांभ या मूळगावी त्या जाऊन आल्या.रत्नागीरीत नवरात्रात 9 दिवस अध्यात्मिक विषयावर व्याख्याने दिली. एकीकडे किमो थेरपी कॅन्सरला हटवून शरीर बरे करत होती तर दुसरीकडे रामदास मनाला खंबीर करत होते.आजार मला कुठे झाला तो तर शरीराला झाला. मी म्हणजे शरीर नव्हे. ही आध्यत्मिक समज ना खंत ना खेद अशी वृत्ती निर्माण करत होता.प्रचंड उर्जा देत होता.

                  १३ साली त्या अमेरीकेला  गेल्या.किती तरी दिवसाच्या  तितिक्षे नंतर आता त्याना नातीला कवटाळता आले होते.सहवासाचा आनंद लुटता आला होता. १५ साली त्या पुन्हा अमेरीकेला गेल्या तेंव्हा  बरोबर दासबोध घेवून गेल्या.शिक्षक आणि पालक यांच्यासाठी 'दासबोध जीवनाचा मार्गदर्शक' हे पुस्तक लिहिले.

                    दरम्यान १६ साली रविंद्र जोशीना पार्किन्सन्स झाला. ७५ वर्षापर्यंत ते प्रॅक्टिस करत होते. ते तबला वाजवतात त्याचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यासाठी उपयोग होतो असं त्यांना वाटतं. प्राणायम, मेडिटेशन आणि व्यायाम हे दोघेही करतात. खेळाडू असल्याने पॉझिटिव वृत्ती आहे त्यामुळे त्यांचा पार्किन्सन्स आटोक्यात आहे.यातच विद्याताई डॉक्टर आणि सजग  शुभंकर त्याचाही फायदा आहेच.विद्याताईनीही दवाखाना बंद केला पण फोनवर साल देणे सुरूच असते पुर्विपासूनचे पेशंट तुमचा चेहरा पहिला तरी चांगले वाटते म्हणतात.स्वस्थ बसणे हा त्यांचा स्वभावच नाही. नवनवीन क्षेत्रे धुंडाळणे सुरूच असते

               कॅन्सरनी थोडी उसंत दिली होती.त्यांनी स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला छान ग्रुप जमला.'द मेकिंग' ही शॉर्ट फिल्म कशी बनवायची यावर,देवाचा धर्म अशा  शॉर्ट फिल्म केल्या.व्हेन्यू विद्याताईंचे घर आणि दवाखाना. तेथेच सेट उभे राहत.आता रामदासांवर फिल्म बनवायची आहे.सगळे छान चालले असताना पुन्हा कॅन्सरने डोके वर काढले.१९ साली मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.संगणकावर लाईन वरवर दिसायला लागल्या.शस्त्रक्रियेमुळे थोडे दिवस होईल असे वाटले.डोळ्यांच्या डॉक्टरांनीही काही समस्या दिसत नसल्याचे सांगितले.पण अखंड ते सावधान पण असे समर्थ अभ्यासक असलेल्या विद्याताईना वेगळाच संशय येत होता.

डॉक्टर म्हणून त्यांच्या मनात आलेल्या शंका फिटेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून वेगवेगळ्या तपासण्या करून घेतल्या.एका अद्ययावत तपासणीत मानेच्या शिरेत छोटी gland दिसली.आता किमो थोड्या पण रीगरस tritment होती.प्लेट लेट कमी होत. त्या वाढल्याशिवाय दुसरी किमो नसे.त्यासाठी पोटात इंजक्शन घावी लागत.डोळ्याला ड्रायनेस येई.स्क्रीन दिसत नसे.युरीनरी इन्फेक्शन अशा अनेक गुंतागुंती होत होत्या.जेवताना जेवण जात नव्हते आणि रात्रीअपरात्री कडकडून भूक लागे.अगदी रडायला येई.विवाहित मुलगी नोकरी सोडून राहायला आली.ती त्या काळात विद्याताईची आई झाली.कोविद हजेरी राहून गेला.दोनदा नागीण या आजारानेही विळखा घातला होता.या सर्वातून मनाची ताकद आणि अध्यात्मिक उंची वाढली. प्रत्येक गोष्ट स्वीकारून पुढे जायचे याचा विचार केला की आजार विसरणे सोपे जाते असे त्यांचे साधे सोपे तत्वज्ञान आहे. अध्यात्मावर त्यांनी फक्त पुस्तके लिहिली नाहीत तर स्वतः ते आचरणात आणले आहे.

         इतका त्रास असला तरी काम थांबले नव्हतेच.दोन किमो मध्ये थोडा काळ बरे वाटे त्यात तीन पुस्तकांचे प्रुफरीडिंग केले.डोळे दुखत.डोळ्यात ड्रोप घालायचे आणि काम करायचे.’दास सर्वोत्तमाचा’ या पुस्तकाचे प्रुफ रीडिंग याच काळातले.  

        आता कवितांचे पुस्तक,८ दीर्घकथांचे पुस्तक,आयुर्वेदीय रेसिपी,योगासानावरील पुस्तक छपाईच्या मार्गावर आहेत.२० साली पेट स्कॅन नॉर्मल आला आहे.आता अजारानो नका फिरकू आमच्या विद्याताईंकडे.भरपूर काम व्हायचे आहे अजून त्यांच्याकडून.यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.   

                  

                 

             

          

                


Tuesday 27 September 2022

स्मिता तळवलकर

                                     आभाळ पेलताना  - स्मिता तळवलकर

                   स्मिता तळवलकर यांनी १७ /१८ वर्षाच्या वयात कॉलेज शिक्षण घेत दूरदर्शनवर वृत्त निवेदिका म्हणून पाउल ठेवले. बघता बघता उंच भरारी घेतली. नाटक, चित्रपट, टीव्ही, क्षेत्रात, अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन, वितरण अशी विविध क्षेत्रे यशस्वीपणे पादाक्रांत केली.दी स्मिता तळवलकर झाल्या. विशेष म्हणजे हे सर्व विवाहानंतर केले.दुर्दैवाने वयाच्या अवघ्या ५९ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले.त्यांचा जीवन प्रवास आणि आजाराशी लढा दोन्ही अत्यंत प्रेरणादायी आहे.

              या सर्व क्षेत्रात काम करताना दूरदर्शन काळात झालेले संस्कार त्या विसरल्या नाहीत.५ वर्षाच्या व्यक्तीपासून ८० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी एकत्रित बसून पहावे असे कार्यक्रम असावेत असा त्यावेळी दृष्टीकोन होता.काळ बदलला,स्पर्धा आली पण तरी कोणतीही तडजोड न करता सामाजिक भान,कलात्मक मुल्ये जपत नाटक,सिनेमा,टीव्ही सिरीयलची निर्मिती केली.मनोरंजनाबरोबर काही विचार दिला.'कळत नकळत' आणि 'तू तिथे मी' या त्यांच्या चीत्रपटाना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.अभिनिवेश नसताना निर्मितीतील इनोसन्सला हे अवार्ड मिळाले असे त्या म्हणाल्या. काही चित्रपट तोट्यात गेले. काही चालले.पण हताश न होता त्या नवनवीन देत राहिल्या.झोकून देऊन काम करत राहिल्या.'तू तिथे मी' च्यावेळी घरपोच तीकीट विक्री सुरु केली.अवन्तिका आणि इतर दूरदर्शन  मालिकाही गाजल्या.६ चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली.विस्तारभयास्तव नावे देत नाही.

                  लहान वयात विवाह झाला ४० माणसांचे एकत्र कुटुंब होते.तळवलकर कुटुंब व्यवसाय क्षेत्रातले.व्यायाम क्षेत्रात मोठे नाव असलेले,पुरोगामी होते.माणसांची आवड असल्याने लगेच या कुटुंबात  मिसळून गेल्या.कुटुंबाकडूनही त्याना कोणतेही काम करायला विरोध झाला नाही उलट मदतच झाली.निर्मिती संस्था काढल्यावर  स्पॉट बॉइजपासून अनेक काम करणार्यांचा त्यांच्या कुटुंबात सहभाग झाला.त्यांची त्यांच्या कुटुंबाची काळजी त्याना होती. सहवासात असलेल्या सर्वांचीच त्यांनी नेहमी विचार केला. कामाला त्या वाघ होत्या. नाटकाचे दौरे असो कि निर्मिती संस्थेचा सेट असो वेळ पडली तर पदर खोचून सर्वांचा स्वयंपाकही त्यांनी केला.अनेक व्याप सांभाळण्याची तारेवरची कसरत करताना त्या सदैव ताज्यातवान्या असत.फिजिकल आणि मेंटल फिटनेस बद्दल जागरूक असत.

                  निर्मितीचे,वितरणाचे काम तसे जोखामिचे.पैशाचे व्यवहार असत.एकदा एका अंडर वर्ल्डच्या माणसाने स्मिताताईंच्या च्या पोस्टर लावणाऱ्या माणसांवर हल्ला केला.या न घाबरता पोलिसात गेल्या.त्या दादाचे ह्रदयपरिवर्तन करण्यात त्या यशस्वी झाल्या असाव्यात.त्या माणसाने स्मिताताईना नंतर त्रास दिला नाही उलट आदराचे वर्तन ठेवले.आजूबाजूच्या सर्वात एकाच पुरुष आहे त्या म्हणजे स्मिता तळवलकर असे तो म्हणाला.आपल्या कामाने. प्रेमाने त्यांनी सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवले.अनेकांसाठी रोल मॉडेल झाल्या.

                 त्या व्हिजनरी होत्या. पुढच्या पिढीचा विचार करून त्यांनी 'अस्मिता चित्र अकॅडेमी' हे अक्टिंग स्कूल चालू केले.स्पर्धेच्या जगात मुलांना अभिनय शिकवण्याबरोबर अपमान,नकार सहन करणे,यश अपयश पचविणे या गोष्टीही शिकवून  मानसिक दृष्ट्या सक्षम करणे त्याना महत्वाचे वाटले.                     २०१० साली त्याना कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापेक्षा या विस्तारित कुटुंबाचे काय याची काळजी वाटली.बर्याच जणांनी घरासाठी कर्जे घेतली होती त्याचे हप्ते स्मिताताई भरायच्या.त्या ७/८ महिने तरी काम करू शकणार नव्हत्या तर निर्मिती संस्थेवर त्याचा परिणाम होणारच होता.या काळजीनेच मी आजारातून लवकर बाहेर आले असे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.भविष्यकालीन स्वप्ने पाहणे,संकल्प करणे त्यांनी सोडले नाही.

                 मनाचा खंबीरपणा, विलपॉवर, अध्यात्मिक  बैठक त्यांच्या मदतीला आली.माहिकारी या कोणतेही कर्मकांड नसलेल्या अध्यात्मिक संप्रदायाची कोणीतरी ओळख करून दिली.वैश्विक शक्ती घेण्याची थेरपी त्यांनी सहा महिने घेतली. त्याना बरे वाटल्यावर इतरांना अशी शक्ती देणेही त्यांनी केले. कॅन्सर, त्यासाठी घ्यावी लागणारी किमो त्यांच्या शरीराला दुर्बल करत गेले पण त्यांच्या मनावर हल्ला करणे या आजारालाही जमले नाही.आज त्या नसल्या तरी त्यांच्या हाताखाली सहवासात तयार झालेल्या अनेकांच्या कार्यातून त्यांच्या विविध कलाकृतीतून त्या प्रेरणा देतच आहेत.

              


Monday 19 September 2022

आनंदी वृद्धत्व - ८

                                                आनंदी वृद्धत्व -८
 
                           आत्तापर्यंत या लेखमालेत ज्या व्यक्तींच्यावर लिहिले त्या व्यक्ती बाहेरच्या होत्या. आत्ता ज्या व्यक्तीवर मी लिहिणार आहे ती व्यक्ती २४ तास सहवासातील होती.ती म्हणजे माझे सासरे.त्याना आम्ही सर्वच नाना म्हणायचो.तीर्थहळ्ळी ही त्यांची जन्मभूमी आणि बेळगाव ही कर्मभूमी.बेळगावात त्यांची नारायण भटजी अशी ओळख होती.समाजात त्यांच्याबद्दल आदर होता.बेळगाव सोडताना त्यांचा मोठ्ठा निरोप समारंभ झाला.त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे,त्यांच्यावर लिहिण्याजोगे खूप आहे. येथे फक्त त्यांच्या आनंदी वृद्धत्वावर लिहित आहे.
                       बेळगाव सोडून आई आणि नाना ७८ साली पुण्याला आले त्यावेळी नाना ७८ वर्षाचे होते.त्याना डायबेटीस होता पण बाकी तब्येत छान होती.ते प्रथमच पुण्याला आले होते.सासुबाई मात्र त्यांच्या आजारपणात बरेच दिवस राहिल्या होत्या.त्यांची काळजी नव्हती.बेळगावला मोट्ठे घर.येथे दोन खोल्या त्यामुळे नानाच कसे काय राहणार असे आम्हाला वाटत होते.बेळगावात ते दिवसभर उधोगात असायचे.येथे काय करतील? तेथे सकाळी राममंदिर, मारुती मंदिरात पूजा, इतर भिक्षुकीची कामे असल्यास सायकलवर जात.घरी आल्यावर ज्योतिष विचारण्यासाठी अनेकजण येत.त्यात ते रमून जात. ज्योतिष हा त्यांचा छंद होता.कोणाला काय द्यायचे ते द्यावे.आलेले पैसे त्यांनी एक धर्मादाय खाते केले होते त्यात टाकत.ते घरासाठी वापरत नसत.येथे काय करतील?

                             नानांनी आमची भीती खोटी ठरवली.देश.काल,परिस्थितीनुसार राहायचे असे ते म्हणत आणि त्यांनी ते खरे करून दाखवले.बेळगावचे सोवळेओवळे येथे संपले.नाना पुण्यात आलेले ऐकून पुराणिक नावाचे भिक्षुकी करणारे गृहस्थ भेटायला आले.नानांची विद्वत्ता ते ऐकून होते.ते त्याना वास्तूशांती, नवग्रहहोम, मुंज,विवाह अशा कामाला घेऊन जाऊ लागले.नाना संस्कृत पंडित होते.प्रत्येक विधीचा अर्थ समजाऊन सांगत.गप्पात संस्कृत सुभाषिते अर्थासह सांगत.नानांच्यामुळे पुराणिक यांचा व्यवसाय वाढला आणि नानांचा वेळ जायचा प्रश्न सुटला.आता येथेही ज्योतिष विचारण्यासाठी अनेक जण येऊ लागले.

                १९८१ मध्ये सासुबाईंचा पाय गुडघ्यापासून काढावा लागला.घरच्या सगळ्यांच्या पत्रिका नानांच्या डोक्यात असत.यातून ती बाहेर येणार नाही आली तरी हाल आहेत त्यामुळे गेलेलीच बरी असे ते शांतपणे म्हणाले तेंव्हा मीच हादरून गेले.त्यांची भविष्यवाणी खरी ठरली.त्या गेल्यावर ते कोलमडतील असे वाटले पण तसे काही झाले नाही 'सुख दु:खे समेकृत्वा' अशी त्यांची वृत्ती होती.सासूबाई असेपर्यंत त्यांच्याशी सासऱ्यासारखेच नाते होते. त्या गेल्यावर मात्र आमच्यात हळूहळू एक वेगळेच नाते तयार झाले.

                 आमचे बंगल्याचे काम चालू झाले आणि  ८१ व्या वर्षी नाना रोज देखरेखीसाठी सायकलवर जाऊ लागले.ते गर्दीच्या रस्त्यावरूनही सायकलवर अनेक ठिकाणी जात.मला काळजी वाटायची ते म्हणायचे 'काही काळजी करू नको गो माझ अपघातात मरण नाही'.मी ज्योतिष शिकून घ्यावे असे त्यांना वाटे.पण माझा फारसा विश्वास नसल्याने मला शिकावेसे वाटत नसे.ते पत्रिका करत तेंव्हा काही गणिती कामे असत ती करायला त्याना मदत मात्र करत असे.

                  १९८२ मध्ये आम्ही बंगल्यात राहायला आलो.गोडाऊन मध्ये ठेवलेले सर्व जास्तीचे सामान आता घरात आले.यात  त्यांनी बेळगावहून आणलेली पुस्तकाची पेटी होती.ही पेटी आणण्यास सासुबाईंचा विरोध होता.त्यांच्याशी भांडून त्यांनी ती आणली होती.त्यांनी वर्षानुवर्षे जमवलेली ती पुस्तके होती.ती त्यांची खरी इस्टेट होती.पेटीला ते माझ्याशिवत कोणाला हात लावू देत नसत.यातली पुस्तके काढून वाचणे, माझ्याबरोबर चर्चा करणे,कधीकधी वादविवाद ही होत ते वैचारिक पातळीवरचे असत.तू काय वादात हरवणार नाही म्हणायचे. त्यात कौतुक असायचे.मला त्यांच्याबाद्दल यासाठी आदर वाटायचा.  मुलगा हवाच या वादात त्यांनी माघार घेतली.उलट माझ्या तिन्ही मुली त्यांच्या आवडत्या झाल्या. त्यांचे कौतुक ते सर्वाना सांगायचे.आता त्या त्यांच्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उच्च स्थानावर आहेत तेंव्हा नानांची खूप आठवण येते.एका मुलीनी संस्कृतमध्ये M.A केले. ते असते तर तिच्या त्यांच्याशी छान चर्चा झाल्या असत्या.तिचे लोकमतमध्ये संस्कृत कणिका नावाचे सदर वर्षभर रोज येत असे.ते खूप खुश झाले असते.मुली,आम्ही दोघे आणि ते आमच्या सहा जणांची एक सुंदर हार्मनी झाली होती.

                स्वत:च्या जागेत आल्यावर ते जास्तच खुलले.त्याना कोणत्याही कामाची कधी लाज वाटली नाही.रस्ते नव्हते.खड्डे असायचे ते बुजवायचे.समोर स्वत: खड्डे खणून मोठ्ठी झाडे लावली. घराभोवतीही बाग केली.दिवसदिवस बागेत असत.आम्ही माळी लावायचा विचार केला तर संतापले.मी असेपर्यंत माळी लावायचा नाही म्हणाले.पायात काही न घालता काम करायचे त्याना डायबेटीस होता त्यामुळे पायाला काहीतरी लागेल याची आम्हाला भीती वाटायची.

            आम्ही नवीन जागेत रहायला आल्यावर धाकटीही शाळेत जाऊ लागली आणि माझे भारतीय शिक्षण संस्थेत एमफिलसाठी जाणे सुरु झाले.सकाळी ९.३५ ची बस गाठायला घरून ९ला निघावे लागे.मोठ्या दोघी माझ्याबरोबर शाळेला जाण्यासाठी बसला असत. धाकटी मात्र घरी असे.तिला शाळेत न्यायला शाळेचा शिपाई साडे दहाला सायकलवर येई. नाना असल्यामुळे मी बिनधास्त असायची. त्या आधी नानांचा ब्रेकफास्ट,त्यांना इन्शुलीन देणे,मुलींचे डबे,दुपारचे जेवण करावे लागे.नानांना माझ्यानुसार सकाळची दैनंदिन कामे करावी लागत.त्यांची त्याबद्दल तक्रार नसे,मी दुपारी घरी येई. नंतर आम्ही दोघे जेवायचो. मला उशीर झाला तर ते स्वत: वाढून घेत.बेळगावपासुनच त्यांना ती सवय होती. तेथेही ते चूल सारवणे.वैश्वदेवासाठी नैवेद्याचा भात करणे अशी कामे करीत.बायकांनी घरी राहून त्यांची खातिरदारी करावी असे त्याना वाटत नसे.

           टीमवीत Distance Education सुरु झाले.त्यासाठी प्राध्यापक हवे होते. मी सहज म्हणून अर्ज केला आणि माझी निवड झाली.नोकरीसाठी माझ्या नवऱ्याचा विरोध होता.नानांना त्रास होऊ नये यासाठी.नाना म्हणाले तो काय सांगतो त्याचा बाप सांगतोय कर तू नोकरी.याच काळात माझी पीएचडी चालू झाली.२६०७ विद्यार्थ्यांना प्रश्नावली पाठवण्यासाठी पाकिटात भरणे,तिकीट चिकटवणे,माझ्या पत्त्याचा शिक्का मारणे या कामात त्यांनी  आनंदाने सहभाग घेतला.तुझी फार ओढ होते घरची कामेही सांग म्हणत.स्वस्थ बसणे त्यांना माहीतच नव्हते.

           माझ्या माहेरी लग्नकार्याला गेले की तेही बरोबर असत.व्याही म्हणुन न वावरता घरच्यासारखे राहत.तसे तेथेही त्यांनी पूजा करायचे काम हाती घेतले. माझ्या आईला ते लहानपणापासून ओळखत.पत्रिका दाखवायला तेथेही माणसे गोळा झाली.

           नोकरी निमित्त मला संपर्क सत्रासाठी शनिवार रविवार गावोगाव जावे लागत होते.इंजक्शन देण्यापासून मुलीना करावे लागे.मला जरा गिल्ट फिलिंग यायचे. ते म्हणत तुझ्यापेक्षा मुली घर छान सांभाळतात. छान स्वयंपाक करतात.

           त्यावेळी लाईट जात असत.नाना म्हणत 'गाणी म्हणा गो'.मग मी व मुली  'वेडात मराठे वीर दौडले सात' पासून 'मेरा कुछ सामान' पर्यंत वाट्टेल ती गाणी म्हणत असू. ते गेल्यावर लाईट गेले की गाणी म्हणणे थांबलेच.मी मुलीनी गाणे शिकावे म्हणून प्रयत्न केला कोणी शिकले नाही.ते म्हणत तुझा शुक्र चांगला आहे तूच गाणे शिक.मी निवृत्तीनंतर गाणे शिकायला लागले. आमच्याच घरी गाण्याचा क्लास सुरु झाला.ते खुश झाले असते.अशी वेळोवेळी ते जावून ३० वर्षे तरी झाली त्यांची आठवण येते. 

           ते कितीही थंडी असो फक्त.धोतर नेसलेले  असे.माझ्या मैत्रिणी,मुलींच्या मैत्रिणी,ह्यांच्या ऑफिसमधले कोणी आले तरी ते आपली बाहेरच्या खोलीतील जागा सोडत नसत की वेष बदलत नसत.आम्हीही त्याना कधी त्याबद्दल म्हणत नसू उलट ते गप्पात सामील होत.त्यांची संस्कृत सुभाषिते,कुट कोडी सांगत. आलेल्यांनाही ऐकण्यात रस वाटे.  

           नाना रोज व्यायाम करत.बागकाम असेच. त्यामुळे त्यांचा डायबेटीस कंट्रोलमध्ये असे.फारसे आजारपण नसे तरी कधी ताप आला,लूज मोशन झाले तर लंघन हे सर्व आजारावर औषध आहे अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित ते सांगत आणि अजिबात औषध घेत नसत.आणि ते बरेही होत. पण आता वृद्धत्वाच्या समस्या हळूहळू चालू झाल्या.लंघन पुरेसे नव्हते.कधी डीहायड्रेशन,कधी जुलाब,कधी जखम झाल्याने त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागू लागले.एकदा तर त्याना खोल जखम झाली घोट्याकडचा बराच भाग काढावा लागला.बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागले.जेवण,ब्रेकफास्ट न्यावे लागे.मुली आणि आम्ही दोघेच ही जा ये,तेथे थांबणे करत असू.त्यावेळी काही दिवस आमच्या ऑफिसमधला निवृत्त शिपाई  ते बाहेर जाऊ नये म्हणून लक्ष द्यायला ठेवला होता.काही दिवस डॉक्टर ड्रेसिंगला येत.नंतर मला करण्याची परवानगी दिली.त्यातून व्यवस्थित बरे झाले.

                         एकदा केइएममध्ये ठेवले होते. प्रसिद्ध डॉ. पै तेथे होते.त्यांची मुंज नानांनी केली होती.त्यांनी ओळखले.ते अगत्यानी चौकशी करत.त्यांच्यामुळे नकळत व्हीआयपी ट्रीटमेंट मिळायला लागली.ते चेहऱ्यावरूनही भविष्य सांगत त्यामुळे तेथेही भोवती लोक गोळा होत.

                   त्याना  बर्याच वेळा लघवीला शौचाला घाई होऊन कपडे खराब होणे असे प्रकार होत पण डायपर माहीत नव्हते.त्या गोष्टीचा त्रास वाटला असेही आठवत नाही.त्यांचे वृद्धत्व त्रासदायक झाले अशा आठवणी नाहीत.उलट आनंददायी आठवणीच आहेत.त्यांच्याही आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा काळ असावा.

             ते एकदा घरातच पडले.खुब्याचे हाड मोडले.हॉस्पिटलमध्ये ठेवायचे होते. अम्ब्युलन्सची वाट पाहत बसलो होतो.ते रोज विष्णूसहस्त्रनाम म्हणत त्याच्या कव्हरच्या मागच्या बाजूला माझी पत्रिका मांडली.आणि ते काही सांगत होते इतक्यात अम्ब्युलन्स आली.ते म्हणाले आता आल्यावर पत्रिका बघुयात.पण ते परत आलेच नाहीत.शस्त्रक्रिया ठरली होती. आमच्या समोर त्यांना OT मध्ये नेले.भूल देण्यापूर्वीच त्याना Hart attack आला.एक दोन दिवस त्यानंतर ते होते.त्यांच्या सेवेला असलेली केरळी नर्स ढसाढसा रडत होती.त्यांनी चेहऱ्यावरून तिचे भविष्य सांगितले होते.घरी परत येणार या भावनेतून ते गेले होते आणि आलेच नाहीत याचा खूप त्रास झाला.ते शतक नक्की काढतील असे वाटले होते.पण थोडक्यात हुकले.

             आमची सेकंड इनिंग सुरु झाली.आमच्यासमोर त्यांचे आनंदी वृद्धत्वाचे मॉडेल आहे.

              https://shobhanatai.blogspot.com/2022/03/blog-post.html

            


 

 


                   

Tuesday 12 July 2022

हरहुन्नरी प्रकाश विष्णू जोशी

                                       हरहुन्नरी प्रकाश विष्णू जोशी

                  १२ जुलै २०२२ ला प्रकाश जोशी ७५ वे वर्ष संपवून ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.त्यांना उत्तम आरोग्य लाभू दे.सळसळता उत्साह असाच टिकू दे यासाठी शुभेच्छा.पंचाहत्तरी ओलांडल तरी 'अजून यौवनात मी' अशी त्यांची वृत्ती आहे.अर्ध्या रात्री कोणीही मदतीचा हात मागितला तर हजर होतील अशी यांची खासियत आहे.आम्ही त्याचा अनुभव घेतलाय.तसे पाहता जोशी दाम्पत्याशी आमची ओळख निवृत्तीनंतर झाली तरीही अनेक वर्षे एकमेकाना ओळखतो असे मैत्र जमले.माझ्यासाठी ते फ्रेंड,फिलासाफर, गाईड झाले.तसे ते मित्रपरिवारातील अनेकांना वाटत असणार.

त्यांचा मित्रपरिवार मोठ्ठा आहे. कोल्हापूरच्या शाळा कॉलेजातील मित्र,इंडियन बँकेतील कलीग,पुण्यात स्थाईक झाल्यावर तेथले.यात विविध जाती धर्माचे,सर्व वयातील,आर्थिक स्तरातील मित्र, मैत्रिणी आहेत.भिमाले उद्यानात फीरत असताना लक्षात आले की, अगदी नर्सरीतल्या मुलापासून,८० ओलांडलेल्या वृद्धापर्यंत सर्व त्यांना मित्र मानतात.त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा करिष्मा आहे.

मोबाईलमध्ये काही तांत्रीक अडचण आली,ऑनलाईन काही घ्यायचे आहे,बँकेचे काही प्रोब्लेम आहेत, मराठीतले इंग्रजीत भाषंतर हवे आहे अशा विविध बाबीत सर्वाना हक्कानी जोशी काका आठवतात.कमी तेथे आम्ही अशा वृत्तीने त्यांचे काम चालते.हे सर्व करताना कोणताही आव नाही,परतफेडीची अपेक्षा नाही.'इदं न मम' ही भावना असते.

               हे झाले सर्वमान्याविषयी.वलयांकित असे अनेक त्यांचे मित्र आहेत. अगदी त्यांच्या घरी राहून पाहुणचार घेणारे आहेत.ते इंडियन बँकेतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.भारतात, भारताबाहेर अनेक ठिकाणी बदल्या झाल्या.त्या त्या ठिकाणीही असे भेटत गेले.रेव्हरंट टिळकांचे नातू अशोक टिळक,गणिती शकुंतलादेवी,लेखिका प्रतिभा रानडे अशी काही उदाहरणादाखल नावे सांगता येतील.हे विश्वची माझे घर अशी वृत्ती असल्याने सगळेच त्यांना आपले वाटतात.त्यांच्यासाठी खिसा मोकळा करण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत.

              त्यांचे हे दानशूरत्व या हाताचे त्या हातालाही माहिती नसते.अनेक संस्थाना ते सातत्याने देणग्या देतात.अगदी अनोळखी,गरजू अडचणीत आहे असे दिसले तर ते तत्काळ मदतीचा हात देतात.आमची दोघांची कामवाली मीरा एक आहे. तिचा मुलगा नुकताच दहावी झाला. अमेरिकेला जाताना ते तिला सांगून गेले, पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक गरज लागली तर मला सांग.

आनंदवनची ट्रीप ठरली.आम्ही गावाला गेलो होतो.आम्ही येईपर्यंत तारीख उलटून जाणार होती.जोशींनी आमचे पैसे भरून टाकले.आम्ही आल्यावर परत दिले नाही तर अशी शंकाही त्यांना आली नाही.विश्वासाचे नाते तयार झाले.करोना काळात माझे एटीएम मधून पैसे आणून द्यायचे काम वेळोवेळी त्यांनीच केले. 

             प्रवास हा जोशी दाम्पत्याचा आवडीचा प्रांत. देशविदेशात त्यांनी भरपुर मुशाफिरी केली.कैलास मानस सरोवर,नर्मदा परिक्रमा,कर्दळीवन,लेह लडाख अशा कठीण ठिकाणीही त्यांनी भ्रमंती केली.तेथून उत्तम फोटो काढून पाठवणे.आणि आल्यावर हास्यकलब आणि जेष्ठ नागरीक संघात त्याची ऐतिहासिक, माहिती,त्याच्याशी निगडीत कथा,विश्लेषण यासह सांगणे हे ते करतात. आमच्या सारख्या घर बश्याना घरी राहून प्रवास केल्याचा आनंद मिळतो.आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाची आनंदवनला सहल गेली तेंव्हा आम्ही निरुपमा आणि जोशींना हक्कानी स्वयंसेवक म्हणून बोलावले.

             अनेक वेळा मंडळाच्या कामासाठी आम्ही त्यांना हक्काने बोलावले आहे.११ एप्रिलचा पार्किन्सन मेळावा,प्रोजेक्टरवर काही दाखवायचे असले तर त्यांच्या लॅपटॉपसह कार्यक्रम दाखवायला इत्यादी.आज आमच्या Whatsapp ग्रुपचा पेशंटना खूप फायदा होतो. असा ग्रुप करायला त्यांनीच मला प्रवृत्त केले.अशा गोष्टीसाठी लागणारी तांत्रिक मदत त्यांचीच.

मोठ्या अधिकारपदावरून निवृत झाले असले आणि अजूनही तज्ज्ञ म्हणून त्याना भारतातील विविध भागातून मागणी असली तरी कोणतेही छोटे काम करताना त्याना लाज वाटत नाही त्यांचे असे पाय जमिनीवर असल्याने ते सर्वांना आपलेसे वाटतात.मी आणि नीरुपमानी फ्लॉवर रेमेडीच्या नोट्स तयार केल्या होत्या. त्याचे टायपिंग त्यांनी करून दिले.               

          तसे पाहता ते फिजिक्सचे विद्यार्थी पण बॅंकेतील नोकरीमुळे त्याक्षेत्रातील तज्ज्ञत्व त्यांच्याकडे आहे तसेच साहित्य,कला,इतिहास,सामाजिक शास्त्रे,खेळ,अध्यात्म अशा अनेक क्षेत्राबद्दल त्यांचे ज्ञान अचंबित करणारे आहे.त्यांच्या वेळोवेळी वेगवेगळ्या निमित्ताने केलेल्या audio क्लीप एकत्र करायला हव्यात. त्यात त्यांची बुद्धीची चमक,बहुश्रुतता,प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन,विश्लेषण करण्याची पद्धत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सोप्या शब्दात ते सांगण्याची हातोटी हे सर्व दिसून येते.

            बऱ्याच जणांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे वयाच्या २०व्या वर्षी retinal detachment मुळे एका डोळ्याला अंधत्व आले.गेल्या ३० वर्षापासून उजव्या डोळ्याचे दिसणे विक आहे.काही दिवसांपूर्वी त्याना थोडे चालले की पाय दुखायचा.पण त्यांची जिगर सगळ्या अवयवांचे काम करते.आणि ते सर्वांच्या नजरेला अगदी ठणठणीत असतात. आणि तसे ते आहेतही.त्यांचे सर्वच जीवन इतरांसाठी पथदर्शक आहे.माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता काठोकाठ भरलेली असते.

            तसे लिहिण्याजोगे खूप आहे.पण विस्तार भयास्तव एक महत्वाची गोष्ट सांगून थांबते. पत्नीच्या आपल्या यशातील वाटा जाहीरपणे सांगणे आणि त्यापेक्षाही 'I love my wife and Dirang' असे फोटो टाकत मोकळेपणानी सांगणे मला फार भावले.दोघांचेही सहजीवन असेच एकमेकासोबत आनंदाने जावो.अमेरिकेत आजचा वाढदिवस लेकी.जावई,नातवंडे यांच्यासह आनंदात साजरा होवो.

            वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा!

May be an image of 2 people and outdoors


Friday 27 May 2022

आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                                आमचे बावन्न वर्षांचे सहजीवन

                   आज आमच्या लग्नाला ५२ वर्षे झाली.पहिली २९ वर्षे या सहजीवनात आम्ही दोघेच होतो.गेली २३ वर्षे मात्र पार्किन्सन्स मित्र घुसला आहे.आमचे सहजीवन एक उघडे पुस्तक बनले आहे. निमित्तानिमित्ताने पार्किन्सन्सने आमच्याबद्दल खूप लिहायला लावले आम्हाला बदलवून टाकले. आज जरा त्याला न जुमानता आधीच्या २९ वर्षात रमावे असे वाटले.

                  नुकतीच बी.ए.झाले होते.अजून शिकायची इच्छा होती.पण पहिल्याच कांदेपोहे कार्यक्रमात लग्न जमले.शोभना रामचंद्र देशपांडेची शोभना गोपाळ तीर्थळी झाले.विवाहानंतर पुण्यात आलो.टिमवी कॉलनित मेजर दामले यांच्या विकास बंगल्यात ह्यांनी आधीच जागा घेऊन ठेवली होती.मोठ्या घरातून दोन खोल्यात रहायचे? पण त्या दोन खोल्या राहिल्याच नाहीत.दामले बाबा,दामले वहिनी,त्यांचा अख्खा बंगला,बाग आणि त्यांचे सर्व कुटुंबीय बघता बघता आमचेही झाले.प्रेम,धाक,त्याचबरोबर आम्हाला आणि आमच्या मुलीनाही उत्तम संस्कार मिळाले.मुलींसाठी समोर महराष्ट्र मंडळ शाळा,व्यायाम शाळा,कॉलनीतले वातावरण कुटुंबासारखे होते.मैत्रिणी मिळाल्या.वैदिक संशोधन मंडळाची लायब्ररी मिळाली.आणि छोट्या गावातून आलेली बुजरी,बेळगावी भाषा बोलणारी मी बघता बघता पुणेरी झाले.

                हे किर्लोस्कर न्यूमॅटीक मध्ये सर्व्हिसला होते.सकाळी सातला जायचे यायची वेळ नसायची.सुटीच्या दिवशी मात्र मोटारसायकलवर भटकणे व्हायचे. कात्रज, थेऊर, ओळखीच्या, नात्यातील लोकांकडे जाणे व्हायचे.कधी चक्क  मुंबईलाही.हे खूप वेगाने मोटार सायकल चालवायचे.ह्यांचे मित्र म्हणायचे वहिनी तुम्हाला भीती वाटत नाही का? पण मी आधी कधी अशी दुचाकी वाहनाच्या मागे न बसल्याने मला वेग काय असतो माहीतच नव्हते.सोनाली आणि देवयानी झाल्यावरही आम्ही त्या दोघींना घेऊन शिवाय सामान असे मोटार सायकलवर खूप फिरलो.श्रद्धाच्या वेळी पोटात कळा सुरु झाल्यावर आम्ही मोटार सायकलवर कर्वे रोडला डॉ.तेलंग यांच्या दवाखान्यात गेलो होतो.आजुबाजुचे म्हणायचे जावानी तुमच्यावर जाहिरात करायला पाहिजे.

              आम्हाला दोघानाही माणसांची आवड आणि साधेपणा हे साम्य सोडता आमच्या व्यक्तीमत्वात खूप फरक.हे नीटनेटके राहणारे मी थोडी गबाळी.मी सर्वांची सदैव काळजी करणारी तर हे बिनधास्त.मला हेच हवे तेच हवे,प्रत्येक गोष्ट हातात देणे अशी ह्यांची नवरेगिरी अजिबात नव्हती.स्त्री, पुरुष समानता अशा पोकळ गप्पा नव्हत्या पण प्रत्यक्षात आचरण मात्र समानतेचे.मला एकटी बाहेर जाण्याची, रस्ता क्रॉस करायची ही भीती वाटायची. याबाबत मात्र त्यांनी सक्ती केली.एकटी बाहेर जायला भाग पाडले.माझ्या मोठ्या बहिणींना माहेरी सोडायला जावे लागायचे आणि वडील परत पोचवायला यायचे माझ्या बाबतीत त्यांनी या दोन्ही गोष्टी बंद केल्या.मी तिन्ही मुलीना घेऊन रेल्वेने पुणे, मिरज आणि पहाटे झोपेत असलेल्या मुलीना उठवून गाडी बदलून मिरज ते खानापूर असे प्रवास सहजपणे करू लागले.रिझर्वेशनही मीच करून आणायचे.आधी राग यायचा पण माझ्याही नकळत त्यांनी मला आत्म निर्भर केले. त्यांनी कंपनीला वाहून घेतलेले. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी,मुलींची आजारपण,शाळा प्रवेश,अभ्यास सर्व माझ्याकडे. मी नोकरी करत नसल्याने मलाही ती माझीच जबाबदारी वाटत होती.

               हे अचानक पूर्वकल्पना न देता कोणालाही जेवायला घेवून यायचे.कधीकधी कोणाला बोलावून ठेवायचे आणि स्वत: ऑफिसमधून खूप उशीरा यायचे.त्या लोकांशी बोलत मला स्वयंपाक करावा लागत असे.एकीकडे अजून का आले नाहीत. मोटारसायकलला अपघात तर झाला नाही न या काळजीत मी असे.एकदा तर हे येताना चिकन घेऊन येणार होते.पाहुणे आले. माझा चिकनची पूर्व तयारीसह  सर्व स्वयंपाक झाला तरी यांचा पत्ता नाही मला कानकोंड्यासारखे झाले. शेवटी हे आले अशा वेळी राग येण्यापेक्षा सुखरूप आहेत यामुळे हुश्श व्हायचे.यांच्या अनेक मित्राना या आठवणी नक्की असतील.

               आमच्या दोन खोल्यांच्या घरात पाहुण्यांची सारखी वर्दळ असे.पार्ट्या,नातेवायिक,ओळखीचे असे अनेकांचे कान्देपोह्याचे कार्यक्रम,साखरपुडा,लग्नाचे वऱ्हाड राहणे अशा अनेक गोष्टी व्हायच्या अर्थात यासाठी दामले बाबा वहिनी यांचे सहकार्य असे,आमच्या दोन खोल्या आणि बंगला यात मध्ये दार होते ते दिवसभर उघडे असायचे त्यांच्या हॉलमध्ये मोट्ठे कार्यक्रम व्हायचे जास्त पाहुणे आले की त्यांची वरची केबिन,जास्तीच्या गाद्या सर्व मिळायचे.आम्ही स्वत:च्या बंगल्यात जाईपर्यंत आमच्याकडे टी.व्ही.नव्हता.आम्ही सर्व बाबांकडेच टीव्हीवरील कार्यक्रम पाहायचो.छोट्या खोलीत अंतर कमी असल्याने मुलींच्या डोळ्यावर परिणाम होईल असे बाबा म्हणायचे. १९७८ मध्ये यांचे आईवडील बेळगाव सोडून कायमचे आमच्याकडे आले.आम्ही मोट्ठे घर बघत होतो.एकीकडे बंगला बांधणे आणि मोठ्या घराचे डीपॉझीट,भाडे परवडणारे नव्हते.आता बंगला बांधताय तर तेथेच जा एकदम असे वहिनीनीनी पटवले.मालक आणि भाडेकरू यांच्यात साप,मुंगुस रिलेशन असते.पण आमचे तसे नव्हते.या संबंधावर वेगळा लेख लिहायला हवा.त्यांच्यामुळे अनेक कटू प्रसंगातून जावे लागले तरी आमच्या सहजीवनाला तडा न जाता ते अधिक घट्ट झाले.प्रेम विश्वास,निष्ठा अधिक पिळदार झाल्या.

             याच काळात मी टीमवी तून एम.ए.केले.संध्याकाळी क्लास असायचे.मुली त्यावेळी समोर व्यायाम शाळेत जायच्या.प्रत्येकांनी सारखे काहीना कामात असलेले याना आवडायचे.मी काही शिकण्यासाठी त्यांचा विरोध नव्हता.बायकोने सारखे घरात अडकून राहायला हवे असे वाटत नसे.मी एमफिल,पीएचडी करताना त्यांचा अहं आड आला नव्हता.उलट अभिमानच असायचा.बायकोला स्वातंत्र्य देतो असा आवही नसायचा.ते स्वत: डिप्लोमा इंजिनीअर होते. त्यांच्या कामानी त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.जनरल मॅनेजर पदापर्यंत ते पोचले होते.

              १९८२ मध्ये आम्ही स्वत:च्या बंगल्यात राहायला आलो.दामलेंचे घर सोडताना मी आणि वहिनी खूप रडलो होतो.आता मुलीही मोठ्या झाल्या होत्या.रस्ता ओलांडला की शाळा नव्हती.धाकटी दीड वर्षाचीच होती.मोठ्या दोघींना बसने शाळेतून यायला खूप वेळ व्ह्यायचा. ज्ञान प्रबोधिनीत जात त्यामुळे त्यांचे इतरही उपक्रम असत. पण ह्यांचे सातच्या आत घरात असे अजिबात नव्हते. गावाबाहेर घर. सामसूम असायची मला खूप काळजी वाटायची परंतु ह्यांचे म्हणणे असायचे लाखात एखादे उदाहरण घडते म्हणून मुलीना डांबून ठेवायच्या का? माझ्याप्रमाणेच ह्यांनी दिलेली मोकळीक आणि प्रबोधिनी यामुळे या मुलीही आत्मनिर्भर झाल्या.सायकलवर शाळेत आणि पुढे कॉलेजलाही जायच्या.कायदा मोडून १८ वर्षाच्या आत टूव्हीलर द्यायची नाही असे आम्हला वाटायचे. आम्ही दोघे कायम जमिनीवर असल्याने मुलींच्यावरही तेच संस्कार झाले.

            बंगल्याचे अर्धेमुर्धे काम झाले होते.बंगला बांधतानाही ह्यांनी घराची अनेक कामे मलाच करायला लावली.रिक्षाला खूप पैसे पडतात अशी माझी कुरकुर असायची पण हे म्हणायचे मी सुटी घेऊन पगार बुडवण्यापेक्षा रिक्षा परवडते.गुरुवारी ह्याना सुटी.तेंव्हा मात्र आम्ही बाहेर पडायचो.अनेक नर्सरीमधून झाडे आणली सुंदर बाग झाली.बागेची निगराणी सासरे आवडीने करायचे.येथे रस्ते झाले नव्हते,रिक्षावाले येत नसत.याना समाजकार्याची आवड येथल्या काही लोकांनी मिळून 'विकास समिती' स्थापन केली.यातून आजूबाजूची अनेक माणसे जोडली गेली.

             नवीन बंगल्यात आल्यावर श्रद्धा थोडी मोठ्ठी झाली आणि मी आयआयइत (भारतीय शिक्षण संस्था ) एमफिलला प्रवेश घेतला.दोन बस बदलून जावे लागत असे.मी आणि मुली एकाच वेळी बसने निघायचो. ह्याना गुरुवारी सुटी असायची. सुटीच्या दिवशी ते मला सोडायला आणि आणायला टू व्हिलरवर कोथरूडला यायचे.माझे लेक्चर चालू असले तर थांबून राहायचे.तिथल्या कर्मचार्यांशी त्यांची मैत्री झाली होती.प्रथम दर्शनी इम्प्रेशन पडणे हे त्यांचे वैशिष्ठ आहे. ते मलाच लिफ्ट द्यायचे असे नाही तर ऑफिसमधले वर्कर्स,वाटेत कोणी ओळखीचे दिसले तर थांबून लिफ्ट द्यायचे.आम्ही दोघेही समोरच्या व्यक्तीकडे जात,धर्म,वय,आर्थिक परिस्थिती, शिक्षण अशी कोणतीच लेबले न लावता माणूस म्हणून पाहतो.त्यामुळे आमचा सर्व स्तरातील लोकसंग्रह मोठ्ठा आहे.सपोर्ट सिस्टीम मोठ्ठी आहे.आमच्या सहजीवनातील हे मोट्ठे संचित आहे.ही इन्व्हेस्टमेंट आमच्या सेकण्ड इनिंगमध्ये उपयोगी पडत आहे.   

             आमच्या सहजीवनात यांनी गजरा आणणे,वाढदिवसाला भेटी देणे असे काही नव्हते.Romantic असे आमचे कपल नाही.गोतावळा जमा करण्यातच आम्हा दोघानाही आनंद असायचा.मी लग्नानंतर १५ वर्षांनी टीमवीत नोकरीला लागले.मे महिन्यात परीक्षा घ्यायला जावे लागे.लग्नाच्या वाढदिवसाला नेमके आम्ही एकत्र नसायचो.आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला हे इटलीला आणि मी कोल्हापूरला होते.माझ्या मुलीच्या सासुबाईना याचे खूप वाईट वाटले होते.

             यांनी कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास खूप केला त्यावेळी मात्र आमच्यासाठी तिथल्या खास वस्तू हे आणायचे. एकमेकाना आम्ही मोठ्ठी मोठ्ठी पत्रे लिहायचो.आमच्यात धुसपूस भांडणे असे नसायचे. याला कारण ही हेच. मी कधी आरडाओरडा  केला तर ते प्रत्युत्तर द्यायचे नाहीत.मी अपोआप गप्प व्हायची.मी वृत्तपत्रात,मासिकात लेखन करायची ते त्याना आवडायचे.माझे अक्षर चांगले नसल्याने पहिली कथा छापून आली तर माझे आडनाव तीर्थकी लिहिले होते. मग हे, कोठे लेखन पाठवायचे तर सुंदर अक्षरात लिहून द्यायला लागले.एका समजशास्त्र परिषदेसाठी माझा तेथे वाचण्या साठीचा रिसर्च पेपरही त्यांनी सुंदर अक्षरात लिहून दिला.त्याचे खूप कौतुक झाले. तोवर ते निवृत्त झाले होते.ते स्वत: कार ड्राईव्ह करत रत्नागिरीला आले होते.त्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो.आणि रत्नागिरीहून कोल्हापूरला आमचे दोन दिवसाचे संपर्क सत्र होते तर ते तेथेही आले.त्यांच्या अशा माझ्या नोकरीतील पूर्ण सहकार्याची आठवण आजही माझे सहकारी काढतात.

               मला नोकरीच्या निमित्ताने संपर्क सत्रांना,परीक्षेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जावे लागे.खरे तर यापूर्वी १५ वर्षे मी पूर्ण वेळ दिमतीला असण्याची सर्वाना सवय होती.परंतु माझ्या नोकरीतील कामांमुळे आमच्या सहजीवनात कोणताही ताण तणाव आला नाही.कोणतीही कुरकुर न करता सासरे,हे आणि मुली व्यवस्थित निभावून नेत.

                या सर्व काळात सासू,सासर्यांचे आजारपण, मृत्यू,मुलींची शिक्षणे,लग्ने,नातवंडांचे आगमन अशा अनेक गोष्टी घडल्या. चारचाकी आली.मुलींसह अलिबाग,गोवा,खिदरापूर,लोणावळा अशी भ्रमंती होत राहिली.आमची अमेरिका ट्रीप झाली.केरळ झाले.केसरीबरोबर नैनिताल,काश्मीर झाले.आता खूप फिरायचे ठरवले होते. पण माझे कमरेचे दुखणे सुरु झाले आणि ते शक्य झाले नाही.

               २९ वर्षांचा काळ खूप मोठ्ठा आहे.अनेकानेक आठवणीत रमले पण ते लिखाणात नेमकेपणाने आणणे काही जमले नाही.आम्हाला बरेच जण विचारतात तुमचे लव्हमॅरेज का? ठरवून केलेले लग्न एक मटकाच असतो असे म्हटले जाते.आम्हाला तो लागला.आमचे जीवन कृतार्थ,समाधानी,आनंदी आहे.सगळे काही आलबेल होते असे नाही थोडा खट्टा थोडा मिठा असतेच पण आमचा सहजीवनाचा पाया श्रद्धा,प्रेम विश्वास,निष्ठा यांच्या भक्कम पायावर उभा असल्याने त्याला तडा गेला नाही.वेळोवेळी प्रतीकुलतेला अनुकुलतेत बदलून घेणे आम्हाला जमत गेले.जुन्या जखमा व्रणसुद्धा न ठेवता भरून आल्या.काही जण आमच्या सहजीवनाला रोलमॉडेल मानतात.त्यामुळे इतरांनाही आमचे सहजीवन यशस्वी वाटत असावे. 

             आत्ता तेवीस वर्षे पार्किन्सन्स आमच्यात घुसला आहे.आमच्या निवृत्तीनंतर कामाची क्षेत्रे वेगळी असल्याने वाटा बदलल्या असत्या.पण पार्किन्सन्सने आम्हाला त्याच्या भोवतीच घोटाळत ठेवले आहे. ही प्रतीकुलताही आम्हाला अनुकुलतेत बदलायला जमले आहे.याला आपल्यात सामावून कसे घ्यायचे आणि त्याच्यासह आनंदी कसे राहायचे हे इतर पार्किन्सन्सग्रास्तांपर्यंत पोचवायचे हे आमचे जीवन ध्येय बनले आहे. 

               पाहिलत या पार्किन्सनला थोडा वेळ बाजूला ठेवायचे ठरवले होते पण नकळत आलाच.आता सहजीवनाचा भागच झालाय. ये बाबा.