Sunday 18 April 2021

आमच्या बागेतील मधुमालती

                                                          आमच्या बागेतील मधुमालती

                    आमच्या बागेतील मधुमालती फुललीय पांढऱ्या,गुलाबी, लाल रंगाच्या मिक्स फुलांनी लगडलेले गुछ्य मन मोहून घेतात.फुललेली मधुमालती पाहिली की मला सुंठणकर पती, पत्नींची आठवण येते.त्याचे असे झाले.        

                    माझ्या सासर्‍यांच्याजवळ धार्मिक,ज्योतिषविषयक,संस्कृत साहित्य इत्यादी पुस्तकांचा संग्रह होता ही पुस्तके पाहताना अचानक' लोकमित्र'चा अंक हातात आला.अंक १९३६चा होता आणि संपादक म्हणून नाव होते द.गो.सडेकर यांचे.मागे लिहिले होते 'हे पुस्तक खानापूर जिल्हा बेळगाव येथे द.गो.सडेकर यांनी आपल्या धनंजय प्रेसमध्ये छापिले.व घनं.६४३ येथे लोकमित्र ऑफिसात प्रसिद्ध केले' हा पत्ता तर आमच्या घराच्या शेजारचा होता.माझे कुतूहल चाळवले.मी शोध सुरु केला त्यांच्या वंशजाकडे माहिती मिळत नव्हती. याचा शोध घेताना मी अनेक ठिकाणी गेले.त्यातील एक नाव बा.रं.सुंठणकर

                      बा.रं. सुंठणकरांचे १९व्या शतकातील महाराष्ट्रावर पुस्तक छापून आले होते..बा.रं. सुंठणकर बेळगावचे.आमच्या पिढीच्या सर्वांसाठी आदरणीय नाव. आणि इतिहासाचे अभ्यासक.त्याना निश्चित माहित असेल असे वाटून त्यांच्याकडे गेले होते पौड रोडला प्रशांत सोसायटीत ते राहत ही सोसायटी माझ्या भावाच्या घराच्या अगदीच जवळ होती.माझ्या भाबजयीला घेऊन मी त्यांच्याकडे गेले.त्यांच्याकडून लोकमित्र हे चांगले मासिक होते आणि आर्थिक चणचणीमुळे बंद झाले एवढीच माहिती मिळाली.बेळगावच्या खूप गप्पा झाल्या..  

                  निघताना त्यांच्या बागेत छान मधुमालती फुलली होती.त्याबद्दल बोलताच त्यांच्या पत्नी म्हणाल्या एक रोप आहे तुम्हाला हवे असेल तर काढून देते.त्यांनी महत्प्रयासाने ते रोप काढून दिले.मी लगेच ते बागेत लावले. त्यावेळी  बंगला नवीनच झाला होता..इकडून तिकडून रोपे,कटिंग  गोळा करणे चालू असायचे.आता बागेत काम करणे झेपत नाही.बऱ्याच ठिकाणी फरशी घातली.जुनी जमवलेली अनेक झाडे आता शिल्लक नाहीत,

               मधुमालती मात्र टिकून आहे.आमचे शेजारी ती वेल सारखी तोडतात.आता ती गेली असे वाटते पण ती पुन्हा येते.ती फुलते.मला हसतमुख प्रसन्न चेहऱ्याच्या सुंठणकर पतीपात्नीची आठवण येते,त्यावेळी ते वयस्क होते पण गेटपर्यंत सोडायला आले आणि प्रेमाने ही वेल दिली.ते प्रेमच तिला जगवत असावे.ते दोघेही आता नाहीत आम्हीही पुढेमागे नसू पण मधुमालती मत्र फुलतच राहील.