Sunday 5 March 2017

आमचा हास्य परिवार - विविधतेतून एकता

                   आमची नव चैतन्य हास्ययोगपरिवारची   भिमाले उद्यान शाखा क्रमांक १४५ बघता बघता  १० वर्षाची झाली..शाखेचे जवळजवळ १३० सभासद पटावर आहेत.सर्व सभासद रोज हजर नसले तरी सहली,वर्धापनदिन,कोजागिरी कार्यक्रम यावेळी बहुसंख्य हजेरी लावतात.  शिवाय आमचे शिक्षक आणि संघटक एकनाथ सुगावकर गमतीने ज्याला एक्स्टर्नल सभासद म्हणतात असे बागेत वेगवेगळ्या कारणासाठी येणारेही आमच्या उपक्रमात सामील होत असतात.आमची शाखा विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे गावातील कोलाहल,गर्दी,वाढती रहदारी,प्रदूषण यापासून दूर असलेल्या विस्तीर्ण बागेत शाखा भरते. बागेत प्रवेश करताच कोणाचेही मन प्रसन्न होऊन जाते.यामुळेच बहुता  काटे सराना  हास्यक्लबची सीडी या उद्यानात करावीशी वाटली.
                  कोणताही  ऋतू,सणवार या कशाचीच शाखा सुरु राहण्यासाठी आडकाठी येत नाही.पाऊस,सण असल्यास संख्या कमी असेल पण बंद नाही.शाखेची सहल असली तरी सहलीला न येणारे जमून व्यायाम करतात.
                  कार्पोरेटर सभासद असलेली आमचीच शाखा असावी.श्रीनाथ भिमाले आणि वंदना भिमाले प्रथम पासून सभासद आहेत.सुरुवातीला ते रोज हजर असायचे आता कार्यबाहुल्यामुळे शक्य होत नाही.
                   महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिवार शब्द फक्त  नावापुरता नाही. वर्षे वाढली तशी केवळ व्यायामासाठी एकत्र येणे न राहता नातीही दृढ होत गेली.खऱ्या अर्थाने परिवार झाला.वाढदिवस लग्नाचा पन्नासावा वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात.नातवंडांच्या यशाचा आनंद वाटला जातो.उत्सवमुर्तीबाबत इतर सभासद भरभरून बोलतात.किरण गांधी,पुष्पा देशपांडे सुंदर कविता करून देतात.फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे करून आनंद मिळणार नाही तेव्हढा येथिल जिव्हाळ्याने मिळतो.सभासदांना पुरस्कार मिळाले,की त्याचे कौतुक केले जाते. प्रत्येकाच्या सुखदु:खाच्या क्षणी,आजारपणात  इतर सभासद पाठीशी उभे राहतात.एखादा सभासद आजारातून उठून खूप दिवसांनी येतो सर्वजण त्याच्याभोवती गोळा होतात. आमच्याबाबतीत सांगायचं तर गेले काही दिवस मुलगी आणि जावई आमची आजारपणे पाहून आमच्याकडे राहायला चला म्हणत होते.आमच्या  मुलीने  ह्यांचा हास्यक्लबमध्ये पंचाह्त्तरावा वाढदिवस साजरा केलेला पाहिला.किती मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे हे तिने पहिले आणि आपल्याकडे ये म्हणणे बंद केले.मध्यंतरी गांधी पतीपत्नीनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.निमंत्रीतात त्यांच्या नातेवाईकांपेक्षा हास्यक्लबचे लोकच जास्त होते.         
                  आमच्या शाखे इतकी विविधता इतरत्र कोठेच नसेल सभासदात तरुण, जेष्ठ नागरिक असे विविध वयाचे स्त्री पुरुष आहेत.निरक्षरापासून  पीएचडीपर्यंत शिक्षण असणारे  आहेत. वकील,डॉक्टर,अभियंते,गृहिणी,उद्योजक.व्यापारी,प्राध्यापक,शिक्षक,सरकारी कर्मचारी,चार्टर्ड अकौंटंट,शेतकरी  अशी व्यावसायिक विविधता आहे.आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या स्तरातील आहेत.विविध जातीधर्माचे लोक आहेत.मराठी भाषिक बहुसंख्य असले तरी मराठी न येणारे इतर भाषिकही आहेत.         
  अशा विविध पातळ्यांवर  विविधता असली तरी त्यातून निर्माण झालेली एकता महत्वाची    आहे. ही विविधता आणि त्यातील एकता  आकडेवारी पुरतीच मर्यादित नाही तर सभासदांचे परिवाराशी आणि परस्पराशी जवळीकीचे नाते असणारी आहे.सहली,विविध समारंभातून,कौटुंबिक कार्याला सगळ्यांच्या जाण्यातून,सभासदांच्या सुखदु:खात सामील होण्यातून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जायचे असल्यास एकमेकांना सहकार्य करण्यातून ही नाती वृद्धिंगत झाली.हास्याच्या शेवटी असणारी शाबासकी सर्वांनाच आवडते.त्यातून होणारा स्पर्श प्रेमाची उब वाढवतो.    
            व्यायामाची वेळ ६.३० ते ७.३० आहे.पण व्यायाम संपला तरी अनेकांची पावले बागेत रेंगाळत असतात.राणी राजानी, पुष्पा देशपांडे,किरण गांधी,कुमुद नरांजे बागेला एकत्र फेऱ्या मारतात.कठड्यावर सावित्री पंजाबी,हिरा जगताप,यशोदा खंडेलवाल,शमीम बागवान या गप्पा मारत उन खात असलेल्या दिसतात.
कुसुम डीकोळेनी पायी पंढरपूर वारी केलेली असते त्यांना अनुभव सांगण्याची विनंती केली जाते.शमीम बागवान हाज यात्रा करून येतात. पाय सुजलेले असतात पण सर्वाना तेथून आणलेले पवित्र पाणी आणि खजूर देण्यासाठी आवर्जून येतात.आपले अनुभव सांगतात, गजराज .दोषींनी मधल्या वेळेत सांगितलेले जैन मुनींचे विचारही  ऐकले जातात.सध्या अमेरिकेला गेलेली ख्रिस्तिना सर्वाना केक देऊन ख्रिसमस साजरा करते.असा सर्वधर्म समभाव असतो.
                  हास्यक्लबमुळे आरोग्यविषयक फायदे होतात,आत्मविश्वास वाढतो,मानसिक आरोग्य सुधारते.मधल्या वेळेत होणाऱ्या चर्चातून सामजिक,राजकीय,सांस्कृतिक,कायदेविषयक,पर्यावरणविषयक ज्ञान मिळते.या सर्वापेक्षाही मला जास्त महत्वाचे वाटते ते.आज परस्परातील नाती दुरावत असताना हास्यक्लबमुळे ती जोडली जात आहेत,माणसामाणसातला संवाद वाढतो आहे.राष्ट्रीय एकात्मतेला पूरक वातावरण तयार होत आहे.ही चळवळ सुरु करणारे काटे सर आणि सुमनताई यांना सलाम.