Wednesday 2 March 2022

आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी - गोपाल तीर्थळी

                                            आदर्श व्यक्तिमत्व कै.नारायण भटजी

                           आमचे पिताश्री साऱ्यांचे नारायण भटजी.ज्ञाती बांधव तसेच इतरांना परिचित आहेत ते त्यांची सायकल आणि त्यांचा नेहमीचा पेहेराव धोतर,कोट,टोपी,एक उपरणे आणि प्रसन्न मुद्रा.तरी खूप लोकांना त्यांच्या पूर्वायुष्याची कल्पना असेल म्हणून त्यांच्या २४ जानेवारी या जन्म शताब्दी दिनाचे औचित्य साधून ते उलगडून दाखवायचा प्रयत्न आहे.

                        तीर्थहळ्ळी हे शिमोग्यापासून ३०/३५ कि.मी.वरील गाव.तेथे २४ जानेवारी १९०१ साली आमच्या नानांचा जन्म झाला.त्यांना २ भावंडे .एक भाऊ आणि बहिण .त्यात नाना मोट्ठे. वयाच्या ७/८ व्या वर्षी मातृछत्र हरपले.आणि वय लहान असल्याने मामाने त्यांना हलीयाळला नेले.त्याच सुमारास प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.त्यामुळे मामा नानांना घेऊन शहापूर येथील बिच्चूगल्लीतील देवळात राहायला आले.

                   त्याकाळात नानांचा बाळंभटजी कामत म्हणजे कै.शारंगधर कामत यांचे वडील यांचा परिचय झाला.तसेच बेळगाव मध्ये आणखी काही लोकांचा परिचय वाढला.त्यात बेळगावला प्लेगची साथ आली आणि मामांचे छत्र हरपले.एकापाठीपाठ हे लहान वयात आघात झाल्यावर विषण्ण मनस्थितीत ते काशिला संस्कृताचे पठण तसेच वैदिक शिक्षण घेण्यास गेले.आणि तब्बल आठ नऊ वर्षांनी बेळगावी परतले ते भटचाळीत बाळंभटजी यांच्या घरी आले.त्यांच्याकडे संस्कृतचे अध्ययन पुढे चालू झाले.त्या काळात संस्कृतसाठी गावातील प्रतिष्ठित मंडळींची मुलेही तेथे येत..नाना काही आठवणी सांगताना त्यांचा उल्लेख नेहमी करत.डॉक्टर गिंडे आणि अशीच ही मंडळी संस्कृतची आवड म्हणून येत.

               तो १९२९ चा काळ असेल.त्यावेळी नाना रेगेंच्या घरी राहत असत.रेगेंच्या घरी कुणी एका साधूने रामाच्या मूर्ती दिल्या.आणि त्याची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा प्रदर्शित केली.बराच काळ तो साधू न आल्याने पुढे त्या मूर्तीची रेगेंच्या समोर असलेल्या पिंपळावर प्रतिष्ठापना झाली.तेंव्हापासून नानांची रामाची सेवा चालू झाली.त्याला वेळोवेळी उर्जितावस्था आली.१९७८ पर्यंत सेवा केली.मधल्या काळात पांडुरंग महाजनिंच्या विनंतीवरून श्री मारुतीची ( लहान) सेवाही १९७८ पर्यंत चालूच राहिली.या सगळ्या इतक्या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी होत्या की जेंव्हापासून शहापूर बाजारातील गणपती उत्सव सुरु झाला तेंव्हापासून त्याची पूजा नैवेद्य,आरती देखील बेळगावचे वास्तव्य होते तेंव्हापर्यंत त्यांच्याकडे चालू होते.श्री राम,श्री मारुती तसेच श्री.गणपतीच्या सेवेने नानाची सर्व इच्छिते पुरी झाली.नानांनी १९३४ च्या दरम्यान बिच्चू गल्लीत घर घेतले.थोडी शेती घेतली.

              नानांना जेवढी संस्कृतची गोडी तेवढीच ज्योतिष शास्त्राची.त्यामुळे त्यांनी आपल्या अभ्यासु वृत्तीने ते चालूच ठेवले.त्यांच्याकडे जन्म झाल्यावर पत्रिका करणासाठी येणाऱ्या सर्वांची पत्रिका केल्यावर रेकॉर्ड करण्याची पद्धत होती.त्यांचेकडे कित्येक हजार पत्रिकांचे रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. ज्योतिषाची आवड असल्याने गावात कोणी चांगला ज्योतिषी आला की ते त्यांची गाठ घेत.आणि एखाद्या पत्रिकेवर चिकित्सा करत.दक्षिणेकडून,उत्तरेकडून आलेल्या खूप ज्योतिषांकडून त्यांची पत्रिका पाहण्याची पद्धत अभ्यासून स्वत:ची ज्योतिष विद्या पूर्णत्वास नेली.

            त्यांच्याकडे सर्व स्तरातील लोक पत्रिका दाखवत.सल्ला घेत.धर्म, जात, वर्ग यांचे बंधन नसे.त्यांना सर्वांकडून आदरच मिळायचा.त्यांचे ज्योतिषाबद्दल एक तत्व होते.ते एक शास्त्र आहे विद्या आहे.त्याचा आदर राखायला पाहिजे ती रिक्त हस्ताने पाहू नये म्हणून येणाऱ्या व्यक्तीस ते आपल्या कुवतीप्रमाणे पैसे ठेवावयास सांगत.त्यात एक पैसा एका आण्यापासून  कित्येक रुपयापर्यंत पैसे देणारे असत.भविष्य सांगणे मात्र दिलेल्या पैशासी रिलेटेड नसे.येणाऱ्या माणसाचे पूर्ण समाधान होइपर्यंत त्यांच्या भल्याचा सल्ला देत.त्यामुळे त्यांनी एखाद्याचे भविष्य सांगितले काही सल्ला दिला तर मानला गेला नाही अस कधीच होत नसे.त्यांची सर्वांची सेवा तसेच आचरणाने नानांना एक वाकसिद्धीच होती असे म्हणावे लागेल.बेळगावच्या वास्तव्यात खूप लोकांना दिलेले सल्ले तंतोतंत पटल्याने पुढे ते पुण्याला आल्यावरही अनेक जण भविष्य विचारायला येत.नानांनी ज्योतिष ही विद्या म्हणूनच जोपासली.त्यापासून मिळालेले पैसे उपजीविकेसाठी न वापरता ते पैसे धर्मादाय नावाने केलेल्या खात्यात टाकीत व धर्मादायचं करत.पुण्याला आल्यानंतरही त्यांचे सायकलवर जाणे पौरोहित्य,ज्योतिष सांगणे चालूच राहिले.

                            बेळगावला असताना त्यांचे ज्योतीशाबाद्द्लचे योगदान मोट्ठे आहे.तसेच बरऱ्या जणांच्या मुंजी लग्नापासून त्यांच्या मुलांच्यापर्यंत त्यांनी लग्ने मुंजी केल्या.अशा नमूद करण्यासारखी बरीच कुटुंबे होती.त्यात नागेशराव हेरेकर, मधुभाऊ हेरेकर,गजाननराव देशपांडे,डॉक्टर कामत कुटुंबीय,गणपतराव देशपांडे अशी नावे प्रामुख्याने घेता येतील.त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेकांचे ते सल्ला देत असत.लग्न मुन्जीतही विधीचा अर्थ,उद्देश ते समजाऊन सांगत.त्यामुळे विधी यांत्रिक न होता बोधपर होत.यामुळे नाना सर्वाना हवेसे वाटत.

                            जेजे घडवते ते नियती घडवते.त्यांच्या आयुष्यात बेळगावकरांचा संग घडायचा होता तेवढा काळ ते बेळगावला राहिले.त्याचाही एक किस्साच आहे.ज्यावेळी नाना  बाळंभटजीकडे राहत त्यावेळी पुण्यातील एका सारस्वत असामिनी   बाळंभटजीकडे एक पौरोहित्य करणारा पुण्यात पाठविण्याविषयी विनंती केली होती त्यावेळी तेलीचारी आणि नाना यापैकी एक पाठविण्याचे ठरले.तेलीचारी पुण्याला गेले आणि नानांचे बेलागावकरांचे सेवाव्रत चालू राहिले.पुढे बेळगावकारांचा  सेवाव्रताचा काळ नियतीने ठरविला.माझ्या मातोश्रींची तब्येत ठीक नसल्याने मी त्या दोघांना पुण्याला  घेऊन आलो.कित्येक वर्षे यासाठी मागे लागल्यावर शेवटी १९७८ साली ते पुण्याला कायमचे राहायला आले.नानांचा निरोप समारंभ मोठ्या जनसमुदायाने आखला.ती बेळगावच्या लोकांनी त्यांच्या कामाची त्याना दिलेली पावती होती.

                        आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही त्यांची मुले आहोत.त्यांना संगीताची आवड होती.त्याना स्वत:ला शिकायची आवड होती तसे मुला सुनानीही शिकावे असे वाटे.त्यांनी खूप दुर्मिळ पुस्तके संग्रही बाळगली.त्यांचा संग्रह त्यांच्या नातीला हिरामोत्याचा खजिना असल्याचा आनंद देतो.आम्ही आज उपभोगतो ते त्यांची पुण्याई आमच्या मागे असल्याने उपभोगतो असे वाटते.  

                      उतार वयात पुढे त्याना बाहेर जाणे कमी करावे लागले.पण पुण्यातील बेळगावशी संबंधित माणसे येत.सल्ले घेत त्यामुळे त्यांना बेळगाव सोडल्याचे जाणवले नाही.पुण्यातील आजूबाजूचे लोकही  भविष्य विचारायला येत. बंगल्याभोवतालच्या बागेची देखभाल करण्यातही त्यांचा वेळ जाई.

                     ज्योतिष तर त्यांच्या हाडात भिनले होते १९९१ साली त्यांना घरीच मढ्यावरून पडल्याचे निमित्त झाले आणि हिपबोन मोडले.त्यावेळी त्याना हॉस्पिटलमध्ये ठेवले.केरळची एक ख्रिश्चन नर्स त्याची देखभाल करत होती.तिला ते म्हणाले तू माझी एवढी देखभाल करतेस तर तुझे भविष्य सांगतो.आणि त्यांनी आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत तिचे भविष्य सांगितले.ते ऐकल्यावर प्रत्येक गोष्ट पटल्याने ती आवाक झाली.तिने नानाचे झोपलेल्या स्थितीत पाय धरले.दुसरे दिवशी नानांची प्राणज्योत मालवली.त्या नर्सला आणखी जाणून घेण्याची इच्छा होती.नाना गेल्यावर ती ढसाढसा रडली.

                  आज तिसरी पिढीही त्यांचे जरूर नाव काढेल अशी आहे.एक नात संस्कृतची अभ्यासका असल्याने आणि नातू ज्योतिषाचा अभ्यासू असल्याने तो वारसा असाच चालू राहो ही आजच्या दिनी श्रद्धांजली.

 

( सदर लेख २४ जानेवारी २००१ च्या तरुण भारत बेळगाव मध्ये छापून आला होता.)