Tuesday 14 January 2014

१.मी अनुभवलेली आनंदवनातील होळी अन रंगपंचमी



मी काही नेहमी फोटोग्राफी करणारी नाही. माझ्या छोट्याश्या मोबाईलवर काढलेले हे फोटो ! त्यांचे महत्व फोटोग्राफीच्या दृष्टीने फारसे नाही हे मला माहिती आहे. पण त्या फोटोंमधून पाझरणारा आनंद, त्यातून थोडेसे का होईना दिसणारे आनंदवन, तुमच्याशी शेअर करावेसे वाटले म्हणून हा प्रपंच ! आशा आहे हा माझा पहिला प्रयत्न तुम्ही गोड मानून घ्याल स्मित माझा उद्देश फक्त त्या सर्वांचा आनंद आपणापर्यंत पोहचावा हाच आहे. आनंदवनशी संबंधित कोणी इथे असाल तर कृपया संदर्भ फोटो आणि संदर्भ यात काही चुका झाल्या असल्यास कृपया दुरुस्त कराल ?
_________________________________________________
१९६० मध्ये आनंदवनात एक स्वित्झर्लंडवासी आले होते. सुरुवातीच्या काळात आनंदवनात भारतीयांपेक्षा परकीय लोकच अधिक येत. तर हे स्वीस अँबॅसडर म्हणाले, "इथं एक आश्चर्य पहावयास मिळाले. सर्व लोकांचे चेहरे हसतमुख कसे असतात?" बाबांनी त्याना उत्तर दिले, "Your exelency,did't they tell you that the joy in Anandwan is more conteginous than the disease in Anandwan ?"
अस हे आनंदवन !
होळीच्या चाहूलीने तर तिथे आनंदाचे उधाणच आले होते. यावर्षी योगायोगाने होळी आणि दुसर्‍या दिवशी तिथं खेळली जाणारी रंगपंचमी अनुभवली. डॉ. भारती आमटे यांच्या आमंत्रणावरुन १ मार्च ते ९ मार्च या काळात Flower Remedy शिकवायला मी तिथे गेले होते. ९ दिवस २-२तास शिकवायचे यानुसार मी आराखडा तयार केला होता. भारतीताई म्हणाल्या, 'होळी आणि रंगपंचमीला कोणी येणार नाही सुट्टी घ्यावी लागेल.' मी चटकन म्हणाले, 'मग मी काय करू?' त्याही तितक्याच सहजपणे म्हणाल्या, 'आमच्याकडे पुरणपोळ्या लाटायला या' हे सांगताना त्यांचा चेहरा खुललेला होता.
नंतर प्रत्येकाच्याच तोंडात वेगवेगळ्या कारणांनी होळीचे उल्लेख आणि ते करताना प्रत्येकाचा चेहरा खुललेला. अगदी पाहुणा म्हणुन आलेला साठेचाही याला अपवाद नव्हता. हा ११वीतील मुलगा. सरोद उत्तम वाजवतो. orchestraत बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणुन काम करत होता. जेवणाच्या टेबलावर भेटायचा. थोड्या दिवसासाठी आला होता. रंगपंचमीला खुप मजा करणार अस सांगत होता. त्याची इथली पहिलीच रंगपंचमी होती पण अनेकांच्याकडुन ऐकुनच तो exite झाला होता.
आम्ही राहात होतो तिथं जवळच स्वयंपाकघर होत. आदल्या दिवशीच पुरणाचा वास सुटला होता.
९/१० किलोच्या पुरणपोळ्या करायच्या, तर पुरण आधी करुन ठेवण गरजेच होत. होळीच्या दिवशी खर तर सुट्टी घ्यायची ठरली होती. पण शिकणारे म्हणाले, 'सकाळी ६ ते ८ येऊ आम्ही.' भारतीताई मात्र म्हणाल्या, 'मला लवकर निघाव लागेल पोळ्या करायच्या असतात.'
होळीचा दिवस उजाडला. लेक्चर संपवून मीही स्वयंपाकघरात जायच ठरवल. मला पोळ्या लाटण प्रकाराचं औत्सुक्य होतच. स्वयंपाकघर ऐसपैस होत इथल. डायनींग हॉल, खोल्या आणि महत्वाचे म्हणजे लोकांची मन - सगळच ऐसपैस आहे.
स्वयंपाकघरात भारतीताईंसकट अनेक स्त्रिया होत्या. आनंदवनातील होत्याच शिवाय पाहुण्या आलेल्या प्रभाताई,गितांजलीही होत्या. मोठा गॅस होता. डोश्याचा असतो तसा मोठा तवा होता. ५/६जणी पुरणाच सारण भरुन गोळा तयार करत होत्या. ५/६जणी पोळ्या लाटत होत्या. आणि एकटी पोळ्या भाजत होती. एकवेळी ५/६पोळ्या भाजल्या जात होत्या. हे करताना गाणी, गप्पाही. बघता बघता ९/१० किलोच्या पोळ्या झाल्याही. जेवण तयारच होत.उत्तरायणमधल्या जेष्ठ नागरीकांची १० वाजता जेवणाचची बेल असते. आम्हीही ११.३०ला पुरणपोळीच सुग्रास जेवण जेवलो.गरमागरम पुरणपोळीवर आनंदवनातच तयार झालेल साजुक तुप. मला हरबर्‍याच्या डाळीचा त्रास होतो असं सांगितल्यावर भारतीताईंनी तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या वाढल्या.
आता दुसर्‍या दिवशीच्या रंगपंचमीचे सर्वाना वेध लागले. सर्वजण रंग खेळतात. तेव्हा कुठेही बाहेर पडायच नाही अस सगळे म्हणत होते. गेस्ट कँटीनच्या समोरच रंग खेळत असल्याने आम्ही लवकर ब्रेकफास्ट करुन आलो. मनात रंगपंचमीची उत्सुकता होती. पण यदाकदाचित कोणी रंग टाकलाच तर कपडे खराब होतील असा परीटघडी विचार करुन आम्ही रुमच्या बाहेर व्हरांड्यात बसुन राहिलो.
इतक्यात २/३मुकबधीर मुली तिथ काहीतरी न्यायला आल्या.त्यातील एकीची ओ पी डी त ओळख झाली होती. ती गालावर खुण करुन मला आर्जव करत होती, 'थोडासा रंग लाउ का?' तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहुन मी तिला खुणानी सांगायचा प्रयत्न केला. 'गालावर थोडा चालेल. अंगावर नको.' त्या तिघी पळत पळत गेल्या कोरडा रंग घेउन आल्या. माझ्या गालाला लावला. मीही तिघींच्या गालाला रंग लावला. त्यांचे चेहरे एवढे खुलले माझं नागरपण गळुन पडल. तेवढ्यात तिथं रंगानी चिंब भिजलेली गितांजली आली.
Photo0046A.jpg
ती सांगत होती खुप मजा करताहेत. "तिथं जा तुम्ही. कोणीही जबरदस्ती तुम्हाला रंग लावणार नाही." आम्ही रहात होतो, त्या 'लोटीराम' इथले व्यवस्थापन पाहणारा मदनही भेटला
Photo0047.jpg
आणि त्यानेही याला दुजोरा दिला.
आणि मग बाबा म्हणत तशी, "आनंदाची लागण" मला केव्हा लागली समजलच नाही स्मित
मी हातात मोबाइल घेउन गेस्टरुमच्या कँटीन समोरच्या चौकात रंगपंचमी चालली होती तिथ गेले. मला थोड उशीरच झाला होता. विकासभाऊ नुकतेच रंग खेळुन परत गेले होते.रंग खेळण संपत आल होत. ओळखीचे वाटणारे अनेक चेहरे दिसत होते. पण रंगात इतके भिजले होते की ओळखयला थोड कठिणच जात होत. लांबुनच पाहत होते. एक आई आणि छोटी मुलगी आईच्या हातात बाटली. दोघीही रंगलेल्या.
Photo0048.jpg
मी मोबाईलवर फोटो घेतला आणि मग फोटो घेतच गेले.
रंग खेळुन झाल्यावर सर्वाना ब्रेकफास्ट दिला जातो. आणि मग सगळे घरी जातात.
हातात पोहे घेतलेले बापलेक. खाली रंग सांडलेला दिसतोय.
Photo0049.jpg
रंग खेळलेले अनेक चेहरे हळुहळु ओळखता येऊ लागले. कुणाला 'संधी निकेतन'मधे पाहिल होत. कुणाला ऑर्केस्ट्रामधे, कुणाला 'विणकाम विभागा'त तर कुणाला बागेत पाणी घालताना. इथं कुणी लहान-मोट्ठ नसत हे पहिल्यापासुनच लक्षात आल होत. सगळे आपणच राजे असल्यासारखे वावरत असतात. अंध कोण मूक कोण अणि कुष्टरोगातुन बरे झालेले कोण काही समजत नाही. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर उत्साह भरभरून, ओसंडून वहात असतो. फक्त अपंग तेवढे व्हिलचेअरवर असतात म्हणून ते समजतात.
हे व्हिलचेअरवरचे महाशय पहिलेत का?
Photo0050.jpg
कसे 'अपंगत्त्वाची ऐसितैसी' म्हणत रंग खेळलेत.
आणि हातात कुबडी घेतलेला हसतमुख तरुण, ऑर्केस्ट्रात सूत्रसंचलन करताना पाहिला होता का याला?
Photo0054.jpg
ही पाठमोरी बहुतदा आमटे कुटुंबातली माणसं दिसताहेत.
Photo0051.jpg
ही शीतल आमटे. बाबांची नात मात्र स्पष्ट ओळखता येतीय.
Photo0052.jpg
ओरडून कुणाला काहीतरी सांगतेय. बहुदा नवर्‍यालाच असाव.कारण तो हसताना दिसतोय पहा.
Photo0053.jpg
की आपल्या भावाला? कौस्तुभला. तोही हसताना दिसतोय.
Photo0057.jpg
काहीजण रंग खेळुन दमलेले दिसतात. हे दोघतीघं दिसताहेत ना त्यातले आम्हाला आनंदवनची माहिती सांगायला आलेले, मधले बक्षीकाका फक्त ओळखता येताहेत.
.photo0058.jpg
अरे वा कडूसरही दिसतात. 'सर फोटो काढू का?' असं मी विचारतच त्यानी चटकन होकार दिला.( )
Photo0059.jpg
कडूसर म्हणजे आनंद अंध विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक. निवृत्त झाल्यावर आनंदवनचे खंदे कार्यकर्ते बनले. वर्ध्याहुन येताना आमच्याबरोबर होते, त्यामुळे चांगली ओळख झाली होती. ते फोटोत दिसतात तसेच नेहमी हसतमुख असतात.
पल्लवी बाबांची नातसुन एका मुलीला म्हणत होती , काय ग इथ पण तुझी शाळा सुरु झाली का? म्हणजे बाई आणि मुल सगळेच रंग खेळत होते. आणि पल्लवीला मला फोटोत पकडता आली ती अशी.
Photo0055.jpg
ही ओळीने बसलेली मुल पहिली का? मला वाटल इथं शहरातली मुल असती, तर म्हणाली असती 'आधी हॅड वॉश करतो अन मगच खातो.' पण ही मुलं मात्र रंगलेल्या हातानी चमचा घेउन मस्त पोहे खात होती.
Photo0060.jpg
हे आनंदराव
Photo0062.jpg
आनंदराव सुरुवातीच्या काळापासुन बाबांबरोबर होते. आम्ही प्रथम गेलो तेव्हा बाबा आणि ताईंच्या समाधीपाशी भेटले होते. आमटे फॅमिलीच्या नव्या पिढीचे ते आजोबा आहेत. इथ सगळ्या आज्जी आजोबांना सख्या आज्जीआजोबांना पहायला जाणार नाही; इतक्या प्रेमानी पाहील जातं. आनंदरावांच्या चेहर्‍यावरुन लक्षात येत ना ते?
इतक्यात समोर आलेला माणुस पहिलेला वाटला. 'अरे हे तर आमच्या जवलच्या रुममध्ये राहणारे पाहुणे. रंगात चिंब भिजलेत.
Photo0066.jpg
यांनी येताना बरोबर जुने कपडे आणले होते का? इथ आल्यावर हा प्रश्न मला पडला. तिथं असताना हे लक्षातही आल नव्हत.
मी परत निघाले होते तितक्यात कॅटिनचे व्यवस्थापक दिसले
Photo0064.jpg
आमच्या ब्रेकफास्टच्यवेळी कॅन्टिनमधे होते. म्हणजे कामधाम उरकून मगच सर्व मजा करत होते.
त्यानी बरोबर असलेल्या माणसची ओळख करुन दिली, "हे इथले सरपंच. "
लगेच त्यांचा फोटोही काढला.
Photo0065.jpg
ते म्हणाले 'रंग लाऊ का थोडा?' मी चालेल म्हटल्यावर लगेच त्यानी गालाला रंग लावला. आनंदवनच्या रंगपंचमीत मी ही रंगून गेले स्मित
Photo0067_0.jpg
संध्याकाळी लेक्चरच्या वेळीही बहुतेकंची रंगात चिंब झालेली मने आणि चेहर्‍यावर रंगाच्या खुणा दिसत होत्या.
हा मी आनंदवनातला काठाकाठाने पाहिलेल आनंद सोहळा. आपण तिथ असून चिंब भिजण्याचा अनुभव घेतला नाही याची आता हळहळ वाटतेय.
पुण्यात आल्यावर मुलांचे होळीसाठी बसवलेलं एक छान गाण ऐकायला मिळाल. त्याचा शेवट असा होता :
"अनेक आम्ही जरी
तरीही एक आम्ही
रंग हे सात जरी
असे हे एक आम्ही
प्रितीचा तराणा बोला
रंगाचा सोहळा आला"
मुलानी गाण छान गायलं. पण आपली फक्त पोपटपंची. खरी एकता पहायची तर आनंदवनात जायला हवं !

No comments:

Post a Comment