Tuesday 25 January 2022

कन्या व्हावी ऐसी


                                                 कन्या व्हावी ऐसी

                           महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज जन्मलेले मुल नावाखाली भविष्य यायचे. २४ जानेवारी १९७२ चे भविष्य होते.सूर्य नेपचून त्रिकोण योगामुळे आज जन्मलेल्या मुलाचे आयुष्य अनेक आश्चर्याने भरलेले असेल.दैविक कृपा आणि ग्रहांची साहानुभूती सतत लाभेल.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडवील.
                          घरात आवराआवरी करताना हे सापडले.मी भविष्यावर फारशी विश्वास ठेवणारी नाही.आणि त्या दिवशी जन्मलेली माझी मुलगी सोनाली तर त्याहून नाही.पण तरीही तिने भविष्य खरे केले आहे.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडविला आहे. माझा उर भरून येईल अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.किती लिहू,किती सांगू.
                       लहानपणापासून स्वतंत्र विचाराची,आपल्या विचाराशी ठाम.यात आदळआपट रडारडी न करता हवे तेच करणारी.लोअर केजीला क्रीसेंट स्कूलमध्ये घातले.तिला मराठी मिडीयमला जायचे होते.पुढच्या वर्षी घालू सांगितले वर्षभर गेली आणि दुसऱ्या वर्षी अडून बसली.प्रवेश संपले होते.कसाबसा प्रवेश  मिळाला.आमच्या जवळ राहणारे आर्किटेक्ट पळशीकर यांच्याकडे पाहून आर्किटेक्ट व्हायचे हेही अगदी लहानपणीच ठरवलेले.बारावीनंतर प्रवेश मिळाला नाही.त्यासाठी एक वर्ष थांबली पण आर्किटेक्ट झाली.चवथ्या वर्षात प्रोफेशनल प्रॅक्टिसक्टीससाठी अहमदाबादचे बाळकृष्ण दोषी यांच्याकडेच जायचे होते.आणि तेच तिने केले.या क्षेत्रातील तिचे यश पाहता तिचे निर्णय बरोबर होते.
                    कधी हैद्राबाद,कधी मद्रास,कधी जपान अशी तिच्या पायाला भिंगरी असते.हैद्राबादचे पर्यावरणपूरक आयआयटीचे हॉस्टेल,कोइमतुरचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी तिच्या यशाची काही उदाहरणे.त्या त्या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास, कलात्मकता, क्लायंटची गरज,नितीमत्ता या सर्वांचा मेळ घालून हे काम केलेले.जुन्या नव्याचा मेळ,क्रिएटिव्हिटी,यामागे व्यापक विचार हा तिचा स्थायी भाव आहे.बाहेर छोटीशी रांगोळी असो,गणपतीची,दिवाळीची आरास असो साधी भाजी चिरणे.थाळीतील पदार्थांची रंगसंगती,न्युट्रिशन व्ह्याल्यू, घराची सजावट घरगुती कार्यक्रम,लिखाण या सर्वात हा स्थायी प्रगट होत असतो.हे सर्व कमिन्सच्या आर्किटेक्चरच्या विध्यार्थिनीपर्यंत आपल्या व्याख्यानातून,प्रॅक्टिकल,सहली यातून तळमळीने पोचविलेले असते.नवभारत टाईम्सच्या सुरुची तर्फे तिला स्त्रीशक्ती पुरस्कार मिळाला पण त्यापेक्षा स्त्रीशक्ती, आर्किटेक्चरचा गाभा या विध्यार्थिनीपर्यंत पोचणे आणि त्यांची भरभरून मिळालेली पावती तिला पुरस्करापेक्षा अधिक महत्वाची वाटते.हे सर्व असूनही तिचे पाय नेहमी जमिनीवर असतात.
                  इमारतीचे डिझाईन असो,स्वत:चा पेहराव असो,मैत्री असो,नातेसंबंध असो त्यात दिखाऊपणापेक्षा एक ग्रेस,भक्कमपणा,प्रामाणिकपणा असतो.स्वत:च्या पेहरावातही ही ग्रेस असते. प्रसन्न हास्यामुळे,कोणताही आव नसता वागण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.यात सख्खे,चुलत,आत्ये,वगैरे सासू सासरे यांची पिढी,नणंदा,सलीलचे मित्र,त्यांच्या बायका,सोशल मिडीयावरून झालेल्या बरोबरीच्या मैत्रिणी,पुढच्या पिढीतले भाचे, भाच्या,विध्यार्थी,हात्खाली काम करणारे हे सर्व आले.अनेकांसाठी ती रोल मॉडेल असते.
                 बाहेरचे सर्व व्याप सांभाळताना.सासर,माहेरची नातीही तिने कुशलतेने सांभाळली आहेत.स्वत: धार्मिक नसली तरी सण, समारंभ ती उत्तम साजरे करते त्याचे कर्मकांड न होऊ देता उत्सव करते.तिच्या घराचे दरवाजे कोकणातील माणसे असोत, जर्मनीची मार्गारेट असो,सलील, क्षितीजचे मित्र असोत की सासुबाईंच्या मैत्रिणी. सर्वाना घराचे दरवाजे उघडे असतात.तिच्या घरातला मोकळेपणा सर्वाना आवडतो.तिच्या या गुणामुळे तिने नात्यातली,देश,परदेशातील अनेक माणसे जोडली आहेत.तिच्या सोशल मीडियातील मित्रमंडळीत ती किती प्रिय आहे ते मीडियातील कॉमन मित्र,मैत्रिणींकडून मला समजत असते.
                 तिच्यातील सच्चेपणा,संवेदनशीलता,मिस्कीलता,संस्कृतीशी जोडलेली नाळ हे सर्व तिच्या लिखाणातूनही असते. मग ते लिखाण वास्तू,वास्तू तज्ज्ञ,देश,परदेशातील भटकंती,एखादी रेसिपी कोणतेही असो.यात हटके असेही असते.
                तिचे सगळेच हटके असते त्यामुळे ती युनिक असते.क्षितीजला वाढवताना ही ती आई कमी आणि मैत्रीण जास्त होती.त्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर एक संवेदनाशील आणि वैश्विक माणूस बनवण्यात ती यशस्वी झाली आहे. यासाठी तिने हळुवारपणे घेतलेले कष्ट,प्रक्रिया मी पाहिलेली आहे.मला भावणारी ही तिची सर्वांग सुन्दर रचना आहे. तिची भटकंती ही अशीच हटके.युरोप ट्रीप बॅगपॅक मैत्रिणीबरोबर केली.स्पेनमधील कमिनो वारी तीन मैत्रिणी बरोबर केली.कामासाठी परदेशात गेल्यावर इतर खरेदि करतात पण ही मात्र इमारती तिथली सांस्कृतिक वैशिष्ठ्य बघत फिरते.येथून आता तिला सायकलवर भटकंतीचा छंद लागला आहे.अचानक पाषाण हून आमच्याकडे सल्स्बारीपार्कला येते सरप्राईज देते. आमचे अनेक दिवस आनंदात जातात.यावेळीही ती आळंदीहून किंवा १५ ऑगस्टला ७५ किलोमीटर करण्यासाठी निघालेली असते.
             मुलगी,बहिण,पत्नी,आई,सून,मैत्रीण.बॉस,आर्किटेक्ट,या सर्व आघाड्यावर ती आदर्श आहे.ती स्वत:ची काळजी घेत नाही अशी माझी तक्रार होती. पण आता सलील खनपटीला बसून ती घ्यायला लावतो. एक मुलगी म्हणून आमच्याशी नाते एक स्वतंत्र लेखातच लिहावे लागेल.आम्हाला तुझा अभिमान वाटतो एवढेच म्हणते.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे असते पण आता आमचे पिल्लू  उंच आकाशात भरारी घेत आहे.पण लक्ष मात्र आमच्याकडे असते.  
 अशी अनादी राहा.आनंद वाटत रहा.
जीवेत शरद शतम   
                
          May be an image of bicycle, outdoors and text that says 'tir thali's'     
      May be an image of 3 people and indoor         

 








                             











No comments:

Post a Comment