Friday 21 January 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - - तुळशीराम कुसाळकर

                                            माझे दूरस्थ विद्यार्थी - तुळशीराम कुसाळकर

   तुळशीराम कुसाळकर यांचे अकस्मात फेसबुकवर भेटणे.फेसबुकला खूप खूप धन्यवाद.त्यानंतर Whats app वर भरभरून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र येणे.सोबत १७ नोव्हेंबर १९८८ मधल्या पदवीदान समारंभाचा फोटो.एका शिक्षकासाठी याहून मोठ्ठा पुरस्कार तो कोणता असणार.त्यांचे पत्र तसेच्या तसे देत आहे.

*वंदनीय तिर्थळी मॅडम*,
स.न.वि.वि.

१७ नोव्हेंबर १९८८ चा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे पदवीदान समारंभाचा आपल्या समवेत चा फोटो जतन करून ठेवला आहे. माझ्या सारख्या भटक्या विमुक्त समाजतल्या मुलाला तुम्ही मोलाचे मार्गदर्शन केले.माझ्यात चैतन्य फुलविले. आपण माझ्या भरकटलेल्या जीवनाला दिशा दिलीत  आत्मविश्वास निर्माण केला. तुमच्या आशिर्वादाने पदवीधर झालो.आणि पुढे जाऊन बी .एड केले. तुम्ही केलेले मोलाचे मार्गदर्शनला 35 वर्षे शिक्षकी पेशात वर्गात तुमचे उदाहरण देत होतो प्रसंगी हाच फोटो वर्गात दाखवत होतो.तुमच्या मुळे माझ्या कुटुंबाला मार्ग व दिशा मिळाली.

माझी तीनही मुले उच्चविद्याविभूषित आहेत.तुमच्या आशिर्वादाने सेवा निवृत्त झाल्यानंतर एक सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केले आहे.त्या द्वारे गोरगरीब दीनदलित मुलांना मदत करतो. मदत करतो .त्यांच्यासाठी उर्वरीत आयुष्य वाहून घेतले आहे. तुमच्या आठवणी मुलांना सांगत असतो. तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात. विद्यापीठाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तुमचा आशीर्वाद कायम आहे. तुम्ही व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शतायुषी व्हा.तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.भेतीअंती खूप बोलेन.

*आपला विद्यार्थी*
तुळशीराम कुसळकर सर

 

त्यांची २ मुले  सायंटीस्ट झाली आहेत याचे तर मला फारच अप्रूप वाटले.त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेंव्हा ते ९० साली म्हणजे बी.ए,झाल्यावर लगेचच एम.ए.झाल्याचे समजले. त्यांनी माजी विध्यार्थ्याना हाताशी धरून पिंपळनेर सामजिक प्रतिष्ठान नावाचा न्यास स्थापन केला आहे.गरीब विद्यार्थ्यानापुस्तके वह्या पुरविणे,गणवेश देणे गरजूंची फी भरणे हे ते करत असतात.ते कृतार्थ,समाधानी जीवन जगत आहेत. मला हे सर्व खूपखूप सुखाऊन गेले.

त्यांच्यावर २७ नोव्हेंबर २००४ साली केसरी मध्ये उत्तुंग भरारी सदरात लिहिलेला लेखही सोबत देत आहे.                         

                                 मुक्त विद्या केंद्राने मला घडवले.

  • गुप्त विद्या केंद्रानेस्ट १९८५ मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केला आणि अनेक वर्षे उपाशी असलेल्या माणसांसमोर पक्वान्नाचे भरलेले ताट ठेवल्यावर तो जसा त्या अन्नावर तुटून पडेल तसे अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमावर अक्षरशः तुटून पडले. कुसळकर तुळशीराम सोमा त्यातील एक. केसाला चोपून लावलेले तेल, मागे फिरवलेले केस, पांढरा शुभ्र पायजमा व शर्ट, प्रसन्न व हसतमुख चेहरा. का कोण जाणे पण कुसळकर यांना पाहिल्यावर 'नव्या मनूचा गिरीधर पुतळा' या मर्ढेकरांच्या ओळी आठवायच्या. 
    कुसळकर यांसारखे विद्यार्थी ज्ञानासाठी हपापलेले होते. परंपरा, सामाजिक परिस्थिती, औपचारिक शिक्षण पद्धतीची ताठरता यामुळे ही भुक मारून जगावे लागत होते. वडारी जातीच्या कुसळकर यांचे बालपण दगड काम करणाऱ्या वडीलांच्या बरोबर गावोगाव भटकणाण्यात गेले. ना घर, जमीन. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरायचे. मिळेल तिथे काम करायचे. काम संपले की दुसरे काम. अशात मुलांच्या शिक्षणाची फरपटच. नियमित शिक्षण घेता आले नाही तरी अनंत अडचणींना तोंड देत एसएससी पर्यंतचा पल्ला गाठला. एसएससी होणे तसे सोपे नव्हते. परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे तर, राहायचे कुठे ? तितके दिवस येणारा जेवणाचा खर्च कसा करायचा? हे साधे सोपे वाटणारे प्रश्न कुसळकरांसाठी अत्यंत जटील होते. अडचणींवर मात करत परीक्षा दिली खरी परंतु गावोगाव भटकत राहणाऱ्या कुसळकर यांचे गणित व इंग्लिश विषय कच्चे राहिले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण होणे नशिबी आले. दहावीला गणित, इंग्लिश मध्ये विद्यार्थी नापास होतात त्याच्या मुळाशी अशी कारणे असतात. कुसळकर यांचे शिक्षण यानंतर बंद झाले. वडीलांच्या दृष्टीने आतापर्यंत झालेली चैन खूप झाली होती. शिकण्याचे स्वप्न सोडून देण्याशिवाय इलाज नव्हता.
     पिंपळनेर मध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले आणि छोटी नोकरी मिळाली. शिक्षण नाही तरी शिक्षण क्षेत्राशी संबंध ठेवता येत होता. अशातच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली.दहावी नापासांना प्रवेश चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार होता. आणि कुसळकर प्रवेशचाचणीत उत्तम प्रकारे पास होऊन  प्रथम वर्षास प्रवेश करते झाले. अत्यंत अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते सर्व शिक्षकांना परिचित होते. सर्व संपर्कसत्रांना ते हजर राहात. नियमित गृहपाठ पाठवत. मी पीएचडीसाठी पाठवलेली प्रश्नावलीही त्यांनी तातडीने आणि मनापासून भरून पाठवली होती. प्रश्नावलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला म्हणून मी आठवण पत्र पाठवले. संशोधकास संशोधन करताना असा कमी प्रतिसाद मिळण्याचा अनुभव नवा नाही. आठवण पत्रे पाठवणे हा एक तंत्राचा भाग होता. कुसळकरांसारख्या अनेक विद्यार्थ्यांना मात्र साधी प्रश्नावली भरून पाठविता येत नाही याचा राग येत आला व वाईट वाटले. विद्यार्थ्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून मी प्रश्नावली बरोबर परतीसाठी पोस्टेज पाठवले होते इतके असूनही विद्यार्थ्यांतील ही उदासीनता त्यांच्या मते अक्षम्य होती. कुसळकर यांचे लगेच पत्र आले 'आपण नाउमेद होऊ नका. आपले संशोधन ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री आहे'. कुसळकर यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास व मानसिक आधार यांचा माझ्या पीएचडी होण्यात खूप मोठा वाटा आहे
                माझे पीएचडी पुर्ण झाल्यावरही त्यांचे अभिनंदनाचे पत्र आले.बी.ए.उत्तीर्ण झाल्यावरही त्यांची अधूनमधून पत्रे येत.बी.ए.झाल्यामुळे त्यांना प्रयोगशाळा सहायाक पदावरून प्रमोशन मिळाले होते. त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ झाली होती. पुढे त्यांनी बी.एड.ही केले.शिक्षक झाले पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ लागले. आज ते दैनिक समाचार अहमदनगरचे वार्ताहर म्हणून काम करतात.बी.ए. होणे गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असाध्य होते. ते साध्य  झाल्याचा आनंद या सर्वांपेक्षा मोठा होता. स्वतःचा विकास करून ते थांबले नाहीत आपल्या समाज बांधवांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सक्तीने शिक्षण घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. समाजातील जुन्या चालीरीती अनिष्ट रूढी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाला पाठवलेल्या मनोगतात त्यांनी लिहिले आहे, 'जिद्द, दृढनिश्चय, आत्मविश्वास व सुयोग्य नियोजन असल्यास अनंत अडचणींवर मात करून विजयश्री खेचून आणता येते'. त्यांच्या मनोगतातील ही वाक्ये, परिस्थितीबाबत कुरकुर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहेत. मुक्त विद्या केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे जीवन उजळलेल्यात कुसळकर यांसारखे वडारी समाजातील विद्यार्थी आहेत, कैकाडी, कंजारभाट, आदिवासी, वंजारी इत्यादी समाजातील आहेत. शेतमजूर, हमाल आहेत. अशी यादी लांबत जाईल. या सर्वांच्या कथा थोड्याफार फरकाने अशाच आहेत. समस्या थोड्या वेगळ्या, अडचणी वेगळ्या परंतु वंचितता तीच. ज्ञान मिळवण्याची आस तीच.  आणि या सर्वांचा परिणाम ही तोच. मुक्त विद्या केंद्रातून आत्तापर्यंत  १४००० पदवीधर बाहेर पडले परंतु मुक्त विद्या केंद्राचे खरे यश म्हणजे आमचे असे प्रबोधित झालेले तळागाळातील विद्यार्थी.
     May be an image of 4 people and indoor

No comments:

Post a Comment