Saturday 3 January 2015

सावित्रीबाई फुलेना जन्मदिनी अभिवादन

                 जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.
आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्याच लेखनाद्वारे अभिवादन.


                                पुण्यापासून ३५ मैलावरच्या नायगावला सजवलेल्या खिलारी बैलगाडीने मंडळी मुलगी पाहायला निघाली होती.खंडोजी पाटलाच इनामदाराच घराण.एकुलती एक सुस्वरूप मुलगी पसंत पडली.यथावकाश ४/५ दिवस लग्न सोहाळा झाला.हत्तीवरून वरात निघाली.आणि मुलगी पुण्यात आली.ती ९ वर्षाची.आणि तो १३ वर्षाचा.१८४० चा काळ, नायगावमध्ये काय, पुण्यात काय, मुलीच्याबाबत परिस्थिती वेगळी नव्हती ती असायची एक मालकीची वस्तू.जणू गोठ्यातल जनावर.तिनी लिहीण वाचण शिकल की वैधव्य येत अशी समजूत असायची.मग कोणाची आहे बिशाद शिकायची.पण हे जोडप वेगळच होत.तिला शिकायची आवड आणि याला शिकवायची.दोघे शिवारात गेले कि फांदीच्या काटकीने' अ,आ,इ,ई 'शिकणे सुरु व्हायचे.आठ वर्षात ती खूप शिकली.भरपूर बुक वाचायला लागली.आणि हिच्या नवर्‍याच्या मनात स्त्रियांसाठी, शुद्रांसाठी शाळा काढायचं खूळ शिरलं.मग ही घरचीच शिक्षिक मिळाली.
                                   १८४८ मध्ये भिड्यांचा वाड्यात  शाळा सुरु झाली.समाजात खूप मोठ्ठा विरोध झाला.पण हे जोडप काही बधल नाही.म्हटल्यावर सर्वांनी तिच्या सासर्‍याला धरल.धर्म बुडाला अशी हाकाटी करत बहिष्कार घालू म्हणून धमकी दिली.सासर्‍यानी सामोपचारांनी सांगून पाहिलं.काही उपयोग झाला नाही.सासरेबुवा म्हणाले.माझ सांगण ऐकायचं नसेल तर घर सोडा.त्यांनी घर सोडलं.बरोबर रामाच्या मागे सीतेने जाव तस तीही बाहेर पडली.शाळा सुरूच राहिली.मग धर्ममार्तंड चिडले.तिच्या जायच्या यायच्या वाटेवर दबा धरून बसून तिला दगडाने शेणाने मारायला लागली.ती घाबरली नाही.उतली नाही मातली नाही घेतला वसा टाकला नाही.उलट त्याने सुचविले पिशवीत एक जादा लुगड घेऊन जा.शाळेत जाऊन बदल येताना पुन्हा पहिलच लुगड नेसुन ये.दोघांच्या कार्याचे सार्थक झाले.१६ नोव्हेंबर १८५२ मध्ये या जोडप्याचा ब्रिटीश शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तो म्हणाला,"हा गौरव तुझाच आहे.मी शाळा स्थापण्यास कारण मात्र आहे.पण तू शाळा अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे चालविल्या.याचा मला अभिमान आहे"
                               या दांपत्याच काम फक्त शाळा सुरु करून थांबले नाही.त्या काळात बालविवाह होत.बालमृत्यूच प्रमाणही मोठ्ठ होत.मग लहान वयात मुलगी विधवा होई.तीच केशवपन केल जाई.तिच्या रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा येत.सती जाणारी एकदाच मरे.हिला मात्र रोजच मरण यातना सोसाव्या लागत.कधी तरुण वय पाय घसरे.कधी समाजातील बुभुक्षितांच  त्या सावज बनत. अशावेळी दिवस राहिले की,जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसे.मग यांनी आपल्या राहत्या घराशेजारीच १८६० मध्ये वाडा बांधला.विधवा बायकांनी इथे यावे गुप्त रीतीने बाळंत होऊन मुल ठेऊन जावे अशी सोय केली.भितीभिंतीवर याची माहिती देणारी पत्रके लागली.इथ झालेलं पहिले मुल त्यांनीच दत्तक घेतले.या मुलांसाठी अनाथाश्रम सुरु केला.त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आश्रम काढले.
                          शाळा असो,अनाथाश्रम असो,अस्पृश्याना पाण्यासाठी हौद खुला करणे असो,न्हाव्यांचा संप असो,विधवाविवाह असो की दुष्काळ निवारणार्थ अन्नछत्र  असो ही पतीच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली.उलट प्रसंगी धीर दिला.त्या एका पत्रात त्याना लिहितात, "पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदुषक खूप आहेत,तसेच येथेही आहेत त्याना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे.सदासर्वदा कामात गुंतावे.भविष्यातले यश आपलेच आहे"
                        अशी ही पतीच्या मागे केवळ अंधानुकरणाने जाणारी नव्हती.तर डोळस सहधर्मचारिणी होती.तिचा पतीही तितकाच खंबीर साथीदार होता.तिला मुल नाही म्हणून दुसरे लग्न करायची गळ अनेकांनी घातली.पण त्याने मानले नाही.
                       पतीला अर्धांगवायू झाला.तिने धैर्याने तोंड दिले.मनापासून सेवासुश्रूषा केली.मृत्युनंतर विश्वास घातकी भाऊबंदान्चा स्पर्शही होऊ देऊ नका असे त्याने सांगितले.तिने ही इछ्या पूर्ण केली.पतीच्या अंतिम यात्रेत गाडगे पुढे घेऊन जाणारी ही एकमेव स्त्री असावी.पती निधानानंतरही रडत न बसता त्यांचे शिक्षणाचे कार्य,सत्यशोधक समाज तिनी चालू ठेवला.कविता, भाषणे,संपादन हेही कार्य ती करत राहिली.पुण्यात प्लेगची साथ आली.दत्तकपुत्र यशवंत डॉक्टर झाला होता.ही त्याच्या मदतीला धावली.जातीपातीचा विचार न करता सेवाकार्य करत राहिली.दवाखाना गावाबाहेर.रुग्णांना पोचविण्यासाठी वहाने मिळणे कठीण होते.एका अस्पृश्य मुलाला प्लेगची लागण झाली.ही सरळ त्याला पाठीवर घेऊन मुलाच्या दवाखान्यात पोचली.अखेर हिलाच प्लेगची लागण झाली.आणि त्यातच १० मार्च १८९७ मध्ये तिचा मृत्यू झाला.अशी ही मृत्युंजय क्रांतीज्योती कोण बरे?

No comments:

Post a Comment