Thursday 24 July 2014

लोकमित्रकारांच्या शोधात



    
                                      माझ्या सासर्‍यांच्याजवळ धार्मिक,ज्योतिषविषयक,संस्कृत साहित्य इत्यादी पुस्तकांचा संग्रह होता ही पुस्तके पाहताना अचानक' लोकमित्र'चा अंक हातात आला.अंक १९३६चा होता आणि संपादक म्हणून नाव होते द.गो.सडेकर यांचे.मागे लिहिले होते 'हे पुस्तक खानापूर जिल्हा बेळगाव येथे द.गो.सडेकर यांनी आपल्या धनंजय प्रेसमध्ये छापिले.व घनं.६४३ येथे लोकमित्र ऑफिसात प्रसिद्ध केले' हा पत्ता तर आमच्या घराच्या शेजारचा होता.माझे कुतूहल चाळवले.
.                        
                                    अंक छोट्या पुस्तकाच्या आकाराचा.१०० पानी होता.भरगच्च मजकुरांनी भरलेला होता.विविधताही होती.स्वामी रामतीर्थ,रामकृष्ण परमहंस,विवेकानंद यांची वचने होती.तसेच गटे,यंग,ब्राउनिंग,डिकन्सयांच्या लेखातील सुभाषित वजा वाक्ये होती.कथांमध्ये विनोदी व सामजिक कथा होत्या.सौ स्नेहलता नावाच्या लेखीकेचीही कथा होती.

पाककृतीत श्रीखंडाची,अर्काची,सुंठीची फळाच्या पेपरमिंटाची कृती होती.विशेष म्हणजे या पाककृती देणारे सदाशिव परांजपे नावाचे लेखक होते.

'लंका बेटाचे वर्णन' यात सिलोनची विस्तृत माहिती होती.'धर्मो रक्षती रक्षित:' नावाचा विस्तृत लेख होता.याचे स्वरूप नियात्कालीकाबरोबर बातमिपात्राचेही असावे.कारण प्रासंगिक विचार नावाच्या सदरात देशातील विविध घडामोडी व त्यावर भाष्य होते.

इहवृत्त सदराखाली 'थंडी बरीच पडत असून रोगराई ऋतूमानाप्रमाणे आहे.गावाबाहेर नवीन बांधत असलेले पोष्ट ऑफिस तयार होत आहे.एप्रिल१९३६ पासून ते खुले होईल'.अशी खानापुराची बातमी होती.तसेच नंदगड येथील नागेश महादेव नाईक या २४/२५ वर्षाच्या तरुण मुलाचे देवीच्या आजाराने पुण्यात निधन झाल्याचे वृत्त होते.

समस्यापूर्ती या सदरात ग्वाल्हेर ,सांगली,गोवा, संकेश्वर,कल्याण अशा विविध भागातून प्रतिसाद दिला होता.शब्दकोड्यांच्या उत्तराबाबतही हेच दिसत होते.विशेष म्हणजे' चिं.वी. जोशी यांच्या लघुकथाबद्दल दोन मुद्दे' नावाचा लेख होता.वी.वा.जोशी कन्नडकर यांचे मासिक राशी भविष्य होते.अंकाच्या शेवटी जाहिराती होत्या.यात प्रवासाला निघण्यापूर्वी ठेवण्यासाठी कॉलरा,खोकला,कफ यावर इतर पोटाच्या विकारावर उपयुक्त अशा सुधासिंधू  या सुख संपादक कंपनी मथुरा यांची जाहिरात होती.किर्लोस्कर बंधूंच्या पोलादी फर्निचरची जाहिरात होती.वर्गणीदार वाढवण्यासाठी नवीन वर्गणीदार होण्याचे आव्हान देताना १० आणे किमतीचे कोकिळेचे बोल हे पुस्तक बक्षिस देण्याचे आमिष दाखविले होते.

तत्कालीन विविध नियतकालिकांप्रमाणे ज्ञानप्रसार हाच याचा उद्देश असावा.कारण सनातनी सुधारक अशा कोणत्याच गटात बसणारे ते वाटत नव्हते.'धर्मो रक्षिती' मध्ये सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांची टर उडवली होती.प्रासंगिक विचारात आंबेडकरांच्या धर्मांतरावर लिहिले होते.जुन्या धर्तीच्या कविता होत्या दर्जा तसा सुमार होता.असे असले तरी खानापूरसारख्या तालुक्याच्या गावातून असा अंक निघणे हे विशेष होते.

असा अंक आपल्या शेजारच्या घरातून निघत होता आणि आपल्याला त्याची माहितीही नव्हती याची खंत वाटली.द.गो.सडेकरांचा  त्यांच्या घरातील बाहेरच्या खोलीत लावलेला मोठा फोटो मला आठवत होता.याशिवाय द.गो.सडेकर आणि लोकमित्र यांच्या खुणा खानापुरात मला तरी दिसल्या नाहीत.येथील लोकाना इतिहासाची जाण नाही हे चीनी प्रवाशाचे इतद्देशियासंबधीचे उद्गार आठवले छोट्या गावात तांत्रिक दृष्ट्या उत्तम छपाई असलेले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खप असणारे मासिक चालवणार्‍या सडेकरांबद्दल कुतूहल जागृत झाले.हा माझा विषय नाही म्हणून मी दुर्लक्ष करू पाहात होते.आणि माझ्याही नकळत लोकमित्राकारांच्या शोधात होते.

सडेकरांच्या वंशजांकडे बरीच माहिती मिळेल असे वाटले होते.पण त्यांच्याकडे एक चीठोराही नव्हता.जे काही होते ते धुळाप्पाच्या चीरमोर्‍याच्या  दुकानात रद्दीला घातले गेल्याचे समजले.सडेकरांच्या कन्या रोहिणी वागळे खानापूरच्या मुलींच्या शाळेत मुखाध्यापिका होत्या.वयोमानाप्रमाणे काही आठवत नसल्याने माहिती मिळाली नाही.त्यासूर्यापोटी शनैश्वर जन्मले अस आपल्या भावान्बद्दल म्हणत ते आठवल.तास का म्हणत याचा उलगडा होत होता.माझ्या वडिलांनी मात्र त्यामानाने बरीच माहिती पुरवली.'लोकमित्रमध्ये काम केलेल्या तंत्रज्ञाला बाहेर कोठेही डोळे झाकून घेतले जाई.चिं.वी.जोशींचे सुरुवातीचे लिखाण लोकमित्रमध्ये होते. लोकामित्रमध्ये लिहिणार्‍या लेखकाना प्रतिष्ठा प्राप्त होई.शंकरराव किर्लोस्करांनी लोकमित्रकारांचा किर्लोस्करवाडी येथे सत्कार केला होता.एकदा मुकुंदराव किर्लोस्कर खानापूरला आले होते आम्ही सर्व यळ्ळुर गडावर सायकलनी गेलो होतो' माहिती मिळवण्यासाठी थोडे धागेदोरे मिळत होते.

मुकुंदराव किर्लोस्करांच्याकडे साशंकतेनेच फोन केला.त्यांचा प्रतिसाद अनपेक्षित होता.फोनवरून ते भरभरून बोलत होते.'मी नुकताच गोव्यावरून आलो येताना खानापूर लागले जुन्या आठवणी जागृत झाल्या.मी त्यावेळी लहान होतो.लोकमित्रांच्या घरी राहिलो खरा पण मला त्यांची फारशी माहिती नाही.माझ्या वडिलांनी खानापुरवरून चाललास तर सडेकराना अवश्य भेटून ये.असे सांगितल्याने मी गेलो होतो.' पुढे ते म्हणाले, 'तुम्हाला भेटायचं असेल तर केंव्हाही फोन करून या'त्याना लोकमित्रबद्दल माहिती नसेल तर जाण्यात अर्थच नव्हता..

या दरम्यान बा.रं. सुंठणकरांचे १९व्या शतकातील महाराष्ट्रावर पुस्तक छापून आले.बा.रं. सुंठणकर बेळगावचे आणि इतिहासाचे अभ्यासक.त्याना निश्चित माहित असेल असे वाटून त्यांच्याकडे फोन केला.त्यांच्याकडून लोकमित्र हे चांगले मासिक होते आणि आर्थिक चणचणीमुळे बंद पडले एवढेच समजले.

यानंतर निवडक विनोदी कथांचा कोळारकरांनी संपादित केलेला संग्रह हातात पडला.त्यात खरे नावाच्या लेखकांनी लिहिलेली लोकमित्रमधील कथा होती.हा लोकमित्र कोणता याचा उल्लेख नव्हता.मी पुस्तक प्रकाशित करणार्‍या संजय प्रकाशनकडे फोन केला.त्यांच्याकडे मूळ नियतकालिके नव्हती.मुंबई मराठी ग्रंथालयात ती मिळतील असे सांगितले.लेखकांचा मिरजेचा पता पुस्तकात होता.तेथे जोडकार्ड पाठवले.लगेचच लेखकांच्या सुनेचे उत्तर आले.'१०/१५ दिवसांपूर्वी माझ्या पतींचे निधन झाले.मला विशेष माहिती नाही.माझे दीर पुण्यात राहतात त्याना भेटा'.हाही प्रयत्न व्यर्थच ठरला.

किर्लोस्करांनी सत्कार केला म्हणजे सत्काराचे वृत्त किर्लोस्कर मासिकात निश्चित आले असणार,किर्लोस्कर प्रेसमध्ये गेले.आता किर्लोस्कर प्रकाशन न राहाता अपूर्व कडे हस्तांतर झाले होते. एका काळोख्या खोलीत जुने अंक धूळ खात पडले होते.तेथून सडेकारांच्या सत्काराचे वृत्त असलेला अंक शोधणे जिकीरीचे होते,वेळखाऊ होते.माझे स्वत:चे व्याप सांभाळून वेळ देण्याची माझी तयारी नव्हती.माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.कारण तसे ते योग्य दिशेने नव्हते.इतिहासाची साधने कशी शोधायची,त्यासाठी लागणारे कष्ट याची मला जाणीव होती पारन्तु मी समाजशास्त्राची प्राध्यापिका,कोणी इतिहासाची व्यक्ती हे काम करेल माझा याच्याशी काय संबंध अशी भूमिका योग्य मार्गांनी जाण्यास परावृत्त करीत होती.तर खानापुराची रहिवासी असून मला लोकमित्रकारांची माहिती नाही याची खंत निरर्थक प्रयत्न करायला भाग पाडत होती.एकूण लोकमित्रकारांनी मला झपाटले होते.

आणि एक दिवस नियतकालिकांची सूची चाळताचाळता मला लोकमित्रकारांची माहिती सापडली.इतके दिवस हा संदर्भ पाहण्याइतकेही कष्ट मी घेतले नाहीत.याबाबत मनातल्या मनात मी थपडा मारून घेतल्या.शेजारून निघणार्‍या नियतकालिकाची मी माहिती मिळऊ शकले नाही.आणि इतक्या नियतकालिकांची संपादकांची माहिती मिळविताना आपल्या समाजाची इतिहासाची जाण पाहता किती कष्ट पडले असतील.अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेणार्‍या दातेंच्याबद्दल मन आदरानी भरून आले.घर,नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात संशोधन करणार्‍या आम्ही आमच्या पिढीची कीव कराविसी वाटली.

सूचित लोकमित्र व द.गो.सडेकर यांच्याबद्दल पुढील माहिती होती.

'जुलै १८९१ पहिला अंक १८९६ पर्यंत मुद्रक बेळगाव समाचार.
नोव्हेंबर १८९६ धनंजय छापखान्याची  स्थापना. यापुढील मुद्रक धनंजय छापखाना.
उद्देश सामान्य मराठी वाचकाच्या गरजा पुरविणे.
स्वरूप - चरित्रे,निबंध,गोष्टी,स्थळ वर्णने,कविता,मासिक,समालोचन,वाड्मयविहार,सुभाषित संग्रह,पुस्तक परिचय,मुलांचे जग,शोधबोध विनोद,भाषा वैचित्र्य,संस्था समाचार,प्रासंगिक विचार,महिला मनोरंजन.'हे स्वरूप ब्रीदवाक्याला अनुसरूनच होते.

'ब्रीदवाक्य - जितके अपुणासी ठावे तितके हळूहळू शिकवावे शहाणे करुनी सोडावे सकलजन - रामदास
२३व्या अंकापासून ब्रीदवाक्य - अद्वेष्टा सर्वभूतांनां मैत्र,करुण,एवंच | निर्ममो निरहंकारा : समदु:ख सुख:समो
३१व्या अंकापासून जननी जन्मभूमी स्वर्गादपि'
ज्ञान प्रसार ते राष्ट्रप्रेम अशा समाजातील बदलाच प्रतिबिंब नियतकालिकांच्या इतिहासात दिसत तसच इथंही दिसत होत.
यानंतर संपादन आणि संपादकांची माहिती होती.संपादक द.गो.चा होते सहाय्यक बदललेले दिसत होते.
'संपादक- द.गो.सडेकर व सहाय्यक म्हणून ना.ह.आपटे, वर्ष २६ ना.ना. गुणाजी,वी.वा हडप,वर्ष ३० का. रा.पॉलन ठाकर वर्ष ३१ चं.ह.पळणीटकर वर्ष ३३ याशिवाय कृ.ना आठल्ये,के.द. काशीकर यांची नावेही सह संपादक म्हणून होती.'
द.गोंची माहिती पुढीलप्रमाणे होती.
जन्म जुलै १८६० ,मृत्यू २८ नोव्हेंबर १९४१ .
शिक्षण मराठी पाचवी.ग्रंथ प्रकाशन,संपादन,मुद्रण,व्यापारउद्यम,समाजकार्य,कोश चरित्रकार,
संपादक - लोकमित्र

सूची लोकमित्र कारांची माहिती मिळाली परंतु ती अधिक कुतूहल चाळवणारी.पाचवी पर्यंत शिकलेल्या द.गो.ना नियतकालिकाची प्रेरणा कुठून मिळाली? याचे तंत्रज्ञान ते कोठे शिकले.?आर्थिक मदत कोणी केली?त्यांच्या मृत्युला ७५ वर्षेच झाली नाहित तोवर खानापूरकर त्यांना कसे विसरले? लोकमित्रकारांचा शोध अपुराच आहे.तरी २८ नोव्हेंबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली म्हणून हे लेखन
 यापुढे मात्र मला शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेऊन कुतूहल शाम्वायाचे आहे.लोकमित्रचे जुने अंक किंवा इतर माहिती असणार्‍यानी कृपया त्याबाबत माहिती कळवावी.
(तरुणभारत बेळगावच्या २८ नोव्हेंबर १९९४ च्या अंकात  हा लेख छापून आला होता.)


4 comments:

  1. द.गो.सडेकर यांचे पूर्ण नाव दत्तात्रय गोविंद सडेकर. त्यांची तीन पुस्तके उपलब्ध आहेत.
    १ लालन बैरागीण अथवा पानिपतचा घनघोर युद्धप्रसंग
    http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5723/1/536Lolanabairaagiind-a-Yuddhaprasanga.pdf
    २ प्रसंगरत्नावली : बुद्धिवैभव
    http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5729/1/542Prasaararatnaavalii.pdf
    3 आई आणि मुलें
    http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5717/1/530Aaii-Aand-i.pdf
    तसेच करवीर नगर वाचन मंदिर कोल्हापूर येथे लोकामित्रचे अंक आहेत.
    https://dol.maharashtra.gov.in/sites/default/files/Kagal%20%28Kolhapur%29_0.pdf

    ReplyDelete
  2. लोकमित्र चे संपादक म्हणून नारायण हरी आपटे यांनी १९११ ते १९१५ काम केलेले दिसते . ना. ह. आपटे समडोळीकर संपादक व सहाय्यक असा उल्लेख मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर येथे तपासताना मिळाला. लोकमित्र वर्ष २१ च्या दिल्ली दरबार अंकाचे संपादन आपटे यांनी केले होते.

    ReplyDelete
  3. सडेकर यांच्याबद्दल आणखी कुठे माहिती मिळू शकेल ...
    रणजित चौगुले .. बेळगाव
    9980374708

    ReplyDelete
    Replies
    1. द.गो.सडेकर यांचे पूर्ण नाव दत्तात्रय गोविंद सडेकर. त्यांची तीन पुस्तके उपलब्ध आहेत.
      १ लालन बैरागीण अथवा पानिपतचा घनघोर युद्धप्रसंग
      http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5723/1/536Lolanabairaagiind-a-Yuddhaprasanga.pdf
      २ प्रसंगरत्नावली : बुद्धिवैभव
      http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5729/1/542Prasaararatnaavalii.pdf
      3 आई आणि मुलें
      http://dspace.vpmthane.org:8080/jspui/bitstream/123456789/5717/1/530Aaii-Aand-i.pdf
      तसेच करवीर नगर वाचन मंदिर कोल्हापूर येथे लोकामित्रचे अंक आहेत.
      https://dol.maharashtra.gov.in/sites/default/files/Kagal%20%28Kolhapur%29_0.pdf

      4. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर पूर्व. येथे राहून संशोधन केले तर भरपूर माहिती मिळेल.

      Delete