Sunday 20 July 2014

फेसबुक,विस्मरण आणि अल्झायमर

                                             

                               बेळगावला एका लग्नात आमच्या लिंगराज कॉलेजमधील मराठीच्या प्राध्यापिका विजया धोपेश्वरकर भेटल्या.निकुंब सरांचा विषय निघण स्वाभाविक होत.'त्याना अल्झायमर झालाय कोणालाच ओळखत नाहीत.बघवत नाही.त्यामुळे जाण सोडून दिलंय' त्या म्हणाल्या.विद्यार्थ्याना लेक्चरच्यावेळी मंत्रमुग्ध करणारे, ज्ञानेश्वरीतील ओव्या,अनेक कविता, संत साहित्य मुखोद्गत असणारे सर स्मृती हरवून बसलेत?विश्वासच बसत नव्हता.
                     'अमलताश' वाचल्यावर इंदिरा संतांचीही हीच अवस्था झाल्याच समजल.यापूर्वी कुटुंबातील,ओळखीतल्या काहीना अल्झायमर झालेला पाहिला होता.पण या दिग्गजानाही? हा आजार झालेल्या व्यक्तीना काही समजत नाही.पण कुटुंबियाना,सहवासातील व्यक्तीना हे सर्व पाहण यातनामय असत.वय वाढत गेल्यावर आपलीही अशी अवस्था होणार नाही ना अशी भीती वाटू लागते.पार्किन्सन्स .   मित्रमंडळाचे काम करताना, जेष्ठनागरिकांबरोबर वावरताना बहुसंख्यांच्या मनात अशी भीती असते हे प्रकर्षाने जाणवले.थोड विस्मरण झाल तरी अल्झायमर होणार कि काय अस वाटत.निवृत्त, व्ही.आर.एस.घेतलेल्यांच्या बाबत हे जास्त आढळत.होत काय, आयुष्यभर काम केल आता थोडा आराम करू अस वाटत.यातूनच दुष्परिणामांची साखळी सुरु होते.वापरा नाहीतर गमवा या न्यायाने शरीर, मेंदू यांच्या क्षमता हळूहळू कमी होऊ लागतात.मेंदूची क्षमता  वाढवण्यासाठी विविध लेखातून, तज्ज्ञांच्या व्याख्यानातून काही गोष्टी सुचविल्या जातात. त्यात शब्द कोडी, सुडोकू सोडवण,जुन्या फोटोंचे अल्बम पाहून त्यातल्या व्यक्तींची नावे लक्षात येतात का पाहणे,सिनेमा टीव्ही.वरील भूमिकांची नावे आठवणे,जुन्या मित्र मैत्रिणी,सहाध्यायी यांची नावे आठवणे असा काहीकाही सांगितलं जात.शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जस एरोबिक तस मेंदूला ताजतवान ठेवण्यासाठी, स्मरण शक्ती चांगली ठेवण्या साठी न्युरोबिकची गरज आहे असही न्युरॉलॉजिस्टनी व्याख्यानात सांगितलं होत.यासाठी रोज त्याच त्याच गोष्टी तशाच न करता  रोजच्या जगण्यात विविधता हवी.रस्ते बदलण,ब्रेकफास्ट,जेवणासाठीच्या जागा बदलण,उजव्या हाताऐवजी डाव्या हाताने काम करण अशा साध्या सध्या बाबीही महत्वाच्या.
                             आता या सगळ्याचा फेसबुकशी काय संबंध? सांगते.
                            माझ्या अस लक्षात आल. हे सगळ सांगितलं जात असल तरी प्रत्यक्षात  फारस कोणी यातल काही करत नाही.त्याला व्यायाम हे नाव दिल की करायचा कंटाळा येतो..या बाबी आपसूकच व्हायला हव्यात.आणि माझ्यासाठी तरी फेसबुकवरचा वावर यासाठी उपयोगी झाला.गाडीवरच्या काचेवरच पाणी वायपरनी स्वच्छ झाल की जस स्पष्ट दिसायला लागत तस अनेक गतस्मृतीना उजाळा मिळायला लागला.

                           मी टीमवीतून निवृत्त झाले त्याला सात वर्ष झाली.फारसा संपर्क राहिला नाही.२२ वर्षे ज्यांच्याबरोबर काम केल त्यांतील काहींची नावे आठ्वेनाशी झाली.हजारो विद्यार्थ्यांची नावे गावे माझ्या लक्षात असायची.हे काय झाल?फेसबुकवर तृप्ता, मंदार, वीणा  अशी एकेक मंडळी करत टीमवीजत्रा जमा झाली.अनेक आठवणी,नवीन घटना घडामोडी समजायला लागल्या.आता सहज नाव तोंडावर यायला लागली.
                          आमच्या देशपांडे फॅमिली या क्लोज ग्रुपवर बहिणी, भाऊ,त्यांची मुल, मुली,जावई,सुना,नातू,नाती,नातजावइ,नातसुना अशा ३७ व्यक्ती आहेत.ओळखा पाहू नावाखाली .कोणाकोणाच्या लग्नातले मुन्जीतील शाळेचे ग्रुपफोटो टाकले जातात.हयात असलेली नसलेली कितीकिती माणस समोर ठाकतात.खानापुरची खास खादाडी मध्ये विस्मृतीत गेलेले पदार्थ आणि त्याबरोबरच्या आठवणी घेऊन रुझुणतं पाखरू रुंजी घालू लागत.मेंदूला छान खुराक.
                         काही जुन्या संबंधित व्यक्ती तिसर्‍याच कोणाच्या तरी प्रतिक्रियेत भेटल्या.म्हणजे मायबोलीवरून ओळखीची  झालेली सई तिची मैत्रीण म्हणून सेतूची यशोदा .यशोदाद्वारे समाजशास्त्राचे नारायण चौधरी.फेसबुकनीच सुचविलेले डॉक्टर राजा दिक्षित असा मैत्रीचा आभासी जगाद्वारे  जुन्या, नव्या ओळखीच्या व्यक्तींचा. सुंदर गोफ विणला जात होता.यशोदाची ओळख आत्ता आत्ताची म्हणजे पाच सहा वर्षातली.सेतुदारे पण चौधरींची ओळख ९४ सालची.गुजरात युनिव्हर्सिटीत झालेल्या रिफ्रेशर कोर्सच्यावेळची.एकत्रित पाहिलेले टेक्सटाइल म्युझियम,अक्षरधाम,भारताच्या विविध भागातून आलेले आणि ज्याना मी पार विसरून गेले होते ते  प्राध्यापक प्राध्यापिका.सगळ आता घडून गेल्यासाख डोळ्यासमोर उभे राहील.त्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठातील वातानुकूलिक रूममधल्या मिटिंगज, वरखेडेन्च्या घरचे जेवण त्याबरोबर रंगलेल्या साहित्यिक गप्पा.अचानक माझी बिघडलेली तब्येत,शेजारच्याच रूम मध्ये असलेल्या डॉक्टरनी गोळ्या सुचविल्या आणि मुंबईहून आलेल्या प्रा. प्रतीभानी २०  किलोमीटर नाशिकपर्यंत स्कूटरवरून जाऊन त्या आणलेल्या.फेसबुकनी या डीलिट होऊ घातलेल्या आठवणी सेव्ह केल्या.
                            माझ आता सेमिनारमधून,व्याख्यानाना जाण कमी झाल्याने राजा दिक्षित भेटण तस अशक्यच होत.एक दिवशी अचानक people you may knowमध्ये दिक्षित सर दिसले आणि माझ्याही नकळत मी Add friend वर क्लिक केल.डॉक्टर अरविंद देशपांडे स्कूलच्या या दिग्गजांच्यापर्यंत मी आरतीमुळे 'आधुनिक महाराष्ट्र १९ वे शतक 'द्वारा सामील झाले.दिक्षित सरांमुळे मी जाणीव पूर्वक बंद केलेलं हे कवाड धाडकन उघडल.झंझावातासारख्या संबंधित आठवणी भिडल्या.
                          सिनेमाला तर मी हद्दपारच केल होत.पण अशोक, अतुल,माधवी,सई,पार्थ यांच्या मागोमाग कधी चोरपावलाने तो शिरला आणि माझ्या मनाचा कब्जा घेतला मला समजलच नाही.आता आठवणीच मोहोळ थांबवण अशक्यच होत.खानापूरच त्रिमूर्ती,बेळगावची आता अस्तित्वात नसलेली अनेक थिएटर, पाहिलेले सिनेमा तीन तीन तास रंगउन सांगितलेल्या गोष्टी सगळ ताज झाल.
                         माझ्या शुष्क कोरड्या होत चाललेल्या जीवनात,अमेय,भारती,माधवी,विशाल यांच्या कवितांनी ओलावा आणला विशाल सोडता इतराना मी प्रत्यक्ष भेटलेही नाही.यांच्याप्रमाणे हर्षद,दीप्ती,कौतुक,जाई इत्यादी मायबोलीवरील अनेक मंडळी येथेही भेटू लागली. साहित्य कला संगीत यांचा भरभरून आस्वाद घेण सुरु झाल काळपांढर होत चाललेलं आयुष्य रंगीबेरंगी झाल.आरती तर माझ्या मेंदूवरील गोंदण ते पुसलं जाण शक्यच नाही.पण तिनी मला या आभासी जगात ढकललं. आणि मेंदूला तरतरीत ठेवण्याच काम आपसूकच होऊ लागल.

                          ' एक लाट फोडी दोघा पुन्ह:नाही भेट' हे फेसबुकनी खोट ठरऊन टाकल.पुन्हा कधी भेटण्याची शक्यता नसलेली माणस अचानक पुढ्यात येऊ लागली.मुलींच्या शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी,कुठल्यातरी समारंभात,प्रवासात  ओळखीच्या झालेल्या व्यक्ती.आणि त्याबरोबर त्यांच्या संबंधातील  अनेक आठवणी.काहीना मी फ्रेंडशिप रिक्वेस्ट केली काहींनी मला.अमेरिका,इंग्लंड,चायना दिल्ली कुठून कुठून.
                          एकुणात काय तर फेसबुक माझ्यासाठी ब्रेनजीम आहे.
                         हे खर आहे? की मी फेसबुकवर रमतीय त्याच समर्थन. शोध घ्यायला हवा.पुन्हा मेंदूला खुराकच.

                         
                        
                          

2 comments:

  1. अग कित्ती सुरेख लिहिलयस :-)
    खरोखर असा वेगळा विचार सुचायला प्रतिभाच लागते. एरवी फेसबुकचे दोष सांगणारेच किती. फेसबुक म्हणजे निरुद्योगी लोकांचा पडिक कट्टा, अशी अनेकांची भावना. पण शेवटी आपण एखादी गोष्ट कशी वापरतो यावरच सगळे अवलंबून असते हे पुन्हा अधोरेखित केलेस बघ. माझाही असाच अनुभव आहे. फेसबुक वरती मिळालेला "पँशनेट अबाऊट क्रोशा" हा जगभरातील क्रोशाप्रेमींचा गृप. त्यात सामील झाले ते क्रोशाप्रेमापोटी. अन कित्ती वेगवेगळ्या मैत्रिणी मिळाल्या. अनेक नवीन प्रोजेक्टस केली. मुख्य म्हणजे तिथे भातरभरच्या आणि जगभरातल्या मैत्रिणी असल्याने अपरिहार्यपणे इंग्रजीत लिहायला लागलं. माझी इंग्रजीची दडस काही अंशी तरी कमी झाली.
    अशा कितीतरी चांगल्या गोष्टी होतात ना या नव्या माध्यमांतून :-)
    हा एक नवा आयाम दिलास शोभना तू, मनापासून धन्यवाद ___/\___

    ReplyDelete
    Replies
    1. var lihilach aahe tech punhaa
      आरती तर माझ्या मेंदूवरील गोंदण ते पुसलं जाण शक्यच नाही.पण तिनी मला या आभासी जगात ढकललं. आणि मेंदूला तरतरीत ठेवण्याच काम आपसूकच होऊ लागल.

      Delete