Wednesday 28 May 2014

वि.दा.सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध

                                                   वि.दा.सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध

                   
                                 वि.दा.सावरकरांच्यावर आतापर्यंत विपुल लेखन झालेले आहे.तरीही वि.दा.सावरकर आणि त्यांचे विज्ञाननिष्ठ निबंध निवडण्यामागे नेमकी भूमिका आहे.एक म्हणजे प्रथम वर्षातील साहित्यातून समाजदर्शन या विषयात' विश्वाचा देव व मनुष्याचा देव' हा विज्ञाननिष्ठ निबंध आहे.तो विद्यार्थ्याना समजणे अधिक सुलभ व्हावे;दुसरे म्हणजे सावरकर म्हणताच त्यांची स्वातंत्र्यनिष्ठा,हिंदुत्वनिष्ठा,अस्पृष्योद्धाराचे कार्य,समुद्रात उडी मारण्याचे शौर्य इत्यादी माहिती सर्वसाधारणपणे असते;परंतु बुद्धिवादी,विज्ञाननिष्ठ विचारवंत म्हणून फारच थोड्यांना त्यांची ओळख असते.सावरकरांचे चिकित्सक अभ्यासक शेषराव मोरे यांच्या मते," अनुयायी व विरोधक दोघानीही सावरकरांच्या बुद्धीवादाकडे हेतुत: दुर्लक्ष केले आहे.त्यांचा बुद्धिवाद समजून घेण्याचा व देण्याचा दोघांनीही प्रयत्न केला नाही."१तिसरे म्हणजे त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार आजही मार्गदर्शक आहेत.कारण आज औद्योगिक आधुनिक समाजात विज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.आहे असे जेंव्हा आपण म्हणतो तेंव्हा विज्ञानाच्या आधारे जी वैज्ञानिक उपकरणे किंवा यंत्रे बनविली गेली त्याचा प्रसार सर्व सामन्याना अभिप्रेत असतो.ही आधुनिक यंत्रे वापरणार्‍या समाजात मात्र भ्रामक समजू
ती,पोथीनिष्ठा,व्यक्तिपूजा कर्मकांड यांची बजबजपुरी असते.या पार्श्वभूमीवर विज्ञाननिष्ठा म्हणजे काय?
वि.दा.सावरकरांनी ती समाजाची प्रवृत्ती व्हावी यासाठी लोकनिन्दा पत्करून केलेली धडपड, समजून घेणे महत्वाचे ठरते.त्यांनी विज्ञाननिष्ठ निबंध भाग१ व विज्ञाननिष्ठ निबंध भाग २ यातून १३ निबंध लिहिले.'क्ष किरणे' या ग्रंथातील निबंध,'जात्युत्तेजक निबंध व इतर निबंध' यातुनही त्यांची विज्ञाननिष्ठा वेळोवेळी डोकावते.किंबहुना त्यांच्या लेखनाची बैठकच बुद्धिवाद ही होती.
                            हे विज्ञाननिष्ठ निबंध लिहिण्यामागची प्रेरणा त्यांच्याच निबंधात व्यक्त झालेली दिसते.विज्ञाननिष्ठा वाढविणे हे बुद्धीवाद्यांचे कर्तव्य आहे.धर्म आहे  असे त्याना वाटते."ज्या अर्थी आम्हा सुधारकाना हे कळून चुकले आहे,की आमच्या हिंदू राष्ट्राच्या गळ्यासच तात देणार्‍या ह्या पोथी जात,जातिभेदाचा नी:पात केल्यावाचून हिंदूराष्ट्राचे अभ्युदय नि उज्जीवन होणे सर्वस्वी असंभाव्य होय,ज्या अर्थी आम्हा बुद्धिनिष्ठ विज्ञानवादी सुधारकांनी सर्व प्रकारचे धार्मिक भाबडेपणा नि लुच्चेगिरी मग ती वैदिक असो,बायबली असो,कुराणीय असो वा पुराणीय असो- तिच्या कचाट्यातून मानवी बुद्धीला मुक्त करणे हेच आमचे पवित्र धर्मकृत्य होय.ह्यातच अवघ्या मानव्याचे,मनुष्यजातीचे कल्याण असे वाटत आहे."२
                        यामुळे लोकनिंदेला पात्र व्हावे लागणार आहे हे त्याना माहित आहे.लोकहितासाठी लोकप्रियतेचा त्याग करावा लागतो.सत्याची कास धरून प्रचलित जनघातक रुढीचा उच्छेद करणार्‍याला नेहमीच छळ सोसावा लागतो.आज कोटीकोटी लोकांचे देव बनलेल्या जिझस,बुद्ध, महंमद यांची ते यासाठी उदाहरणे देतात.
                        हा बुद्धिवादाचा भडीमार आवश्यकच आहे पण "हेटाळणीने नव्हे,रागाने नव्हे, गंमत म्हणून नव्हे,द्वेषाने तर नव्हेच नव्हे.आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आमच्या पुढारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले परम कर्तव्य आहे.हाच एक खरा धर्म आहे"३हे केवळ हिंदू धर्मियांपुरते मर्यादित नाही.तर ख्रिस्ती,मुसलमान इत्यादी धर्मातील अज्ञानी लोकांसाठीही आहे." ही अज्ञानाची रोगट साथ जी फैलावली जात आहे ती हटवून त्याना सुद्धा विज्ञानाच्या शुद्ध वातावरणात नेऊन सोडणे बुद्धिवाद्यांचे कर्तव्य आहे.कारण गावामध्ये काणत्याही भागात रोगाणु जोपासले गेले की त्यांचा उपद्रव सार्‍या गावाचे आरोग्य संकटात पाडल्यावाचून सहसा होत नाही."४
                       एखाद्या निष्णात वैद्याने रोग्याची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण करणार्‍या जुनाट रोगाची कारणे शोधावीत.त्याला सबळ करण्याचे आव्हान स्वीकारावे तसेच सावरकरांनी पारंपारिक समाजातील दोष शोधून काढले आहेत.राष्ट्र प्रबळ व्हावयाचे तर आधुनिक व्हावयास हवे.आधुनिक होण्यासाठी विज्ञाननिष्ठ व्हावयास हवे.विज्ञाननिष्ठ होण्यासाठी समाज हिंदू असो,मुस्लीम असो,किंवा कोणताही;त्यात सुधारणा व्हावयास हवी.येथे प्रथम विज्ञाननिष्ठा म्हणजे काय ते पहावे लागेल.विज्ञान ही संज्ञा सावरकर दुहेरी अर्थाने वापरतात.एक वैज्ञानिक म्हणजे बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन आणि दुसरा विज्ञानाने निर्माण केलेले तंत्रज्ञान.समाजाला सबल बनवायला मुलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीची त्याना गरज वाटते." समाजकारणात विज्ञानाचे वर्चस्व स्थापिले पाहिजे तसेच आपल्या राष्ट्राच्या अर्थकारणातही त्याच विज्ञानाची मूर्ती जे यंत्र त्या यंत्राचे वर्चस्व स्थापिले पाहिजे"५
                      म्हणजेच विज्ञाननिष्ठा म्हणजे केवळ आधुनिक साधनांचा वापर नाही तर प्रत्य्क्ष प्रयोग, अनुभव, तर्क इत्यादींच्या आधारे सत्यशोधन करणा र्‍या दोन गोष्टींचा कार्यकारण शोधणारी ती एक बुद्धिनिष्ठ शास्त्रीय पद्धती आहे.बुद्धिनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी बुद्धीचा आधार घेणे. बाबावाक्य प्रमाण,पोथीनिष्ठा देवभोळेपणा,हे बुद्धिनिष्ठेला मान्य नसते.जुना समाज तर याच आधारावर उभा होता.नवीन समाजरचना घडवायची तर हा आधार उध्वस्त करून नवीन विज्ञान धर्माची स्थापना करणे हे त्याना प्रथम आवश्यक वाटते.इहलोकातील सुखासाठी इहलोकातच पाळावयाचे नियम,आचार वा कर्तव्ये म्हणजे धर्म असा धर्माचा अर्थ ते सांगतात." जे सृष्टीनियम विज्ञानास  प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगांनी सर्वथैव अबाधित शाश्वत सनातन सत्य आढळून आले आहेत तेच काय ते सनातन धर्म होत."६
                       पारलौकिक वास्तवाचे असे ज्ञान झालेले नसल्यामुळे तो विषय प्रयोगावस्थेत आहे.असे समजावे.व प्रयोगसिद्ध नसल्याने त्याना सनातन म्हणू नये.असे ते सांगतात.अशा धर्माच्या आड पोथीनिष्ठा येत असल्याने पोथीनिष्ठेवर ते प्रहार करतात.हिंदू,मुस्लीम,ख्रिस्ती सर्व ध्रर्मावर हा प्रहार असतो.दूरध्वनीचा शोध लागल्यावर धर्मग्रंथात त्याची माहिती नसल्याने पोथीनिष्ठानी ते स्वीकारण्यास केलेली खळखळ "पोथीनिष्ठेची बाधा" या त्यांच्या निबंधातून मुळातूनच वाचली पाहिजे.
   "बिचारे यंत्र मध्य अरबात ते मुसलमानी ठरते,स्पेनात ख्रिस्ती,रशियात नास्तिक.Godless!ती त्यातून बोलेल ते त्याचे मत तो त्या यंत्राचा धर्म! सामान्यत: मनुष्यही या अशा शब्दनिष्ठ धर्म प्रकरणी असेच एक दुरध्वनी यंत्र नव्हे काय?.... लहान पणी एकाच्या कानात कुराण हाच धर्म गुणगुणले की तो मुसलमान,बायबल हाच धर्म पठविले की तो जन्माचा ख्रिस्ती! कुराण खरे की बायबल की वेद हे त्याला स्वत:ला तोलून पहायची सोयच नाही!"७
                        मनुष्याने धर्माचे नुसते दुरध्वनी यंत्र न बनता शब्दनिष्ठेचा त्याग करून बुद्धीनिष्ठा आचरावी असे ते सांगतात.बायबल,कुराण,वेद,श्रुती,स्मृती पुराणे सारे आदरणीय नि अभ्यासनीय असे ग्रंथ आहेत.परंतु ते मनुष्याने निर्माण केलेले असून ते मनुष्यांनी निर्माण केलेल्या इतर ग्रंथाप्रमाणेच अभ्यासावेत.त्यातील मनुष्यहितास योग्य असलेले विज्ञानाची कसोटी लावून आचरावे.व जे अनुभवांअंती टाकाऊ बुद्धिशून्य,अडाणी ठरते ते त्यागावे.
                       पोथीनिष्ठेबरोबर धर्मभोळ्या,देवभोळ्या समजुतीवरही ते कडाडून हल्ला करतात.या धर्मभोळ्या अज्ञानाचा उदोउदो करणारे तीन वर्ग असल्याचे ते सांगतात.ते म्हणजे धंदेवाईक नेणते,नेणते भाबडे,जाणते संकोची.या सर्वाना वाटते सावरकर बुद्धीभेद करतात.व लोकांच्या भावना दुखवितात.सावरकर तर्काच्या आधारावर त्यांचे म्हणणे खोडून काढतात.व सांगतात "आम्ही खर्‍या अर्थी धर्म भावना उच्छेदित नाही.बुद्धीभेदही करीत नाही,तर उलट आपल्या हिंदुराष्ट्राच्या नि मनुष्यमात्राच्या उद्धरणास जेजे आवश्यक तेते कर्तव्य आणि प्रत्य्क्ष प्रयोगाअंती जे अबाधितपणे टिकून राहते ते सत्य याचाच प्रचार करीत असल्याने सदधर्माला,सदभावनेला हानिकारक ठरणार नाही.करीतच असेल तर दुर्बुद्धीभेद् करीत आहे अपधर्म भावना दुखवित आहे."८
                    दुर्बुद्धीभेद् करीत धर्मभोळेपणाची खिल्ली उडविताना यज्ञाचे महत्व कसे संपलेले आहे अग्नीचे देवत्व का संपलेले आहे.याचा चिकित्सक परामर्श ते घेतात.गोपालन हवे गोपूजन नव्हे हे सांगताना पशुपालन म्हणून पाहणार्‍या अमेरिकेतील गायींची सुस्थिती व देव म्हणून पूजा होते त्या गायींची भारतातील दुरवस्था वर्णन करतात." हा प्रश्न एका फुटकळ धर्म समजुतीचा नाही.अशा धार्मिक छापाच्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत.प्रश्न आहे तो भाकड प्रवृत्तीचा! तिचे उपलक्षण म्हणून आम्ही गायीची गोष्ट निवडली."९असे ते सांगतात.हिंदूंचे अंत्यसंस्कार करताना पक्क्या बंद स्वच्छ पेटीत प्रेत झाकून नेणे कसे सोयीस्कर आहे हे बुद्धिवादी दृष्टीने ते पटवितात.हिंदूंची प्रेताला अग्नी देण्याची पद्धत त्याना पटते.परंतु ती देखील धर्मग्रंथाने सांगितल्यामुळे नव्हे तर उपयुक्ततेच्या दृष्टीकोनातून.येथेही विद्युतदाहिनी अधिक सोयीस्कर उपयुक्त असे ते पटवितात.अंत्ययात्रेसाठी तिरडीवरून नेल्या जाणार्‍या प्रेताचे वर्णन,गोग्रासाचे वर्णन,यज्ञाच्या अवडंबराची खिल्ली ते इतक्या तर्ककठोरपणे करतात की धर्मभोळ्याच नव्हे तर श्रध्दावान नसणार्‍याच्याही अंगावर सरसरून काटा यावा.
                     जुन्या समाजरचनेचे शल्यविच्छेदन करून ते थांबत नाहीत तर समाजरचना कशी असावी हेही सांगतात.आधुनिक समाज घडविण्यासाठी शास्त्राधाराचे एरंडाचे गुर्‍हाळ ते बंद करावयास सांगतात..श्रुतीपुराणोक्ताची बेडी म्हणजेच ग्रंथ प्रामाण्याची बेडी प्रथम तोडावयास सांगतात.त्या जुन्या ग्रंथाबाबत त्याना आदर आहे.त्यातील ज्ञान घ्यावे अज्ञान टाकावे असे ते सांगतात.
                  " ही प्राचीन .श्रुतीपुराणादि शास्त्रे ऐतिहासिक ग्रंथ म्हणून संग्रहालयात,सन्मानपूर्वक ठेऊन आता विज्ञानयुगाचे पान उलटले पाहिजे.त्या ग्रंथाचा काल काय ते सांगण्याचा अधिकार.आज काय ते सांगण्याचा अधिकार प्रत्यक्षनिष्ठ विज्ञानाचा.अद्ययावतपणात मागच्या सर्व अनुभवांचे सार सर्वस्व सामावलेले असते."१०
हा .अद्ययावतपणा म्हणजे काय? कालपर्यंतच्या जुन्यातील जे प्रयोगांती उत्तम ठरते ते ज्ञान आम्ही टाका म्हणत नाही......आजच्या विज्ञानाच्याकसोटीने जे राष्ट्रधारणास उपयुक्त तेच बेधडकपणे वापरावे उद्या बदलत्या परिस्थितीत वा वाढत्या वैज्ञानिक ज्ञानात जर तेही चुकीचे नि अहितकारक ठरेल तर तो आमचा आजचा आचार बदलण्यास उद्याही तसाच स्वतंत्र आहे.केवळ कालच्या पोथीच्या शब्दाने आज बांधलेला नसावा.उद्या तर नसावाच नसावा.या  विज्ञाननिष्ठ मतासच आम्ही .अद्ययावतपणा म्हणतो.अद्यतनी प्रवृत्ती हीच" ११ अशी अद्यतनी प्रवृत्ती युरोप अमेरिकेत असल्याने ते देश पुढे गेले.ते देवभोळे होते तेंव्हा तेही दुर्बल होते.परंतु आता मात्र "त्यांचा प्रत्येक आज कालच्याहून इतका अधिक समंजस,सकस,सरस ठरत आहे की त्यांचा कालवरचा विश्वास ढळून आजवरचा अढळपणे बसलेला आहे."१२ही प्रवृत्ती वाढण्यासाठी देवभोळेपणात घट होऊन यंत्रशीलपणा वाढला पाहिजे असे त्याना वाटते.
                        देवभोळेपणामुळे प्रत्येक घटनेचे कारण देवाची लहर,कृपा,कोप असे शोधले जाते त्याचे निराकरण व्हावे म्हणूनही प्रार्थना,पूजा सत्यनारायण,जपजाप्य,जादूटोणा यांचा अंगीकार केला जातो.परंतु यंत्रशीलपणा हा या सृष्टीतील भौतिक व्यापार ठराविक सृष्टीनियमाचे फलित होय,आणि जर त्या नियमाप्रमाणे
आपण तेते घटक जुळवून आणू शकलो तर ते कार्य घडलेच पाहिजे,या निष्ठेवरच काय ती अधिष्ठानलेला असणार,अमुक अंशपर्यंत पाण्याचे उष्णतामान वाढविले की पाण्याची वाफ झालीच पाहिजे.मग त्यावेळी तो यांत्रिक नमाज पठणाचे विसरल्यामुळे अल्ला रागावलेला असो वा संध्या करण्याचे टाळल्याने देव चवताळलेला असो..... देवाने का म्हणता,पण जे सृष्टीनियम एकदा घालून दिले त्यात देव देखील पुन्हा बदल करू शकणार नाही."१३ यंत्रशास्त्राचा भक्कम पोलादी पुतळा धर्मशास्त्राच्या पायावर उभारण्याचा प्रयत्न त्याना हास्यास्पद वाटतो.यंत्राने बेकारी वाढते ही कल्पनाही ते खोडतात." बेकारी यंत्राने वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते.आणि  विषम वाटणीचा दोष यंत्राचा नसून समाजरचनेचा आहे."१४
                           या पार्श्वभूमीवर देवभोळेपणा कमी करणारी विश्वाच्या देवाची नवी संकल्पना ते मांडतात.विश्व हे माणसाच्या सुखासाठी निर्माण झाले.ही कल्पना ते खोडून काढतात.मानुष्य विश्वाच्या अनंत काळाच्या असंख्य उलाढालीतील एक तुच्छ परिणाम आहे.असे पटवतात.सत्यनारायणाने तो प्रसन्न होणार नाही."विश्वाची नियमबद्धता समजून घेऊन मनुष्य जातीच्या हिताला आणि सुखाला ती पोषक कशी होईल हे पाहणे महत्वाचे.विश्वात आपण आहोत पण विश्व आपले नाही, फार थोड्या अंशी ते आपणास अनुकूल आहे,फार फार मोठ्या अंशी प्रतिकूल आहे;हे धीटपणे समजून घेऊन त्यावर बेधडकपणे तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे आणि विश्वाच्या देवाची खरी खरी तीच पूजा!"असे त्याना वाटते.
                          एकदा ही विश्वाच्या देवाची कल्पना समजून घेतल्यावर कोणत्याही चळवळीला भगवन्ताचे अधीष्ठान असावे लागते हे मानणे निरर्थक ठरते." सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील त्याचे." इतकेच काय ते खरे.आणि वैज्ञानिक,सामर्थ्यशील,प्रत्य्क्षनिष्ठ अशा ऐहिक साधनांनी विपक्षाहुन वरचढ होण्याचा यत्न करावा.
" ऐहिक विजयाचा मार्ग हाच!अन्यायी परोपद्रवी व्हावे असे नव्हे तर न्याय झाला तरी तो समर्थ नसेल तर व्यर्थ होय.समर्थ अन्याय त्यावर कुरघोडी केल्यावाचून राहणार नाही.दुर्बल पुण्याई ही पंगु होय.नुसत्या एकशे आठ काय अकराशे आठ सत्यनारायणाच्या पूजा केल्या तरी ऐहिक यश मिळणार नाही.कारण ते चळवळीच्या भौतिक सामर्थ्यावरच अवलंबते"१६
                    रोग निवारणार्थ वापरलेल्या जहाल प्रतिजैविकांनी व्याधी बरी होण्याबरोबर शरीर स्वास्थ्य राखणार्‍या काही आवश्यक कार्यावरही दुष्परिणाम होतो.तसेच बुद्धिवादाच्या अतिरेकी मार्‍यामुले होईल का? अशी शंका सावरकरांचे  विज्ञाननिष्ठ निबंध वाचताना येत राहते.परंतु समाजसुधारक सावरकराना याचे भान आहे.मानवी जीवनात बुद्धीबरोबर श्रद्धा व मन हेही महत्वाचे घटक असतात.प्रखर बुद्धिनिष्ठा सरर्वसाममान्याना पेलणारी नसते.म्हणून ज्या श्रद्धा खर्‍या का खोट्या याचा निश्चित निर्णय लागलेला नाही व ज्या मनुष्य हीतास हानिकारक नाहीत अशा श्रद्धांचा माणसाच्या हितासाठी वापर करणे त्याना अनुचित वाटत नाही.बुद्धिवादाला अशा रीतीने ते उपयुक्तातावादाची मर्यादा घालतात.त्यांचा बुद्धिवाद ते बुद्धीभेदाकडे झुकू देत नाहीत.परंतु हे सर्व समजून घेण्यासाठी सावरकरांच्या  विज्ञाननिष्ठ निबंधांबरोबर त्यांचे इतर सर्व लेखन व कार्य जाणून घेणे महत्वाचे ठरते.या लेखाचा मर्यादित हेतू सुरुवातीलाच सांगितल्यामुळे सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचण्याची ते वाचून सावरकरांचे इतर लिखाणवाचण्याची आणि या सर्वातून सावरकर नेमके पणाने समजून घेण्याची जिज्ञासा निर्माण होणे हे महत्वाचे.वाटते.
                                    संदर्भ
१) शेषराव मोरे,.सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास,'निर्मल प्रकाशन',नांदेड पृ.३
२)वी.दा सावरकर, 'जर का पेशवाई असती'
    समग्र सावरकर वाङमय,खंड ३रा पृ ४१९
३)तत्रैव -'न बुद्धिभेद जयते' पृ ४०२
४) तत्रैव -'यंत्र' पृ.३८७
५)- " -'सनातन धर्म कोणता' पृ.३१५
६) -" -' पोथीनिष्ठेची बाधा' पृ.१७४
७) -" - 'आमच्या धर्म भावना दुखू नका' पृ.४२४
८) -" - 'गोपालन हवे गोपूजन नको' पृ.३५१
९) - " -' आजच्या सामाजिक क्रांतीचे दूत' पृ ३७०
१०) -" -'पुरातन की अद्यतन' पृ.३७७
११) -" - 'दोन शब्दात दोन संस्कृती' पृ.३५५
१२) -"- 'यंत्र'पृ.३८२
१३) -" - 'यंत्राने का बेकारी वाढते'पृ.३९८
१४) -" - 'मनुष्याचा देव आणि विश्वाचा देव'पृ.२९७
१५) -" - ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय/'पृ.३०६
टिळक विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या माध्यम १९९६-९७ अंक २मधील सदर लेख छापण्यास परवानगी दिल्याबद्दल विद्यापीठ व्यवस्थापनाचे आभार.



                   
                       
                                         

No comments:

Post a Comment