Friday 23 June 2023

मर्म बंधातली ठेव ही - ४

                                              मर्म बंधातली  ठेव ही - ४

                   पावसाची वाट पहात जून सरत आला. सर्व हवालदिल. आणि आज अचानक तो आला.आपल्याला उकाडा कमी होण्याचे पडलेले असते.आपण आपल्या संकुचित विश्वात.मला या परीस्थितात माझा नातू आर्यच्या लहानपणीच्या एका प्रसंगाची आठवण येते.

                   तो सहा, सात वर्षाचा असेल. शाळा सुटली की आई ऑफिसमधून येईपर्यंत आमच्या कडे असायचा.आमची पार्किन्सन मित्रमंडळाची सभा असली की आमच्याबरोबर यायचा.रिक्षात दांडीला धरून उभा असायचा.

                  असाच बरेच दिवस पाऊस नव्हता.आम्ही अश्विनी लॉजमध्ये असलेल्या सभेला चाललो होतो.लक्ष्मी नारायण थियेटर पर्यंत आलो आणि अचानक जोराचा पाऊस सुरु झाला.आता सभेला लोक कसे येणार हा पहिला विचार माझ्या मनात आला.आणि त्याच क्षणी आर्य म्हणाला आज्जी शेतकर्यांना किती आनंद होईल ना? त्याचा चेहरा आनंदाने चमकला होता.तो आजही माझ्या डोळ्या समोर आहे.मला चपराक मारल्यासारखे झाले. मी त्याला म्हटले, तुला असे का वाटले? तो म्हणाला मम्मा बातम्या पहात होती तेंव्हा मी पहिले होते. शेतकरी दु:खी होते.

                तो असे शुद्ध मराठी बोलला की मला त्याचे कौतुक वाटायचे. त्यांनी शेतकरी शब्द वापरलेला पाहूनही मला आश्चर्य वाटले. तो आर्मी पब्लिक स्कूल मध्ये जायचा.आजूबाजूला मराठी बोलणारे नाहीत.हल्ली इंग्लिश मिडीयमला जाणार्या मुलाना रोजचे व्यवहारातील शब्दही माहित नसतात.इंग्रजी शब्दांचा वारेमाप वापर करतात.

              त्याचे हिंदी भाषिक दादा, दादी आले की तो त्यांच्याशी शुद्ध हिंदीत बोलतो.आणि आमच्याशी मराठीत.याचे मला कौतुक वाटते.

            त्याची आई आल्यावर तिला ही रिक्षातील घटना सांगताना माझा चेहरा खुलला होता.तिचे म्हणणे असते मी अतिशयोक्ती करते.पण माझ्याकडे पुरावा होता.माझी मैत्रीण निरुपमा त्यावेळी माझ्याबरोबर रिक्षात होती.तिनेही त्याचा चमकलेला चेहरा पाहिला होता.

           आर्य कितीही मोठ्ठा झालास तरी तुझ्यातले हे माणूसपण,Empathy हरवू देऊ नकोस.            

No comments:

Post a Comment