Wednesday 14 July 2021

आनंदी वृद्धत्व - ६

                                                               आनंदी वृद्धत्व - ६

                                             आत्तापर्यंत आमचे वृद्धत्व आनंददायी होण्यासाठी रोलमॉडेल असणाऱ्या  व्यक्तींच्याबद्दल  लिहिले यावेळी मात्र एका व्यक्तीबद्दल नाही तर जोडप्याबद्दल लिहिणार आहे.या दोघांचा एकमेकाव्यतीरिक्त विचारच करता येत नाही इतके त्यांच्यात अद्वैत आहे.हे जोडपे म्हणजे हास्य्योगी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई  काटे.काटे सर वय वर्षे ८४ आणि सुमनताई वय वर्षे ७५. केवळ या वयामुळेच त्यांना वृद्ध म्हणायचे.नाहीतर कोणत्याच अंगाने ते वृद्ध नाहीत.गेली २३ वर्षे ते चैतन्य हास्ययोग परिवाराची धुरा समर्थथपणे सांभाळत आहेत..ही सांभाळतानाचा त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे.

                                  आमची रोजची सुप्रभात  विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या टाळ्या आणि प्रार्थनेने होते.खणखणीत आवाजात आकडे मोजत आणि माहिती सांगत २० मिनिटे व्यायाम प्रकार,यात डोळ्यापासून पाउलापर्यंत सर्व अवयवांना व्यायम होईल अशी रचना आहे.त्यानंतर प्राणायाम आणि हास्य असे चालते.प्राणायाम झाला की मकरंद टिल्लू हास्य घेतात.प्रमोद ढेपे वाढदिवस साजरे करतात.ही सर्व रचना अनेक रथी मह्रारथीनी पाहून मान्यकेली आहे.काही सुधारणा सुचविल्या.त्याचे कौतुक केले.यात कै. डॉ. ह..वी.सरदेसाई, कै.डॉ.नितीन उनकुले,डॉ.शरद मुतालिक, डॉ संचेती, डॉ.हिमांशू वझे अशी दिग्गज मंडळी आहेत.

                           करोना पूर्व काळात १८० बागामधून विविध सहकारी हे सर्व घेत.अधून मधुन प्रत्येक बागेत दोघांची फेरी असे.त्यात्या  बागेत यांच्या फेरीने चैतन्य निर्माण होई.यासाठी  दोघे पहाटे पाचला उठत.अंघोळ,पूजा आवरून स्कूटरवर  लांबलांबच्या ठिकाणी जात.फक्त शस्त्रक्रिया,आजारपण यामुळे या अविरत चाललेल्या कामात खंड पडे.सगळ्या हास्यक्लबनी मिळून फोर व्हीलर भेट द्यायचा प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी तो धुडकावून लावला.काही घेण्यापेक्षा देणेच ते पसंत करतात. मध्यंतरी त्यांच्या पंच्याहत्तरीला त्याना पंच्याहत्तर हजाराची थैली देण्यात आली.त्यात २५००० ची भर घालून  त्यांनी हास्य्क्लबलाच ती दिली.आमच्या समोरच्या बागेत २००७ साली हास्यक्लब सुरु झाला आणि आम्ही या दाम्पत्याच्या संपर्कात आलो.प्रथम दर्शनी प्रभाव पडावा अशी ही जोडी.बघता बघता आमच्या जवळची झाली.आमच्या बरोबर आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळ असतेच ते आमच्या या परिवारातलेही झाले.केंव्हाही बोलावले तरी आमच्यासाठी हजर झाले.

                          करोना नंतर बागा बंद झाल्या आणि एकदम हे सर्व ठप्प झाले.पण स्वस्थ बसतील ते काटे दाम्पत्य कसले? टिल्लू यांनी ओंनलाईन  हास्यक्लब घेण्याची कल्पना सुचवली आणि ती एकदम हिट झाली.आज महराष्ट्रातील विविध भागातून, भारत आणि परदेशातीलही २००० च्या वर सदस्य आहेत.झूमवर जास्तीत जास्त १००० सहभागी  मर्यादा आहे.ती संपल्यावर युट्युबवर सोय करण्यात आली.सहभागी करून घेणे थांबवले नाही.सेवादलातील सानेगुरुरुजींच्या आंतरभारती,विश्वभारतीची संकल्पना येथे प्रत्यक्षात आली आहे 'भारत जोडो विश्व जोडो' हे हास्यक्लबचे  ब्रीदवाक्य असते.सर्व जाती धर्माच्या, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक स्तरातल्या सदस्यामुळे सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण आहे. सेवादलाचे संस्कार असले तरी येथे सर्व राजकीय पक्षाचे सहभागी आहेत आणि विविध पक्षांचे  नेते या कार्याला मदत करत असतात. माणसे जोडण्याच्या या जोडप्याच्या गुणामुळे हे शक्य होते. हे मोफत चालते.या त्यांच्या कामाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे.यावर  स्वतंत्र लेख लीहावा लागेल.आनंदी वृद्धत्व हा विषय असल्याने हात आवरता घेते.महत्वाचे म्हणजे या कार्याची सुरुवातच काटे सरांच्या निवृत्तीनंतर झाली.

                          गव्हर्मेंट पॉलीटेकनिक मधून निवृत्त झाले.घरातल्या जबाबदाऱ्या आधीच संपल्या होत्या. काम करून शिक्षण केल्याने सतत कामात राहायची सवय निवृत्तीनंतर रिकामपण खायला उठले.त्यातच स्वत;ची चूक नसताना एका जवळच्या व्यक्तीच्या चुकीने ते आर्थिक संकटात सापडले.त्याना नैराश्याने घेरले.त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला.वजन कमी होत होते.सर्व तपासण्या नॉर्मल.तरी तब्येतीची कुरकुर चालू होती.कुटुंबीय चिंतेत पडले. डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांच्याकडे गेले. त्यांनी लिहून दिले. रोज सकाळी बागेत जाणे आणि व्यायाम करणे.जवळच्या संभाजी उद्यानात जाऊन सेवादलात शिकलेले व्यायाम सुरु केले. हळूहळू इतर लोक सामील होऊ लागले.नैराश्य कधी पळून गेले समजलेच नाही.यात प्राणायाम ,हास्य यांचाही समावेश झाला. लोकाना फायदा होत होता लोक वाढू लागले.शिक्षक तयार झाले.वेगवेगळ्या बागात शाखा सुरु झाल्या..  

                       घरातील सर्व त्यांचे डिप्रेशन गेले म्हणून खुश होते. सुमनताईनी तर त्यांची अकाउंटंटची चांगली नोकरी पन्नासितच सोडली आणि जेथे राघव तेथे सीता म्हणत त्यांच्या कार्यात स्वत:ला झोकून घेतले.तसे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.त्याना दोन मुले.एक मुलगा एअरफोर्से मध्ये त्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुली प्रथमपासूनच बदलीच्या ठिकाणी.दुसरा साफ्टवेअर इंजिनिअर.पत्नी शिक्षिका आणि दोन मुली,काटे सरांची एक अविवाहित बहीण सिंधुताई त्यांच्याबरोबर राहतात.त्या ९१वर्षाच्या आहेत.काटे दाम्पत्यासाठी  त्या रोल मॉडेल आहेत.मुख्याध्यपिका होत्या..सामजिक कामात सहभागी असतात.यासाठी कोरोना पूर्व काळात दुपारी तीन साडे तीनला बाहेर पडायच्या त्या रात्री आठ साडेआठला घरी यायच्या.अजूनही स्वत:ची कामे स्वत: करतात. पहाटे उठून व्यायाम करतात.काटे सरांचे आईवडील ९७/९८ वर्षाचे होऊन गेले.सरांची मावशीही त्यांच्याकडे राहायची.ती ९७ वर्षांची होऊन गेली.सुमन ताईंची याबद्दल तक्रार नसते.नोकरी सांभाळून सर्वांचे करताना त्यांना त्रास झाल असेल असे आपल्याला वाटते.त्या म्हणतात सहवासातून प्रेम निर्माण होते.आता सुनेशीही त्या छान जमवून घेतात.इतर कामाला बाई असली तरी स्वयंपाक घरीच असतो.दोघी मिळून परस्पर संगनमताने त्या स्वयंपाक  करतात.आपल्याला सामजिक काम सुनेच्या सहकार्यामुळे करता येते हे अभिमानाने त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.मुलांनीही बाबांना सांगितले आहे आतापर्यंत खूप केलेत आता घराची जबाबदारी माझी.तुम्हाला जे आवडेल ते करा.काटे सरांनी तन मन, धनाने हास्यक्लबच्या कार्याला वाहून घेतले. एकुणात काटे सरांच्या.तीन पिढ्या गुण्यागोविन्दानी राहतात. 

                       त्यांचे घर मोट्ठे आहे.पण कोरोनामुळे सगळे घरी आणि दोन नाती,सून मुलगा यांचे ऑनलाईन काम चालू असते.प्रत्येकजण एकेका खोलीत. दर बुधवारी हास्यक्लबची ऑनलाईन मिटिंग तसेच विविध कार्यक्रमही ऑनलाईन असतात.सर्वाना यासाठी एकमेकांशी जुळवून घ्यावेच लागते.सुमनताईनी निवृत्तीनंतर संगीताच्या विशारद पर्यंत परीक्षा दिल्या.आता घरात रोजच्या गरजेच्या गोष्टी विविध खोल्यातून ऑनलाईन चालू असल्याने रियाज करणे बंद असे सुमनताईनी परिस्थितीनुसार ठरवले आहे.हे एक तडजोडीचे उदाहरण सांगितले.अशा अनेक तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागत असणार तेंव्हाच आनंदाने एकत्र राहता येते.आता तर हे विश्वची यांचे घर झाले आहे.त्यांचे कुटुंब विस्तारीत झाले आहे.

                      या विस्तारित कुटुंबाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आनंद लुटला जातो..कोरोन पूर्वी देश परदेश अशा  अनेक सहली झाल्या.अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. दिवाळीत ११००० किलो मिठाई वाटण्यात येते. शहीद जवान कुटुंबियांना मदत केली जाते.भूकंप,पूर अशी  कोठेही आपत्ती आली की हे धाऊन जातात तेथे जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.अशा खूप गोष्टी आहेत.

                  ऑनलाईन हास्यक्लब मध्ये अनेकजण आपले मनोगत सांगतात काटे दाम्पत्याबाद्द्ल कृतज्ञता व्यक्त करतात..करोनामुळे,लॉकडाऊनमुळे जगणे विसरलेल्या नैराश्यात गेलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले आहे.हे ते श्वासाईतक्या सहजतेने करतात.उलट या सर्वाना बदलताना पाहून आमचीच उर्जा वाढते, ही देवाणघेवाण आहे असे त्यांचे म्हणणे असते.कोणतेही काम आनंदाने करायचे ही या दोघांची वृत्ती आहे.अनेक पुरस्कार या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याकडे चालून आले आहेत.पुणे महानगरपालिकेचा जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष नागरी सत्कार करण्यात आला जनसेवा फौंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तशी यादी मोठ्ठी आहे हजारोंच्या मनातील अबाधित स्थान हाही मौलिक पुरस्कार आहेच.

                आपले कार्य असेच बहरो.यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही मनापासून प्रार्थना.

                   

                        

                     

                          

                              

                        

No comments:

Post a Comment