Saturday 8 March 2014

आम्ही गृहिणी

                                                 आम्ही गृहिणी
 समस्त महिलानो महिलादिनाच्या शुभेच्छा!
ज्यांच्यामुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला त्या सर्व ज्ञात अज्ञात सुधारकाना आणि त्यांच्या चळवळीला अभिवादन.
                                 मी स्वतः विवाहानंतर १५ वर्षे गृहिणी होते.त्यानंतर प्राध्यापक झाले.विभाग प्रमुख झाले.पण गृहिणी असल्याने वाटणारा न्युनगंड या काळातही राहिलाच.इतरानी केलेले ओरखडे हे काम चोखपणे करत होते.कदाचित म्हणूनच  अभ्यासक्रमास प्रवेश घेणार्‍या आणि स्वतःची पुढे प्रगती करणार्‍या गृहीणींबाबत मला विशेष आस्था वाटली.माझ्या दूरशिक्षणातील विद्यार्थिनीवरील हा लेख.

                              "निवासी संपर्कसत्रात परस्पर परिचयाचा कार्यक्रम चालु होता.'मी सुजाता काळे गृहिणी.'सुजाताने आपला परिचय करुन दिला.गृहिणी हा शब्द तिने असा काही उच्चारला की गृहिणी असल्याचा अभिमान त्यात होता.अभ्यासक्रमाबाबतचे अनुभव,अभ्यासक्रमाने काय दिले हे ती अगदी नेमकेपणाने,ठामपणे,आत्मविश्वासाने सांगत होती.प्रवेश घेण्यासाठी आलेली सुजाता मला चांगलीच आठवत होती.बावरलेली, गोंधळलेली,प्रवेश घ्यावा की नाही अशा संभ्रमात असलेली.तुम्ही काय करता या प्रश्नाला तिने काही नाही असे उत्तर दिले होते.

बहुतेक गृहिणींच्याबाबत असेच होते.घर्,मुले संसार यात त्या इतक्या गुरफटून गेलेल्या असतात.की स्वतःचे वेगळे अस्तित्व राहिलेलेच नसते.स्वतःच विणलेल्या कोशात अडकल्याने घराच्या उभारणीत,घरातील माणसांच्या घडणीत त्यांचे असलेले महत्व त्यांच्या लक्षातच आलेले नसते.अशा अनेक गृहिणी दूरशिक्षणातील बी.ए. अभ्यासक्रमास प्रवेश घेतात आणि बघता बघता त्यांच्यातील सुरवंटाचे फुलपाखरु होते. बर्‍याचवेळा फक्त पदवीधर होणे एवढेच स्वप्न त्या घेऊन आलेल्या असतात.पण हळूहळू त्यांचे क्षितिज विस्तारत जाते.पुढे त्या वेगळ्याच रुपात भेटतात आणि आम्ही प्राध्यापक मंडळी सुखावून जातो.
         
रत्नागिरी येथे मराठी समाजशास्त्र परिषदेच्या अधिवेषनासाठी गेले होते.तिथे एक पस्तीशीतील स्त्री येऊन म्हणाली,मॅडम ओळखलत का?माझा प्रश्नार्थक चेहरा पाहुन ती म्हणाली,'मी प्रिती कोल्हे''     
' तुम्ही इथे कशा?' मी विचारले.
'मॅडम नाशिकच्या के.टी.एच.एम.मध्ये समाजशास्त्राची प्राध्यापक आहे'
मी अवाक होऊन आणि सुखाउनही तिच्याकडे पहातच राहिले.

प्रिती बी.ए.करत असताना नाशिकच्या संपर्कसत्रात एक दोन वेळाच भेटली होती.परंतु तीनही वर्षातील
गृहपाठातून ती सर्व प्राध्यापकाना माहित होती.एखादी चांगली उत्तरपत्रिका.आली,की तो आनंद सर्व प्राध्यापकात नेहमी वाटला जायचा.प्रितीचे गृहपाठ सुंदर अक्षरातले,निट्नेटके, मनापासून लिहिलेले असायचे.त्यांचे सामूहिक वाचन झाले  प्रितीला पाहिल्यावर मला हे सर्व आठवले.प्रितीने बी.ए.केल्यावर समाजशास्त्रात एम.ए. केले होते.त्यानंतर सेटची परीक्षा दिली होती.सेटचा निकाल नेहमी कडक  लागतो.फार थोडे उत्तीर्ण होतात.आमची दूरशिक्षणातून पुढे आलेली प्रिती मात्र पहिल्याच प्रयत्नात पास झाली.आपलीच विद्यार्थिनी प्राध्यापक म्हणून बरोबरीच्या नात्याने शेजारी बसते हा आनंद काही वेगळाच होता.

प्रितीप्रमाणे अनेक उदाहरणे सांगता येतील.पतीच्या बद्लीप्रमाणे गावोगाव फिरायला लागले तरी पदवीनंतर पीएच..डी.पर्यन्त भरारी मारुन पुढे पुस्तके लिहिणारी सुवर्णा,एम.ए.,एम.एस.ड्ब्ल्यु. करुन भारती विद्यापिठात काम करणार्‍या मंजुषा  मांडके आणि रमा सोनावणे,एम.ए. आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम करुन स्वतःची स्वयंसेवी संस्था काढणारी सुशिला ढवळे अशा कितीतरी.

काही गृहिणीनी मात्र बी.ए. झाल्यावर दुसरे काही न करता गृहिणी म्हणून राहणेच पसंत केले.परंतु अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापुर्वीचे आमचे गृहिणी असणे आणि अभ्यासक्रमानंतरचे गृहिणी असणे यात जमिन अस्मानाचा फरक असल्याचे अनेक गृहिणी सांगतात.कधी पत्रातून तर कधी प्रत्यक्ष भेटुन. 'गृहिणी सचिवः सखी' असे यांच्याबाबत म्हणता येइल

बँक ऑफिसरची पत्नी असणारी स्मिता म्हणते,पतीच्या सुखदु:खात अधिक चांगल्या रीतीने समरस होता आले.त्यामुळे पतीची प्रगती अधिक वेगाने झाली.सहजिवन अधिक चांगले झाले'.

शशीकलाचे पती अर्थशास्त्रातील तज्ज्ञ.तिच्या पतीचे समाजासाठी योगदान किती मोठे आहे याची तिला नव्याने जाणिव झाली.संसारातील बारीकसारीक कुरबुरी त्यांच्यापर्यंत न पोहोचविता.घराचा सर्वार्थाने भार उचलणे आणि पतीला त्यांच्या कामात झोकून काम करु देणे,हे सुद्धा मोठे समाजकार्य आहे असे तिला वाटते.मुले आणि बाबा यांच्यात मध्यस्ताचे काम आपण निट करु शकतो असे सुरेखाला वाटते.मुले अशी का वागतात याच्या मुळाशी जाउन ती विचार करु शकते.ती आता मुलांची जवळची मैत्रिण झाली आहे.

विशेष म्हणजे या गृहिणींमध्ये सर्व आर्थिक सामाजिक स्तरातील स्त्रिया आहेत.हिंदू आहेत तशा मुस्लीम, ख्रिश्चन आहेत.ग्रामिण भागातील आहेत तशा शहरातील आहेत.यांची भरारी वरवर पाहता उत्तुंग वाटणार नाही.पण अनेक चिमण्या पाखरांच्या पंखात उत्तुंग भरारी घेण्याचे बळ देण्याचे काम त्या जाणिवपूर्वक करत आहेत हे निश्चित.एक स्त्री शिकली, की कुटूंब सुधारेल् व समाज सुधारेल हे सुधारकांचे गृहितक मोठाल्या पद्व्या घेउन फक्त स्वतःचीच प्रग्ती करणार्‍या स्त्रियानी खोटेच पाडले.होते. आमच्या विद्यार्थिनी गृहिणी मात्र या गृहितकला निस्चित न्याय देत आहेत"


१८डिसेंबर २००४ च्या केसरी मध्ये उत्तुंग भरारी या सदरात सदर लेख छापून आला होता. छापण्यास परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.





No comments:

Post a Comment