Tuesday, 5 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ७

                                                     मर्म बंधातली ठेव ही - ७

                      अंजली महाजनची तब्येत बरी नव्हती.मी भेटायला गेले होते.तेथे आर्यची आठवण निघाली.त्याचे काय झाले

एकदा दहा साडेदहालाच अंजलीचा फोन आला.आज पावभाजी केले.केशवराव काका, काकुना बोलाव म्हणत आहेत तर तुम्ही येता का? अंजलीचे तीन जिने चढून जायचे माझ्या जीवावर आले होते.पण आमचे बोलणे ऐकून आर्य म्हणाला आज्जी पाव भाजी आहे नको का म्हणतेस जाऊया ना.अंजलीने ते ऐकले आणि ती म्हणाली पहा तुमचा नातूही म्हणतोय,केशाव्रव्ही आग्रह  करत आहेत,तुम्ही याच.आर्यसाठी  पार्किन्सन मित्रमंडळाच्या माझ्या मित्र मैत्रिणी घरच्याच होत्या.शेवटी आम्ही पावभाजी खायला गेलो.

                    अंजलीकडे  तिच्या नातवासाठी ठेवलेले खेळ होते.केशवरावांच्या बरोबर कॅरम खेळून झाले.अंजलीची उर्जा आणि आर्यची उर्जा घर दणाणून गेले होते.केशवराव खुश होते.इतक्यात आर्यचे लक्ष व्हीलचेअरकडे गेले.अंजलीने शंभरीच्या सासू बाईंसाठी कमोड असलेली व्हीलचेअर घेतली होती. त्यांच्यासाठी ती सोयीची होती.त्या ती वापरायला अजिबात तयार नव्हत्या.नवी कोरी व्हीलचेअर तशीच पडून होती.गरज असून व्हीलचेअर वापरण्यास तयार नसलेल्या अनेक शुभार्थीबद्दल आमची चर्चा चालू झाली.

                     उतारवयाच्या अनेकांना व्हीलचेअर पाहिली की निगेटिव्ह फिलिंग येते.कितीही सोयीचे असले तरी ती वापरताना आजार,अवलंबित्व याच भावना प्रकर्षाने येतात.लहान मुले मात्र निरागस असतात.त्यांच्या साठी ते खेळणेच.मी बसू का यावर असे  अंजलीला विचारत आर्य त्यावर बसलाही.घरभर त्यावरून फिरु लागला.

                     अंजलीला त्यांनी वापरत नसाल तर OLX वर विकून का टाकत नाही असा सल्लाही दिला.त्याचा सल्ला ऐकून आम्ही खूप हसलो.आमची व्हीलचेअर बाबतीतील चाललेली गंभीर चर्चा त्याच्या गावीही नव्हती. 

 

Monday, 4 September 2023

मर्म बंधातली ठेव ही - ६

                                                        मर्म बंधातली ठेव ही -  ६

                     आमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला कार पार्कमध्ये दोन खांबाना कपडे वाळत घालण्यासाठी दोऱ्या बांधलेल्या आहेत.मी कपडे वाळत घालत होते आणि आर्य खुर्चीवर चढून पाय वर करून काहीतरी कारभार करत होता.मी त्याला पडशील उतर खाली म्हणत होते.तो म्हणाला, 'सरप्राईज आहे आज्जी' त्यांनी खुर्चीवरून उडी मारली आणि मोबाईल मध्ये घेतलेला फोटो दाखवला.

 त्यांनी काढलेला फोटो पाहून मी थक्क झाले.दोन दोर्यांच्या मधल्या फटीत बरेच महिने एक पक्षांनी बांधलेले छोटे घरटे होते.त्या द्रोणाच्या आकाराच्या घरट्यात दोन छोटी अंडी होती.इतके दिवस घरटी होती पण त्याची काहीच अडचण नसल्याने मी ते काढून टाकले नव्हते.त्यात अंडी असतील का असे कुतूहलही मला वाटले नव्हते.

काही दिवसांनी तो सांगत आला अंड्यातून पिलू बाहेर आले.त्याचा त्यंनी फोटो काढून आणला होता.पिलांची आई कधी येते पिलांना चारा घालते हे पाहण्यात तो रंगून जाई.नंतर पिले उडून कधी गेली समजलेच नाही.घरटे रिकामे होते.

यूएन मिशनवर ऑफ्रिकेत असलेल्या त्याच्या बाबांची पुण्यात बदली झाली.आणि गोळीबार मैदानातील Family accommodation वाले घर बदलून आर्य आता खडकीला राहायला गेला.घर सोडून जायच्या दिवशी काही सामान टाकायला श्रद्धा आली होती.खूप घाईत होती.आर्य पळत पळत मागच्या बाजूला गेला.आई अरे लवकर चल अशा हाका मारत होती.मी त्याच्या मागोमाग गेले तर खुर्चीवर चढून त्यांनी घरटे काढले होते. त्याच्या हातात ते रिकामे घरटे होते.

हल्ली बाईच कपडे वळत घालण्याचे काम करते.माझे मागे जाणे होत नाही.काल काही कामासाठी गेले तर मला तसेच घरटे त्या ठिकाणी दिसले.आर्यची प्रकर्षाने आठवण झाली.

 

No photo description available.No photo description available.

Thursday, 10 August 2023

जीवेत शरद: शतम पराग

                                                    जीवेत शरद: शतम पराग

                   पराग,पन्नासाव्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! पुढील आयुष्य आरोग्यपूर्ण,सुख समृद्धीचे जावो.

                बघता बघता पराग पन्नास वर्षाचा झाला.मला कॉलेजमध्ये असलेला पाठीवर सॅक घेतलेला पोरगेलासा पराग अजून आठवतो.लिहायला बसल्यावर अनेक आठवणी जाग्या झाल्या.जावई मुलासारखा असे अनेक जण म्हणतात. ज्यांना फक्त मुली आहेत अशावेळी तर हे नाते जोडले जातेच.पण मला मात्र असे ओढूनताणूनणून नाते जोडावे वाटत नाही.ज्याला नाव देता येत नाही असे पण छान आणि अत्यंत जवळचे नाते आमच्यात आहे.तो मला काकूच म्हणतो.तो जसे काही वेळा माझे कौतुक करतो.तसेच स्पष्टपणे चुकाही दाखवतो.एकदा तो मला म्हणाला काकू तुमचे सीरिअल बघणे फारच वाढलेले दिसतेय.त्यानंतर मी टीव्ही पाहणे थोडे कमी केले.त्याला ते माझे अध:पतन वाटत असावे. 

               लग्नाच्या आधीपासून सामाजिक शास्त्रे हा विषय आमच्यातील दुवा ठरला.त्यामुळे वैचारिक चर्चा होत.तो प्राध्यापक झाल्यावर आणखी जिव्हाळ्याचे विषय वाढले.लिखाण,संगीत हाही एक समान धागा.आई जसे आमचे काही वर्तमानपत्रात आले की जपून ठेवायची तसे मी त्याच्या लेखनाची कात्रणे जपून ठेवली आहेत.त्याचे भारतातील आणि अमेरिकेतील रीसर्च मॅग्झीन मध्ये लेखन छापून आले याचा मला अभिमान आहे पण त्याहीपेक्षा तरुण भारत पासून हिंदू सारख्या उच्च दर्जाच्या वर्तमानपत्रात त्याचे सर्वसामन्यांना आर्थिक साक्षर करणारे लेखन येते.तेंव्हा मला जास्त आनंद होतो.

           तो विकल्पवेध नावाच्या मासिकात काम करत होता तेंव्हा त्याने माझ्याकडून लेखन करवून घेतले. होते.याचवेळी तो प्राध्यापकीही करत होता.तो विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहे.आता तर डीनही झाला आहे.त्याच्याकडे विद्यार्थी पीएचडी करतात.शिकवताना तो नवनवीन प्रयोग करतो.अमेरिकेतील विद्यापीठातील त्याचे ऑफिस पाहून आम्ही खुश झालो होतो.पिटूने तेथे काही कुंड्या नेवून ठेऊन ती आकर्षक केली होती.

          शिवाजीमराठा मधली खेड्यापाड्यातील पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी असोत की अमेरिकेतील आणि आता दिल्लीतील मोठ्या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी असोत या सर्वाना तो आपलाच वाटतो. इतरांशी संवाद साधण्याचे त्याचे कौशल्य इतरत्रही तो वापरतो.त्यामुळे सर्वांवर त्याची प्रथमदर्शनी छाप पडते. ह्यांचे मित्र हेरेकर यांच्याकडे न्यू जर्सीला पराग घेऊन गेला होता.तेथेही त्यानाही परागने इम्प्रेस केले.

            पुण्यात आम्ही त्याच्याबरोबर गोव्याला गेलो होतो.वाटेत सरूकडे थांबा असतो.सरू नव्हती म्हणून मीनाकडे झाला.आम्ही मीनाकडे इतक्यांदा गेलो तरी वर जाऊन सर्व घर कधी पाहिले नाही. परागने मात्र ते केले.तो खुश झाला होता.त्याला विविध गोष्टींचे कुतूहल असते.कोठे जाईल तेथे तो लगेच मिक्स होतो. त्यामुळे ही तो सर्वाना आवडतो.

          अमेरिकेला आम्ही दोन महिने राहिलो तेंव्हा त्याचा जास्त सहवास मिळाला.विमानतळावर दोघे न्यायला आले होते.दोघांचे आनंदाने भरलेले चेहरे मला अजूनही आठवतात.त्या क्षणा पासून परत येइपर्यंतची आमची ट्रीप अत्यंत अविस्मरणीय झाली.पिट्टूनी  आम्हाला झेपेल,आवडेल अशी ठिकाणे निवडून नियोजन केले होते.तिचे थिसीसचे काही काम व्हायचे होते.परागला मात्र सुटी होती.त्यामुळे बर्याच वेळा पराग आमच्याबरोबर असायचा.त्यांनी छान खातिरदारी केली.

                आम्ही चौघांनी मिळून विविध विद्यापीठे, शाळा पाहिल्या.नायगारा ट्रीपही चौघांनी केली.त्यावेळचे क्षण नि क्षण आठवतात.परागच्या ड्रायव्हिंगमुळे आणि ड्रायव्हिंग करताना परागला Entertain  करण्यासाठी विविध भेंड्या आणि Gossips मुळे मजा यायची. 

          न्युबेडफर्डला त्यांचा Flat होता तेथे खाली एक थियेटर होते.कोणताही सिनेमा पहायचा तर आपल्याकडील सीडी नेऊन तो पाहता यायचा.तेथे आम्ही तिघांनी काही सिनेमी पाहिले.पराग तयार पाकिटे मिळतात त्याचे पॉपकॉरन करायचा आणि ते खात आम्ही पिक्चर पाहायचो.त्या थियेटरचा फायदा घेणारे फक्त आम्हीच असू.

        आम्ही बाख फ्लॉवर रेमेडीची बाखच्या पुस्तकातील Repertory मराठीत भाषांतरित  करण्याचे काम घेऊन गेलो होतो.ही १५० पानांची होती.मी शब्द सांगायची आणि हे सुवाच्य अक्षरात लिहायचे. एखाद्या शब्दाचा अर्थ आला नाही तर पराग डिक्शनरी पाहून नेमका शब्द सांगायचा.ही प्रोसेसही आम्ही खूप एन्जॉय केली.

            त्याला खाण्याची आवड असल्याने आपण अमेरिकेत त्याला काही करून घालू असे मला वाटायचे.किचन मध्ये दुसर्याची लुडबुड त्याला आवडायची नाही मला प्रत्यक्ष सांगू शकायचा नाही.पिटूकडे भुणभुण करायचा. शेवटी तिने दोघांना समोर बसवून सांगितले.मग तो मेन शेफ आणि मी त्याची असिस्टंट असे ठरले.सकाळीच विचारायचे काय आज्ञा? आणि तो सांगेल तेवढे मी करायची. भाज्या चिरणे,पोळ्या करणे अशी कामे मी करायची.तेथे खतखते,गड्डा दबदबित असे अस्सल बेळगावी पदार्थ आम्ही केले.त्याला सगळे सारस्वती पदार्थ आवडतात.आजही त्याचा फोन आला की समजावे कोठलीतरी रेसिपी पाहिजे.

            भारतात आल्यावर आता पुण्यात येणे आणि राहणे कमी झाले. तो खूप बिझी झाला आहे.पण पिटूशी बोलताना गप्पा ऐकणे त्याला आवडते.

          खर तर कितीतरी आठवणी आहेत.मलाच त्या नेमाक्या शब्दात मांडता येत नाही आहेत.पराग, काही गोष्टी सांगायच्या आहेत.गाण्याचा रियाज सोडू नकोस आणि सोशल मिडीयावर सत्य असली तरी स्फोटक विधाने करू नकोस.व्यायामाचा आळस करू नकोस.

 आनंदी रहा.यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत कर.जीवेत शरद: शतम.

 

           

              

Saturday, 15 July 2023

मर्म बंधातली ठेव ही - ५

                                                      मर्म बंधातली ठेव ही - ५

                       आज मैत्रिणींच्या ग्रुपवर कोरांटीच्या फुलाचा फोटो आला आणि मला आर्यनी काढलेल्या एका फोटोची आठवण झाली.तो सात आठ वर्षाचा असेल.

आम्ही रस्त्यांनी चाललो होतो.रस्त्यात पडलेले एल फुल दाखवत आर्य म्हणाला 'आज्जी थांब थांब. किती सुंदर फुल आहे बघ'.माझ्या हातातील मोबाईल घेऊन त्यांनी फोटो काढला. फुल कोरांटीचे होते.आज ग्रुपवर आलेल्या रंगाचेच होते.आमच्या जवळ राहणाऱ्या ओबेरॉय यांच्याकडे कोरांटीची झाडे होती ती मी त्याला दाखवली.फुलांनी भरलेली झाडे पाहून तो हरकून गेला.लहनपाणापासून विविध रंगातील कोरांटी पाहिली होती.मला यात कधी सौंदर्य का दिसले नाही? आता आर्यनी म्हटल्यावर मला खरच सुंदर आहे की असे वाटले.

आमच्याकडे बेळगावला या फुलांना घोरटी म्हणतात.नवरात्रात पहिले दिवशी एक दुसरे दिवशी दोन अशा वाढत्या माळा घटावर सोडतात.त्या घोरटीच्या असायच्या.कारण याची पाने गळत नाहीत.फुले हलकीही असतात.त्याच्या कळ्यांच्या  केळीच्या दोर्यात वेण्या केल्या जायच्या.दुसरे दिवशी फुले फुलायची

 सुंदर फुल म्हणजे कधी कोरांटी असे मात्र डोळ्यासमोर आले नाही.गुलाब आणि सुंदर सुवासाची मोगरा,जाई,जुई,चाफा,निशिगंध यांचीच आठवण येते.भा.रा.तांबेनीही "मधु मागसी माझ्या" कवितेत "देवपुजेस्तव ही कोरांटी बाळगी अंगणी कशी तरी" असे म्हटले त्यामुळे कोरांटीचे मनात जरा खालचेच स्थान असावे.आर्यची पाटी मात्र कोरी होती.उघड्या डोळ्यांनी तो आजूबाजूला पाहत होता.आमच्या बागेतील,समोरच्या सार्वजनिक बागेतील बारीक सारीक सौंदर्यस्थळे तो निरागसपणे दाखवायचा.नकळत मला संदेश जात होता उघड डोळे आणि आजूबाजूला बघ निट.त्याच्या सहवासात जगण्यात आलेला कोरडेपणा जात होता. 

 



Friday, 23 June 2023

मर्म बंधातली ठेव ही - ४

                                              मर्म बंधातली  ठेव ही - ४

                   पावसाची वाट पहात जून सरत आला. सर्व हवालदिल. आणि आज अचानक तो आला.आपल्याला उकाडा कमी होण्याचे पडलेले असते.आपण आपल्या संकुचित विश्वात.मला या परीस्थितात माझा नातू आर्यच्या लहानपणीच्या एका प्रसंगाची आठवण येते.

                   तो सहा, सात वर्षाचा असेल. शाळा सुटली की आई ऑफिसमधून येईपर्यंत आमच्या कडे असायचा.आमची पार्किन्सन मित्रमंडळाची सभा असली की आमच्याबरोबर यायचा.रिक्षात दांडीला धरून उभा असायचा.

                  असाच बरेच दिवस पाऊस नव्हता.आम्ही अश्विनी लॉजमध्ये असलेल्या सभेला चाललो होतो.लक्ष्मी नारायण थियेटर पर्यंत आलो आणि अचानक जोराचा पाऊस सुरु झाला.आता सभेला लोक कसे येणार हा पहिला विचार माझ्या मनात आला.आणि त्याच क्षणी आर्य म्हणाला आज्जी शेतकर्यांना किती आनंद होईल ना? त्याचा चेहरा आनंदाने चमकला होता.तो आजही माझ्या डोळ्या समोर आहे.मला चपराक मारल्यासारखे झाले. मी त्याला म्हटले, तुला असे का वाटले? तो म्हणाला मम्मा बातम्या पहात होती तेंव्हा मी पहिले होते. शेतकरी दु:खी होते.

                तो असे शुद्ध मराठी बोलला की मला त्याचे कौतुक वाटायचे. त्यांनी शेतकरी शब्द वापरलेला पाहूनही मला आश्चर्य वाटले. तो आर्मी पब्लिक स्कूल मध्ये जायचा.आजूबाजूला मराठी बोलणारे नाहीत.हल्ली इंग्लिश मिडीयमला जाणार्या मुलाना रोजचे व्यवहारातील शब्दही माहित नसतात.इंग्रजी शब्दांचा वारेमाप वापर करतात.

              त्याचे हिंदी भाषिक दादा, दादी आले की तो त्यांच्याशी शुद्ध हिंदीत बोलतो.आणि आमच्याशी मराठीत.याचे मला कौतुक वाटते.

            त्याची आई आल्यावर तिला ही रिक्षातील घटना सांगताना माझा चेहरा खुलला होता.तिचे म्हणणे असते मी अतिशयोक्ती करते.पण माझ्याकडे पुरावा होता.माझी मैत्रीण निरुपमा त्यावेळी माझ्याबरोबर रिक्षात होती.तिनेही त्याचा चमकलेला चेहरा पाहिला होता.

           आर्य कितीही मोठ्ठा झालास तरी तुझ्यातले हे माणूसपण,Empathy हरवू देऊ नकोस.            

Monday, 19 June 2023

आनंदी वृद्धत्व - ११

                                               आनंदी वृद्धत्व -  ११

             काही व्यक्ती कितीही अडचणीचे प्रसंग येवोत, समस्या येवोत.हतबल न होता.रडगाणे न गाता आपली आनंदी वृत्ती कायम ठेऊ शकतात.आमच्या शुभंकर ( Care taker ) जोत्स्ना सुभेदार त्यातील  त्यातील एक.आत्तापर्यंत मी हजारो शुभंकर,शुभार्थींशीबोलले असेन.प्रत्येकाची काही तरी समस्या असते.मन मोकळे करायचे असते.त्याला माझाही अपवाद नाही.मीही इतर शुभंकरांकडे मन मोकळे करते.जोत्स्नाताई हे वेगळेच रसायन आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर त्यांचे पती शुभार्थी ( पेशंट ) रामचंद्र सुभेदार यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. त्यावर जोत्स्ना ताईंची व्हाइस मेसेज द्वारे प्रतिक्रिया आली.आज ८९ वर्षे पूर्ण झाली.वयोमानामुळे समस्या थोड्या वाढल्या आहेत,आवाज गेलेला आहे.गिळता येत नाही म्हणून सहा महिन्यापासून ट्यूब द्वारे फीडिंग करावे लागते.बाकी इतर काही कॉम्प्लिकेशन नाही त्यामुळे तब्येत बरी आहे.सकाळी व्हिल्चेअरवरुन खाली फिरायला नेतो.झोपूनही ते हातपाय हलवत व्यायाम करतात.केअरटेकर चांगला मिळाला आहे.मुलगाही खूप  चांगल पाहतो सगळे छान चाललय.आनंदी कावळ्याच्या गोष्टीसारखे जोत्स्नाताई कायम आनंदीच असतात.कितीही कठीण परिस्थिती आली तरी कुरकुर न करता त्या परिस्थितीतल्या जमेच्या बाजू हे पतीपत्नी पाहतात असे वेळोवेळी मी पाहिले आहे. 

               ज्योस्नाताईनी पाठवलेल्या वाढदिवसाच्या फोटोत सुभेदार यांनी सिल्कचा झब्बा आणि धोतर घातले होते.नाकाला लावलेल्या ट्यूबसकटचा त्यांचा फोटो पाहून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक वाटले.आमच्या शुभंकर आशा रेवणकरनी 'सकारात्मकतेचे शिखर' असे फोटो पाहून प्रतिक्रिया दिली. ते अगदी खरे आहे.आम्हाला तुम्ही हवे आहात हे कुटुंबियांच्या.कृतीतून दिसले की शुभार्थीलाही जगण्यासाठी उर्जा मिळते.

             पार्किन्सन मित्रमंडळ आणि दिनानाथ हॉस्पिटलमध्ये चालणारा PDMDS चा स्वमदत गट या दोन्ही स्वमदत गटांचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घेतला.

वर्गात पहिल्या बाकावर बसून शिक्षकाच्या प्रत्येक प्रश्नाला हात वर करणाऱ्या सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या मला वाटतात.           

            प्रत्यक्ष सभा,ऑनलाईन सभांना जास्तीत जास्त उपस्थिती कोणाची? - जोत्स्ना सुभेदार

युट्यूब वरील सर्व व्हिडिओ कोणी पहिले आहेत.- जोत्स्नाताई सुभेदार

पार्किन्सनवर लिहिलेले आमचे सर्व लेखन कोणी वाचले आहे ?-जोत्स्नाताई सुभेदार

शुभार्थीचे करताना स्वत:ला आणि कुटुंबियाना स्पेस देणे कोणाला जमले आहे?.ज्योत्स्नाताईना

पार्किन्सनसह आनंदाने जगूया हे ब्रीदवाक्य आचरणात आणणे कोणाला जमले आहे? अर्थात जोत्स्नाताई सुभेदार यांना.

पत्नी, आई,शुभंकर,आज्जी,विद्यार्थिनी,मैत्रीण,पेशंट अशा सर्व भूमिका त्या चोख बजावतात.यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

रामचंद्र सुभेदार हवामान खात्यात India Meteorological Department मधून असिस्टंट Meteorologist म्हणून निवृत्त झाले.शेतीची आवड,निवृत्तीनंतर घरची शेती करायला मध्यप्रदेशात आले.काही समस्या निर्माण झाल्याने आवडीचे काम सोडून पुण्यात आले. पुण्यात ११ वर्षे  मुलीकडे  होते.मुलगा ,सून आर्मीमध्ये.सारख्या बदल्या होत.मुलगा निवृत्त झाल्यावर दिल्लीला घेऊन गेला.अशी विविध ठिकाणी स्थलांतरे झाली तरी या दोघांना सर्वांशीच जमवून घेता आले.आणि तेही सर्वांना हवेशे वाटले.

 पुण्यात आल्यावर  ते  व त्यांचे पती गीता संथा वर्गात दाखल झाले संस्कृतची किंवा गीता पठणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती.२०१८ मध्ये जोत्स्नाताई गीता धर्म मंडळाच्या 'संपूर्ण  गीता कंठस्थ परीक्षे'त ९३.९ % गुण मिळवून तिसऱ्या आल्या.त्यावेळी वय होते ७८. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचा अडसर येत नाही हे त्यांनी दाखवून दिले.शृंगेरीला जाऊन दिलेल्या गीता पठ्णाम्ध्ये त्यांना २१००० रु.बक्षीस मिळाले.अधिक महिन्यात त्यांनी गीतेचे ३३ पाठ केले.  

अश्विनीमधल्या आणि नर्मदा हॉलमधल्या सर्व सभांना त्या पतीना घेऊन हजर असत.काही दिवसानी त्यांच्याबरोबर केअरटेकर असे.सहलीलाही सक्रीय सहभाग असे.झूम मिटिंग सुरु झाल्या त्यातही त्यांचा पहिल्या पासून सहभाग होता.

मध्यंतरी त्या सुभेदाराना सावरत असताना स्वत:च पडल्या.खुब्याचे हाड मोडले.शस्त्रक्रिया करावी लागली.माझे ऑपरेशन आहे सभा अटेंड करु शकणार नाही म्हणाल्या होत्या.परंतु सभेत नेहमीप्रमाणे उपस्थिती पाहून मला आश्चर्य वाटले.ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी सभेला हजेरी लावली होती.त्या काळात दोघा पतीपत्नीना वेगवेगळे केअर टेकर होते.मुलगी आणि जावई यांनी घेतलेली काळजी,सकारात्मक विचार यामुळे त्या लवकर बऱ्या झाल्या.बऱ्या झाल्यावर त्यांचा मेसेज आला. माझ्याकडे काम करणारी केअरटेकर चांगली आहे कोणाला हवी असेल तर फोन देत आहे.मेसेज ग्रुपवरही टाकला.तिला काम मिळावे आणि कोणाला तरी चांगली केअर टेकर अशी त्यांची मनापासून इच्छा होती.                       

लेखन,व्हिडिओ,सहल, कोणताही कार्यक्रम यावर लगेच त्यांची त्या त्या व्यक्तीला व्यक्तिश: प्रतिक्रिया असते.मी त्यांच्या कोणत्याच प्रतिक्रिया,फोटो,व्हाइस मेसेज गाळले नाहीत.ते पाहून मलाच उर्जा मिळते.पुणे सोडून दिल्लीला निघाल्या तेंव्हा भावूक झाल्या होत्या.ऑनलाईन मिटिंग,मेसेज, फोन द्वारे भेटत राहिल्या.त्यावेळची सुभेदार यांची परिस्थिती पाहता त्याना प्रवास कसा झेपणार असे वाटत होते.पण दोघे सुखरूप दिल्लीला पोचले.

 आमचे एक शुभंकर रमेश तिळवे औरंगाबादहून पुण्यात येणार होते अचानक गेटटुगेदर ठरले.आपण पुण्यात नाही याची त्याना हळहळ वाटत होती.त्यांचा व्हिडीओ कॉल आला  रमेश भाऊनी सर्वकडे फिरवून कोणकोण आले आहे, कशी सभा चालले हे दाखवले. माझ्याशी बोलल्या.दुधाची तहान ताकावर भागवली.१७ ऑक्टोबरला कोजागिरीचा ऑफलाईन कार्यक्रम चुकल्याचेही त्याना वाईट वाटत होते. त्यांचा मुलगा म्हणाला पुण्याची इतकी आठवण येते तर मी बाबांना पाहतो तू थोडे दिवस जाऊन राहून ये.

नवनवीन पदार्थ करण्याची त्यांना आवड आहे असे पदार्थ केले की त्या फोटो पाठवतात.एकहा रसमलाई बनवली त्याचा फोटो आला कृतीही सांगितली.मुला नातवंडाना नवीनवीन पदार्थ करून घालताना त्याना आनंद मिळत होता.दिवाळीत स्वत: केलेल्या फराळाचा फोटो त्यांनी पाठवला होता.खूप वर्षांनी मुलांसाठी फराळ करता आला यासाठी त्या खुश होत्या.

या वयात कसे काय जमते तुम्हाला असे विचारल्यावर 'होते तोपर्यंत करत राहायचे आणि करत राहिले की होत राहते असेही त्यांनी लिहिले होते.आता त्यांचे वय वर्षे ८३. मी स्वत: अजिबात फराळ करायचा नाही सर्व विकत घ्यायचे ठरवले होते पण त्यांचा हा विचार वाचल्यावर मलाही उत्साह आला.आणि थोडा फराळ केला.

एकदा फोन केला तर त्या मुलाबरोबर पत्ते खेळत होत्या.मुलगा आणि सून जवळच राहतात. सून डॉक्टर आहे.मुलगा सकाळी फेरी मारून जातो.नंतर जेवायला येतो आईशी पत्ते खेळतो.२४ तास केअरटेकर आहे.तो छान सांभाळतो असे जोत्स्नाताई सांगतात.इतरेजनांच्या केअरटेकरबद्दल अनेक तक्रारी असताना यानाच चांगला केअरटेकर कसा मिळतो असा प्रश्न पडू शकतो.पण येथे मुद्दा असतो दृष्टीकोनाचा आणि केअरटेकरशी तुम्ही कसे वागता त्याचा.जोत्स्नताईंच्या सहवासात माणूस बदलून जात असावा.

 त्यांचा उत्साह, सकारात्मकता वेळोवेळी माझ्यापर्यंत पोचली ती तुमच्यापर्यंत पोचवावी यासाठी हा लेखन प्रपंच.

 




 

Monday, 22 May 2023

मर्म बंधातली ठेव ही ३

                                               मर्म बंधातली ठेव ही  ३

                                              माझ्या मागे मागे मांजरी सारखा फिरणारा आर्य बघता बघता किती मोठा झाला. आज त्याचा दहावीचा उत्तम रिझल्ट ऐकल्यावर 'किती सांगू मी सांगू तुम्हाला' असं होऊन गेलं. निकाल पाठवला आणि तासाभराच्या आत स्विगीकडून श्रद्धा ने आनलाईन पाठवलेले चितळे बंधूंचे पेढेही आले. आज सगळी सकाळ ओळखीच्या आणि अनोळखी लोकांनाही पेढे वाटण्यात गेली. व्हाटस्अप वर मेसेज टाकणे,प्रतिक्रिया वाचणे चालूच आहे.

आर्यच्या कितीतरी आठवणी दाटून आल्या. आजी तुझ्या कुठे लागतो बघू असं सारखा म्हणायचा.आता खांद्यापर्यंत, आता डोक्यापर्यंत असं म्हणता म्हणता माझ्यापेक्षाही उंच झाला. माझ्या मांडीवर येऊन बसायचा नंतर थोडा मोठा झाला तरी तो आला की मांडीवर बसून फोटो काढणे हे व्हायचेच. टीनेजर झाल्यावर आजीच्या मागे फिरणं, आजी-आजी करणं कमी झालं पण मांडीवर बसून फोटो काढणं मात्र चालूच राहिलं आणि त्यासाठी तो कधी नाही म्हणाला नाही. तेवढाच बालपणाचा धागा.हा त्याचा मांडीवर बसलेला लेटेस्ट फोटो.
पुढील आयुष्यासाठी खुपखुप आशिर्वाद आणि शुभेच्छा!