आंनदी वृद्धत्व - १०
हास्यक्लबमध्ये नसरीनचा वाढदिवस साजरा झाला.प्रत्येक जण तिच्याबद्दल भरभरून बोलत होते. तिचे डॉक्टर भाऊ,मुलगा,सूनही बोलले.नेहमी बडबडणाऱ्या नसरीनने मात्र श्रोत्याची भूमिका घेतली होती.चेहऱ्यावर कृतार्थतेचे हसू,पिवळ्या झगमगत्या ड्रेसमधली,रुपेरी केसात पिवळा गुलाब माळलेली नसरीन, 'ही परी अस्मानीची' अशी वाटत होती.अंतर्बाह्य सुंदर,बुद्धिमान,क्रिएटीव,प्रेमळ,खोडकर नसरीन सर्वांनाच आपल्या अगदी जवळची वाटते.
नसरीनची प्रथम भेट कधी झाली आठवतही नाही.अनेक वर्षे आम्ही एकमेकाना ओळखतो असे वाटते.भिमाले गार्डनमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या.त्यात नसरीनही होती.भेट झाली तेंव्हा तिने सत्तरी पार केली होती हे नक्की. ८१ वर्षाच्या डॉक्टर नसरीन शेख म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा.मन प्रसन्न करणारे थुईथुई कारंजे.तिचे कर्तुत्व,व्यक्तित्व एका लेखात माववणे महा कठीण काम आहे.तिला आत्मचरित्र लिही असे मी म्हणत असते पण ती ते करणार नाही.तिच्यातल्या डॉक्टरला,शिक्षिकेला शैक्षणिक क्षेत्रात काम करायला,त्याबद्दलच लिहायला आवडते.पोस्ट ग्रज्युएट,पीएचडी विद्यार्थ्यांना गाईड करताना,त्यांचे थेसिस तपासताना ती खुश असते.
शालेय जीवनापासून अत्यंत हुशार नसरीनने अनेक मेडल मिळवली.तिने बी.जे.मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि Preventive medicine मध्ये एम.डी.केले.आणि व्यवसायात पडण्याऐवजी प्राध्यापिका बनून डॉक्टर घडवणे पसंत केले.आज मान्यताप्राप्त असलेले कितीतरी डॉक्टर तिचे विद्यार्थी आहेत.अनेक National आणि Inter National सेमिनारमध्ये तिने रिसर्च पेपर प्रेझेंट केले आहेत,पब्लिशही केलेले आहेत.
कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करणारी नसरीन निवृत्त झाली असली तरी अजूनही ती P.A.Inamdar University च्या डेंटल कॉलेज,फिजिओथेरपि कॉलेजच्या पोस्ट ग्रज्युएट विद्यार्थ्यांना शिकवते.केईएम मध्ये मानद प्राध्यापक म्हणून शिकवायला जात असते.रिसर्च प्रोजेक्टमध्ये सहभाग घेत असते.करोना काळातही नातीच्या मदतीने तिचे ऑनलाईन शिकवणे सुरु होते.अनेक सेमिनारना तिला अध्यक्ष म्हणून बोलावतात.एकदा मलाही तिने नेले होते.संस्थेचे अधिकारी,प्राध्यापक,विध्यार्थी यांच्या मनातला तिच्याबद्दलचा आदर पाहून या माझ्या मैत्रिणीचा मला अभिमान वाटला.
तिला शैक्षणिक वारसा घरातूनच मिळाला आहे.तिच्या आईचे वडील अलिगढ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते.वडील अग्रीकल्चर कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. १९४७ साली त्यांनी अमेरिकेतून एम.एस.केले.माहेर, सासर दोन्हीकडे बरेच उच्च शिक्षित आहेत.
शैक्षणिक वर्तुळातले तिचे कितीही वरचे स्थान असले तरी आमच्या भिमाले गार्डन ग्रुपमध्ये ती गळ्यात गळे घालणारी,आमची सखी असते.सगळे तिला नसरीनदीदी म्हणतात मला मात्र तिला काही दीदी म्हणावेसे नाही वाटत.तरुण,वृद्ध,पुरुष.स्त्रिया,उच्च शिक्षित,निरक्षर सगळेच तिच्या जवळच्या वर्तुळातले असतात.सर्वांची चेष्टामस्करी करणे,हास्यक्लबमध्ये वाढदिवस साजरे केले जातात त्यावेळी त्या व्यक्तीवर उत्स्फूर्तपणे शेरोशायरी करणे हे चाललेले असते.
हास्य क्लब संपला की तिची मोफत ओपीडी सुरु असते.आपले रिपोर्ट घेऊन कोणीना कोणी तिच्याकडे येते.अनेक प्रतिथयश डॉक्टर तिचे कलीग तरी असतात किंवा विध्यार्थी तरी.डॉ मोहन आगाशे.रंगकर्मी,प्रसिध्द लेखक सतीश आळेकर.यांच्या आठवणी तर ती नेहमी सांगत असते.ती योग्य त्या डॉक्टरकडे जायचा सल्ला देते.
तिचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रापुरता मर्यादित नसतो.तिला स्वत:ला नवनवीन कपडे घालायला.त्याला शोभतील अशा बांगड्या,गळ्यात घालायला आवडते.त्यासाठी खरेदी,बार्गेनिंग करायला आवडते.कोठे काय चांगले मिळेल यासाठीही ती सल्ले देते.स्वत:च कपडेही शिवते.नातींचे जुने ड्रेस त्याला मध्ये काहीतरी जोड लावून लेस लावून कुठे साड्यांचे काठ लावून नव्यासारखे बनवते.हे जुन्यापासुन बनवले हे सांगूनही खरे वाटणार नाही.तिचा फॅशन डिझाईनिंगचा सेन्स अफलातून आहे.आता पेंटिंगचा नाद लागला आहे.ड्रेसवर काहीतरी पेंट करते.मला वाढदिवसाला खणाची पर्स करून त्यावर पेंटिंग करून दिले आहे.रिसर्च प्रोजेक्टएवढीच ती या कामात रमते.
न्युट्रीशस पदार्थ बनवून खिलवायलाही तिला आवडते. शाळेपासून मित्र मैत्रिणी पुणेरी असल्याने टिपिकल ब्राम्हणी पारंपारिक पदार्थ तिला आवडतात.मैत्रीणीही तिची आवड पुरवतात.माझ्या नवर्यावर तिचा विशेष जीव आहे.त्यांच्यासाठी ती काहीतरी करून पाठवते. ते आता बागेत हास्यकलबला जात नाहीत.आमचे घर बागेच्या समोरच असल्याने तीच मधून मधून भेटायला येते.तीचे पती नइम शेख साहेबांच्या आठवणी निघतात.तीर्थळी आणि शेख साहेब सांगलीच्या वालचंद कॉलेजचे.त्यामुळे मैत्री झाली.ते बजाज मध्ये चीफ इंजिनिअर होते.फिरोदिया साहेबांचे लाडके.कामावर आणि कामगारांवरही त्यांचे प्रेम असायचे.स्वत:च्या डब्याबरोबर कामगारांसाठीही पोळ्या न्यायचे.
त्यांनी बजाज सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला.बाजाजशी सल्ला देण्याचे काम चालूच राहिले.त्यांचा व्यवसाय पुढे मुलानी चालू ठेवला नसरीन प्रमाणे तेही कामातून पूर्ण निवृत्त झाले नाहीत.मुलाला सांगेन युक्तीच्या गोष्टी चार हे काम ते करतच असत.या दोघांचे सहजीवन अत्यंत सुंदर होते.एक रोमॅन्टिक कपल असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल.ते हॅंडसम,नसरीन ब्युटीफुल.सर्वार्थाने एकमेकाना अनुरूप. त्यांच्याशी गप्पा आनंददायी असत.विनोद सांगणे, शेरोशायरी करणे,नसरीनचीची फिरकी घेणे हे चाले.त्यांच्या सपोर्टमुळे ती शैक्षणिक क्षेत्रातील कामे करत राहिली.अर्थात तिला ही भरपूर तडजोडी कराव्या लागल्या.
मुले सुना असली तरी नसरीन स्वत: जातीने त्यांचे खाणे,पिणे पहायची.बागेतून शेख साहेब वाट पहात असतील म्हणून घाईघाईने जायची.शेवटपर्यंत त्यांची तिने खूप सेवा केली.त्यांच्या जाण्याने काही दिवस कोमेजली.आता हळूहळू मुळ पदावर येत आहे.मुलगा सून ,नाती यासाठी जातीने लक्ष घालत असतात.अमेरिकेतील मुलगा रोज व्हिडीओ कॉल करतो.
ती जुन्या हिंदी सिनेमातील नायीकेसारखी दिसते.ताठ चालते.थकलेली मरगळलेली,वृद्ध कधीच दिसत नाही.याचा अर्थ तिला व्याधी नाहीत असे नाही.ती खूप मोठ्या शस्त्रक्रियेतून गेली आहे.ओव्हरीज आणि गर्भाशय काढलेलाच होता.पोटात दुखायचे. निदान होत नव्हते.विविध ठिकाणच्या बायोप्सी केल्या निगेटिव्ह निघाल्या.मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या.अवयवांची मोडतोडं,जोड करावी लागली.डॉक्टरांनी आशा सोडली होती.तिच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे,आनंदी राहण्यामुळे,पथ्य सांभाळण्यामुळे यातून ती बाहेर आली.ती यातून बाहेर येणे डॉक्टर्सनाही आश्चर्याचे वाटले.तिला चेष्टेने ते तू भूत आहे म्हणतात.ती पण मी रात्री येऊन घाबरवणार असे तिच्या खास हसूसह म्हणते.
मी अर्धे अवयव देवाला आधीच देवून टाकलेत असे ती हसत हसत सांगते.तिच्या सर्व गोष्टी आनंदाने घेण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.तिच्यासारखी मैत्रीण मिळाली याचा अभिमान वाटतो.तिच्या फक्त आनंदी वृद्धत्वावर लिहायचे असल्याने लिहिताना हात आखडता घेतला.नसरीन, सखी अशीच आनंदी राहा आणि आनंद लुटत रहा.
तिच्या नातीचे मध्यंतरी लग्न झाले.तिचे सासरे अब्दुल जब्बार शेख यांनी नसरीनच्या वाढदिवसाला तिच्याबद्दल लिहिले आहे त्यातील काही भाग मला येथे दिल्याशिवाय राहवत नाही.
" Let's salute and wish doctor Nasreen Shaikh on her birthday today. When Muslim doctors were few and if they were gents she was the soul lady Muslim doctor
No comments:
Post a Comment