Monday, 22 May 2023

मर्म बंधातली ठेव ही ३

                                               मर्म बंधातली ठेव ही  ३

                                              माझ्या मागे मागे मांजरी सारखा फिरणारा आर्य बघता बघता किती मोठा झाला. आज त्याचा दहावीचा उत्तम रिझल्ट ऐकल्यावर 'किती सांगू मी सांगू तुम्हाला' असं होऊन गेलं. निकाल पाठवला आणि तासाभराच्या आत स्विगीकडून श्रद्धा ने आनलाईन पाठवलेले चितळे बंधूंचे पेढेही आले. आज सगळी सकाळ ओळखीच्या आणि अनोळखी लोकांनाही पेढे वाटण्यात गेली. व्हाटस्अप वर मेसेज टाकणे,प्रतिक्रिया वाचणे चालूच आहे.

आर्यच्या कितीतरी आठवणी दाटून आल्या. आजी तुझ्या कुठे लागतो बघू असं सारखा म्हणायचा.आता खांद्यापर्यंत, आता डोक्यापर्यंत असं म्हणता म्हणता माझ्यापेक्षाही उंच झाला. माझ्या मांडीवर येऊन बसायचा नंतर थोडा मोठा झाला तरी तो आला की मांडीवर बसून फोटो काढणे हे व्हायचेच. टीनेजर झाल्यावर आजीच्या मागे फिरणं, आजी-आजी करणं कमी झालं पण मांडीवर बसून फोटो काढणं मात्र चालूच राहिलं आणि त्यासाठी तो कधी नाही म्हणाला नाही. तेवढाच बालपणाचा धागा.हा त्याचा मांडीवर बसलेला लेटेस्ट फोटो.
पुढील आयुष्यासाठी खुपखुप आशिर्वाद आणि शुभेच्छा!


Saturday, 4 March 2023

प्राउड ऑफ यु क्षितीज

                                                        प्राउड ऑफ यु क्षितीज

                         माझ्यामागे आज्जी हे बिरूद लागले त्याला आज २५ वर्षे झाली.क्षितीज माझा पहिला नातू आज २५ वर्षाचा झाला.आता पीएचडी करत आहे.नुकताच आयर्लंडहून IEEEच्या कॉनफरन्ससाठी भारतात आला होता.इतक्या मोठ्या कॉनफरन्ससाठी त्याचा पेपर निवडला गेला याचे मला अप्रूप वाटत होते.तो मात्र कुल होता.त्याच्या आई, बाबापेक्षा उंच झालेल्या क्षितीजकडे मला मान वर करून पहावे लागत होते.बघता बघता किती मोठ्ठा झाला. माझ्या डोळ्यासमोर मात्र दुपट्यात गुंडाळलेला तान्हा, सोनालीने स्वत: तयार केलेल्या कापडी चिमण्या हलताना पाहून जोरजोरात पाय आपटून खेळणारा,तल्लीन होऊन ड्रम वाजवणारा,आज्जी गोष्ट सांग म्हणणारा,कल्हईवाल्याची कल्हइ करताना कमरेवर हात घेऊन कुतूहलाने पाहणारा,मला पास्ता करून खायला घालणारा,स्वत: रचून गणिताची कोडी घालणारा,जादूचे खेळ करून दाखवणारा अशी त्याची लहानपणापासूनची अनेक गोजिरी रूपे तरळत होती.

                         क्षितीज जो काही माझ्या वाट्याला आला तो खूप क्वालिटी टाईम होता. तो आमच्याकडे फारसा रमायचा नाही. एक तर त्याच्या बिल्डींग मध्ये त्याची खूप मित्रमंडळी होती. येथे कोणीच नव्हते.शिवाय त्याचे तीथले आज्जी आजोबा भक्कम होते.त्यांचा त्याला खूप लळा होता. तो म्हणायचा ते रिअल आज्जी, आजोबा आणि तुम्ही डूप्लीकेट.आज्जी त्याला खूप छान गोष्टी सांगे आणि अब्बू त्याला कोठेकोठे घेऊन जात.ते स्वत: सायंटीस्ट,शिकवायची आवड.त्याच्या विविध प्रश्नांचे निरसन होई. रेल्वे स्टेशन,फायर ब्रिगेड असे काहीकाही दाखवत विविधांगी ज्ञान देत.            

            अगदी लहानपणापासून विविध गाड्यांची आवड होती.डम्पर आणि एक्सेवेटर ही तर आवडीची. पुण्यात रस्त्याची कामे सारखी चाललेलीच असतात.आजोबा त्याला तेथे घेऊन जायचे आणि तो तासन तास पहात राहायचा.आमच्याकडे असे काम चालले होते तेंव्हा तो आवडीने राहिला आणि इतराना आवाजाचा त्रास होत असला तरी मला मात्र ते काम संपूच नये असे वाटत होते.

एकदा तो आमच्याकडे आला असता माझे विद्यार्थी आणि जे.जे स्कूल ऑफ आर्टचे प्रोफेसर डॉ.गजानन शेफाळ आले होते.क्षितीजची चित्रकला चालू होती.ते म्हणाले वयाच्या मानाने फारच सुंदर.तो मोठ्ठा चित्रकार होईल.त्याला सोनालीने चित्रकलेच्या क्लासला घातले.शिक्षक आवडले तरच तो शिकायला तयार असायचा.त्याची चित्रकला बंद पडली तरी हातातली जादू थोडीच जाणार गणपतीत आदले दिवशी गौरीचा मुखवटा लागतो त्याचे त्याने सुंदर चित्र बनवले.आणि आता दरवर्षी बनवतो.

मसुरकर नावाचे दुसरे एक विद्यार्थी मोटारजगत नावाचे मासिक काढतात. त्याचे गाड्यांविषयी ज्ञान पाहून त्याना कौतुक वाटले.ते आपले मासिक त्याला दर महिन्याला पाठऊ लागले.

 मुले मोठ्ठी होऊ लागली की आजी आजोबांच्या वाट्याला कमीच येतात.तो विविध उद्योगात रमलेला असायचा. सायकल चालवायला लागला. स्कूटरही चालवायला लागला.एनसीसीचा ड्रेस घालून ऐटीत एनसीसीत सामील होऊ लागला.फुटबॉल खेळू लागला,हॉकी टीममध्ये निवडला गेला.हे सर्वच करतात पण मला त्याचे कौतुक वाटणारे,अभिमान वाटणारे  काम म्हणजे त्याचे कार्पोरेशनच्या शाळेतील मुलाना इंग्रजी शिकवणे.आणि एका अत्यंत क्रिटीकल परिस्थितीत त्याचे कोणत्याही दबावाला बळी न पडता ठामपणे सत्याच्या बाजूने उभे राहणे. काही गोष्टी सांगता येत नाहीत.म्हणून येथे लिहू शकत नाही.लहान वयातील त्याची ही समज आणि कृती चकित करणारी होती.आणि त्याचा त्याला निर्णय घेऊ देणाऱ्या त्याच्या आई,बाबांचेही कौतुक होते.

              त्याच्या मुंजीच्या आधी इन्नाने ( तो आईला इन्ना म्हणतो.) आम्हालाही त्यांनी आमच्या झेन गाडीवरून अगदी छोटा असतानाच झेन आज्जी आणि झेन अब्बू असे नाव दिले आहे.झेन आता नाही पण अजूनही तेच नाव कायम आहे.तर काय सांगत होते,मुंजीच्या आधी इन्नाने संस्कार म्हणून अनेक क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घडवल्या.स्कुबा डायव्हिंग,अँनिमल सायकालॉजी,अर्कीऑलॉजी अशी काही उदाहरणे देता येतील.

आज्जीच्या गोष्टी,आब्बू आणि त्याच्या बाबाची प्रत्यक्ष कृती आणि आईचे जाणीवपूर्वक आणि त्याच्याही नकळत संस्कार करणे चालू होते.टीनेजर असताना सर्वच मुलांचे थोडे तंत्र बिघडते पण नकळत झालेल्या संस्कारांची मुळे अंतर्मनात रुजलेली असतातच.

               खर्या अर्थाने त्याच्याशी माझी मैत्री झाली ती जेंव्हा,जेंव्हा आम्ही त्याच्याकडे राहायला गेलो तेंव्हा.सोनालीने तिच्याकडे आम्ही रहायला जायचे हेच तिचे माहेरपण.अशी माहेरची नवीन व्याख्या केली आहे.क्षितीजनेही बहुदा आजोळची अशीच व्याख्या केली.कारण आमच्याकडे तो फारच थोडा राहिला.माझ्या एका शस्त्रक्रियेनंतर माझे काहीही न ऐकता हॉस्पिटलमधून सोनाली तिच्या घरी घेऊन गेली.लेकीचे माहेरपण आणि नातवाचे आजोळपण या दोन्हीची संधी मिळाली.आजार माझ्यासाठी इष्टापत्ती ठरली.

              तो शाळेतून आला की त्याच्याशी बे ब्लेड खेळण्यात वेळ छान जायचा. अर्थात कायम हरायची मीच.बे ब्लेड मी प्रथमच पाहत होते.माझ्यासारख्या कच्च्या खेळाडूबरोबर तो खेळायचा हेच विशेष.त्याला वाढदिवसाला मी मराठी पुस्तकेच भेट द्यायची मराठी वाचावे हा हेतू. त्यांनी मराठी वाचावे म्हणून आई आणि आज्जीने जंग जंग पछाडले पण त्यांनी काही दाद दिली नाही.जाडजूड इंग्लिश पुस्तकांचा मात्र फडशा पडू लागला.

मी त्याला बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणता राजा आणि विश्वास पाटलांचे महानायक दिले होते. रोज रात्री तो म्हणायचा आज्जी गोष्ट सांग.आता लहनपणी सांगायच्या त्या गोष्टी चालणार नव्हत्या.मी त्याला म्हटले ही पुस्तके मी तुला वाचून दाखवते.तो म्हणायचा नको.तू वाच आणि मसाला लावून सांग.मग असेच सुरु झाले.नावे, प्रसंग सर्व लक्षात ठेवून मला सांगावे लागे.मी अगदी झोपेत असताना त्याचे आज्जी गोष्ट सांग म्हणून येणे आजही माझ्या कानावर आहे.

मी त्याला मराठी वाचायला मागे लागायची .तो एकदा म्हणाला तू कुठे इंग्रजी वाचते? त्याचे आव्हान स्वीकारून मी त्याच्याकडे असलेले हॅरी पाॅटरचे सर्व खंड वाचले.यातून एक छान झाले त्याच्याशी चर्चेला छान विषय झाला.आमची मैत्री झाली. त्याच्या पिढीशी जोडले जाण्यासाठी त्यांच्या विश्वात जायला हवे असे लक्षात आले.मी त्यातील पात्रांचे गंमतशीर उच्चार करायची.Platform 9 and Three Quarters at kings Cross Station अशा काही गोष्टी डोळ्यासमोर यायच्या नाहीत.यासाठी आम्ही सर्वांनी मग एकत्रित हॅरी पाॅटर सिनेमा पाहिला.अनेक गोष्टी उलगडल्या.इतरही अनेक क्लासिक हिंदी,इंग्रजी सिनेमा एकत्रित पाहायला लागलो.तो आता ड्रम शिकत होता.ते वाजवून दाखवू लागला.हार्ड रॉक कॅफे मध्ये त्याचे कार्यक्रमही झाले.

 इन्नाने त्याला कॅमेरा दिला. तो आजूबाजूच्या निसर्गाचे छान फोटो टिपायचा. आज्जी आज्जी करत दाखवायला यायचा.त्याची सौंदर्य दृष्टी मला थक्क करायची.झेन अब्बुच्या चपला त्याच्या पायात येऊ लागल्या. त्यांचे घड्याळ आणि चपला घालून जायला त्याला आवडायला लागले.आम्हाला पास्ता करून खायला घालायला लागला.त्याच्याबरोबर मी खाली जाऊन सोसायटी क्लबहाउसच्या बाहेर बसायला लागले. तो खेळत असायचा ते पाहत बसायची.दुसऱ्या आजारात आम्ही राहायला गेलो तेंव्हा कॉलेजला जायला लागला होता.

घरापासून भारती विद्यापीठ खूप लांब. छोट्या गाड्यांशी खेळणारा क्षितीज आता सराईतपणे गाडी चालवू लागला. कॉलेजमध्ये गाडी घेऊन जाई.तेथेही मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळालेला रद्द करून हवा तोच कोर्स त्यांनी निवडला.या चार वर्षाच्या कोर्स मध्ये प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शन मिळाल्यास चवथ्या वर्षाला 'टेकनिकल युनिव्हर्सिटी ऑफ शेनॉन मिडलॅंड मिडवेस्ट' येथे प्रवेश मिळणार होता आणि त्या युनिव्हर्सिटीची बीईची डिग्री मिळणार होती.तसे न झाल्यास भारती विद्यापीठात तीन वर्षे झाल्यावर  बीएससीची डिग्री मिळणार होती.यात मोठी रिस्क होती.पण त्याने ती स्वीकारली.

यावेळी तो घरी कमी असायचा.आमच्या वाट्याला कमी यायचा.जिंजर हा नवा पाहुणाही आला होता.हा बोकोबा म्हणजे क्षितीजजे आज्ञाधारक बाळच.तो येण्याची जिंजरला बेल वाजण्यापुर्वीच चाहूल लागायची.त्याचे लाड करण्यात क्षितिजही रमायचा.

असे इतर व्याप असले तरी मला किमोला जावे लागे तेंव्हा सोनाली माझ्याबरोबर आणि तो अब्बुला छान सांभाळायचा.आता अब्बुला एकट्याला बाहेर जाणे शक्य नव्हते तर केस कापायला,इतर काही गरज लागली तर प्रेमाने घेऊन जायचा. अलीकडे नातवंडे आज्जी आजोबाना आईवडिलांना उलटून बोलणे,त्याना कमी लेखणे,त्यांचे न ऐकणे असे करताना दिसतात.क्षितीजचे वागणे मात्र घरातले असोत किंवा बाहेरचे असोत सर्वांकडे अत्यंत डीसेंट असेच होते आणि अजूनही आहे. 

यावेळी त्याचा रिझल्ट लागला.तो डीस्टीन्गशन मध्ये पास झाला होता.निकाल सांगून त्याने नमस्कार केला.निकाल ऐकणारी मी पहिली होते. त्याचा खुललेला चेहरा मला अजूनही आठवतो.           क्षितिजला सर्व सेमिस्टरला  डिस्टिंक्शन मिळाले आणि तो आयर्लंडला.इंजिनिअरिंगच्या चवथ्या वर्षाला रुजू झाला इतर मित्रमंडळीही होती.घर सोडून न जाणारा क्षितीज तेथे रमु शकेल का अशी भीती वाटायची पण तो रमला.स्वत: केलेल्या पाककृतीचे फोटो यायला लागले.बघता बघता पदवीधारक झाला.एम.एस.ला प्रवेश घेतला. इतर मित्रांनी पदवीवरच थांबणे पसंत केले.

 करोना काळात तर जवळचे विद्यार्थी आपापल्या घरी गेले हा एकटाच होस्टेल मध्ये होता.त्यावेळचे वातावरण अधांतरीच होते.केंव्हा कोठे जाण्यावर निर्बंध येतील सांगता येत नव्हते.आता संगणक फोन हेच काय ते मित्र राहिले.यात एक झाले एखादा विषय घेऊन खोलात जाऊन अभ्यास करणे सुरु झाले.प्रोजेक्ट गाईडशी मैत्री झाली.

त्यांनी आर्टीफिशियल इंटलीजन्स साठी पार्किन्सन मधील मास्क लाईक म्हणजे भावनाविहीन चेहरा या लक्षणाची निवड केली.त्यात तो काय करणार आहे हे मला समजले नाही.त्याला विचारले की तो म्हणतो झाले की सर्वात पहिला तुलाच सांगीन.

एम.एस. पूर्ण होऊन ऑनलाईन पदवीदान समारंभ झाला.तो आम्ही येथे बसून पाहिला.स्टेजवर येणाऱ्या भारतीय मुलांचे गमतीशीर नाव घेतले जात होते.क्षितीजचे मात्र क्षितीज सलील मालवणकर असे व्यवस्थित नाव घेतले.उच्चार कठीण असूनही तो निट केलेला पाहून मला आश्चर्य वाटले.नंतर समजले अनाउन्स करणारे त्याचे गाईड होते. आणि क्षितीजने त्याना नीट उच्चार समजाऊन सांगितला होता.मला शिक्षक विद्यार्थी यांच्यातील अशा मोकळ्या रिलेशनचे अप्रूप वाटले.

एम.एस. झाल्यावर त्याचा पीएचडी करण्याचा निर्णय आमच्यासाठी सुखद धक्का होता.आता तो पीएचडी करताना शिकवण्याचेही काम करतो.माझ्या लाईन मध्ये आला म्हणून मला छान वाटले.

मध्ये एकदा भारतात आला तेंव्हा भेटून गेला आता तो छोटा क्षितीज राहिला नव्हता.पुन्हा आला तो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे IEEE च्या जयपूरला होणाऱ्या इंटरनॅशनल सेमिनार मध्ये त्याचा पेपर निवडला होता म्हणून.

त्याला आता आपल्या आयुष्याचा मार्ग स्पष्ट आहे.आज २५ व्या वाढदिवशी भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा! यशाची शिखरे गाठताना तुझ्यातील कलाकार, संवेदनाशील माणूस हरवू देवू नकोस.


                   

Friday, 27 January 2023

मर्म बंधातली ठेव ही २

                                                   मर्म बंधातली ठेव ही  २

                  डे केअर सेंटरमध्ये लहान मुलांकडून विविध कलाकृती करुन घेत असतात.असाच एक आर्यकडून करवून घेतलेला स्टेनग्लास डिझाईन केलेला काचेचा ग्लास होता.जावयाच्या सतत बदल्यामुळे घर बदलावे लागे. कधी कधी आर्मी क्वार्टर मिळेपर्यंत भाड्याच्या घरात राहावे लागे.अशी घरे बदलताना खुप सारे समान भंगारात निघे.ही सारी उठाठेव मुलीलाच करावी लागे. एकदा या भंगारात मी हा आर्यने केलेला ग्लास पाहिला आणि लगेच उचलून घेतला.माझ्या घरी आणून ठेवला.त्या छोट्या ग्लासचा वापर कसा करावा समजत नव्हते.शो पीस म्हणून कोठेतरी ठेवला जायचा तो नाजूक ग्लास धक्का लागून पडेल फुटेल अशी भीती वाटायची.माझ्यासाठी तो मौल्यवान होता.एक दिवशी अचानक त्यासाठीची जागा सुचली. संगमरवरी बांधलेल्या देवघराच्यावर जपमाळ घालून तो ग्लास ठेवला.आता रोज देवाला नमस्कार करताना तो दिसतो आणि त्या बरोबर आर्यच्या बालपणीच्या आनंददायी आठवणीही.

May be an image of flower and indoor

Friday, 13 January 2023

सोनीचे पालकत्व

                                                  सोनीचे पालकत्व

                          सोनी मला भेटली 'गोष्ट नर्मदालयाची' या भारती ठाकूर यांच्या पुस्तकात.सोनी सात वर्षाची ती नर्मदालयात शिकणाऱ्या मुलींपैकी  नव्हती. छोट्या दोन मुलीना संध्याकाळी घसरगुंडीवर खेळायला घेऊन यायची.नर्मदालयात दिलेला संध्याकाळचा पोष्टिक आहार बहिणीना खाऊ घालून नंतर स्वत: खाउन परतायची. भारतीताईनी तु का शिकायला येत नाही विचारल्यावर तिचे उत्तर होते, या मुली मोठ्या झाल्या की त्याना पाठवीन.

                    सोनीची आई नवऱ्याच्या व्यसनाला कंटाळून घर सोडून गेली. सोनीचे वडील थोडीफार कमाई मिळवीत ती व्यसनात घालवीत. घर चालवण्याचे काम सोनी करी. त्यासाठी शेतात कापूस तोडणे,दुसऱ्याच्या गाई गुरांना चरायला नेणे अशी कामे करी.या सर्वात झालेल्या दमणूकिचा विचार न करता छोट्या बहिणीना खेळायला घेऊन येत होती.हे सर्व करून हसतमुख चेहऱ्यानी वावरायची. भारतीताईंनी नर्मदाल्यात आल्यास शिकायला मिळेल आणि काम करावे लागणार नाही असे सांगितले.तेंव्हा बहिणींना जेऊ खाऊ कोण घालेल? हा प्रश्न तिला होता. दारुड्या बापाच्या तावडीतून त्यांचा बचाव करणे हाही प्रश्न होता.दोन्ही बहिणीना घेऊन ये असे सांगितल्यावर माझ्या आज्जीकडे कोण पाहिलं तिला आता काम होत नाही असे तिचे उत्तर होते.स्वत:चे सुख,बालपण सर्वावर पाणी सोडून आज्जीचे आणि सर्व घराचेही हसतमुखाने आपणहून पालकत्व  स्वीकारणारी चिमुरडी सोनी मला भावली.खरे तर 'गोष्ट नर्मदालयाची' या पुस्तकातून भारती ताईंच्या शब्दातून ती नेमकी समजेल.

Friday, 6 January 2023

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे

 

                      फेसबुकच्या कृपेने माझे अनेक दूरस्थ  विद्यार्थी ३०/३२ वर्षानंतर संपर्कात आले.त्यातील एक गौतम ननावरे.या मुक्त पत्रकारावर आज पत्रकार दिनादिवशी लिहावेसे वाटले.२००४ मध्ये मी त्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' या केसरीमधील लेखमालेत लेख लिहिला होता.तो सोबत दिला आहे.त्यानंतर १८ वर्षातील त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भरारीचे दर्शन त्यांच्याशी संपर्कातून आणि फेसबुकवरील पोस्टमधून होत राहिले.

                 त्यांचा झोपडपट्टी ते म्हाडाचे कांदिवलीतील स्वत:चे घर हा प्रवास सहज,सोपा नव्हता तरीही एक आनंदयात्रा आहे.हे करताना स्वत:बरोबर पत्नी, मुले यांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास होईल यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.मुलाना उत्तम संस्कार दिले.स्वत:चे करिअर निवडणे,विवाह याबाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले.आंतरजातीय,आंतरधर्मीय,परदेशी कोणताही जोडीदार निवडा अशी मुभा दिली. एक मुलगा कोरा या साईटचा मराठी भाषेसाठी व्यवस्थापक आहे.वडिलांचा पत्रकारितेचा,सामाजाभिमुखतेचा, लेखनाचा वसा तोही चालवत आहे.त्याची पत्नी प्राध्यापक आहे.दुसरा मुलगा फाईव्हस्टार हॉटेलमध्ये शेफ आहे. सद्या ऑस्ट्रेलियात आहे, मुलीनी टुरीझमचा कोर्स केला आहे आणि ती भाग्यश्री ट्राव्हलमध्ये काम करते.पत्नीचे शिक्षण जास्त नसले तरी ती स्वत:च्या पायावर उभे राहील हे पाहिले.तिला स्वत:चा व्यवसाय निवडू दिला.या कोकण कन्येने मासळी विक्रीचा व्यवसाय निवडला.

                 सध्या त्यांची मुक्त पत्रकारिता सोशल मिडीयावर मुक्त संचार करत आहे.विविधांगी वाचन असल्याने कोरावर सामाजिक,राजकीय,शैक्षणिक अशा विविध विषयावर ते लेखन करतात.फेसबुकवरील  लेखही लक्ष वेधून घेतात.निर्वाहाचे साधन असलेली सायकल एक छंद झाली. त्यांच्या फोटोग्राफीचा अविष्कार फेसबुकवर सायकल,मुंबई सकाळ,ग्रामीण जीवन,निसर्ग,कात्रणातील बातमी अशा विविध विषयातून साकार होत आहे.त्यांचे सूक्ष्म निरीक्षण,सामाजिक भान,कलावंताची नजर यातून जाणवते.

                 निवृत्तीनंतर त्यांनी मनसोक्त प्रवास सुरु केला आहे.बस स्थानकावर जायचे मोकळी दिसेल त्या बसमध्ये बसायचे असा unplanned प्रवास ते करतात.तेथील प्रेक्षणीय स्थळे,निसर्ग,जनजीवन यांचे फोटो ते टाकतात.सकाळच्या सायकल राईडमधुनही त्याना फोटोसाठी विषय मिळत असतात.पन्नासी नंतरही त्यांनी सायकलवर बॉम्बे गोवा,इंटरनल गोवा या  ट्रीप केल्या. मुलांनी यासाठी प्रोत्साहन दिले.बोरिवलीपासून खारघर,कान्हेरी गुंफा,गोरेगाव आरे कॉलनी,अशा विविध सहली केल्या.कांदिवलीहून कुलाब्याला ऑफिसलाही ते जात.मुलांच्या दोनचाकी,चारचाकी आल्या तरी सायकल प्रेम संपले नाही.

                   ननावरे विध्यार्थी म्हणून मला तुमचे कौतुक आणि अभिमान वाटतो.

                 पर्यावरण,निसर्गप्रेमी,खुल्या विचाराचा, जुन्या नव्यातील चांगले वेचणारा,जगण्यातील विविध रंगत रंगणारा कलाकार,भरभरून जगणारा आणि इतरांना त्यांच्या मनाप्रमाणे वागू देणारा संवेदनशील माणूस,उक्ती आणि कृती एकच असणारा अशा या मुक्त पत्रकाराला पत्रकारदिनी भरभरून शुभेच्छा!

                           उत्तुंग भरारी

                        गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)








Friday, 9 December 2022

मर्म बंधातली ठेव ही १

                                              मर्म बंधातली ठेव ही १

                      माझी मैत्रीण तिच्या नातवाच्या Grand parents day ला गेली होती.त्याचे फोटो तिने टाकले होते.ती खूप खुश होती.मला माझ्या नातवाच्या आर्यच्या Grand parents day ला गेले होते त्याची आठवण झाली.नातू आता दहावीत आहे.पण मला अगदी काल परवा घडल्यासारखा तो दिवस आठवतो.त्याचे पाळणाघर आणि नर्सरी एकच होती.छोटी,छोटी मुले आणि त्यांचे आज्जी, आजोबा.वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भारलेले. प्रत्येक आज्जी-आजोबा आणि त्यांचे नातवंड याना बोलावले जात होते आणि त्यांच्या नातवंडानी तयार केलेल्या वस्तू नातवंडाकडूनच भेट दिल्या जात होत्या.एक निळ्या कापडावर फुल आणि पान  पेंट केलेले मोबाईल कव्हर आणि एक लाल रंगाची पिशवी भेट दिली गेली. पिशवीवर नातवाच्या हातांचे रंगीत ठसे घेऊन डिझाईन केले होते.खरे तर हे करवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते.

                  मोबाईल कव्हर हरवली. एखादा दागिना हरवावा तेवढे याचे दु:ख होते.पिशवी मात्र अजून छान आहे.किती वेळा धुतली तरी लाल रंग आणि डिझाईन अजून हालले नाही.मी जिकडे तिकडे ती घेऊन मिरवत असते.वाचनालयात पुस्तके आणणे,दुध आणणे,बागेत जाणे अशा कोणत्याही कामाला मी तीच वापरते.कोणी विचारो न विचारो मी आवर्जून सांगते याच्यावर हाताचे ठसे आहेत ते माझ्या नातवाचे आहेत. त्यांनी हे पेंट केले आहे.हे सांगताना मीच आठवणीत रमून जाते मला छान वाटते.काही काही जणांना तर दोन तीन वेळा हे सांगितले असण्याची शक्यता आहे.पण मला कोण काय म्हणेल याचे फारसे काही वाटत नाही.मला सांगताना आनंद मिळतो हे महत्वाचे.आर्यच्या अशा कितीतरी छोट्या छोट्या आठवणी माझ्या 'मर्म बंधातली ठेव' आहेत.आता सांगेन एकेक.

May be an image of 3 people and people smiling

Sunday, 13 November 2022

आनंदी वृद्धत्व - ९

                                               आनंदी वृद्धत्व -  ९

                       भाऊराव रामजी कदम यांची आमच्या कुटुंबाशी ओळख झाल्याला २३/ २४ वर्षे झाली.निवृत्तीनंतर त्यांनी शिवशंकर सभागृहात योगासन क्लास सुरु केला. आम्हीही तीर्थळीना पार्किन्सनचे निदान झाल्यावर तेथेच योगासन क्लास सुरु केला.आमच्याच भागात राहणारे आणि त्यात बेळगावचे त्यामुळे लगेच मैत्रीत रुपांतर झाले.तरतरीत,हसतमुख चेहरा,बोलण्यात मार्दव.कोणाशीही सहज मैत्री होईल असेच व्यक्तिमत्व.योगासनाचे क्लास घेणारे सर आले नाहीत तर कदम क्लास घ्यायचे.रोजच्या रोज क्लासहून गेल्यावर कोणती आसने केली. ती कशी करायची,त्याचा उपयोग याची डायरीत नोंद करत.मनापासून समजून घेत.त्यामुळे वर्षभरातच ते शिक्षक होण्याइतके तरबेज झाले होते.त्यांचे शरीर अत्यंत लवचिक. कोणतीही आसने सहज करायचे.आता कदम सर ८४ वर्षांचे आहेत पण आम्ही त्यांना प्रथम पहिले तसेच आहेत.नियंत्रणात असलेला डायबेटीस वगळता तब्येत ठणठणीत आहे.अजूनही सर्व आसने सहजपणे करतात.पुण्यात असतात तेंव्हा आमच्या जवळच्याच बागेत सूर्यनमस्कार ,आसने शिकवताना दिसतात.पुण्यात असतात तेंव्हा असे म्हणायचे कारण दोन मुले, एक मुलगी आणि बेळगावला स्वगृही अशी त्यांची फिरस्ती चालू असते.विशेष म्हणजे पत्त्त्यातील ज्योकर सारखे ते कुठेही सामावून जातात.

                    बेळगावला इंटर सायन्स नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला.पीडब्ल्यूडीमध्ये  नोकरीला लागले.काही दिवस इरीगेशनलाही होते. कोकड,अलिबाग,आटपाडी टॅंक, वीर धरण,रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी बदल्या झाल्या.गुणवत्तेत तडजोड नाही यासाठी स्ट्रीक्ट,हव्या तेथे सवलती द्यायच्या.असा त्यांचा कामाचा खाक्या होता.क्लास वन ऑफिसर म्हणून ते निवृत्त झाले.सर्व ठिकाणी अनेक माणसे जोडली. आजही त्या सर्वांशी लागेबांधे आहेत.माणसे जोडणे ही त्यांची खासियत आहे. शिवशंकर सोडून खूप दिवस झाले तरी त्यावेळच्या सर्वांशी संबंध आहेत. आमच्या समोरच्या बागेतही कदम सर्वांचे मित्र आहेत.

                   मध्यंतरी बरेच दिवस ते दिसले नाहीत. आणि दिसले तेंव्हा चेहर्यावरचे हास्य लोपले होते.काहीतरी आघात झाल्यासारखा चेहरा झाला होता.आणि खरेच तसे झाले होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.त्याना सांगताना रडू आवरत नव्हते.त्या बरेच दिवस बेडरीडन होत्या.त्या काळात ते बेळगावला होते.त्यांच्या सेवेसाठी केअरटेकर  मिळत नव्हती.ए टू झेड सर्व मी करत होतो असे ते सांगत होते.माझ्यासाठीही हे धक्कादायक होते.मी त्याना फ्लॉवर रेमेडीतले रेस्क्क्यू रेमेडी दिले.दोनचार दिवसातच ते म्हणाले मला तुमच्या औषधाने बरे वाटत आहे.नातवंडे,मुले, सुना यांच्या सहवासात लवकरच ते पूर्व पदावर आले.              

             त्यांची मुले, सुना सर्व उच्चशिक्षित आहेत त्यांच्याबद्दल सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुललेला असतो.मुलगी कार्व्याला असते. तिने बंगला बांधला.वास्तूशांतीला ते गेले होते.बंगल्याचे, मुलीच्या संसाराचे भरभरून कौतुक करत होते.मुलीसार्खेच सुनांचे ही कौतुक सांगताना ते थकत नाहीत.एक सून एम.ए.डी.एड.तर एक एम.ए.बी.एड आहे.एम.ए.ला तिला डीस्टिंगशन मिळाले आहे. अशी माहिती ते पुरवत असतात.हास्यक्लबमध्ये वाढदिवस साजरे केले जातात.त्यांच्या सुनेची सकाळी लवकर शाळा असते पण त्यापूर्वी तिने सासर्यांच्या वाढदिवसासाठी ५० लोकांसाठी शिरा करून दिला होता.अशा छोट्या छोट्या गोष्टी नातेसंबंधातील घट्ट विण दाखवतात.कुटुंबियातील सर्वांशी मिळून मिसळून वागल्यास कुटुंबीयांनाही वृद्ध हवेसेच वाटतात.आनंद द्यावा आनंद घ्यावा हेच खरे.

              कदम असेच आनंदी रहा आणि आनंद वाटा.