Wednesday, 24 March 2021

अंधांची पांढरी काठी - दिलीप शेलवंटे

                                                अंधांची पांढरी काठी - दिलीप शेलवंटे

                   हल्ली बहुसंख्य तरुणांच्या फेसबुक भिंतीवर कुटुंबीय,मित्रमंडळीसह हॉटेल,सहली,अमुक सिनेमा पाहत अहो,अमुक एका एअरपोर्टवर आहोत असे फोटो झळकत असतात. आमचा दिलीप याला अपवाद आहे. त्याच्याबरोबरच्या फोटोत  कायम अंध,अंधांचे उपक्रम असतात.तन,मन धनानी त्यांनी या कामाला वाहून घेतले आहे.यात मी काही तरी मोट्ठे करतो आहे असा आव नाही.त्याच्या जगण्याचाच तो भाग झाला आहे. 

शेलवंटे कुटुंब आमच्या सोसायटीत राहणारे.दिलीप त्यांचे शेंडेफळ.कोरेगाव पार्क जवळच्या जे.एन.पेटीट शाळेत दिलीप जायचा जवळच असणाऱ्या अंधशाळेतील मुलांबद्दल कुतूहल, करुणा वाटायची.लहानपणी रुजलेले हे बीज सुप्तावस्थेतच राहिले.शाळा पुढे ईन्जिनिअरिंगचे शिक्षण अशी जगण्याची धडपड चालू होती.स्वत:चा बिझिनेस उभारायचे स्वप्न होते.सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. पहिल्या  नोकरीचा  पगार होता ८०० रुपये.त्यातले १०० रुपये रास्तापेठेतील पुना ब्लाइंड असोशिएशनला दिले.दर महिन्याच्या पगारातून पैसे देणे सुरु झाले.अंध प्रेमाच्या बीजाला छोटा अंकुर फुटला होता.व्यवसायाचे स्वप्न उराशी बाळगत सात वर्षे नोकरी केली मग घरातच छोटा उद्योग सुरु केला.व्याप वाढला तशी नवीन जागा घेतली इंडस्ट्रीअल कोटिंगच्या व्यवसायाला सचोटी,गुणवत्ता आणि प्रयोगातून विविधता,छोट्या गोष्टीपासून मोठ्या मशिनारीपर्यंत उत्पादन सुरु झाले.एकाचे तीन कारखाने झाले.स्थैर्य आले.दरम्यान विवाह,मुले संसारही बहरत होता.स्वत:पुरते न पाह्ता आई, वडील त्यांची मित्रमंडळी ,वृद्धांच्या संस्था यांच्यासाठी काहीना काही करणे चालू होते.पत्नीलाही हे सर्व करावे लागेल याची विवाहापूर्वीच कल्पना दिलेली होती.यातच आयुष्यातील एका प्रसंगाने  अंध प्रेमाच्या अंकुर हळूहळू फुलू लागला.

महर्षी नगर रस्त्याने दिलीप येत होता आणि एक अंध फुटपाथवर पडला.स्कूटर थांबउन दिलीपने विचारपूस केली त्याला जेथे जायचे होते तेथे सोडतो असे सांगितले.त्याला नेहरू स्टेडियमला जायचे होते.खरे तर दिलीपला उलट्या बाजूला जायचे होते पण त्यांनी मी त्या बाजुलाच चाललोय सांगत त्याला लिफ्ट दिली.तिथल्या एका गाळ्यात काही  अंध मुले राहतात.तिथून कॉलेजला जातात ,नोकरीला जातात.त्या सर्व मुलांशी दिलीपचे मैत्री झाली.त्या मुलाना पार्टी देणे,त्यांच्याबरोबर वाढदिवस करणे,त्यांची फी भरणे चालू झाले.संगणक बिघडला दिलीपने घेऊन दिला अशी गुंतवणूक वाढतच गेली आणि दृष्टीहिनांसाठी विविध पातळ्यांवर काम चालू झाले. त्यातील एक क्रिकेट.

ही मुले फर्ग्युसन कॉलेज मैदानावर क्रिकेट खेळत.त्यांना मदत चालू झाली .एकदा मॅचसाठी प्रायोजक हवा होता.प्रायोजक मिळणे मुश्कील होते.अंधांचे क्रिकेट लोकांना माहीतच नव्हते.दिलीप त्याना न समजू देता स्वत:च प्रायोजक झाला. .अंधान्चेही क्रिकेट असते,परस्परात, इंटरनॅशनल मॅचेस असतात,वर्ल्डकप असतो हे त्याला जगाला दाखवून द्यायचे होते अंधांचे क्रिकेट लाइमलाईटमध्ये आणायचे होते.यासाठी तो झपाटल्यासारखे काम करू लागला.

एकदा राजस्थान टीमची रेल्वे लेट आली रात्री साडेतीनला यांनी स्टेशन वर जाऊन सर्वाना आणले आणि हॉटेलवर पोचवले.अनेक मॅचचे काम तो यशस्वीरीत्या पार पाडत होता त्याचे फलित म्हणून वर्ल्डकप मॅचची जबाबदारी इंडियन क्रिकेट कमिटीने दिलीपवर सोपवली.तो इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोशिएशनच्या कमिटीवरही आहे.श्रीलंका विरुद्ध भारत ही मॅच नेहरू स्टेडियमवर. व्हायची होती.यासाठी त्याने जीवाचे रान केले.यात स्वत:ची टामटूम नव्हती तर त्याच्या अंध मित्रांचे कर्तुत्व त्याला जगाला दाखवायचे होते.त्याना आनंद मिळवून द्यायचा होता.आयपीएचच्या दर्जाची मॅच करून दाखवायची होती.जबाबदारी मोठ्ठी होती. दुसर्या देशातील टीम असल्याने भारतात आल्यापासून परत जाईपर्यंत त्याना  पोलीस प्रोटेक्शन द्यायचे होते.४२००० रूपयांचे कोटेशन आले..त्याने वरपर्यंत खटपटी करून ही मॅच कमर्शियल नाही तर सामाजिक कार्य आहे हे पटवून दिले.आणि काम मोफत झाले.

तो ३०/४० शाळात गेला. मुलांना मोफत मॅच बघायला पाठवा जोरदार टाळ्या देणे हे काम करायचे.अंधांना प्रोत्साहन  द्यायचे.त्याप्रमाणे भरपूर मुले आली.जागोजागी बॅनर लावले खूप पब्लीसीटी केली.सजावट केली.स्वत:च्या खिशातून तीन लाख खर्च केले.नेहरू स्टेडीयम पूर्ण भरले होते.मिशन यशस्वी झाले. नंतर कलकत्त्यात मॅच होती भारतातर्फे खेळणारा दिलीपचा पुण्यातील मित्र अमोल करचेचा फोन आला.सर तुमचे श्रीलंकेच्या कॅप्टनने कौतुक केले. त्यांनी Food, hospitality,ground सर्व अंगाने पुणे क्रिकेट उत्तम होते याचे श्रेय दिलीप शेलवंटे सराना जाते असे म्हटले.आता मुलींचा संघही तयार झाला आहे.विस्तारभयास्तव अधिक लिहित नाही.या अंधांच्या टीमने आत्तापर्यंत चार वर्ल्डकप जिंकले पण त्याचे फारसे कौतुक होत नाही याचे त्याला वाईट वाटते.

अंधांनी भिक मागू नये स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठीही दिलीपची धडपड असते.बरीच मुले विमाननगर येथील निवांत मध्ये संगणक शिकून येतात त्यांना बँक,कंपन्यात नोकऱ्या मिळतात.उत्तम आणि ज्ञानेश्वर बँकेत काम करतात.उत्तमने नोकरी करून स्वत:चा flat घेतला आहे.काही ऑर्केस्ट्रात काम करतात.मुलांना विमाननगर लांब पडते म्हणू आता दिलीप स्वारगेटला क्लास सुरु करणार आहे.अंधांनी अंधांसाठी चालवलेल्या National Federation for  Blind चाही तो सल्लागार आहे या कमिटीत तो आणि गोखालेताई दोघेच डोळस बाकी सर्व अंध आहेत.स्वारगेटला ऑफिस आहे त्याची बरीच जबाबदारी तो घेतो.

ज्यांना शिक्षणाची आवड नाही त्यांना बीज भांडवल देवून उद्योगाला लावले जाते.ही मुले आता हात पसरत नाहीत तर नाना पाटेकर यांच्या संस्थेला इतर संस्थाना देणगी देतात.हे सांगताना दिलीपचा चेहरा आनंदाने फुललेला असतो.

त्यांची भावनिक गरजही महत्वाची आहे आणि दिलीप त्याला पुरेपूर न्याय देतो आपल्या मुलांचे करत नसेल तेवढे कोडकौतुक तो या मित्रांचे करतो.स्वत:चा वाढदिवस तो या मुलांबरोबर करतो.त्याना  घरी बोलावतो.त्याची पत्नी आणि मुलीही आनंदानी त्यांची बडदास्त ठेवतात.

अमोल करचे याला सचिन तेंडूलकरला स्पर्श करायचा होता त्याची ही इच्छा दिलीपने पूर्ण कली आणि सचिननेही संवेदनशीलता दाखवली.याना बराच वेळ दिला.त्याला विचारले की तू काय खेळतोस.अमोलने गोलंदाज.असल्याचे सांगितले.सचिनच्या स्पर्शाबरोबर अमोलला सचिनशी खेळताही आले.सचिनसह सर्वांसाठी हा क्षण भारावून टाकणारा होता.

या मित्रांकडून मलाच शिकायला मिळते असे दिलीप म्हणतो.जमीर शेखला दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायचे होते.दिलीपने त्याला नेले.हा मुस्लीम असून गणपतीला कसा असे आश्चर्य व्यक्त केले.तो म्हणाला,'अंधांना सर्व देव सारखेच तुम्ही डोळस लोकांनी देव वाटले.

दिलीप ऑर्गन डोनेशनचा फॉर्म भरत होता या मुलानाही भरायचा होता ती मुले म्हणाली आमचे डोळे सोडले तर इतर अवयव उपयोगी येतीलच की.या मुलांबद्दल बोलताना दिलीपला किती सांगू किती नको असे होते. तो भावनिक होतो.आपले मनही दिलीपाविषयीच्या कौतुकाने भरून जाते.तोम्हणतो मला आयुष्यभरयांची पांढरी काठी बनायचे आहे.

अंधांची पांढरी काठी त्यांना फक्त रस्ता दाखवत असते. दिलीप मात्र त्या पलीकडे जाऊन त्यांच्यासाठी पिलर आहे.त्यांच्या आर्थिक अडचणी,समस्या,सुख,दु:ख,आनंद,प्रेमाचा,आधाराचा  स्पर्श,प्रेरणा या सर्वांसाठी त्यांच्या सदैव बरोबर असलेली ही पांढरी काठी आहे. 

दिलीप तुझा आम्हाला अभिमान वाटतो.तुझ्या वाढदिवसासाठी,भविष्यातील योजनांसाठी खूप खूप शुभेच्छा! आणि आशीर्वाद.


              

Saturday, 27 February 2021

अमराठी तरीही मराठी

                                                  अमराठी तरीही मराठी

मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्‍या मराठीतून पुस्तके लिहिणार्‍या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण नंतर अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्‍या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्‍या आशा रेवणकर. आमच्या आजुबाजूचे कितीतरी सिन्धी,मारवाडी,तेलगु भाषिक. पण या सर्वात मला अधिक भावली ती सुरेखाच. तिचीच ही पूर्वप्रकाशित कहाणी !

"१९७७मध्ये मी सातवी पास झाले. त्याच वर्षी मला सासरी यावे लागले. माझी शाळा सुट्ली. माझ्याच द्प्तरात पुस्तकांच्या ऐवजी कपडे कोंबून कृष्णा नदी ओलांडून मी महाराष्ट्रात आले. त्या दिवसापासून सातवीचा शिक्का कपाळावर ठळक दिसू लागला. डोळे पूर्ण उघडून जगाकडे बघताच येइना. मोठे शहर, शिकलेले लोक बघून पार भेदरुन गेले. शिकण्याची इच्छा मनाच्या पार तळाशी पड्ली. परत शिकण्याची संधी मिळेल असे वाटलेच नव्हते. परंतु टिमविच्या मुक्त विद्या केन्द्रामुळे माझे मध्येच तुटलेले स्वप्न साकार झाले."

पदवीधर झाल्यावर सुरेखाच भलं मोठ पत्र आल होत. त्यातील हा मजकूर. तिच्या पत्रात पदवीधर झाल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. टिळक विद्यापीठाबद्दलची अपरंपार कृतज्ञता,तिच्या घडणीतील विद्यापीठाचा वाटा याबद्दल तिने भरभरुन लिहिल होत. विवाहामुळे शिक्षण तुटलेल्या व मुक्त विद्या केन्द्रामुळे पदवीधर झालेल्या गृहिणीची कथा थोड्याफार फरकाने अशीच असते. परंतु सुरेखाच्या यशाला वेगळा रंग आहे. खर तर तिचे बी.ए..साठी प्रवेश घेणं एक धाडसच म्हणावयास हरकत नाही.

सुरेखा पाटील अथणीची. मातृभाषा कानडी. मराठीची दूरुनही ओळख नव्हती. हिंदी विषय शाळेत असल्याने देवनागरी लिपी मात्र येत होती. ती हुषार होती शाळेत पहिली यायची. परंतु खेळत्या वयात म्हणजे अगदी पहिलीतच लग्न झाल.सातवीत असताना सासरी आली. नव-याची बदली महाबळेश्वरला झालेली. आजूबाजूच्या काम करणार्‍या मुलींबरोबर लंगडी छप्पापाणी खेळताना त्यांची मराठी मोडकी तोडकी येऊ लागली. ग्रामीण भागातून नागरी जीवनात आलेल्या सुरेखाला त्याच जवळच्या वाटायच्या.चवदाव्या वर्षीच मुल झाल.

नंतर मुल,संसार्,नवर्‍याच्या बद्ल्या यात वर्ष निघून गेली. मुले इंग्रजी माध्यमात होती.त्याना एक विषय मराठी असल्याने थोडथोड वाचन सुरु झाल. कानडी तर नजरेलाही पडत नव्हत. घरात सकाळ यायचा तो वाचायचा. चांदोबासारखी लहान मुलांची मासिकही वाचायची. थोड्थोड मराठी समजायला लागल.बोलताही येऊ लागल.
आणि एके दिवशी मुलीनी बातमी आणली. घरबसल्या बी.ए.करता येइल. पूर्व शिक्षणाची अट नाही. पण अभ्यासक्रम मराठीतून. सुरेखानी घाबरत घाबरत फोन केला. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्या व्यक्तीचे बोलणे इतके आश्वासक होते की सुरेखाला वाटले प्रवेश घ्यावा. तिने बी.ए. प्रवेश चाचणी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे तिला १००पैकी ६८ गुण मिळाले. सुरेखानी प्रथम वर्षास प्रवेश घेतला.

प्रवेशाबरोबर मिळालेली मराठीतून असलेली दहा पुस्तके पाहिली आणि धडकीच भरली. पण मनाच्या तळाशी असलेली इच्छा आता नजरेच्या टप्प्यात होती. जिद्द होती कष्ट करायची तयारी होती. सुरेखाची तपश्चर्या सुरु झाली.

घरची काम उरकली की रोज रात्री तीन् तीन वाजेपर्यंत वाचन, लिहिण सुरु झाल. पुन्हापुन्हा वाचायच लिहायच. मुलांकडून न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. मराठीतल्या सनावळ्यांचे आकडे मुलाना विचारुन कानडीत लिहायचे. आणि पाठ करायचे असा क्रम चालू झाला. लिहून लिहून हात दुखला तरी लिहिणे थांबायचे नाही. मग हात तट्ट सुजायचा.काम करेनासा व्हायचा. मग तिला रडायला यायचे. हात दुखतो म्हणून नाही तर काम थांबले म्हणून.
सर्व संपर्कसत्राना ती हजर राहायची. जिवाचा कान करून प्राध्यापकांचा शब्द न शब्द ऐकायचा.आत्मसात करायचा. त्यावर चिंतन करायचे.हुषार सुरेखाच्या मेंदूवर ते कोरले जायचे

सुरेखा सांगते परीक्षेवेळी हातवार्‍यासकट. प्राध्यापकांचे व्याख्यान डोळ्यासमोर येई. आणि ती झट्पट पेपर लिहित असे.

प्रथम वर्षात अनेक गृहिणींचा एखादा विषय राहतो; सुरेख मात्र सर्व विषयात उत्तीर्ण झाली. कानडी मातृभाषा असूनही मराठी आत्मसात करणे,पहिल्या झट्क्यात सर्व विषयात पास होणे हे वाखाणण्याजोगे होते. या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला.या पूर्वीही काही अमराठी विद्यार्थ्यानी बी.ए. केले होते. परंतु त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. नोकरी व्यवसायामुळे बाह्य जगाशी मराठीशी संपर्क होता. अभ्यासक्रम मराठीतून असला आणि सर्व लिखित साहित्य मराठीतून असले तरी पेपर इंग्रजीमध्ये लिहिण्याची परवानगी होती. त्यामुळे लिखाणासाठी इंग्रजीचा आधार होता. आणि मुख्य म्हणजे बी.ए.होणे ही त्यांची व्यावसायिक गरज होती. परंतु सुरेखाच्या बाबतीत यापैकी काहीच नव्हते. सातवी उत्तीर्ण मराठी व्यक्तीही प्रवेश घेताना दहावेळा विचार करतात. पण सुरेखानी मात्र जिद्दीने प्रथम वर्ष पूर्ण केले.

पहिल्याच वर्षात तिला स्मिता देसाई,महाशब्दे वाणी, परदेशी अशा मैत्रिणी मिळाल्या. स्मिता त्यांची लीडर. सुरेखाला प्रोत्साहन देण्यात तिचा मोठा वाटा होता. या सर्वानी एकत्र येऊन अभ्यास तर केलाच शिवाय दिवसभर विद्यापीठात रेंगाळणे कँटीनमध्ये गप्पाटप्पा करणे, निवासी संपर्कसत्रात विद्यापीठाच्या उपक्रमात सह्भागी होणे; असे करत दूरशिक्षणात राहुनही महाविद्यालयीन जीवनाचा आनंदही लुटला. या सर्व मैत्रिणींच्या सहवासात भित्री सुरेखा बोलायला लागली. चक्क शुद्ध मराठीतून बोलायला लागली. अभ्यासाची खडतर तपश्चर्याही चालूच होती. दुसरे तिसरे वर्षही ती पहिल्या खेपेतच द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तृतीय वर्षात संज्ञापन कौशल्य या विषयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित वैचारीक निबंध असत. विद्यार्थ्याना नेहमीच हा विषय कठीण वाटतो. सुरेखाला मात्र यात प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. तिच्या सख्यानी एकत्र येऊन तिचा सत्कार केला. आम्हा प्राध्यापकानाही बोलावल होत. एरवी आम्ही असे विद्यार्थ्यांकडे जात नसू. पण आम्हा सर्वानाच या मैत्रीणींच्या भावनांचा आदर करावासा वाटला.

आज सुरेखा डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहू शकते. स्वतःकडे स्वतःच्या कुटुंबाकडेही ती आता अधिक सुजाण नजरेने पाहू शकत आहे.

सुरेखानी सानेगुरुजींच्या आंतरभारतीचे एक सुरेख उदाहरण दिले आहे. तिच्याकडे पाहिले कि वाटते "कष्टाने मराठी शिकणार्‍या सुरेखाला अमराठी म्हणायचे की मराठी मातृभाषा असूनही मराठी माध्यमाची लाज वाटणार्‍याना."
हा लेख आल्यानंतरही तिची खबरबात फोनवरुन कळत होती आता तिची ज्ञानाची भूक वाढली होती. बी.ए.झाल्यावर तिने पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्यासन(women study department) येथे 'स्त्री विषयक अभ्यास' या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सख्यांच बोट सोडून एकटी जाण्याएवढी ती धीट झाली होती. बिबवेवाडीहून बसने एकटी विद्यापीठात जायला लागली. वर्षाचा अभ्यास्क्रम.५ पेपर आणि शोधनिबंध अस अभ्यासक्रमाच स्वरुप होत. "बालविवाह आणि शिक्षण" असा तिचा शोधनिबंधाचा विषय होता. स्वतः च्या जीवनावरच केसस्टडी अस त्याच स्वरुप होत. तिला आता पंख फुटले होते. आकाश तिला खुणावत होत.

मायबोलीवर सुरेखावरचा लेख टाकायचा ठरवल्यावर तिला फोन करायच ठरवल तर माझ्याकडे असलेल्या फोनवर फोन लागेना. मग स्मिताला फोन केला तिच्याकडे नंबर मिळाला.सुरेखा फोन केल्यामुळे खुपच खुश झाली.आनंदाबरोबर तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
"मॅडम कालच आठवण काढली होती तुमची.धावत धावत याव आणि तुम्हाला भेटाव वाटतय. आज माझा दिवस छान जाणार. तुमचा चेहरा बोलण हातवारे सगळ डोळ्यासमोर येतय." ती भरभरुन बोलत होती. विद्यापीठातल्या जुन्या आठवणी सांगत होती पीएच,डी करणार असल्याच सांगत होती. सध्या मुलीच लग्न, बाळंतपण, नातवंडाना सांभाळण चालू होत. पण तिची स्वप्न तिला खुणावत होती.तिला मराठी दिनाच्या निमित्याने विचारण्यासाठी मी प्रश्न काढले होते. पण मला तिचा ओघ थांबवून ते विचारावेसे वाटलेच नाहीत. तिच बोलण ऐकत राहावस वाटत होत.

पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा .

(वरील लेख ८ जानेवारी २००५च्या केसरीच्या अंकात 'उत्तुंग भरारी' या सदरात छापून आला होता. इथे पुन्हा टाकण्यासाठी दै. केसरीने परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार! )



Sunday, 7 February 2021

आनंदी वृद्धत्व - ४

                                                      आनंदी वृद्धत्व  -  ४
आमची गार्डन ग्रुपची सर्वात तरुण मैत्रीण विद्याताई देशपांडे. वय वर्षे अवघे ८३.मुलगा,सून,नातवंडे असे एकत्र कुटुंब आहे.एक मुलगी अमेरिकेत एक पुण्यात.मुलेही त्यांच्यासारखीच क र्तुत्वी आहेत. आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत

 विद्याताईंची आणि आमच्या कुटुंबाची ओळख खुप पूर्वीची.त्यांची मुकुंदनगरची  किलबिल शाळा खूप प्रसिद्ध होती. आमच्या भागात त्यांनी बंगला बांधला.नव्यानेच  वस्ती विस्तारत होती. येथेही त्यांना किलबिलची शाखा काढायची होती.आमच्या साठी ही खूप चांगली सोय होती.आम्ही दोघींनी घरोघर जाऊन शाळेबद्दल सांगितले. बघता बघता अनेक विद्यार्थी दाखल झाले..माझी मुलगी शाळेची  पहिली विद्यार्थिनी.तिच्या मार्फत विद्यार्थ्यात विविध मुल्ये रुजवण्यातील त्यांची कल्पकता,शाळेचा दर्जा अत्युत्तम ठेवण्याची त्यांची तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती.घराजवळ उत्तम शाळा मिळाल्याने आम्ही खुश होतो.त्यांचे वेगळेपण सांगणारे एक उदाहरण सांगते. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदना साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते.त्यादिवशी धोधो पाऊस.कोणीच गेले नाही.विद्याताई आणि त्यांच्या पतीनी स्वत:ची गाडी काढली आणि घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना आणले.एखादे काम हातात घेतले की काही झाले तरी करायचेच आणि तेही उत्तमरीतीने हे त्यांचे वैशिष्ट्य हळू हळू लक्षात येत होते.
आमच्या सेकंड इनिंगमध्ये ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.आम्हा निवृत्त झालेल्या अनेकांना भिमाले उद्यानाने एकत्र आणले.सकाळी मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू मिळतो आणि एकमेकिंकडून सकरात्मक उर्जाही.ही उर्जा देण्यात विद्याताईंचा वाटा मोठ्ठा असतो.आमच्या सर्वात पूर्ण पणे निवृत्त न झालेल्या फक्त विद्याताईच.त्यांच्या डॉक्टर सुनेने वैद्यकीय कामाऐवजी आता शाळेचा भार उचलला आहे.पण विद्याताईंचे मन अजून शाळेत रेंगाळत असते.शाळेला  ५३ वर्षे झाली.तेथे त्यांनी अनेक उपक्रम राबवले. कोणताही उपक्रम असो,घरगुती कार्यक्रम असो,संगीत क्लास असो,दैनंदिन व्यवहार असो, त्यातील नियोजनबद्धता,शिस्तबद्धता  ही त्यांची खासियत असते.
बागेत त्या फिरायला येतात. आमचा हास्यक्लब झाला की आम्ही काहीजणी ओंकार करतो.त्यांनी एक दिवशी फतवा काढला,ओंकारानंतर रोज एक प्रार्थना म्हणायची.ती आठवडाभर म्हणायची, ती तयार झाली की दुसरी.यासाठी त्यांनी गूगलवरून प्रार्थना शोधल्या. कोणत्या ओळी कितीदा म्हणायच्या या तपशिलासह सुंदर अक्षरात त्या  लिहिल्या. झेरॉक्स करून फाईलमध्ये घालून सर्वाना दिल्या.एव्हढ्यावर न थांबता गाणी रेकॉर्ड करून आणणे ती ऐकवणे,म्हणून घेणे हेही केले'.तू बुद्धि दे,' 'हमको मनकी शक्ती देना','ये मलिक तेरे बंदे हम','गगन सदन',' इतनी शक्ती हमे देना दाता' अशा अनेक प्रार्थना तयार झाल्या.हे करताना ताल,चाल, उच्चार हे सर्व व्यवस्थित होत आहे ना याकडे त्यांचे लक्ष असे. प्रार्थनेच्या सकारात्मक सुरुवातीने दिवस सुंदर जायचा.त्यांच्या आजारपणात त्यांचे येणे बंद झाले आणि उपक्रमही थंडावला.आता त्या यायला लागल्या तो पुन्हा सुरु होईल.असे वाटत असतांना बागाच बंद झाल्या.

त्यांच्या उत्साहाचे कारंजे सतत उसळत असते. त्याच्या शिडकाव्याने  शुष्क झालेली मनेही टवटवीत होत असतात.कधी डोळ्याची शस्त्रक्रिया कधी गळ्याची,कधी इतर काही आजार यामुळे अनेकदा त्यांचे बागेत येणे बंद होते. सर्वच जेष्ठ असल्याने प्रत्येकाचेच असे आजार चालू असतात.विद्याताई मात्र त्यांच्या इच्छ्याशाक्तीच्या जोरावर डॉक्टरनी दिलेल्या मुदती पूर्वीच बऱ्या होतात. उत्साहाने कामाला लागतात.                       

 गाण्याची आवड हा आम्हाला एकत्र आणण्याताला समान धागा आहे.ज्योती देशमुख यांचा संगीतानंद वर्ग त्यांच्या आणि आमच्या घरी असतो.बऱ्याचवेळा आम्ही एकमेकांचे स्पर्धक असतो पण ही स्पर्धा खेळीमेळीची असते.वैयक्तिक स्पर्धा असो किंवा दोन क्लास मधली असो.अटीतटीचे प्रयत्न आणि नंतर आत्मपरीक्षण हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.सवाईगंधर्व महोत्सव हा त्यांचा विकपॉइंट आहे.यासाठी त्या इतरानाही प्रवृत्त करतात. तिकीटे काढण्याची व्यवस्था,येण्याजाण्याची सोय यासठी धडपड करतात.त्यांची तब्येत पाहता आता यावर्षी काही त्या जाणार नाहीत असे वाटते.पण आपला होरा त्य खोटा ठरवतात.सकारात्मक विचार प्रबळ इच्छ्याश्क्ती या जोरावर त्यांचे सर्व चालते. त्यांची युरोप सहलही  या बळावरच झाली

 .घरात संस्कृतचा वारसा असल्याने  आणि काही काळ संस्कृत शिक्षिका म्हणून काम केल्याने संस्कृत उच्च्याराबाबतही त्या जागरूक असतात.कोणाच चुकत असेल तर बरोबर येईपर्यंत शिकवण्याची त्यांची तयारी असते.अनेकांना त्यानी स्वत:च्या घरी गीता,श्रीसूक्त, विविध स्तोत्रे शिकविली आहेत.याशिवाय ८० व्या वर्षी मुलीकडे रोज जाऊन तिच्या आजूबाजूच्या बायकांनाही गीता शिकवली.

मुलीचा मुलगा दहावीला होता तर घरून रोज पाहटे त्या त्याला मराठी शिकवायला जात. आज आर्किटेक्ट झालेला नातू इंग्लिश मिडीयम असून त्याचे मराठी चांगले असण्याचे श्रेय आज्जीला देतो.पहिल्या पगाराची साडी त्यांनी आई आधी आज्जीला दिली.त्यांना सुनेपासून नातवंडे नातजावयापर्यंत  सर्व अग आई  म्हणतात.मुलांना त्यांची अडचण होण्याऐवजी मदतच होते.अमेरिकेतील मुलीला तिच्या गरजेनुसार मदतीला गेल्या.नातीचे मुंबईला घर शिफ्ट करायचे होते. आईला वेळ नव्हता तर या आपल्या फार्म हाउसवरच्या बाइला घेऊन मुंबईला गेल्या आणि चोख काम करून आल्या.              

 उत्साही, स्पष्टवक्ती,व्यवहारी, कडक शिस्तीची,परफेक्शनिस्ट,जीवाला जीव देणारी  अशी ही आमची मैत्रीण आहे.तोंडावर एक बोलेल मागे वेगळेच असे नसल्याने मैत्री करणे, निभावणे सोपे जाते.या त्यांच्या स्वभावामुळे कुटुंब नातेसंबंध हेही त्यांनी टिकवून ठेवले आहेत.त्यांचे पती अत्यंत उत्साही होते.सर्व बाबतीत पत्नीला प्रोत्साहन स्वातंत्र्य देणारे होते.लोक्संग्रहही मोठ्ठा हे सर्व संबंध त्यांनी आणि मुलांनीही जोपासले आहेत

  त्यांचे कुटुंब कोणीही अनुकरण करावे असेच आहे.गाण्याच्या क्लासमध्ये सासू, सून दोघीही आहेत.दैनदिन व्यवहार एकमेकीतील सामंजस्याने चालतात.मुला,नातवंडाना तिखट चमचमीत लागते. विद्याताईना तिखट चालत नाही त्या सुनेला म्हणाल्या मी माझी भाजी करत जाऊ का? सून म्हणाली कशाला आपण रोज दोन भाज्या करतो एक बिन तिखटाची करू.बाकीचे हवे असल्यास ठेचा मिसळून खातील.एकमेकांशी मोकळेपणाने बोलण्याने सर्व प्रश्न सोपे होऊन जातात.जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचे हा नियम. आई आल्यावरच मुलगा जेवायला सुरुवात करणार.हाच आपलेपणा आणि प्रेम वडील मंडळीना हवे असते.विद्याताई सर्व स्वत:ची कामे स्वत: करतात. पण आजारपण,शस्त्रक्रिया या काळात सून डॉक्टर असल्याने खुप आधार असतो. मुलगी पुण्यातच असल्याने तीही असते एकमेकांच्यात लुडबुड न कारता हवे तेंव्हा सर्व एकमेकांसाठी असतात.

त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली म्हणून सर्व मुलांनी  मिळून खूप मोठ्ठा कार्यक्रम केला.सूत्र संचलनाची जबाबदारी सुनेने उचलली होती.त्यांच्या जीवन प्रवासाची सुंदर व्हिडीओफित केली होती.त्या सुंदर नटल्या होत्या.गच्च सभागृहात लोकात त्याच उठून दिसत होत्या.यात ब्युटीपार्लरवालीचा जेवढा वाटा होता त्यापेक्षा जास्त त्यांच्या चेहऱ्यावरील कृतार्थता, तृप्ती आणि समाधानाचा वाटा होता.गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.स्वत: त्यांनी 'प्रेमा काय देऊ तुला' मनापासून म्हटले.

सातत्याने नवनवीन शिकण्याच्या उत्साहामुळे त्यांच्यात साचलेपणा नाही.सध्या त्या ऑनलाईन फ्लॉवर रेमेडी शिकत आहेत.भोवतालच्या परिस्थितीतील,तब्येतीतील, नातेसंबंधातील बदल स्वीकारल्याने त्या आपल्या बरोबरीच्या लोकांशी तेवढ्याच दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीशीही उत्तम जुळवून घेतात.सुना मुली आधुनिक ड्रेस,इतर सौंदर्य साधने आणतात त्या आवडीने घालतात त्यांना ते शोभतेही.संक्रांतीला सर्वांनी आधुनिक काळे  गाऊन घालायचे ठरवले त्यांही सामील झाल्या.मुलीने आणलेला प्लाझोही त्यांनी आनंदाने घातला.मुलांइतक्याच सून ,जावई,नातवंडे,नातजावई यांच्या त्या लाडक्या अग आई आहेत.नात आणि नातजावई सिने क्षेत्रातील आहेत.त्यांचे त्यांना कौतुक आहे.अमराठी असलेल्या जावई म्हणतो आईसारखी सिनिअर सिटीझन मी कोठेच पहिली नाही.त्याच्याशी रमी खेळतानाचा फोटो सोबत दिला आहे.      

लॉकडाऊनच्या काळात घरात कामवाल्या येत नव्हत्या.सुनेला सर्व कामे करावी लागत.विद्यातैने काही करावे अशी कुणाची अपेक्षा नव्हती पण यांना पहाटे पाचला जाग येई. एक दिवशी त्यांनी किचन झाडून पुसून घेतले दुसरे दिवशी सर्व घराचा झाडू पोछा केला. प्रथम कंबर दुखली नंतर सवय झाली स्वेच्छेने त्यांनी हे काम कामवाली यावयास सुरु होईपर्यंत घेतले. यात मी काही मोठे केले असा आव नाही.          

            आज त्यांचे जीवन कृतार्थ आहे.संस्कारक्षम वयात त्यांनी घडवलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनीअर,संशोधक,उद्योजक असे विविध स्तरात आहेत.बागेत भेटतात तेंव्हा आदरानी त्यांच्याशी बोलतात आमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही सुखाऊन जातो.



Saturday, 5 December 2020

वृद्धांचे पालकत्व


 गेटवर फुलांचा गुच्छ पाहिला आणि सखी येऊन गेल्याचे लक्षात आले.गेट उघडताना रोज असा गुच्छ पाहून प्रसन्न वाटते.सखीबद्दलच्या प्रेमाने मन भरून येते.ही सखी माझी सख्खी मैत्रीण निरुपमा जोशी.साठीनंतर झालेली मैत्री एवढी घट्ट होऊ शकते असे वाटले नव्हते.ही मैत्री त्यांचे पती प्रकाश जोशी यांच्यापर्यंत विस्तारित झाली आणि मैत्रीतून जोशी पती पत्नी आमचे दोघांचे पालक कधी झाले समजलेच नाही.ते पुण्यात असले की आम्हाला एकदम सुरक्षित वाटते.अमेरिकेला गेले की हात मोडल्यासारखा वाटतो.ते असले की छोट्याछोट्या गोष्टी मुलींच्यापर्यंत  नेतच नाही.ह्यांच्या पार्किन्सन्सच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मदत झाली.हे बाहेर जायचे तेंव्हा सवाईगंधर्व ला मी जोशींबरोबर याना पाठवू शकायची मला इतका वेळ जाणे शक्य नसायचे.पार्किन्सन्स झालेल्या व्यक्तीला गर्दीतून सांभाळून आणायची अशी जबाबदारी मला नाही वाटत कोण आनंदाने स्वीकारेल.जेष्ठ नागरिक संघ,हास्यक्लब च्या सहली जायच्या.मला बस लागणे आणि पाठीचे दुखणे यामुळे जाणे शक्य नसायचे.जोशी पती पत्नी असल्यावर हे सह्लीला जाऊ शकायचे.पार्किन्सन्स मित्रमंडळ आमच्या जगण्याचाच एक भाग असल्याने तेथेही आमची गरज असल्यास हे दोघे हजर.मंडळाची सहल आनंदवनाला नेली होती इतक्या लांब जायचे तर मदत करणारे लागणार होते.हे दोघे आले होते.मी आनंद्वनला थांबले तर जोशी यांच्याबरोबर केअरटेकर म्हणून हेमलकस्याला गेले.

आमच्या नकळत  रुक्ष बनत चाललेल्या जगण्याला त्यांनी टवटवी आणली.आमच्या आजारामुळे आलेल्या घरबसेपणाला त्यांनी बाहेर काढले.कधी देवबाभळी नाटकाची  तिकिटे काढून  आणून आम्हाला सुरक्षितपणे नेणे आणणे, कधी मिसळ खायला बाहेर काढणे असे चालू असते.घरात न बसता बंगल्या बाहेरील बागेत बाहेर खुर्च्या टाकून बसायलाही आम्ही त्यांच्यामुळे सुरु केले.ही अत्यंत साधी गोष्ट पण त्यामुळे खूप फरक पडतो.

आमच्या रोज बागेत भेटी होत.करोनानंतर यावर मर्यादा आल्या.पण नियम पाळून आमच्यावर दोघांचेही लक्ष असते.आणि मदत असते.आपली जवळची माणसे,नातलग  दूर असतात.अशावेळी अशा मित्रमंडळाचे स्थान खूपच महत्वाचे असते.

Friday, 20 November 2020

आनंदी वृद्धत्व - ३

                          आमच्यासाठी रोलमॉडेल असणार्या व्यक्तींच्याबद्द्ल येथे लिहिण्यातील माझा उद्देश येथे स्पष्ट करावा असे वाटते. मी निवृत्तीपर्यंत अनेक नकारात्मक भावनांनी ग्रासलेले होते.छोट्या गोष्टींचे भयंकरीकरण करणे,छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणे,मुलींच्या शिक्षणाची,लग्नाची या कौटुंबिक काळज्या होत्याच पण काळजी करणे हा स्थायी भाव होता.कोणताही विषय त्यासाठी चाले.न्यूनगंड होताच.मनोविकारतज्ञांची मदत घेण्यापर्यंत सगळे गेले माझ्या नवर्याला पार्किन्सन्स झाल्यावर तर चिंता काळजी गैरसमज यातून अनेक चुका केल्या पार्किन्सन्स मित्रमंडळ या गटात सामील झाल्यावर परिस्थिती बदलली.आजारासह आनंदी राहणारी माणसे भेटली.त्यांच्याबरोबर आम्ही बी घडलो.ही प्रक्रिया हळूहळू झाली.आमच्या आयुष्यात आलेल्या अशा माणसाना माझ्या कुवतीनुसार आपल्यापर्यंत पोचवल्यास अनेकांना त्याचा फायदा होईल असे वाटले.

https://parkinson-diary.blogspot.com/2014/03/blog-post_29.html

  आनंदी वृद्धत्व -३

                                        सुमनताई जोग आणि अरुण जोग हे आमच्या आयुष्यात आलेले आणि आमचे रोल मॉडेल बनलेले जोडपे.समृद्ध सहजीवन आनंदी वृद्धत्व कसे असावे याचा वस्तुपाठ त्यांचे जगणे पाहताना मिळाला..शासकीय अभियांत्रिकी महविद्यालयात प्राध्यापकी केलेले अरुण जोग आणि सुमनताई, अरुण जोग याना झालेल्या पार्किन्सन्समुळे आमच्या परिवारात सामील झाले.

अरुण जोग शांत,सौम्य,मितभाषी,ऋजू व्यक्तिमत्व ,चेहऱ्यावर हसरा भाव, पार्किन्सन्सलाही  त्यांनी हसत हसत स्वीकारले.सुमन ताईनाच हा खेळाडू,सशक्त माणूस याला कसा पार्किन्सन्स झाला म्हणून वाईट वाटले होते. .खणखणीत आवाज,विचाराची स्पष्टता,रोकठोक बोलण,बोलण्याला कृतीशीलतेची जोड.ही सुमनताईंची वैशिष्ट्य.सत्तरी ओलांडलेल्या  जोग पती पत्नींना भेटायला आम्ही  त्यांच्या घरी  गेलो त्या आधी सभामधून भेटी झाल्या होत्या.घरभेटीत ते अधिक उलगडले.तरुण वयातच  सुमनताईना संधीवाताने गाठले. अरुण जोग शुभंकर ( केअर टेकर )म्हणून भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते.आता सुमनताई शुभंकर बनून त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या.आमच्या गप्पात त्यांचा कुठेही तक्रारीचा स्वर, कुरकुर नव्हती.खर तर बोलण्याचे काम मी आणि सुमनताईच करत होतो आणि आमच्या दोघांचे नवरे.मधून मधून अत्यावश्यक तेवढेच बोलत होते.
                        B.E. Electrical आणि M.E.Mechanical असलेले जोग पुना इंजिनिअरींग कॉलेजमधून मेकॅनिकल विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून निवृत्त झाले.मंडळात मात्र ते आमच्यापैकीच एक असत.सुमनताइनीही .शासकीय अभियांत्रिकी विद्यालयातून सिव्हील इंजिनिअर झाल्या.त्या काळात स्त्रियांनी हे क्षेत्र निवडणे धाडसाचे होते.नंतर काही काळ त्यांनी शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात नोकरी केली आणि मुलगा झाल्यावर चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णयही घेतला.शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची ही धाडसी वृत्ती कायम राहिली.

                        मित्रमंडळाची सभा असो,मेळावा असो की सहल असो ते आवर्जून उपस्थित असत.सुमनताइंचे नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन झाले त्यावेळी काही दिवस त्या सभांना येऊ शकल्या नाहीत,पण जोग मात्र सोबत शोधून सभांना उपस्थीत राहिले.मुलगा आणि मुलगी परदेशात राहणारे.गरज पडली कि तातडीने हजर राहणारे. नातेवायिक आणि मित्रमंडळीचा मोठ्ठा गोतावळा होता.त्यांच्या घराचा वरचा हॉल तेथे जेकृष्णमूर्ती यांच्या तत्वज्ञानावर विचार करणारा अभ्यासगट चाले.जे कृष्णमुर्ती यांची पुस्तके,सीडीज सर्वांसाठी उपलब्ध होती.कृष्णमुर्ती यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी खडकवासला येथे त्यांनी बैठे घर बांधून घेतले होते..अरुण जोगाना यात रस नव्हता पण विरोधही नव्हता.परस्पर विरोधी स्वभावाच्या या जोडप्यात नात्याची वीण मात्र घट्ट होती.

                        त्यांचा हॉल अनेक चांगल्या कामासाठी उपलब्ध असे. हृषीकेश पवार यांना पार्किन्सन्स पेशंटसाठी मोफत नृत्योपचार करण्याची इछ्या होती पण जागेचा प्रश्न होता.जोग पती पत्नींनी आपली जागा देवू केली.जोग स्वत:ही नृत्य वर्गात  सामील झाले.त्याचा त्यांना फायदा होत होता म्हणून ते खुश होते.नृत्योपाचारातील सहभागींसाठी तर अरुण काका म्हणजे जवळचे मित्रच.२०१३ मध्ये अरुण जोग यांचे निधन झाले.सातत्यने बरोबर राहणाऱ्या सुमनताई हे कसे सहन करतील असे वाटले.पण त्यांनी जोडीदाराचा मृत्यू अत्यंत समंजसपणाने स्वीकारून पुढील वाटचाल चालू देखील केली.नृत्यवर्गाच्या सर्वाना अरुण काका नसताना तेथे क्लास ही कल्पनाही सहन होणारी नव्हती.पण सुमनताइनी प्रत्येकाना फोन करून सांगितले आणि क्लास तेथेच सुरु राहिला. त्या अमेरिकेला गेल्या तरी हॉलची किल्ली देऊन गेल्या. अमेरिकेला मुलांकडे गेल्यावर.तेथे सेवेसाठी हजर असलेली मुले, नातवंडे, स्वतंत्र खोली अशी लौकिक अर्थाने उत्तम व्यवस्था होती पण सतत कार्यरत असणाऱ्या सुमनताई तेथे रमल्या नाहीत.केअरटेकर,फिजिओथेरपिस्ट, मसाजीस्ट यांच्या सहाय्याने त्या त्यांचे वृद्धत्व तरुणाला लाजवेल अशा जोमाने आपल्याच घरात राहून जगत होत्या,डान्सक्लासमध्ये सहभागी होत होत्या आमच्या सहलीना येत होत्या, आणि त्यांनि उभारलेल्या विविध उद्योगातही सामील होत होत्या..त्यांचे विविध उद्वोग येथे सांगितलेच पाहिजेत.

                             त्यांनी आस्क ( अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रा)च्या स्थापनेत पुढाकार घेतला.खेड्यापाड्यातील मुलाना गुण कमी मिळाले की इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही.महहागडी प्रायव्हेट कॉलेज परवडत नाहीत.अशा  गरीब मुलाना येथे अत्यंत माफक खर्चात तांत्रिक शिक्षण दिले जाते.प्रत्येक विद्यार्थ्याला काम मिळेल याचीही जबाबदारी घेतली जाते.आस्क्चे ऑफिसही काही दिवस त्यांच्या घरी होते.त्यांच्या मृत्युपूर्वी १/२ वर्षे त्यांनी संस्थेचा राजीनामा दिला.तरी वेळोवेळी सल्ला द्यायला त्या होत्याच.विद्यार्थी कमी झाले की इतर  नाउमेद होत पण सुमनताईंच्या  पोतडीतून नवनवीन कल्पना येतच.त्यात सामजिक जाणीव हा गाभा असे.खेड,राजगुरुनगर येथील धरणग्रस्त मुलांसाठी तांत्रिक शिक्षणाची सोय,कोकणातील मुलाना राहण्याची सोय असे उपक्रम असत.हे सगळे करताना वय आजार या कशाचीच अडचण नसे.                 

 त्यांच्या एका नव्या उद्योगाने तर आम्ही अवाकचा झालो.त्यांचा सकाळी सकाळी फोन आला.नेहमीसारखा खणखणीत आवाजात. ऑर्थरायटीसचा सपोर्टग्रुप काढताहेत हे सांगण्यासाठी.हा फोन होता.याची पहिली सभा ११ ऑक्टोबरला भारतीनिवास हॉलमध्ये होणार आहे.याबद्दलची माहिती मंडळाच्या सभेत द्यावी अशी त्यांची इछ्या होती.याची बरेच दिवस आधी पूर्व तयारी चालू होती.घरातून कोणाच्या मदतीशिवाय बाहेर जाऊ शकत नाही,जिला  घरातही मदतनिसाची गरज आहे.जिचा एक पाय घरात तर एक हॉस्पिटलमध्ये असतो  अशी स्त्री ८५ व्या वर्षी सपोर्ट ग्रुप चालू करायचा विचार करु शकते हे थक्क करणारेच होते

परंतु तरुणपणीच संधीवाताने गाठलेली छोटीशी कुडी,वाकडी झालेली बोटे,अनेक आजाराने शस्त्रक्रीयानी पोखरलेले शरीर यात कणखर मन वास करत होते.  स्वत:चा आजार जपताना आजूबाजूच्या व्यक्ती,घडामोडी यांचा विचार करणारे विशाल मन,फक्त विचार न करता ठोस कृती करून त्यावर उत्तर शोधण्याची वृत्ती.या कृतीत  त्यांच्यातल्या सिव्हीलल इंजिनिअरने निट भविष्यकालीन आराखडा काढलेला असे. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये अध्यापन केल्याने हा आराखडा समोरच्याला पटेलच अशा तऱ्हेने मांडण्याची हातोटी, समोर १५० विद्यार्थ्याना व्याख्यान देत आहेत असा खणखणीत आवाज.नुसत्या एका फोनवर कोणत्याही कामासाठी हजर होतील अशी जोडलेली उत्तम वकूबाची माणसे.या बळावर त्यांनी हे काम उत्तम प्रकारे निभावले.

.गोल्डन एनार्जायझर संस्थेच्या सहायाने त्यांनी या स्वमदत गटाचे अनेक उपक्रम राबवले.तरूण वयात संधिवात झालेल्यांना जगण्याचा उत्साह दिला.सकारात्मक अनुभव लीहीण्यास प्रोत्साहन दिले.त्याना वेबसाईट करायची होती.केअरटेकर साठी एक अभ्यासक्रम राबवायचा होता.असंख्य योजना होत्या.

त्यांच्या नातवाच्या मुंजीला त्यांनी बोलावले होते.त्या नेहमीच अत्यंत नीटनेटकया राहात.मुंजीतही त्या छान नटलेल्या होत्या.उत्साहाने सर्वांशी बोलत होत्या.ओळखी करून देत होत्या.आजाराचा मागमूसही चेहर्यावर नव्हता.

त्यांची माझ्याशी शेवटची भेट डिसेंबरमध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकारिणी सभेत झाली.
ही मिटिंग त्यांच्या घरी झाली होती.त्या कार्यकारिणीत नसल्या तरी त्यांचे घर आमच्या मिटिंगसाठी सदैव उघडे असायचे.  इंदूरच्या वनिता सोमण या पुण्याला आल्या होत्या त्यांना आम्हाला भेटायचे होते.आम्ही अगदी हक्कानी मध्यवर्ती असलेल्या सुमनताईंच्या घरी मिटिंगच्या वेळीच भेटायला बोलावल.आम्ही सर्व येण्यापूर्वीच वनिताताई आल्या.पण अनेक वर्षांची ओळख असल्यासारखी सुमनताईंनी त्यांचे स्वागत केले. 
दोन महिन्यातच फेब्रुवारीमध्ये त्यांचे निधन झाले.शेवटपर्यंत अनेकांची मदत घेत स्वत:ला आणि संस्थाना सांभाळले त्यांना पालकत्वाची गरज नव्हती त्याच अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या पालक होत्या.    
 



Saturday, 7 November 2020

आनंदी वृद्धत्व - २

      आनंदी वृद्धत्व - २

 पार्किन्सन्स मित्रमंडळ या स्वमदत गटात स्वत:चे स्वत:च पालक बनून सपोर्ट सिस्टीम बनवून आनंदाने जगणारे  वृद्ध,समर्थपणे  पालकत्व निभावणारी मुले,मुलबाळ नसणारी पण जोडलेल्या माणसांच्या आधारे दैनंदिन जीवन सुखाने जगणारी जोडपी असे अनेक प्रेरणादायी अनुभव आले. ही माणसे आयुष्यात आली नसती तर आमचे वृद्धत्व कसे असले असते मी कल्पना करू शकत नाही पण आता एवढे समृद्ध नक्कीच नसते.यांच्याबद्दल लिहिल्याने आपल्यालाही प्रेरणा मिळेल असे वाटल्याने हे अनुभव देत आहे.

आम्ही पेशंटला शुभार्थी आणि केअरटेकरला शुभंकर म्हणतो.स्वमदतगटात हे शब्द आता रूढ झाले आहेत.आज मी शुभार्थी मालती अग्निहोत्री यांच्याबद्दल लिहित आहे. मालती अग्निहोत्री आणि रामचंद्र अग्निहोत्री या दोन्ही पती-पत्नीला पार्किन्सन्स होता. रामचंद्र अग्निहोत्रीना जावून अडीच वर्षे झाली.

मालती अग्निहोत्री म्हणजे एकदम उत्साही, प्रेरणादायी व्यक्तिमत्व. दोघांना पण पार्किन्सन्स होता पण त्यांच्या पतीना स्विकारता नाही आला. ते लवकरच शय्याग्रस्त झाले. आम्ही प्रथम त्यांच्याकडे गेलो तेंव्हा त्यांच्यासाठी एक केअर टेकर,मालतीताईना एक केअरटेकर आणि इतर कामाला बाई होती. या सार्वासह मालतीताईनी सुखनैव जगत होत्या.त्यांनी  पार्किन्सन्सला चांगल्या प्रकारे स्वीकारलं आणि हाताळतही आहेत. खरंतर त्यांचा पार्किन्सन्स गुंतागुंतीचा होता बऱ्याच पीडी पेशंटच्या बाबतीत गीळण्याची समस्या असते. त्यांच्याबाबतीत ही समस्या होती पण थोडी वेगळी त्यांना लिक्विड काही गिळता येत नव्हतं. न्यूरॉलॉजिस्टच्या सल्ल्याने त्यांच्या पोटात नळी बसवली होती. सर्व नळीतून घ्यावे लागायचे. डॉक्टर म्हणाले होते की, पाव गोळी, अर्धी गोळी असं थोडं थोडं करत वाढवून तुम्ही गोळी गिळण्याचा प्रयत्न करा.ते जमले तर नळी काढू. आम्ही त्यांच्याकडे प्रथम गेलो तेव्हा त्या नळी लावलेल्या अवस्थेतच सहजपणे फिरत होत्या. चष्मा घालावा तसं ते त्यांच्यासाठी सहज होते.नंतर कधी आमची स्मरणिका द्यायला कधी त्याबाजूला गेलो म्हणून असे आम्ही त्यांच्याकडे गेलो 

त्यावेळी आम्ही आमच्या स्मरणिका किंवा काही द्यायचे असले तर जवळच्या लोकांना घरी जाऊन द्यायचो. यामुळे पोस्टाचा पोचेल की नाही हा प्रश्न असतो तो प्रश्न येणार नाही आणि त्या निमित्याने गाठीभेटी होतात असा विचार असे. गेलो की त्या खूप आदरातिथ्य करायच्या. कुठल्याही वेळी गेलं तरी हसतमुखाने स्वागत करायच्या. 

एकदा काय झालं राव नर्सिंग होम मध्ये आम्ही एका पेशंटला भेटायला गेलो होतो आणि भेटायची वेळ नसल्याने थोडे थांबावे लागणार होते. माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी होत्या मी त्यांना म्हटलं इथे आमच्या अग्निहोत्री म्हणून पेशंट जवळ राहतात आपण जाऊयात का? त्या म्हणाल्या चालेल. माझ्या पर्समध्ये पत्त्यांची एक यादी असते अग्निहोत्रीना फोन केला आणि येऊ का विचारले. दुपारची वेळ होती तरी त्या चालेल म्हणाल्या. आम्ही गेलो तर त्या व्हीलचेअरवरून दार काढायला आल्या. मनातून मला थोडे वाईट वाटले नंतर आम्ही आत गेल्यावर आम्हाला काहीतरी द्यायला व्हीलचेअरवरून उठल्या. चालत काम करू लागल्या.मी प्रश्नार्थक नजरेने पहिले. ते लक्षात आल्यावर त्या म्हणाल्या, की‘ मला दमणूक होते म्हणून मी व्हीलचेअर घेतली आहे. येरझा-या घालायच्या असतील, इकडेतिकडे जायचे असेल, तर मी व्हीलचेअर वापरते. एरवी माझी मी उठून कामे करत असते.आत्तासुद्धा काही काम नव्हते म्हणून मी बाईला झोपायला सांगितले.म्हणून मी दार काढायला व्हीलचेअरवरून आले’.तेव्हा असाही विचार करता येतो हे लक्षात आल्यावर मला खूप गंमत वाटली.अनेकांना मी हे उदाहरण देते. पण घरच्या लोकांना वाटते एकदा व्हीलचेअर दिली की चालण्याचा प्रयत्नच होणार नाही.अर्थात प्रत्येकजण मालतीताईसारखा असणार नाही हेही खरेच. 

मालतीताईना स्वत:ची शक्ती कशी पुरवून वापरायची. असलेल्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे हे छान जमले आहे. त्या आणि त्यांचे पती दोघेही शाळेत शिक्षक होते या रेणुकास्वरूप मध्ये स्पोर्ट्सच्या शिक्षिका होत्या त्यामुळे खिलाडु वृत्ती, हार मानायची नाही जिंकण्यासाठी लढायचे हा त्यांचा बाणा जगण्यातही आहे.

त्यानंतर एकदा आम्ही गेलो तेव्हा त्यांच्या पोटावर असलेली नळी काढलेली होती आणि आता त्यांना गोळी गिळता येत होती.पाणी प्याल्याचे समाधान मिळत होते. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे साध्य केले होते आणि न्यूरॉलॉजिस्टच्या सांगण्यावरूनच नळी काढली होती. इतर व्यायामाबाबतही त्या नियमित होत्या.त्यांना जिथे नळी लावली होती तिथे पोटात अजून थोडं दुखत असे. 

मध्यंतरी त्यांच्या घराचे रंग देणे,रिनोव्हेशन चालले होते त्यामुळे त्या तळजाइच्या बाजूला तात्पुरत्या राहायला गेल्या होत्या.मी घरी आले की फोन करीन म्हणाल्या होत्या. घरी आल्यावर त्यांचा फोनही आला.

माझ्या स्वत:च्या तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्यावर माझे त्यांच्याकडे जाणे कमी झाले.त्यांचे पती गेल्यावरही मला भेटायला जाणे जमले नव्हते. त्यांचे तीन जिने चढून जावे लागतात हा माझ्यासाठी अडथळा होता. मी त्यांना फोन केला होता आणि माझी अडचण सांगितली होती.

बर्याच दिवसांनी त्यांच्याकडे भेटीला जाण्याचा योग आला.त्याचे काय झाले ८० वर्षाच्या मालतीताईना पेटी शिकायची होती माझी माझी मैत्रीण सुनीता पोतनीस त्याना पेटी शिकावायला जाणार होती.सुनीता मला व्यवस्थित नेऊ शकेल याचा विश्वास होता म्हणून मी तिच्याबरोबर जायचे ठरवले.

                    त्या दिवशी शिकवणाऱ्या बाई येणार म्हणून त्यांची मुलगी आली होती. सुनिता त्यांच्या नात्यातील होती त्यामुळे त्यांचे संबंध अनौपचारिक होते सुनीताच्या मालती ताई गुरु होत्या आणि आता सुनीता त्यांची गुरु होणार होती. आम्ही गेल्यावर त्या व्हीलचेअरवरून आल्या. ऊठून पेटी वाजवण्यासाठी खुर्चीवर बसल्या. सगळे अगदी सहजपणे चालले होते. त्यांची केव्हापासून ची गाणं शिकण्याची इच्छा पूर्ण होणार म्हणून त्या खुश होत्या सुनीता जे शिकवत होती ते सहजपणे करत होत्या. काही वेळाने त्या पार्किन्सन पेशंट आहेत हे मी ही विसरून गेले.

सुनिताबरोबर मी गेले तेंव्हा पार्किन्सन्सविषयी काही बोलायचे नाही असे ठरवले होते.मला त्यांचे पेटी शिकणे अनुभवायचे होते.
त्या स्वतःवर विनोद करत होत्या इतरांवर विनोद करत होत्या. त्यांची मुलगी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत होती जास्तीत जास्त स्वावलंबी कस राहायचं असा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या कॅलेंडरवर दुधाचा हिशोब,गॅस केव्हा आला त्याच्या तारखा, वेगवेगळी बिल भरण्याच्या तारखा, फिजिओथेरपिस्ट,मसाजीस्ट,बिकानेरवाला, वाणी असे विविध फोन नंबर असे सर्व लिहिलेलं होतं आणि गरजेनुसार त्या फोन करून स्वतः सर्व मॅनेज करत होत्या आम्ही गेल्या गेल्या त्यांनी बिकानेर वाल्याकडे फोन करायला सुरुवात केली होती आमच्यासाठी त्यांना खायला मागवायचं होतं आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला काही खायचं नाहीये तरी त्यांनी बर्फी मागवली आमच्याबरोबर खाल्ली ही.

त्यांच्याकडे दिवस-रात्र राहणारी एक बाई ठेवलेली आहे तरीही स्वतःला जमेल तेवढे त्या करतच असतात.मुलगी अधून मधून फेरी मारत असते.
त्यांचे घर तिसऱ्या मजल्यावर त्यामुळे त्यांचे खाली उतरणे होत नाही तेवढी ताकद त्यांच्यात नाही.त्यांच्या बरोबर राहणारी बाई आणि त्या हे दोनच चेहरे,आणि घराच्या भिंती.घराला बाहेरचे दृश्य दिसेल रस्त्यावरची हालचल दिसेल असेही काही नाही.अशावेळी शुभार्थीला नैराश्य येण्याची शक्यता असते. पण मालती ताई हे वेगळेच रसायन आहे. त्यांच्यात कोठे ही कंटाळलेपणा,दुर्मुखलेपणा,कुरकुर नाही.उलट आनंदी दिसत होत्या.शेजारच्या चाळीस पन्नाशीच्या बायका येतात आम्ही गप्पा मारतो,हसतो, खिदळतो,खानपान करतो.असे त्या सांगत होत्या.मला याचे खूप आश्चर्य वाटले.

त्यांची शारीरिक अवस्था फारशी चांगली नाही.इतक्या वर्षाचा पीडी.या कशाचेच त्यांना काही नव्हते.त्या सहजपणे वावरत होत्या.चहा पिण्यासाठी, पेटी वाजविण्यासाठी खुर्चीवर बसल्या.मध्येच व्हीलचेअरवरून बाथरुमला जाऊन आल्या.मुलगी सांगत होती उलट ती आम्हालाच सारखीच तुमची सर्दी झाली,पाठ दुखली अशी कुरकुर का असते?.असे रागावते.

एकुणात मुलगा,मुलगी गरजेनुसार आहेत पण त्या स्वात:च स्वत:च्या पालक आहेत असे म्हणायला हरकत नाही.

मी घरी परतले ती एक सकारात्मक उर्जा घेऊनच.निराशेने ग्रासलेल्या शुभार्थीनी एक दिवस मालती ताई यांच्याबरोबर घालवला तर त्यांचे नैराश्य कोणत्याही समुपादेशनाशिवाय निघून जाईल असे मला वाटले.

या लेखातून त्यांच्यातली थोडी जरी उर्जा मी पोचवू शक्ले तरी माझ्या लिहिण्याचे सार्थक झाले असे वाटेल.

( मंडळाच्या वेबसाईटवर' क्षण भारावलेले'  असा लेख मी मालतीताई यांच्यावर लिहिला होता.त्यातच थोडा फेरफार करून हे लेखन केले आहे.)

Wednesday, 4 November 2020

आनंदी वृद्धत्व - १

     आनंदी वृद्धत्व - १

                           वृद्धांचे पालकत्व या ग्रुपवर विविध अनुभव वाचायला मिळत आहेत.प्रत्येक अनुभवावर दीर्घ प्रतिसाद लिहायचा असतो.पण थोडक्यात लिहिले जाते. आज मी आमचाच अनुभव सांगणार आहे.

                          आमच्या बाबतीत सांगायचे तर आमचे वृद्धत्व अत्यंत आनंदी आहे.समधानी,कृतार्थ आहे. सुखी माणसाचा सदरा आमच्याकडे मागु शकता.यासाठी आर्थिक गुंतवणुकीइतकीच  नात्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. आर्थिक नियोजनात आम्ही थोडे कमी पडलो पण नात्यांची गुंतवणूक मात्र भरपूर आहे.

                            निवृत्तीपूर्वीच निवृत्तीनंतर काय करायचे याचे प्लान ठरवले होते.आमच्या घरात पार्किन्सन्सने प्रवेश केला आणि आधीचे प्लान बाजूला ठेवून जीवनाला वेगाळीच दिशा मिळाली. मी आधी काय ठरवले होते हे सांगणे येथे गरजेचे नसल्याने त्याबाबत लिहिलेल्या लेखाची लिंक देत आहे.

बर्याच अनुभवात ४५/ ५० वयापासून नियोजन करावे असा विचार दिसला. त्याप्रमाणे झाले तर उत्तमच. पण वेळ पडली तर प्लान बदलण्याचीही मनाची तयरी ठेवावी.ठरवल्याप्रमाणे होत नाही याची खंत बाळगू नये असे सुचवावेसे वाटते.

                             माझे पती इंजिनिअर.वय वर्षे ७९.एका मोठ्या कंपनीतून जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाले.गेली २१ वर्षे पार्किन्सन्स आजार आहे.जुलैमध्ये कोविद्नीही हजेरी लावली.आता पूर्ण बरे झाले.मी वय वर्षे ७२.समाजशास्त्राची प्राध्यापक, २००७ मध्ये स्लीप डिस्कचा त्रास सुरु झाल्याने एक वर्ष आधीच स्वेछ्यानिवृत्ती घेतली.मला ब्लड प्रेशर,Hypo ,thyroid,चा त्रास आहे.मागच्या वर्षी कॅन्सर झाला त्यातून बरी झाले.

तीन मुली. त्या विवाहित आहेत.आम्ही दोघेच राहतो.पण मुली जावयांचे आमच्याकडे पूर्ण लक्ष असते.फोनवर आवाजावरून त्यांना आम्ही ठीक आहोत का हे समजते.आम्ही बरीच वर्षे या भागात राहत असल्याने आमची सपोर्ट सिस्टीम भक्कम आहे.यात वाणी,फळवाला,भाजीवाला इ. दैनंदिन गरजा भागवणारे आहेत तसेच गावातून काही आणायचे असेल,इतर काही गरजा असतील तर पुरवणारे मित्र मैत्रिणी आहेत.ज्यासाठी आम्हालाच जायला हवे अशा कामासाठी बरोबर येणारे रिक्षावाले आहेत.आमच्याकडे घरकाम करणाऱ्याही आमच्या सपोर्ट सिस्टीमचा भाग आहेत.आमचे शेजारी म्हणजे आमचे विस्तारित कुटुंबच आहे त्यांच्याकडे तीन डॉक्टर आहेत.आम्हाला उठून दवाखान्यात जावे लागत नाही..येता जाता तेच व्हिजीट   करतात.त्यांचा खूपच आधार वाटतो मुलींच्या प्रमाणे ते आमचे पालकच आहेत.मुलीनाही त्यांच्यामुळे आमची काळजी कमी वाटते.याशिवाय एक जावई आर्मीत अर्थोपेडीक सर्जन आहे.त्याचाही आधार वाटतो.  

                          एक मुलगी पुण्यातच कायम आहे एक दिल्लीला तर एक बदल्यानुसार वेगवेगळ्या गावी. गेली काही वर्षे पुण्यात आहे.त्या एका हाकेत धाऊन येतील अशी खात्री असते.आम्हीही त्याना काळजी वाटणार नाही असेच वागतो.सकाळी आमच्या समोरच्याच बागेत हास्यक्लबला जातो मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू घेतो.तो संपल्यावर थोडावेळ मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा,हास्यविनोद यातून भरपूर मानसिक प्राणवायू मिळतो. संध्याकाळी आमच्याकडे आजूबाजूचे काहीजण येतात आम्ही रामरक्षा,प्राणायाम,मेडीटेशन करतो.आठवड्यातून दोनदा आमच्या घरी गाण्याचा क्लास असतो.त्याचे विविध उपक्रम चालू असतात.

                      आमच्याकडे एक मोठ्ठा हॉल असल्याने.गुरु पौर्णिमा,मित्र मैत्रीणीत कोणाचे लग्न असल्यास एकत्रित केळवण आमच्या पार्किन्सन्स मित्रेमंडळ या सपोर्ट ग्रुपची मिटिंग,हास्य्क्लबची मिटिंग अशा गोष्टी ही चालू असतात.काही चांगल्या कामासाठी छोटा हॉल हवा असल्यास आम्ही देतो.मध्यंतरी वर्ध्याच्या सर्वोदयी माननीय कालीन्दिताई पुण्यात आल्या होत्या. अयोजकाना त्यांच्याशी अनौपचारिक गप्पांसाठी जागा हवी होती आमच्याकडे या गप्पा झाल्या.आमच्यासाठीही घरबसल्या ही सुवर्ण संधी होती.समोर बाग असल्याने तेथे येणारे डोकावतात.काही हवे नको विचारतात. आम्ही दोघेही माणसात रमणारे असल्याने आम्हाला केंव्हाही कोणी आलेले चालते. 

                     सर्व काही सुरळीत असताना हे असे जगणे असते पण घराच्या  दुरुस्त्या,देखभाल यासाठी मुलींचाच आधार असतो.माझी एक शस्त्रक्रिया,कॅन्सर,ह्यांचा कोविद अशी आमची मोठ्ठी आजारपणे झाली त्यावेळी मुलीनी एकत्र संगनमताने सर्व सूत्रे  आपल्या हातात घेतली आता आम्ही म्हणू तसेच करायचे असे बजावले तन,मन धन या सर्व पातळीवर चोख भूमिका बजावली.आम्हाला १०० टक्के कम्फर्टआणि झिरो इनकन्व्हीनिंअस असेल याची पुरेपूर काळजी घेतली.आमचे काही एक न ऐकता स्वत:च्या घरी काही काळाकरिता हलवले.मोतीबिंदू सारख्या शास्त्रक्रीयान्च्यावेळी मात्र आमचे आम्ही मॅनेज केले.                      

करोना नंतर लॉकडाऊन झाला त्यावेळीही कामवाल्या नसल्याने आम्हाला झेपणे शक्य नव्हते.आम्ही कोणतीही खळखळ न करता मुलीकडे राहायला गेलो.

 आम्ही स्वत:ला  पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले आहे.तोही मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे.या आमच्या कामात आमच्या पालकांची लुडबुड नसते.उलट गरजेनुसार मदतच असते.पण माझ्या ,कॅन्सरच्या काळात माझ्या मुली आणि आमचा पार्किन्सन्स परिवार यांनी मी पूर्ण बरी होईपर्यंत काही काम करू दिले नाही.एकुणात आमचे पालक आणि आम्ही यांच्यात सुंदर हार्मनी आहे.तारा जास्त ताणलेल्याही नाहीत आणि सैलही नाहीत.

आमच्या या आनंदी वृद्धत्वाचे श्रेय' पार्किन्सन्ससह अनांदाने जगूया' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पार्किन्सन्स मित्रमंडळाला जाते येथे काम करताना आमचा स्व विस्तारला.१५०/२०० पेशंटच्या घरभेटी घेताना आणि काम करताना आनंदी वृद्धत्वासाठी रोल मॉडेल मिळाले. वृद्धत्व कसे असावे कसे नसावे याचा वस्तुपाठ मिळाला.

या रोल मॉडेल बद्दलही लिहिणार आहे.

https://parkinson-diary.blogspot.com/2017/09/blog-post_16.html