जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव
उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता
लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण
स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक
स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची संख्या जास्त
आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि
बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्यांच्याब्द्द्लाचा लेख प्रसिद्ध केला होता आज महिला दिनाच्या निमित्ताने बहिणाबाईना अभिवादन.
ही म्हणजे कविता. हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे तिच्या कवितेबद्दल बोलायचं
.'
कवितेचे दळण दळून अनेकांनी मांडले पण सुखदुःखाच्या जात्यात स्वतःचे जीवन भरडले
जात असताना त्या श्रमाचे सामवेद करून गाणारी एखादी' असं पु ल देशपांडे
म्हणतात
'जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे एका निरक्षर
आणि अशिक्षित स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला
लावणारा चमत्कार आहे' असं आचार्य अत्रे म्हणतात
अनेकानेक विचारवंत तिची
स्तुती करताना थकले नाहीत. नमुन्यासाठी वरील दोन उदाहरणे पुरेशी आहेत
हा
चमत्कार घडला तरी कसा ती म्हणते
'माझी माय सरोसती मला शिकवते बोली
लेक
बहिणाच्या मनी किती गुपितं पेरली'
ही गुपित बाहेर कशी येतात, ऐका.
' अरे घरोटा
घरोटा तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गाणं पोटातून येत होटी'
विठोबाच,रामाच मंदिर याच
माझ्या शाळा असं ती म्हणते.. निसर्गातही तिला मग भजन दिसतं. तानक्या सोपानाला
हऱ्यात निजवून तो हारा डोक्यावर घेऊन ती शेतात निघायची तिच्याबरोबर तिचं
काव्यही
विषय पुरवायला आजूबाजूचा निसर्ग माणस होतीच. ' ऊन वार्याशी खेळता एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं दंग देवाच्या भजनी'
घरी आल्यावर तव्यावर भाकरी टाकताना ही
हिला काव्य सूचाटे.
'बरा संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तेव्हा मिळते भाकर
ऐका संसार संसार दोन्ही जीवांचा इचार
देतो दुःखाले होकार
आणि सुखाले नकार'
एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञान सारखी हिच्या मुखातून
सुभाषित बाहेर पडतात
- ज्यातून कापूस निघत नाही त्याला बोंड म्हणू नये
ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये
- इमानाला जो विसरतो त्याला
नेक म्हणू नये
जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये
' आला सास गेला
सास देवा तुझं र तंतर
अरे जगणं-मरणं एका सासाचं अंतर'
असं जगण्या-मरण्याचा
तत्वज्ञान समजल्यामुळे ती पतिनिधनानंतर रडत बसत नाही
' जरी फुटल्या बांगड्या
मनगटी करतुत
तुटे मंगयसूतर उरे गयाची शपथ
नका नका आया बाया करू माझी
कीव
झालं माझं समाधान आता माझे मला जीव'
प्रत्यक्षातही तिने मोठ्या
धिराने दोन लहान मुलांना वाढवलं, घडवलं.
' येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप
काम करता करता देख देवाजीच रूप' असं म्हणत ती काम रेटत राहिली. कामाच्या
रगाड्यात ती सहजपणे आजूबाजूचे बदल न्याहाळत होती कवितेतून मांडत होती
नुकताच छापखाना सुरू झाला होता,
' माणसा परी माणूस राहतो रे येडजना
होतो छापिसनी
कोरा कागद शहाणा'
प्लेगची साथ आली त्याबद्दल ती म्हणते,
' पिलोक पिलोक आल्या
पिलोका च्या गाठी
उजाडलं गाव खया मयामधी भेटी'
माणसाच्या स्वार्थाची तिला चीड
.येते.
'अरे माणसा माणसा कधी होशील माणूस?' असं ती विचारते
' जवा ईमान सचोटी पापामध्ये
बुडाली
तेव्हा याच माणसाने किल्ल्याकुलूप घडले.
किल्ल्या राह्यल्या ठिकाणी जवा तिजोऱ्या फोडल्या.
तवा याच माणसाने बेड्या लोखंडी gघडल्या.
अशा या माणसाचा मनाबद्दल ती म्हणते,'
मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला
हाकला फिरी येते पिकावर
मन जहरी जहरी याचं न्यारं रे तंतर
आरे इचू साप बरा
तयाले उतारे मनतर
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर गेल
गेल आभाळात
मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं आभायात बी मायेना
संत-महात्म्यांच्या रांगेत बसणारी असं हे मनाचं वर्णन.
देव कुठे याबाबत
ही ही अडाणी बाई एखाद्या तत्वज्ञाना शोभेल असं काव्य लिहिते.
' सदा जगाच्या
कारणे चंदनापरी घसला
अरे सोतामदी त्याला देव दिसला दिसला
स्वतः झाला रे दगड
घाव टाकीचा सोसला
अरे दगडात त्याले देव दिसला दिसला
डोये मिटले मिटले स्वतःला
विसरला
अरे अंधारात त्याला देव दिसला दिसला
देव कुठे देव कुठे तुझ्या बुबुया
माझार
देव कुठे देव कुठे आभायाच्या आरपार'
तिचं जगणं एक कविता होती. तीच मोल
न समजल्याने काळाच्या ओघात बरच काव्य नष्ट झालं. थोडफार मुलांनी लिहून
ठेवलं ते आज उपलब्ध आहे तेच इतकं अनमोल सर्व उपलब्ध झाला असता तर? बहिणाई
तुझ्या जगण्याला, तुझ्या काव्याला आणि तुला सलाम