Friday, 26 May 2017

गेले द्यायचे राहुनी

                                          
         दसऱ्याच्या आधी झेंडूच्या फुलांच्या राशी दिसल्या की मला प्रकर्षाने आमच्या झेनची आठवण येते.  आमची झेन गाडी विकली त्याला ४ / ५  वर्षे तरी झाली. गेली एकदा कटकट अशीच भावना होती त्यावेळी.त्याला कारणही तसेच होते.माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.पीडी असणाऱ्यांना किती कठीण याची कल्पना करु शकतो. मोटर डिसऑर्डचा हा आजार असल्यामुळे हालचालीवर नियंत्रण कठीण जाते. त्यात हात,पाय अशा शरीराच्या विविध भागावर कंप असतो.प्रतिक्षिप्त क्रिया असतात तेंव्हा इतका प्रॉब्लेम येत नाही. पण विचार प्रक्रिया सुरु झाली की कंप वाढतो. गाडी सरळ रस्त्यावर चालवताना प्रॉब्लेम यायचा नाही.पण रिव्हर्स घेणे,यु टर्न घेणे, ट्राफिक जाम झाला की त्यातून गाडी बाहेर काढणे कठीण व्हायचे,आजूबाजूच्या लोकांचे हॉर्न वाजणे सुरु झाले की कंप वाढायचा.आजूबाजूचे लोक अशावेळी वाट्टेल ते बोलतात ते ऐकताना मला त्रास व्हायचा,यांच्या रागाचाही पारा चढायचा.पेट्रोल पंपावरचा माणूस दरवेळी म्हणायचा आजोबा आता गाडी चालवणे बंद करा.रस्त्यावरच्या इतर लोकांचे आडाखे  आणि पीडीमुळे यांच्या मेंदूने निर्णयास घेतलेला वेळ यात फरक पडत होता.छोटे मोठे अपघात होत होते,नशीबाने आम्हाला आणि इतर कोणाला कधी दुखापत झाली नाही. पण गाडी दुरुस्ती साठी १० /१२ हजार तरी खर्च यायचा.गराजवालेही आता गाडी चालवणे बंद करा म्हणायचे. यांना एकट्याला मी कुठे जाऊ देत नव्हते याचाही त्यांना राग यायचा.मी यांच्या बरोबर जीव मुठीत घेऊन गाडीत बसायची,पार्किन्सन्सची सभा संपवून आले की पोचलात ना व्यवस्थित असे सहकाऱ्यांचे फोन यायचे.कुठे जायचे तर एखादा ड्रायव्हर बोलऊ असे सुचवून पहिले पण त्यांना ते मान्य नव्हते.आणि हवा तेंव्हा असा ड्रायव्हर मिळणे कठीणही होते.गाडीवरून आमची सारखी भांडणे होऊ लागली.गाडी विकणे हा पर्याय होता.गाडीवर येणाऱ्या खर्चापेक्षा भाड्याचे वाहन वापरणे कसे स्वस्त पडेल हा गणिती हिशोबही करून झाला.शेवटी आमच्या ग्रुपमधील बुजुर्ग शुभार्थी ( पार्किन्सन्स पेशंट )  शेंडे साहेब यांना मी सांगितले ह्यांना जरा समजावा.शेंडे साहेबांनीही गाडी चालवणे योग्यवेळी थांबवले होते.कशाचाच उपयोग होत नव्हता.
शेवटी यांनाच उपरती झाली.ब्रेक पटकन दाबला जात नाही असे लक्षात आले.आपल्या गाडीखाली कोणी गेले तर काय असा विचार आला आणि आता गाडी विकूया असे त्यांनी जाहीर केले.जेथे गाडी दुरुस्तीला देत होतो त्यांनीच गिऱ्हाईक आणले.
                   मला हुश्य झाले.रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या वेळी गाडी विकली ते किती बरे झाले असे वाटायचे गाडी विकल्यानंतरचा पहिला दसरा आला.नेहमीप्रमाणे भरपूर झेंडूची फुले आणली.दाराची तोरणे केली. आता गाडीसाठी हार करायचा.आणि एकदम लक्षात आले गाडी कुठे आहे आता? आणि प्रथमच झेनच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले.ती आणल्यापासूनच्या आठवणी येऊ लागल्या.आपण तिला हकलायच्या नादात तिची पाठवणी किती निर्दयपणे केली.ती आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा होती.दरवर्षी सावंतवाडी,गोवा,बेळगाव अशी ट्रीप तर जवळजवळ ठरलेली असे.महाबळेश्वर, नाशिक सहल व्याही आणि विहीणबाईबरोबर केली होती.रत्नागिरीला समाजशास्त्र परिषदेला गेलो. माझ्या  आईला सोपान महाराज समाधी पहायची होती,आळंदी, देहू तर कितीक वेळा.मुलींच्या लग्नात हिने खूप धावपळ केली.लेकीला रात्री डीलीव्हरीसाठी नेताना हिचाच आधार होता.छोट्या बाळालाहि हिने आणले. आणि हे बाळ मोट्ठे  झाले  तर आमच्या कडे झेन आहे म्हणून त्यांनी आमचे झेन आज्जी आणि झेन अब्बू असे नामकरण केले. झेन गेली तरी हे नाव मात्र आम्हाला चिकटलेलेच राहिले.
                  पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम सुरु केल्यावर हडपसर,कात्रज,औंध,कोथरूड अशा पुण्याच्या कानाकोपर्यातील कित्येक घरभेटी हिच्या साथीने झाल्या.पेशंट असून गाडी चालवत येतात याचे इतरांना कौतुक वाटे.पीडी आटोक्यात होता तोवर हे ठीक होते.झेन गेल्यावर आमच्या घरभेटीना मर्यादा आल्या.मंडळाच्या पहिल्या सहलीत बस बुक केली होती ऐन वेळी लोक वाढले आणि ही मदतीला आली.अशा या सखीच्या बाबत मी रुक्ष कोरडी कशी झाले.मला प्रकर्षाने वाटले आपण तिच्यावरून हात फिरवून धन्यवाद. तरी म्हणायला हवे होते. प्रेमाने तिची पाठवणी करायला हवी होती राहूनच गेले.
(' संपूर्ण ' या मित्रगणात' गेले द्यायचे राहुनी' असा विषय दिला होता त्याला अनुसरून लिहिले आहे. आरती प्रभू यांच्या कवितेतील ओळीलक्षात घेऊन नाही.)

Monday, 17 April 2017

उत्साह्मुर्ती विद्याताई देशपांडे

                                                     उत्साह्मुर्ती विद्याताई देशपांडे
आमची सर्वात तरुण मैत्रीण विद्याताई देशपांडे यांनी आज ८० व्या वर्षात पदार्पण केले.त्यांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख समाधान लाभो.
विद्याताईंची आणि आमच्या कुटुंबाची ओळख खुप पूर्वीची.त्यांची मुकुंदनगरची  किलबिल शाळा खूप प्रसिद्ध होती. आमच्या भागात त्यांनी बंगला बांधला.नव्यानेच  वस्ती विस्तारत होती. येथेही त्यांना किलबिलची शाखा काढायची होती.आमच्या साठी ही खूप चांगली सोय होती.आम्ही दोघींनी घरोघर जाऊन शाळेबद्दल सांगितले. बघता बघता अनेक विद्यार्थी दाखल झाले..माझी मुलगी शाळेची  पहिली विद्यार्थिनी.तिच्या मार्फत विद्यार्थ्यात विविध मुल्ये रुजवण्यातील त्यांची कल्पकता,शालेचा दर्जा अत्युत्तम ठेवण्याची त्यांची तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती.घराजवळ उत्तम शाळा मिळाल्याने आम्ही खुश होतो.त्यांचे वेगळेपण सांगणारे एक उदाहरण सांगते. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदना साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते.त्यादिवशी धोधो पाऊस.कोणीच गेले नाही.विद्याताई आणि त्यांच्या पतीनी स्वत:ची गाडी काढली आणि घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना आणले.एखादे काम हातात घेतले की काही झाले तरी करायचेच आणि तेही उत्तमरीतीने हे त्यांचे वैशिष्ट्य हळू हळू लक्षात येत होते.
आमच्या सेकंड इनिंगमध्ये ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.आम्हा निवृत्त झालेल्या अनेकांना भिमाले उद्यानाने एकत्र आणले.सकाळी मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू मिळतो आणि एकमेकिंकडून सकरात्मक उर्जाही.ही उर्जा देण्यात विद्याताईंचा वाटा मोठ्ठा असतो.आमच्या सर्वात पूर्ण पणे निवृत्त न झालेल्या फक्त विद्याताईच.त्यांच्या सुनेने आता शाळेचा भार उचलला आहे.पण विद्याताईंचे मन अजून शाळेत रेंगाळत असते.शाळेला पुढच्या वर्षी  ५० वर्षे होणार त्याची जोरदार तयारी आतापासून चालू आहे.कोणताही उपक्रम असो,घरगुती कार्यक्रम असो,संगीत क्लास असो,दैनंदिन व्यवहार असो, त्यातील नियोजनबद्धता,शिस्तबद्धता  ही त्यांची खासियत असते.
बागेत त्या फिरायला येतात. आमचा हास्यक्लब झाला की आम्ही काहीजणी ओंकार करतो.त्यांनी एक दिवशी फतवा काढला,ओंकारानंतर रोज एक प्रार्थना म्हणायची.ती आठवडाभर म्हणायची, ती तयार झाली की दुसरी.यासाठी त्यांनी गूगलवरून प्रार्थना शोधल्या. कोणत्या ओळी कितीदा म्हणायच्या या तपशिलासह सुंदर अक्षरात त्या  लिहिल्या. झेरॉक्स करून फाईलमध्ये घालून सर्वाना दिल्या.एव्हढ्यावर न थांबता गाणी रेकॉर्ड करून आणणे ती ऐकवणे,म्हणून घेणे हेही केले'.तू बुद्धि दे,' 'हमको मनकी शक्ती देना','ये मलिक तेरे बंदे हम','गगन सदन',' इतनी शक्ती हमे देना दाता' अशा अनेक प्रार्थना तयार झाल्या.हे करताना ताल,चाल, उच्चार हे सर्व व्यवस्थित होत आहे ना याकडे त्यांचे लक्ष असे प्रार्थनेच्या सकारात्मक सुरुवातीने दिवस सुंदर जायचा.त्यांच्या आजारपणात त्यांचे येणे बंद झाले आणि उपक्रमही थंडावला.आता त्या यायला लागल्या तो पुन्हा सुरु होईल.त्यांच्या उत्साहाचे कारंजे सतत उसळत असते. त्याच्या शिडकाव्याने  शुष्क झालेली मनेही टवटवीत होत असतात.कधी डोळ्याची शस्त्रक्रिया कधी गळ्याची,कधी इतर काही आजार यामुळे अनेकदा त्यांचे बागेत येणे बंद होते. सर्वच जेष्ठ असल्याने प्रत्येकाचेच असे आजार चालू असतात.विद्याताई मात्र त्यांच्या इच्छ्याशाक्तीच्या जोरावर डॉक्टरनी दिलेल्या मुदती पूर्वीच बऱ्या होतात. उत्साहाने कामाला लागतात.                      
                                                 गाण्याची आवड हा आम्हाला एकत्र आणण्याताला समान धागा आहे.ज्योती देशमुख यांचा संगीतानंद वर्ग त्यांच्या आणि आमच्या घरी असतो.बऱ्याचवेळा आम्ही एकमेकांचे स्पर्धक असतो पण ही स्पर्धा खेळीमेळीची असते.वैयक्तिक स्पर्धा असो किंवा दोन क्लास मधली असो.अटीतटीचे प्रयत्न आणि नंतर आत्मपरीक्षण हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.सवाईगंधर्व महोत्सव हा त्यांचा विकपॉइंट आहे.यासाठी त्या इतरानाही प्रवृत्त करतात. तिकीटे काढण्याची व्यवस्था,येण्याजाण्याची सोय यासठी धडपड करतात.त्यांची तब्येत पाहता आता यावर्षी काही त्या जाणार नाहीत असे वाटते.पण आपला होरा त्य खोटा ठरवतात.सकारात्मक विचार प्रबळ इच्छ्याश्क्ती या जोरावर त्यांचे सर्व चालते. त्यांची युरोप सहलही  या बळावरच झाली.
                  .घरात संस्कृतचा वारसा असल्याने  आणि काही काळ संस्कृत शिक्षिका म्हणून काम केल्याने संस्कृत उच्च्याराबाबतही त्या जागरूक असतात.कोणाच चुकत असेल तर बरोबर येईपर्यंत शिकवण्याची त्यांची तयारी असते.अनेकांना त्यानी गीता,श्रीसूक्त, विविध स्तोत्रे शिकविली आहेत.
                  उत्साही, स्पष्टवक्ती,व्यवहारी, कडक शिस्तीची,परफेक्शनिस्ट,जीवाला जीव देणारी  अशी ही आमची मैत्रीण आहे.तोंडावर एक बोलेल मागे वेगळेच असे नसल्याने मैत्री करणे, निभावणे सोपे जाते.
            आज त्यांचे जीवन कृतार्थ आहे.संस्कारक्षम वयात त्यांनी घडवलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनीअर,संशोधक,उद्योजक असे विविध स्तरात आहेत.बागेत भेटतात तेंव्हा आदरानी त्यांच्याशी बोलतात आमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही सुखाऊन जातो.
त्यांच्या मुली,जावई,मुलगा ,सून,नातवंडे सर्वच आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत त्या आनंदी आहेत.सखी अशीच हस्त रहा आनंदी राहा.
जीवेत शरद: शतम!

Sunday, 5 March 2017

आमचा हास्य परिवार - विविधतेतून एकता

                   आमची नव चैतन्य हास्ययोगपरिवारची   भिमाले उद्यान शाखा क्रमांक १४५ बघता बघता  १० वर्षाची झाली..शाखेचे जवळजवळ १३० सभासद पटावर आहेत.सर्व सभासद रोज हजर नसले तरी सहली,वर्धापनदिन,कोजागिरी कार्यक्रम यावेळी बहुसंख्य हजेरी लावतात.  शिवाय आमचे शिक्षक आणि संघटक एकनाथ सुगावकर गमतीने ज्याला एक्स्टर्नल सभासद म्हणतात असे बागेत वेगवेगळ्या कारणासाठी येणारेही आमच्या उपक्रमात सामील होत असतात.आमची शाखा विविध कारणाने वैशिष्ट्यपूर्ण आहे गावातील कोलाहल,गर्दी,वाढती रहदारी,प्रदूषण यापासून दूर असलेल्या विस्तीर्ण बागेत शाखा भरते. बागेत प्रवेश करताच कोणाचेही मन प्रसन्न होऊन जाते.यामुळेच बहुता  काटे सराना  हास्यक्लबची सीडी या उद्यानात करावीशी वाटली.
                  कोणताही  ऋतू,सणवार या कशाचीच शाखा सुरु राहण्यासाठी आडकाठी येत नाही.पाऊस,सण असल्यास संख्या कमी असेल पण बंद नाही.शाखेची सहल असली तरी सहलीला न येणारे जमून व्यायाम करतात.
                  कार्पोरेटर सभासद असलेली आमचीच शाखा असावी.श्रीनाथ भिमाले आणि वंदना भिमाले प्रथम पासून सभासद आहेत.सुरुवातीला ते रोज हजर असायचे आता कार्यबाहुल्यामुळे शक्य होत नाही.
                   महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे परिवार शब्द फक्त  नावापुरता नाही. वर्षे वाढली तशी केवळ व्यायामासाठी एकत्र येणे न राहता नातीही दृढ होत गेली.खऱ्या अर्थाने परिवार झाला.वाढदिवस लग्नाचा पन्नासावा वाढदिवस उत्साहात साजरे केले जातात.नातवंडांच्या यशाचा आनंद वाटला जातो.उत्सवमुर्तीबाबत इतर सभासद भरभरून बोलतात.किरण गांधी,पुष्पा देशपांडे सुंदर कविता करून देतात.फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वाढदिवस साजरे करून आनंद मिळणार नाही तेव्हढा येथिल जिव्हाळ्याने मिळतो.सभासदांना पुरस्कार मिळाले,की त्याचे कौतुक केले जाते. प्रत्येकाच्या सुखदु:खाच्या क्षणी,आजारपणात  इतर सभासद पाठीशी उभे राहतात.एखादा सभासद आजारातून उठून खूप दिवसांनी येतो सर्वजण त्याच्याभोवती गोळा होतात. आमच्याबाबतीत सांगायचं तर गेले काही दिवस मुलगी आणि जावई आमची आजारपणे पाहून आमच्याकडे राहायला चला म्हणत होते.आमच्या  मुलीने  ह्यांचा हास्यक्लबमध्ये पंचाह्त्तरावा वाढदिवस साजरा केलेला पाहिला.किती मोठ्ठा परिवार आमच्याबरोबर आहे हे तिने पहिले आणि आपल्याकडे ये म्हणणे बंद केले.मध्यंतरी गांधी पतीपत्नीनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस थाटामाटात साजरा केला.निमंत्रीतात त्यांच्या नातेवाईकांपेक्षा हास्यक्लबचे लोकच जास्त होते.         
                  आमच्या शाखे इतकी विविधता इतरत्र कोठेच नसेल सभासदात तरुण, जेष्ठ नागरिक असे विविध वयाचे स्त्री पुरुष आहेत.निरक्षरापासून  पीएचडीपर्यंत शिक्षण असणारे  आहेत. वकील,डॉक्टर,अभियंते,गृहिणी,उद्योजक.व्यापारी,प्राध्यापक,शिक्षक,सरकारी कर्मचारी,चार्टर्ड अकौंटंट,शेतकरी  अशी व्यावसायिक विविधता आहे.आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या स्तरातील आहेत.विविध जातीधर्माचे लोक आहेत.मराठी भाषिक बहुसंख्य असले तरी मराठी न येणारे इतर भाषिकही आहेत.         
  अशा विविध पातळ्यांवर  विविधता असली तरी त्यातून निर्माण झालेली एकता महत्वाची    आहे. ही विविधता आणि त्यातील एकता  आकडेवारी पुरतीच मर्यादित नाही तर सभासदांचे परिवाराशी आणि परस्पराशी जवळीकीचे नाते असणारी आहे.सहली,विविध समारंभातून,कौटुंबिक कार्याला सगळ्यांच्या जाण्यातून,सभासदांच्या सुखदु:खात सामील होण्यातून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जायचे असल्यास एकमेकांना सहकार्य करण्यातून ही नाती वृद्धिंगत झाली.हास्याच्या शेवटी असणारी शाबासकी सर्वांनाच आवडते.त्यातून होणारा स्पर्श प्रेमाची उब वाढवतो.    
            व्यायामाची वेळ ६.३० ते ७.३० आहे.पण व्यायाम संपला तरी अनेकांची पावले बागेत रेंगाळत असतात.राणी राजानी, पुष्पा देशपांडे,किरण गांधी,कुमुद नरांजे बागेला एकत्र फेऱ्या मारतात.कठड्यावर सावित्री पंजाबी,हिरा जगताप,यशोदा खंडेलवाल,शमीम बागवान या गप्पा मारत उन खात असलेल्या दिसतात.
कुसुम डीकोळेनी पायी पंढरपूर वारी केलेली असते त्यांना अनुभव सांगण्याची विनंती केली जाते.शमीम बागवान हाज यात्रा करून येतात. पाय सुजलेले असतात पण सर्वाना तेथून आणलेले पवित्र पाणी आणि खजूर देण्यासाठी आवर्जून येतात.आपले अनुभव सांगतात, गजराज .दोषींनी मधल्या वेळेत सांगितलेले जैन मुनींचे विचारही  ऐकले जातात.सध्या अमेरिकेला गेलेली ख्रिस्तिना सर्वाना केक देऊन ख्रिसमस साजरा करते.असा सर्वधर्म समभाव असतो.
                  हास्यक्लबमुळे आरोग्यविषयक फायदे होतात,आत्मविश्वास वाढतो,मानसिक आरोग्य सुधारते.मधल्या वेळेत होणाऱ्या चर्चातून सामजिक,राजकीय,सांस्कृतिक,कायदेविषयक,पर्यावरणविषयक ज्ञान मिळते.या सर्वापेक्षाही मला जास्त महत्वाचे वाटते ते.आज परस्परातील नाती दुरावत असताना हास्यक्लबमुळे ती जोडली जात आहेत,माणसामाणसातला संवाद वाढतो आहे.राष्ट्रीय एकात्मतेला पूरक वातावरण तयार होत आहे.ही चळवळ सुरु करणारे काटे सर आणि सुमनताई यांना सलाम.





Tuesday, 3 January 2017

लावा भांड्याला कल्हई

                          
 


 
                                                  
         घरोघरी आता तांब्या पितळेची भांडी इतिहासजमा झाली आहेत.त्यामुळे त्यासाठी लागणारी  कल्हई करणारा  कल्हईवालाही दिसेनासा झाला आहे.आमच्या लहानपणी खानापूरला पाटलांच्या कपड्याच्या दुकानाशेजारी  कल्हईवाल्याच दुकान होत. भांड्याची  कल्हई गेली की जायचं तिथ.पुण्यात आल्यावर पितळेची भांडी फारशी नव्हती.सासू सासरे शहापूर सोडून पुण्यात आल्यावर त्यांच्याबरोबर पितळेची भांडीही आली.आम्ही अजून ती वापरतो.त्यात पदार्थ बराच वेळपर्यंत गरम राहतो. आमच्याकडे येणाऱ्या अनेकांना त्याच अप्रूप वाटत.पूर्वी एक काम करणाऱ्या बाई होत्या. त्यांना त्याची कटकट वाटायची ही सगळी भांडी मोडीत का घालत नाही? अस त्या म्हणायच्या. आताची माझी मदतनीस जया मात्र याबद्दल कधी कुरकुर करत नाही.देव पूजेची तांब्याची भांडीही ती पितांबरीने चकचकीत करते.त्यामुळे मी तांब्या पितळेच्या भांड्याची ऐट करू शकते.सुरुवातीला एक कल्हईवाला आला. त्यांनी केलेली कल्हई ७/८ महिन्यातच गेली. गेली तीस एक वर्षे मात्र  इसाकभाई नावाचा चांगला कल्हईवाला मिळाला आहे.तीन चार वर्षे कल्हई टिकते.
                                    नुकताच हा कल्हईवाला येऊन गेला.नोटांचा काटकसरीने वापर करायचा म्हणून अत्यावश्यक गोष्टीवर खर्च करायचा ठरवलं होत.माझी कल्हई करायची सर्व भांडी दाखवल्यावर त्यांनी सातशे रुपये सांगितले मी मान्य केले.अशा दारोदार फिरून व्यवसाय करणाऱ्यांकडे घासाघीस करायला मला आवडत नाही.खर तर हे अत्यावश्यक मध्ये येत नव्हत.पण तरी ही,ही चैन करायचं ठरवल.दरवेळी तो आला कि मी आजूबाजूला,ओळखीपाळखीच्याना कल्हई करायची आहे का विचारते.कारण एखाद दुसऱ्या भांड्यासाठी कल्हईसाठीची सर्व मांडणी शक्य नसते.अशी भांडी यायचीही.पण यावेळी मात्र कोणाकडेच भांडी द्यायची नव्हती. काहीजण घरी नव्हते..कल्हईवाला मोठ्या आशेने  साहित्य ठेऊन गेला.आठ दिवसांनी मोकळ्या हाताने  गेला.मलाच वाईट वाटले.येथे हे सर्व देत आहे कारण आत्तापर्यंत त्याच्याकडे फोन नव्हता.संपर्क साधता येत नव्हता.आता मात्र फोन आहे.ज्यांना कल्हई करायची आहे त्यांना संपर्क साधता येईल.चकचकीत कल्हईची भांडी पाहून मिळणारे समाधान खरतर पैशात मोजता येत नाही.
इसाकभाई   ९६५७९४२५४२
     


Saturday, 10 December 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.

                   डॉक्टर वसुधा भंडारे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची समाज शास्त्र विषयातील विद्या वाचस्पती ( पीएचडी) पदवी मिळाली.अडचणींचा डोंगर पार करत संकटावर मात करत त्यांनी यशश्री खेचून आणली. मन:पूर्वक अभिनंदन! ६७ व्या वर्षी त्यांनी  मिळवलेले यश नक्कीच प्रेरणादायी आहे'.स्वेच्छां रक्त्दानासंबंधी पुणे शहरातील रक्तपेढ्यांचा समाजशास्त्रीय अभ्यास' असा त्यांचा पीएचडीचा विषय होता.
. त्यांच्या जिद्दी बद्दल  २० ऑगस्ट २००४ .च्या केसरीच्या अंकात' कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची' असा लेख लिहिला होता.त्यात लिहील होत,."डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'"  माझ भाकीत त्यांनी खर करून दाखवलं.त्यांची धडपड इथेच थांबणार नाही.त्यांच्या भविष्यकालीन योजनात काही  पुस्तकांचे लिखाण आहे.          
  माझे दूरस्थ विद्यार्थी - कहाणी एका वसुधाच्या जिद्दीची.
                                     भारतातील सामाजिक समस्या या विषयात वेश्या व्यवसायाच्या समस्येविषयी लिहायचे होते.त्यांच्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभव गाडीखान्यात काम करणाऱ्या कुसुम फुले यांना विचारावे म्हणून तेथे गेले होते.आमची चर्चा चालू होती.तेवढ्यात शुब्र वास्नातील गोऱ्यापान,प्रसन्न चेहऱ्याच्या परिचारिका तेथे आल्या.चर्चेत सहभागी झाल्या.'या वसुधा भंडारे' फुलेंनी ओळख करून दिली.चर्चेत त्याही सामील झाल्या.त्यांची निरीक्षणे,त्यांच्यासाठी काय करायला हवे हे सांगू लागल्या.या प्रश्नाविषयी आपल ज्ञान किती तोकड आणि पुस्तकी आहे असे मला वाटले..मी त्यांना म्हटल' खरे तर तुम्ही काम करणाऱ्या लोकांनी यावर संशोधन करायला हवे.'
                                    वसुधाताईनी एक सुस्कारा सोडला.क्षणार्धात त्यांचा प्रसन्न चेहरा उदास झाला.' खरे तर माझे पदवीचे स्वप्नही अपुरे राहिले आहे.उत्पध्यन्ते विलीयन्ते दरिद्राणा मनोरथा.'पुढे त्या म्हणाल्या,'तुमच्या विद्यापीठातून मुलासाठी माहिती पुस्तिका आणली होती.स्वत:हि प्रवेश घ्यावा असे वाटले होते.पण आता पन्नाशी जवळ आली आहे, स्वत:वर पैसे खर्च करायला नको वाटते'
                                   ' स्वप्न पुरे करायला वयाचा काही संबंध नाही.आमच्याकडे  ७५ वर्षाच्या गृहस्थानीही प्रवेश घेतला आहे.आणि आर्थिक बाबतीत म्हणाल तर मी तुमची फी भरते.जमेल तशी सवडीने परत करा.' मी त्यांना म्हटले.
                                    सात आठ दिवसांनी वसुधाताई फॉर्म भरून घेऊन आल्या.'तुम्ही येऊन गेल्यापासून खूप विचार केला.एक अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी फी भरायला तयार होते,तर आपण घेऊच प्रवेश असे ठरवले.पण मला जमेल ना हो?'
                                 ' न जमायला काय झाले? नक्की जमेल'.मी त्यांना म्हटले.वसुधाताईनी माझ्याकडून फीचे पैसे मात्र घेतले नाहीत.
                                    त्यांच्या भरगच्च दिनक्रमातूनवेळ काढून त्या मन लाऊन अभ्यास करत होत्या.शंका विचारायला येत होत्या.'मला जमेल ना हो' हे पालुपद मात्र सारखे चालूच असायचे.योग शिक्षक म्हणून काम करणे,नर्सिंगवर व्याख्याने देणे,होमिओपॅथी शिकणे असे इतर उद्योगही चालूच होते.तिसऱ्या वर्षापर्यंत त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला.त्या प्रथम श्रेणीत पदवीधर झाल्या.समाजशास्त्रा या विषयात  पहिल्या आल्या.त्यासाठीचे पारितोषिकही त्यांना मिळाले.
                                  आता त्यांच्या प्रतिभेला बहार आला होता.कथा लेख लिहिणे चालूच होते.त्यांच्या सर्व्हिसबुकमध्ये आता पदवीधर झाल्याची नोंद होणार होती.पगारवाढही होणार होती.पण नोकरशाही आड आली.'ही कुठली तुमची पदवी आम्ही नाही मानत' तिथल्या मग्रूर क्लार्कने सुनावले. खर तर अशी वेळ आली की विध्यार्थी निराश होतात. आक्रमक होऊन विद्यापीठात येतात.पदवीच्या सामाज्माण्यातेचे पत्र मागतात.पण वसुधाताईनी मात्र यातले काही केले नाही.त्यांनी शांतपणे माहिती पुस्तिकेतील शासन मान्यतेचे पत्र दाखवले.तरीही काम होत नाही म्हटल्यावर वरिष्ठांपर्यंत जाऊन तड लावली.
                               बी.ए. झाल्यावर त्या एम,ए.ही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या.आता त्या थांबणार नव्हत्या.टिळक विद्यापीठाच्या नेहरू विद्यास्थानात मुलाखतीद्वारे निवडक विद्यार्थ्यांना एम.फिल.साठी प्रवेश दिला जातो.तेथेही त्यांची निवड झाली.अभ्यासक्रमाला उपस्थिती गरजेची असते.वर्ग दुपारी असल्याने नोकरी सांभाळून हजार राहणे त्यांना शक्य होणार होते.नोकरीचा व्याप,मुलीचे बाळंतपण,स्वत:चे आजारपण ही तारेवरची कसरत करत त्या जीद्दीने एम.फिल. पूर्ण करत आहेत.परीक्षेच्यावेळीमणक्याचा आजार उद्भवला.बाकावर बसने अशक्य झाले.विध्यापिथाने पाठीला आधार घेऊन बसता येईल असी स्वतंत्र व्यवस्था केली.एक निवृत्त परिचारिका त्यांच्या औषध आणि इंजक्शनचे पाहत होती.
                                डोंगराएवढ्या अडचणी आल्या तरी वसुधाताई त्यांना दाद देणार नाहीत.मला या सर्वांबद्दल खात्री आहे.डॉक्टर वसुधा भंडारे एक दिवस पेढे घेऊन येतील आणि म्हणतील,'मॅडम मी पीएचडी झाले'.






Monday, 2 May 2016

कुलकर्णी सर आणि मॅडम

                        कुलकर्णी सर आणि मॅडम,गेल्या काही दिवसात तुमची खूप आठवण येते.किती किती जणांना सांगितलं मी तुमच्या बद्दल. कदाचित पुन्हा पुन्हाही.
काय झाल आमच्या संगीतानंद क्लासच्या ज्योती देशमुख मॅडमनी यावर्षी 'संगीतकार एक रत्नपारखी' अशी स्पर्धा ठेवली.आठ गट होते. प्रत्यकाला एकेक संगीतकार दिले.३० मिनिटात ते संगीतकार उभे करणार प्रेझेन्टेशन करायचं. त्या संगीतकाराची माहिती ,त्यांनी संगीत दिलेली  गीते,संगीताची वैशिष्ट्य इत्यादी त्यात असण अपेक्षित होत.आमच्या गटाला वसंत देसाई आले.त्यांच्या संगीतातील विविधता अशी थीम घेऊन सादरीकरण करायचं ठरलं.गुगलवर शोधाशोध सुरु झाली.
शोधताना 'प्यारकी प्यास'ला त्याचं संगीत आहे आणि त्यात राष्ट्रीय एकात्मतेवरच 'किसका देश' हे गीत आहे हे लक्षात आल.जवळ जवळ १० मिनिटाच्या या गाण्यावर सर,मॅडमनी मी आठवीत असताना साधारण ६१/६२ च्या दरम्यान गॅदरींगसाठी नृत्यनाट्य बसवलं होत. त्यावेळी लक्षात आल नाही. पण आत्ता वाटत एवढ मोठ्ठ धाडस कस केल होत.बंगाल,महाराष्ट्र,मारवाड,गुजरात,तामिळनाडू विविध राज्ये भारत आपलाच आहे म्हणत भांडत आहेत. भारत माता प्रगट होते. ती गाण्यातून या सर्वांना आपापासात वैर करू नका अस सांगते आणि नंतर सर्व एकत्र येऊन 'हम एक है....दुनियाके आगे बात ये सौबार हम कहेंगे|' म्हणतात.यात ४० तरी  मुली घेतल्या होत्या.खानापुरसारख छोट गाव.पालक पाल्य हे शब्द तेंव्हा अस्तित्वात नव्हते. गॅदरींगच्या ड्रेपरीसाठी भले मोट्ठे खर्च करण शक्य नव्हत. पण या दोघांची कल्पकता एवढी होती,हाताशी असलेल्या साहित्यातून त्यांनी विविध प्रदेशाची ड्रेपरी उभी केली.एक उदाहरण सांगते.मी यात मारवाडी होते.घरात जुनी ठेवणीतली साडी ती रुंदीत दुडून त्याला मोठ्ठा मोठ्ठा धावदोरा घालून नेफा बनवला होता.त्यात बंद घातला होता.कडेनीही मोठठा धावधोरा घातला आणि मारवाडी घागरा तयार. 'घेरदार घागर लुभायो'ला गिरकी मारून बसल्यावर तो पसरायचा.इतक मस्त वाटायचं.छोटे कच्चे पेरू दोन्हीकडून घासायचे थोडा चपटा झाला,की मधला गर काढायचा, वर एक चीर पाडायची आणि बेगड लावायच. चांदीचे  मोठे रिंग तयार.त्यावेळी टेपरेकॉर्डर होते की ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर गाण ऐकवल होत आठवत नाही पण आम्ही ते लिहून घेतलं नव्हत नक्की. ऐकून ऐकून
सर्वाना पाठ झाल होत कितीतरी दिवस तालीम चालू होती.आणि आश्चर्य म्हणजे आजही ते सर्व गाण मला आठवत होत.वसंतरावांच्या संगीताच एक वैशिष्ट्य, त्यांनी मराठी हिंदीबरोबर गुजराथी,इंग्लिश,तमिळ अशा विविध भाषातील चीत्रपटाना  संगीत दिल.सुब्बलक्ष्मीनी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक युनोत गायला त्याच संगीतही वसंतरावांच.त्यामुळे एक दुसऱ्या भाषेतलं गीत घ्यायचं ठरलं.मी 'बोन्धू रे...'हे बंगाली गाण  ऐकवल. सर्वाना ते खूप आवडलं.थोडा कोरस असल्याने इतरांसाठी पहिल्यांदाच कागदावर लिहील. वसंतरावांची इतर गीते युट्युबवरून रेकॉर्ड करून कितीतरीवेळा प्रॅक्टीस करावी लागली.पण हे गाण मात्र सहज बसल.हे गाण म्हणताना प्रत्येक वेळी तुमची आणि त्यावेळी केलेल्या धमालीची आठवण झाली.स्पर्धेच्यावेळी सर्वाना ते आवडलच. पण परीक्षकांनीही इतके कष्ट घेऊन बंगाली गाण बसवलं अस कौतुक केल.आम्ही काहीच कष्ट घेतले नव्हते. कष्ट तर त्यावेळी तुम्ही घेतले होते.उगाच कानकोंड्यासारख झाल.आम्हाला दुसरा नंबर मिळाला.खर श्रेय होत सर आणि मॅडम तुमच.ते तुमच्यापर्यंत पोचउन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन
प्रपंच.
वसंतरावांचा अभ्यास करताना ते  साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी होते हे लक्षात आल.त्यांची आठवण म्हणून त्यांनी बांधलेला मोगर्याचा गजरा त्यांनी आयुष्यभर त्यांची  हाताला बांधला.चांद्यापासून बांद्यापर्यंत देशभक्तीपर गीते शाळाशाळातून मोफत शिकविली.संस्कारक्षम वयात मुलांना देशप्रेम शिकवायला हव असा त्यांना वाटे.याच भावनेतून सर आणि मॅडमनीही हे राष्ट्रीय एकात्मता रुजवणार नृत्य बसवलं असाव. सर आणि मॅडमही सानेगुरुजी प्रेमी त्यांनी खानापुरला साने गुरुजी कथामाला चालविली.बेळगावहून कितीतरी वक्ते आणले जायचे.तुम्ही केलेल्या कितीतरी गोष्टींचा अर्थ आत्ता लागतो.आम्ही नशीबवान म्हणून तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला लाभले.

Wednesday, 6 January 2016

माझे दूरस्थ विद्यार्थी - गौतम ननावरे.

                         गौतम ननावरेना १०० विद्यार्थ्यातून ओळखायला सांगितलं तर मी कदाचित ओळखणार नाही. पण १००  विद्यार्थ्यांचे लेखन माझ्यासमोर ठेवले तर तर मात्र मी त्यांचे अक्षर आणि लेखन नक्की ओळखेन.कारण त्याना प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा त्यांच्या परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनाचा भाग असलेल्या गृह्पाठातून आणि पत्रातूनच त्यांची ओळख अधिक झाली आहे.
                       मी पीएचडीसाठी प्रश्नावली भरून पाठवलेल्या विद्यार्थ्याना धन्यवाद देणारे आणि  न पाठविणार्‍या विद्यार्थ्यांना ती पाठविण्याविषयी आवाहन करणारे असे एकत्र पत्र तयार करून पाठवले होते.झाले काय यानंतरही प्रश्नावली फार कमी आल्या.परंतु ज्यांना प्रश्नावली पाठवल्या होत्या अशा अनेकांची पुन्हा पत्रे आली.त्यातील एक पत्र होते ननावरेंचे. हे त्यांचे पहिले पत्र.पत्रात त्यांनी लिहिले होते.' मी बेस्टमध्ये नोकरी करत असल्याने मला मुंबईत कोठेही मोफत जाता येते.आपण मुंबई केंद्राच्या विद्यार्थ्यांचे पत्ते दिल्यास मी प्रश्नावली गोळा करून आणून देईन.' या बदल्यात त्यांना काही नको होते.मला जवळजवळ रोज भेटणार्‍या आणि अभ्यासक्रमातील शंका विचारायला येणार्‍या पुण्यातील विध्यार्थ्यानीही वेळोवेळी आठवण करूनही प्रश्नावली भरून देण्याबद्दल उदासीनता दाखवली होती.आणि हा अनोळखी विद्यार्थी मला मदत करू इच्छित होता.मला भरून आले.
                    मुंबई नगरीने अनेकाना रोजीरोटी दिली.आसरा दिला.ननावरेचे वडील हे सेंच्युरी मिलमध्ये नोकरीला होते.वरळीला गांधीनगर झोपडपट्टीत राहात.वडिलाना हातभार लावण्यासाठी गौतम दिवसा कारखान्यात काम आणि रात्रशाळेत शिकायचे.त्यांच्यावर दहावीला नापासाचा शिक्का बसला.शिक्षण सुटले आणि नोकरीही सुटली.नोकरी करत असताना होमगार्डचे शिक्षण घेतले होते.बक्षिसेही मिळवली होती. त्या आधारावर मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन मंडळ (बेस्ट) मध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी लागली. एवढ्यात वडील आजारी पडले.आई व गौतमवर काम करून घर सांभाळण्याची जबाबदारी आली.धाकट्या भावाचे शिक्षणही होते.शिकण्याची आवड बाजूला सारावी लागली.विचार करण्याची सवय होती ती मात्र हातातली होती.मग वृत्तपत्रे वाचायची,कात्रणे काढायची सवय लागली.मुंबई शहरातील घरे किती लहान पण गौतमनी दहाबारा वर्षातील विविध विषयावरील कात्रणांचा संग्रह जपून ठेवला.पुस्तकेही जमवली.थोडे थोडे लिखाण चालू होते.परंतु समाजाचा , समाजातील प्रश्नांचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही याची याची खंत होती.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातीलअभ्यासक्रमाची जाहिरात आली जसा हवा होता तसाच अभ्यासक्रम आहे असे वाटले.रात्र शाळेत शिकताना इंग्रजी तसे कच्चेच राहिले होते.हा अभ्यासक्रम मातृ भाषेतून असल्याने  काम सोपे होते.मनाच्या तळाशी जपून ठेवलेल्या स्वप्नांना उजाळा देणारी ही पर्वणीच वाटली.बघता बघता ननावरे पदवीधर झाले.
                   आधीपासून लेखन चालू होतेच.आता लेखनाला खोली आली.झळाळी आली.समाजाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन मिळाला.सामाजिक,आर्थिक,राजकीय प्रश्नांच्या मुळाशी जाऊन विचार करु शक्तो असा आत्मविश्वासही आला.एकदा लोकसत्तेतील त्यांचा लेख माझ्या वाचनात आला.परिपक्वता,व्यासंग,असणारे संयत लेखन वाचून मला कौतुक वाटले.मी त्याना त्याबद्दल पत्र लिहीले.आणि त्याला त्यांचे मोट्ठे उत्तर आले.त्यांनी त्यांच्या छापून आलेल्या विविध लेखांची यादी देऊन त्यावर अभिप्राय मागितला होता.बी.ए.अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर डिसेंबर ९० पासून जुलै ९२ पर्यंत लोकाप्रभा,नवशक्तीसारख्या मान्यवर वृत्तपत्रातूनव नियतकालिकातून त्यांचे विविध लेख छापून आले होते.त्यातील निवडक ३२ लेखांची ती यादी होती.भूतकाळाचा धांडोळा घेणारे,वर्तमानातील वास्तव टिपणारे,आणि भविष्याचा वेध घेणारे, राजकीय,सामाजिक,आर्थिक, परायावरण,विज्ञान अशा विविध विषयावरील ते लेख होते.
                      कामाच्या ठिकाणी तीन पाळ्या करत त्यांचे लेखन चालूच आहे.याशिवाय त्यांनी फोटोग्राफी,वायरमन,बागकाम अशा विविध छंद वर्गाचे अभ्यासक्रमही केले.बी,ए.झाल्यावर एम.ए.ही केले.मुंबईच्या एन.एम.कॉलेजमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.ननावरेंची पत्रकारिता आता बहरत चालली आहे.फक्त लोकप्रभा मध्येच ६७ लेख प्रसिद्ध झाले आहेत.याशिवाय लोकसत्ता, नवाकाळ,सामना,नवशक्ती,व्र्यत्त्मानास,बेस्त्वार्ता धर्मभास्कर,जनप्रवाह,सांज,दिनांक इत्यादीमधून जवळजवळ १५० कथा,कविता,वैचारिक लेख,मुलाखतीइत्यादी प्रसिद्ध झाले आहेत.त्याला सर्वसामान्यांप्रमाणे,मान्यवरांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.या सर्वांचे फलित म्हणून उत्कृष्ट साहित्य प्रमाणपत्र ,राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार,डॉक्टर ना.भी.परुळेकर स्मृती पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळाले.
                      ननावरेंची सामाजिक बांधिलकी फक्त लिखाणापुरती मर्यादित नाही.तर ती कृतीशील आहे.महाराष्ट्रातील शालेय मुलांसाठी ज्ञान विज्ञानाचे विविध उपक्रम राबविणार्‍या जिज्ञासा ट्रस्टमध्येही ते कार्यरत आहेत.सामाजिक कार्याबद्दल त्याना नागरमित्र पुरस्कार मिळाला आहे.शिवाजीराव भोसले,मंगेश पाडगावकर,अशोक नायगावकर यांच्यासारख्या मान्यवरांकडून पारितोषिक घेताना त्याना झालेला आनंद व समाधान हे शब्दातीत आहे. एका रात्रशाळेत शिकणार्‍या मुलाचा शैक्षणिक प्रवास कौतुकास पत्र असाच आहे.ननावरे पदवीधर झाल्यामुळे त्याना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी बढतीसाठी उपयोग होऊ शकेलही.पण त्यांच्या दृष्टीने हा हेतू दुय्यम आहे.पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.पत्रकारिता,सामाजिक कार्य या आवडीच्या क्षेत्रात काही करता येते हा आनंद मोठ्ठा आहे.त्यांच्या बी.ए. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकलेला लोकहितवादिनी सांगितलेला विद्येचा अर्थ ननावरे यांच्यासारखे विद्यार्थी आत्मसात करतात या गोष्टीचा आम्हाला आनंद होतो.लोकहितवादी विद्येबाबत म्हणतात ,केवळ पोट भरणारी ती विद्या नव्हे.तर विद्या म्हणजे ज्ञान जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो,विचारी होतो,विवेकी होतो.'.
( सदर लेख ११ डिसेंबर २००४च्या केसरीच्या अंकात उत्तुंग भरारी या सदरात छापून आला होता तो छापण्यास परवानगी दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार.)