Friday, 16 October 2015

अभिनंदनाच्या निमित्ताने

                                                 अभिनंदनाच्या निमित्ताने
                    माझी पासष्टी ओलांडलेली,मैत्रीण  प्रतिभा पारखे नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची संस्कृत या विषयात एम,ए.'A' ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाली.'मन:पूर्वक अभिनंदन.' खूप दिवसाच स्वप्न, निवृत्तीनंतर.पूर्ण झाल.पोस्टासारख्या निरस ठिकाणी काम करूनही त्यांनी आपली रसिकता,वाचन वेड जोपासलं.पण व्याख्यानांना हजर राहण, परीक्षा देण शक्य नव्हत.त्यामुळे एम.ए. जमत नव्हत.निवृत्तीनंतरही अडचणी येतच राहिल्या.दु:ख,अडचणी,समस्या या प्रतिभाताताईंच्या पाचवीलाच पुजलेल्या.त्यात लष्करच्या भाकर्या भाजण्याची हौस त्यामुळे. प्रतिभाताईंच हे यश भल्या मोठ्या  अडथळ्याची शर्यतच होती.आम्ही सर्व पाहिलं आहे त्यामुळे या यशच अप्रूप.त्याचं एम.ए. होण आम्हीही एन्जोय केल.या काळात त्यांच्या भेटीगाठी दुर्मिळ झाल्या होत्या मग त्याना गाठण्यासाठी त्यानीच सुरु केलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वाचनालयात.पुस्तक बदलायचं नसल तरी जायचं मग आमचा गप्पांचा फड जमायचा त्यांच्या अभ्यासातल्या, संस्कृत साहित्यातील अनेक गमती जमती समजायच्या  एम.ए. करताना, व्यक्ती म्हणूनही त्याचं विकसित होण आम्ही पाहिलं.
                  त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने त्यांचे सहाध्यायी,प्राध्यापक यांचही अभिनंदन करायचं आहे.कारण त्यांच्या  यशात  यांचाही मोठा   वाटा आहे.अनेकवेळा अभ्यासक्रम सोडून द्यावा अशी वेळ आली.पण हे सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहिले.त्याना मानसिक आधार दिला. पहिल्या वर्षानंतर पतीच्या निधनामुळे आता थांबू अस त्याना वाटत होत. पण या सर्वांनी हे होऊ दिल नाही .प्रवेश घ्यायची शेवटची तारीख होती.आता प्रवेश घ्यायचा नाही हे ठरऊन त्या विद्यापीठात गेल्या.पण प्राचार्य श्रीपाद भट म्हणाले, नाही .आता पैसे आणले नसले तर मी भरतो. पण प्रवेश घ्यायचा.सहध्यायानीही दुजोरा दिला.
                  टीमवीच्या संस्कृत विभागाने वाडा पडून उंच इमला झाला तरी, पर्सनल टच कायम ठेवला आहे हे पाहून मला आनंद झाला.भट सर आणि टीम लागे रहो!


Sunday, 4 January 2015

मला भेटलेले डॉक्टर वसंत गोवारीकर

                        डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या निधनानंतर वैद्न्यानिक,राजकीय नेते,सहकारी,सर्वानीच भरभरून लिहील.संशोधन ,लेखन,प्रशासन सर्वच पातळ्यावर समाजाभिमुख, विकासाभिमुख,उद्देशाभिमुख अस त्याचं काम राहील.अनौपचारिक सह्जसंवादी अस त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वर्णन केल गेल.मलाही याचा अनुभव आला.त्यांच्याशी भेट ही माझ्या  आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रेरणादायी अशी घटना आहे.त्याविषयी.
                    ' मी वसंत गोवारीकर बोलतोय 'मी फोन उचलला होता खरा पण दुसर्‍या बाजुने बोलणारी व्यक्ती? मला फोन का आहे हे लक्षात आल. पण हे अगदी  अनपेक्षित,धक्कादायक (सुखद) होत. माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता.अवसान गोळा करून मी थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
                  त्याच अस झाल,माझा एम.फिलचा विषय  निरंतर शिक्षण हा होता.पुणे विद्यापीठाच्या या विभागाचा १० वर्षाच्या काळाचा आढावा त्यात होता.१९८७ साली मी एम.फिल केल तेंव्हापासून हा विषय डोक्यात खदखदत होता.डॉक्टर गोवारीकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरु झाल्यावर मला आनंद झाला या समाजाभिमुख वैद्न्यानिकापर्यंत माझ म्हणण पोचवाव अस वाटल.  मी त्याना एक पत्र आणि सोबत टिळक विद्यापीठाच्या मासिक पत्रिकेत याविषयी आलेला लेख पाठऊन दिला होता.आणि आज त्याविषयी बोलायला हा फोन होता.
                 दुसर्‍या बाजूचा आवाज इतका आश्वासक आणि सहज संवादी होता.की माझ्या भीतीची जागा परस्पर सहज संवादात कधी बदलली मला समजलच नाही.त्यांनी लेख बारकाईने वाचला होता.त्याबाबतचे त्यांचे परदेशातील अनुभव सांगत होते.किती वेळ चर्चा चालली होती याच भान नव्हत.बेल वाजली.सर मी जरा दार उघडते,अस म्हणण्या इतका मोकळेपणा आता माझ्यात आला होता.दार उघडल्यावर आत येणार्‍या माझ्या नवर्‍याला मी हळूच सांगितलं डॉक्टर गोवारीकर बोलत आहेत.( मी तासनतास फोनवर बोलते याबद्दल नेहमी बोलणी खावी लागतात. मागून याबाबत काही कॉमेंट नकोत म्हणून ही खबरदारी होती).नंतरही कितीतरी वेळ बोलण चालू होत.फोन संपला तरी मी  अगदी हवेत होते.भारावलेपण थोड ओसरल्यावर अरे हे सांगायचं राहील ते बोलायला हव होत अस वाटत राहील.मी आभाराच आणि माझी ही भावना व्यक्त करणार
पत्र लिहील.
                   काही दिवसात दुसरा आश्चर्याचा धका बसला.पुणे विद्यापीठाकडून कुलागुरुनी भेटीला बोलावल्याच पत्र  आल.ठरल्याप्रमाणे मी गेले.कुलगुरुंच्या खोलीबाहेर अनेकजण बसले होते.शिपायांनी मला आत बोलावल्याच सांगितलं.कुलगुरुंच्या अलिशान रूमच दडपण,डॉक्टर गोवारीकरांच्या शांत,रुजू,आश्वासक व्यक्तीमत्वाने आणि बोलण्याने कोठल्याकोठे पळाल.थोडी चर्चा झाल्यावर त्यांनी निरंतर शिक्षण विभागाच्या तेज निवळीकराना बोलवून घेतल त्यांच्यासोबतही चर्चा झाली.माझ्याकडे आता सांगायचं राहील अस काही नव्हत.मी पूर्ण समाधानी होते.माझा एम.फिलचा थिसीस मी नेला होता.कुलगुरुनी निवळीकराना तो वाचायला सांगितला.माझ्या एम.फिल डिग्रीपेक्षा माझ्यासाठी हा सर्व अनुभव मोलाचा होता.
                 डॉक्टर गोवारीकराना पाठवलेल्या लेखाची लिंक सोबत देत आहे.आत्ता तो वाचताना मला स्वत:लाच त्यातला अपुरेपणा,मांडणीतला विस्कळीतपणा,भरपूर संपादनाची गरज जाणवली.अशा कच्च्या लिखाणाची त्यांनी  दखल घेतलेली होती.
http://shobhanatai.blogspot.in/2014/01/blog-post_6754.html
                
                 
                 
                      

Saturday, 3 January 2015

सावित्रीबाई फुलेना जन्मदिनी अभिवादन

                 जेष्ठ नागरिक संघाच्या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम ठरवला.समाजासाठी योगदान असलेली स्त्री निवडायची.तिच्यावर नाव न देता लिहायचे.जास्तीतजास्त पाच मिनिटांचा वेळ दिला होता.प्रेक्षकांनी कोण स्त्री ओळखायचे.जिजाबाई,झाशीची राणी पासून आजच्या सुधा मूर्तीपर्यंत अनेक स्त्रिया निवडल्या गेल्या.आमच्या भागात अमराठी लोकांची  संख्या जास्त आहे.त्याना अगदी सोप्या मराठीत सांगायचं होत.मी सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाई चौधरी निवडल्या होत्या.
आज सावित्रीबाईंच्या जन्मदिनी त्याच लेखनाद्वारे अभिवादन.


                                पुण्यापासून ३५ मैलावरच्या नायगावला सजवलेल्या खिलारी बैलगाडीने मंडळी मुलगी पाहायला निघाली होती.खंडोजी पाटलाच इनामदाराच घराण.एकुलती एक सुस्वरूप मुलगी पसंत पडली.यथावकाश ४/५ दिवस लग्न सोहाळा झाला.हत्तीवरून वरात निघाली.आणि मुलगी पुण्यात आली.ती ९ वर्षाची.आणि तो १३ वर्षाचा.१८४० चा काळ, नायगावमध्ये काय, पुण्यात काय, मुलीच्याबाबत परिस्थिती वेगळी नव्हती ती असायची एक मालकीची वस्तू.जणू गोठ्यातल जनावर.तिनी लिहीण वाचण शिकल की वैधव्य येत अशी समजूत असायची.मग कोणाची आहे बिशाद शिकायची.पण हे जोडप वेगळच होत.तिला शिकायची आवड आणि याला शिकवायची.दोघे शिवारात गेले कि फांदीच्या काटकीने' अ,आ,इ,ई 'शिकणे सुरु व्हायचे.आठ वर्षात ती खूप शिकली.भरपूर बुक वाचायला लागली.आणि हिच्या नवर्‍याच्या मनात स्त्रियांसाठी, शुद्रांसाठी शाळा काढायचं खूळ शिरलं.मग ही घरचीच शिक्षिक मिळाली.
                                   १८४८ मध्ये भिड्यांचा वाड्यात  शाळा सुरु झाली.समाजात खूप मोठ्ठा विरोध झाला.पण हे जोडप काही बधल नाही.म्हटल्यावर सर्वांनी तिच्या सासर्‍याला धरल.धर्म बुडाला अशी हाकाटी करत बहिष्कार घालू म्हणून धमकी दिली.सासर्‍यानी सामोपचारांनी सांगून पाहिलं.काही उपयोग झाला नाही.सासरेबुवा म्हणाले.माझ सांगण ऐकायचं नसेल तर घर सोडा.त्यांनी घर सोडलं.बरोबर रामाच्या मागे सीतेने जाव तस तीही बाहेर पडली.शाळा सुरूच राहिली.मग धर्ममार्तंड चिडले.तिच्या जायच्या यायच्या वाटेवर दबा धरून बसून तिला दगडाने शेणाने मारायला लागली.ती घाबरली नाही.उतली नाही मातली नाही घेतला वसा टाकला नाही.उलट त्याने सुचविले पिशवीत एक जादा लुगड घेऊन जा.शाळेत जाऊन बदल येताना पुन्हा पहिलच लुगड नेसुन ये.दोघांच्या कार्याचे सार्थक झाले.१६ नोव्हेंबर १८५२ मध्ये या जोडप्याचा ब्रिटीश शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.तो म्हणाला,"हा गौरव तुझाच आहे.मी शाळा स्थापण्यास कारण मात्र आहे.पण तू शाळा अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे चालविल्या.याचा मला अभिमान आहे"
                               या दांपत्याच काम फक्त शाळा सुरु करून थांबले नाही.त्या काळात बालविवाह होत.बालमृत्यूच प्रमाणही मोठ्ठ होत.मग लहान वयात मुलगी विधवा होई.तीच केशवपन केल जाई.तिच्या रोजच्या जगण्यावर अनेक मर्यादा येत.सती जाणारी एकदाच मरे.हिला मात्र रोजच मरण यातना सोसाव्या लागत.कधी तरुण वय पाय घसरे.कधी समाजातील बुभुक्षितांच  त्या सावज बनत. अशावेळी दिवस राहिले की,जीव देण्याशिवाय दुसरा पर्यायच नसे.मग यांनी आपल्या राहत्या घराशेजारीच १८६० मध्ये वाडा बांधला.विधवा बायकांनी इथे यावे गुप्त रीतीने बाळंत होऊन मुल ठेऊन जावे अशी सोय केली.भितीभिंतीवर याची माहिती देणारी पत्रके लागली.इथ झालेलं पहिले मुल त्यांनीच दत्तक घेतले.या मुलांसाठी अनाथाश्रम सुरु केला.त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आश्रम काढले.
                          शाळा असो,अनाथाश्रम असो,अस्पृश्याना पाण्यासाठी हौद खुला करणे असो,न्हाव्यांचा संप असो,विधवाविवाह असो की दुष्काळ निवारणार्थ अन्नछत्र  असो ही पतीच्या खांद्याला खांदा देऊन उभी राहिली.उलट प्रसंगी धीर दिला.त्या एका पत्रात त्याना लिहितात, "पुण्यात आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदुषक खूप आहेत,तसेच येथेही आहेत त्याना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे.सदासर्वदा कामात गुंतावे.भविष्यातले यश आपलेच आहे"
                        अशी ही पतीच्या मागे केवळ अंधानुकरणाने जाणारी नव्हती.तर डोळस सहधर्मचारिणी होती.तिचा पतीही तितकाच खंबीर साथीदार होता.तिला मुल नाही म्हणून दुसरे लग्न करायची गळ अनेकांनी घातली.पण त्याने मानले नाही.
                       पतीला अर्धांगवायू झाला.तिने धैर्याने तोंड दिले.मनापासून सेवासुश्रूषा केली.मृत्युनंतर विश्वास घातकी भाऊबंदान्चा स्पर्शही होऊ देऊ नका असे त्याने सांगितले.तिने ही इछ्या पूर्ण केली.पतीच्या अंतिम यात्रेत गाडगे पुढे घेऊन जाणारी ही एकमेव स्त्री असावी.पती निधानानंतरही रडत न बसता त्यांचे शिक्षणाचे कार्य,सत्यशोधक समाज तिनी चालू ठेवला.कविता, भाषणे,संपादन हेही कार्य ती करत राहिली.पुण्यात प्लेगची साथ आली.दत्तकपुत्र यशवंत डॉक्टर झाला होता.ही त्याच्या मदतीला धावली.जातीपातीचा विचार न करता सेवाकार्य करत राहिली.दवाखाना गावाबाहेर.रुग्णांना पोचविण्यासाठी वहाने मिळणे कठीण होते.एका अस्पृश्य मुलाला प्लेगची लागण झाली.ही सरळ त्याला पाठीवर घेऊन मुलाच्या दवाखान्यात पोचली.अखेर हिलाच प्लेगची लागण झाली.आणि त्यातच १० मार्च १८९७ मध्ये तिचा मृत्यू झाला.अशी ही मृत्युंजय क्रांतीज्योती कोण बरे?

Monday, 10 November 2014

चैतन्याचा झरा


                                             चैतन्याचा झरा

.
'स्काइपवर येऊ शकाल का?' पटवर्धनांचा सकाळी ११.३० ला फोन आला.खर तर माझा स्वयंपाक व्हायचा होता इतरही कामे होती.पण त्यांच्या स्वरात इतका उत्साह होता.मला नाही म्हणवल नाही.त्यांचा मुलगा त्यावेळी जपानमधून संपर्कात होता.त्यांना  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग करून पहायचा होता.मला अंतरजालावरील बाबी हाताळण्याचे अत्यंत जुजबी ज्ञान,त्याना माझ्यापेक्षा थोडेच जास्ती आणि जपान मधल्या तज्ज्ञ मुलाची  अशा आमच्याबरोबर गाठ होती.तांत्रिक अडचणी येत होत्या.पण अनेक खटपटीनंतर प्रयोग किंचित पुढे सरकला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाल नाही पण होऊ शकेल असा अंदाज आला.पटवर्धनांनी मनावर घेतलं म्हणजे ते पूर्णत्वाला जाणारच यात काही संदेह नाही.दोन दिवसापूर्वीच मिटींगमध्ये चर्चा झाली आपल्या सर्वांच्या तब्येतींचा विचार करता, मिटींगसाठी येण्याजाण्याचा व्याप करण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केल तर काय हरकत आहे.आम्ही बोलबच्चन. त्यांनी मात्र लगेच कृती केली. त्यांच्यामुळे अशा अनेक गोष्टी माझ्याकडून शिकल्या जातात.त्यांच्या संपर्कात राहणे हेच एक प्रकारचे शिक्षण असते.

.शरच्चंद्र पटवर्धन म्हणजे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक.वय वर्षे ७९..परंतु संस्थापक म्हटलेलं त्याना अजिबात आवडत नाही.म्हटल तर ते दुरुस्त करून म्हणतात 'मी साधा कार्यकर्ता आहे.' हे फक्त बोलण्यापुरत नाही.त्याना तसच वाटत असत.त्याप्रमाणे त्यांची कृतीही असते.समारंभात मंचावर त्याना जबरदस्ती बसवावं लागत.त्यांच्या कामाला योग्य ती आणि तेवढीच दाद दिली तरी ते अवघडतात.

  पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.

'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल  हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.

स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर  सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके  विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार  विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.

 या वयातही उन असो, पाउस  असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता१००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस  जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते  वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.

 ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते  फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.

लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे  त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा  आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या  की त्यांच्या  औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक !

त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.

पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात शंका असतात.एकदा त्यांनी विचारल संस्कृत आपण देवनागरीत पाहतो तस इतर लिपीत असत का?प्रथम कोणत्या लिपीत सुरुवात झाली वगैरे.अर्धवट माहितीवर उत्तर देऊन चालणार नव्हत मग मी माझ्या ओळखीतल्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना विचारल.काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.

एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.या वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी  कोणीतरी मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाला अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी हॉस्पिटलचा सर्व  चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह  दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.
त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.

सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम  स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.

शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे  पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.








Sunday, 10 August 2014

प्रसिद्धी पराङमुख,परोपकारी रामचंद्र देशपांडे.

( ४ डिसेंबर १९९२च्या बेळगाव तरुण भारत अंकात आलेला लेख  जसाच्या तसा देत आहे.)
खानापूर तालुक्यातील विकासात अनेकांचे योगदान आहे.त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे रामचंद्र विष्णुपंत देशपांडे.समाजात ते परिचित आहेत ते मात्र रामभाऊ या नावाने.नुकतीच त्यांनी वयाची पंचाहत्तरी पुरी केली.त्यांची प्रसिद्धी पराङमुख वृत्ती माहित असल्याने त्यांच्या मुला नातवंडानीच त्यांनाही न सांगता एकत्र जमून घरगुती स्वरूपात अनौपचारिक रीतीने पंचाहत्तरी सोहळा पार पाडला.त्या निमित्त्याने त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला करून देणे आवश्यक आहे.
 


        खानापूर अर्बन बँकेच्या १९७२ साली झालेल्या सुवर्ण महोत्सवी समारंभात महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब भारदे व कै.बाबुराव ठाकूर यांच्या समवेत रामभाऊ देशपांडे


जीवन परिचय
रामचंद्र देशपांडे तथा आण्णांचा जन्म११ ऑगष्ट १९१७ साली झाला.लहानपणीचा वडिलांचे कृपाछत्र  हरपले.आईनी सांभाळ केला.मुलाकीपर्यन्तचे शिक्षण कसेबसे घेता आले.पुढे शिक्षणाची सोय नव्हती.घरची जबाबदारीही तेराव्या वर्षीच स्वीकारावी लागली.परंपरेने कुलकर्णीपद चालून आलेले.अंकले ह्सनवाडी,खेमेवाडी या गावाचे कुलकर्णीपद होते.ते काम १९४५ डिसेंबरपर्यंत केले.या काळात ब्रिटीश सरकारची सक्तीची लेव्ही वसुली सुरु झाली.गरिबांच्या कडून सक्तीने लेव्ही घेणे न  पटल्याने कुलकर्णीपदाचा राजीनामा दिला.
राजकीय सहभाग
सार्वजनिक कामाची आवड रक्तातच भिनलेली.ती स्वस्थ बसू देईना.१९४५ साली लोकल बोर्डाच्या निवडणुकीला उभे राहिले.आणि निवडूनही आले.पदाचा उपयोग खानापूर तालुक्याच्या मागासलेल्या पश्चिम भागाच्या विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात केला.हे कार्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता आपल्या पत्नीलाही निवडणुकीस उभे राहण्यास प्रवृत्त केले.त्या काळात हे विशेष म्हणावे लागेल ग्रामपंचायतीचेही ते काही काळ सदस्य होते.खानापूर येथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना झाली त्याचे ते खजिनदार होते.संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्याच्या वेळी सत्याग्रहीना आमच्या घरी जेवण असायचे हे मला आठवते.
अर्बन बँकेतील कार्य
खानापूरच्या आर्थिक विकासात खानापूरच्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मोठ्ठा वाटा आहे.अर्बन बँकेच्या उभारणीत आणि प्रगतीत आण्णांचा सिंहाचा वाटा आहे.१९५१ ते १९८० पर्यंत ते अर्बन बँकेच्या संचालक मंडळावर होते.त्यामध्ये सहा वर्षे चेअरमन म्हणूनही काम केले.त्यांच्याच अध्यक्ष पदाच्या काळात बँकेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला.तो यशस्वी होण्यासाठी घेतलेले अपार कष्ट आम्ही पाहिलेले आहेत.बँकेला इमारत नव्हती.इमारतीसाठी जागा मिळविण्यासाठी बरेच परिश्रम घेतले.१९५५ मध्ये इमारत बांधून घेतली.
साखर कारखान्याची सुरुवात
अर्बन बँकेचे चेअरमन असताना खानापूर तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी सहकारी तत्वावर कारखानदारी सुरु करणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन पहिली बैठक बोलाविली.यातून सहकारी तत्वावर कारखाना उभारण्याची कल्पनापुढे आली.केवळ कल्पना मांडून न थांबता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कै.निळकंठराव सरदेसाई यांच्या बरोबरीने कार्य केले.सुरुवातीची काही वर्षे ते या कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते पुढे डोळ्याचा त्रास सुरु झाल्याने पदाचा राजीनामा दिला.
धार्मिक व सामाजिक कार्य
आण्णा प्रथमपासून धार्मिक वृत्तीचे परंतु ही धार्मिक वृत्ती कर्मकांडाकडे झुकणारी नाही तर भक्तिमार्गावर भर देणारी.नैतिकता जोपासणारी आहे.वारकरी संप्रदायाचा अधिक प्रभाव आहे.पंढरीची वारी त्यांनी कधी केली नाही.'येथेच पंढरपूर' या वृत्तीने खानापूरचे विठ्ठल मंदिर व पांडुरंग हेच अधिक जवळचे वाटले.या संदर्भात पुरोगामीपणाचा कुठेच गाजावाजा न करता अनेक जातीच्या लोकांशी त्यांचे जवळीकीचे संबंध होते.भक्ती मार्गातील त्यांच्या भजनी मंडळाबरोबर असताना त्यांनी सार्वजनिक जीवनातील मोठेपणा नेहमीच बाजूला ठेवला.
१९३८ पासून ते देवस्थान कमिटीवर होते.१९४८ साली कम्प्लीट देवास्थान कमितीचे ट्रस्टी म्हणून काम केले.१९५५ पर्यंत रवळनाथ देवस्थान कमिटीचे चेअरमन व गेली ४५ वर्षे पांडुरंग देवस्थान कमिटीचे चेअरमन आहेत.अत्यंत कमी उत्पनात देवस्थानचा सर्व कारभार सांभाळणे,कीर्तने,पुराण,काकड आरती,इ.पूर्वापार गोष्टी चालू ठेवणे हे अत्यंत जिकीरीचे काम.परंतु गेली ४५ वर्षे ते हे काम कोणतीही तक्रार न करता गाजावाजा न करता करत आले आहेत.
आज सार्वजनिक कामात सहभागी होणार्‍यांनी पदरी माया जोडण्याचा जमाना सुरु होत आहे.आण्णांनी मात्र सार्वजनिक कामात पदरमोडच अधिक केली.तालुक्याच्या ठिकाणी कामास येणारे अनेक लोक आमच्याकडे राहावयास असत.कीर्तनकार पुराणिक यांची जेवणाची सोय नसेल तर तीही अनेकवेळा आमच्याकडे असे.आर्थिक परिस्थिती फार उत्तम होती असे नाही.तरीही अनेकाना शिक्षणात सहकार्य,लग्नकार्यात सहकार्य,ज्यांचे मागेपुढे कोणी नाही,गरिबीमुळे ऐपत नाही अशांच्या अंतिम संस्कारांसाठी सहकार्य इ.मध्येंआण्णांचा नेहमी पुढाकार असे.त्यांनी कुणाला किती मदत केली याचा हिशोब कधी ठेवला नाही.परंतु आण्णांनी केलेल्या मदतीमुळेआयुष्यात पुढे आल्याचे स्मरण ठेऊन त्या व्यक्ती जेंव्हा सांगतात तेंव्हाच ते समजते.भांडे मिटवणे,एकमेकातील गैरसमज दूर करणे यासाठी मध्यस्ताची भूमिका निभावताना त्याना अनेकवेळा पाहिलं आहे.त्यांच्या सर्व कार्यात आईनेही विना तक्रार सहाय्य केले.आजही त्यांची अशी कामे चालूच असतात.आम्ही पुण्यामुंबईला राहणारी मुले,मुली,नातवंडे त्याना व्यवहारी होण्याचा सल्ला देत असतो,परंतु त्यांच्यात काही फरक पडत नाही.
व्यक्तिमत्वाचे पैलू
आज आपल्या नातेवाईकाना आपल्या क्षेत्रात पुढे आणून घराणेशाही चालू ठेवण्याचे युग आहे.परंतु आण्णांनी मात्र आपल्या प्रतिष्ठेचा स्वत:च्या फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही.आम्हाला नोकर्‍या मिळवून देण्यासाठीही त्यांनी हे केले नाही.खर तर त्यांच्या एका शब्दावर ही कामे झाली असती.त्यावेळी त्यांचा राग आला तरी याद्वारे शुद्ध चारीत्र्याचा त्यांनी आदर्श घालून दिला हे आज जाणवते.कर्मण्ये वाधिकारस्ते हा गीतेचा संदेश त्यांनी जीवनात प्रत्यक्षात उतरविला असे मला त्यांचे जीवन चरित्र पाहताना वाटते.त्यांचा धोरणीपणा,दिलदारपणा,बुद्धिमत्ता,कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची वृत्ती,निरपेक्ष प्रेम करण्याची वृत्ती,आधुनिक काळाशी जमवून घेण्याची वृत्ती,या सर्वाबाबताच्या अनेक आठवणी आहेत.परंतु हे सर्व लेखाच्या व्याप्तीत मावणे कठीण.यासाठी पुस्तकच लिहायला हवे.
आज त्यांची मुले मुली नातवंडे,वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात यश मिळवत आहेत.सर्वांनाच आण्णांबद्दल अपरंपार आदर आहे.आण्णांचा आशीर्वाद व पुण्याई पाठीशी आहे म्हणून आम्ही सुखी आहोत अशी माझी भावना आहे.त्याना दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
( आज आण्णा आमच्यात नाहीत.परंतु आठवणी आहेत.११ ऑगष्ट या जन्मदिनी त्याना आदरांजली सर्व लेकीसुना,मुलगे जावई,नातवंडे,  पणतवंडे या सर्वाना आण्णांच्या कार्याची माहिती व्हावी म्हणून हा जुना लेख  देत आहे.)

Thursday, 24 July 2014

लोकमित्रकारांच्या शोधात



    
                                      माझ्या सासर्‍यांच्याजवळ धार्मिक,ज्योतिषविषयक,संस्कृत साहित्य इत्यादी पुस्तकांचा संग्रह होता ही पुस्तके पाहताना अचानक' लोकमित्र'चा अंक हातात आला.अंक १९३६चा होता आणि संपादक म्हणून नाव होते द.गो.सडेकर यांचे.मागे लिहिले होते 'हे पुस्तक खानापूर जिल्हा बेळगाव येथे द.गो.सडेकर यांनी आपल्या धनंजय प्रेसमध्ये छापिले.व घनं.६४३ येथे लोकमित्र ऑफिसात प्रसिद्ध केले' हा पत्ता तर आमच्या घराच्या शेजारचा होता.माझे कुतूहल चाळवले.
.                        
                                    अंक छोट्या पुस्तकाच्या आकाराचा.१०० पानी होता.भरगच्च मजकुरांनी भरलेला होता.विविधताही होती.स्वामी रामतीर्थ,रामकृष्ण परमहंस,विवेकानंद यांची वचने होती.तसेच गटे,यंग,ब्राउनिंग,डिकन्सयांच्या लेखातील सुभाषित वजा वाक्ये होती.कथांमध्ये विनोदी व सामजिक कथा होत्या.सौ स्नेहलता नावाच्या लेखीकेचीही कथा होती.

पाककृतीत श्रीखंडाची,अर्काची,सुंठीची फळाच्या पेपरमिंटाची कृती होती.विशेष म्हणजे या पाककृती देणारे सदाशिव परांजपे नावाचे लेखक होते.

'लंका बेटाचे वर्णन' यात सिलोनची विस्तृत माहिती होती.'धर्मो रक्षती रक्षित:' नावाचा विस्तृत लेख होता.याचे स्वरूप नियात्कालीकाबरोबर बातमिपात्राचेही असावे.कारण प्रासंगिक विचार नावाच्या सदरात देशातील विविध घडामोडी व त्यावर भाष्य होते.

इहवृत्त सदराखाली 'थंडी बरीच पडत असून रोगराई ऋतूमानाप्रमाणे आहे.गावाबाहेर नवीन बांधत असलेले पोष्ट ऑफिस तयार होत आहे.एप्रिल१९३६ पासून ते खुले होईल'.अशी खानापुराची बातमी होती.तसेच नंदगड येथील नागेश महादेव नाईक या २४/२५ वर्षाच्या तरुण मुलाचे देवीच्या आजाराने पुण्यात निधन झाल्याचे वृत्त होते.

समस्यापूर्ती या सदरात ग्वाल्हेर ,सांगली,गोवा, संकेश्वर,कल्याण अशा विविध भागातून प्रतिसाद दिला होता.शब्दकोड्यांच्या उत्तराबाबतही हेच दिसत होते.विशेष म्हणजे' चिं.वी. जोशी यांच्या लघुकथाबद्दल दोन मुद्दे' नावाचा लेख होता.वी.वा.जोशी कन्नडकर यांचे मासिक राशी भविष्य होते.अंकाच्या शेवटी जाहिराती होत्या.यात प्रवासाला निघण्यापूर्वी ठेवण्यासाठी कॉलरा,खोकला,कफ यावर इतर पोटाच्या विकारावर उपयुक्त अशा सुधासिंधू  या सुख संपादक कंपनी मथुरा यांची जाहिरात होती.किर्लोस्कर बंधूंच्या पोलादी फर्निचरची जाहिरात होती.वर्गणीदार वाढवण्यासाठी नवीन वर्गणीदार होण्याचे आव्हान देताना १० आणे किमतीचे कोकिळेचे बोल हे पुस्तक बक्षिस देण्याचे आमिष दाखविले होते.

तत्कालीन विविध नियतकालिकांप्रमाणे ज्ञानप्रसार हाच याचा उद्देश असावा.कारण सनातनी सुधारक अशा कोणत्याच गटात बसणारे ते वाटत नव्हते.'धर्मो रक्षिती' मध्ये सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ विचारांची टर उडवली होती.प्रासंगिक विचारात आंबेडकरांच्या धर्मांतरावर लिहिले होते.जुन्या धर्तीच्या कविता होत्या दर्जा तसा सुमार होता.असे असले तरी खानापूरसारख्या तालुक्याच्या गावातून असा अंक निघणे हे विशेष होते.

असा अंक आपल्या शेजारच्या घरातून निघत होता आणि आपल्याला त्याची माहितीही नव्हती याची खंत वाटली.द.गो.सडेकरांचा  त्यांच्या घरातील बाहेरच्या खोलीत लावलेला मोठा फोटो मला आठवत होता.याशिवाय द.गो.सडेकर आणि लोकमित्र यांच्या खुणा खानापुरात मला तरी दिसल्या नाहीत.येथील लोकाना इतिहासाची जाण नाही हे चीनी प्रवाशाचे इतद्देशियासंबधीचे उद्गार आठवले छोट्या गावात तांत्रिक दृष्ट्या उत्तम छपाई असलेले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर खप असणारे मासिक चालवणार्‍या सडेकरांबद्दल कुतूहल जागृत झाले.हा माझा विषय नाही म्हणून मी दुर्लक्ष करू पाहात होते.आणि माझ्याही नकळत लोकमित्राकारांच्या शोधात होते.

सडेकरांच्या वंशजांकडे बरीच माहिती मिळेल असे वाटले होते.पण त्यांच्याकडे एक चीठोराही नव्हता.जे काही होते ते धुळाप्पाच्या चीरमोर्‍याच्या  दुकानात रद्दीला घातले गेल्याचे समजले.सडेकरांच्या कन्या रोहिणी वागळे खानापूरच्या मुलींच्या शाळेत मुखाध्यापिका होत्या.वयोमानाप्रमाणे काही आठवत नसल्याने माहिती मिळाली नाही.त्यासूर्यापोटी शनैश्वर जन्मले अस आपल्या भावान्बद्दल म्हणत ते आठवल.तास का म्हणत याचा उलगडा होत होता.माझ्या वडिलांनी मात्र त्यामानाने बरीच माहिती पुरवली.'लोकमित्रमध्ये काम केलेल्या तंत्रज्ञाला बाहेर कोठेही डोळे झाकून घेतले जाई.चिं.वी.जोशींचे सुरुवातीचे लिखाण लोकमित्रमध्ये होते. लोकामित्रमध्ये लिहिणार्‍या लेखकाना प्रतिष्ठा प्राप्त होई.शंकरराव किर्लोस्करांनी लोकमित्रकारांचा किर्लोस्करवाडी येथे सत्कार केला होता.एकदा मुकुंदराव किर्लोस्कर खानापूरला आले होते आम्ही सर्व यळ्ळुर गडावर सायकलनी गेलो होतो' माहिती मिळवण्यासाठी थोडे धागेदोरे मिळत होते.

मुकुंदराव किर्लोस्करांच्याकडे साशंकतेनेच फोन केला.त्यांचा प्रतिसाद अनपेक्षित होता.फोनवरून ते भरभरून बोलत होते.'मी नुकताच गोव्यावरून आलो येताना खानापूर लागले जुन्या आठवणी जागृत झाल्या.मी त्यावेळी लहान होतो.लोकमित्रांच्या घरी राहिलो खरा पण मला त्यांची फारशी माहिती नाही.माझ्या वडिलांनी खानापुरवरून चाललास तर सडेकराना अवश्य भेटून ये.असे सांगितल्याने मी गेलो होतो.' पुढे ते म्हणाले, 'तुम्हाला भेटायचं असेल तर केंव्हाही फोन करून या'त्याना लोकमित्रबद्दल माहिती नसेल तर जाण्यात अर्थच नव्हता..

या दरम्यान बा.रं. सुंठणकरांचे १९व्या शतकातील महाराष्ट्रावर पुस्तक छापून आले.बा.रं. सुंठणकर बेळगावचे आणि इतिहासाचे अभ्यासक.त्याना निश्चित माहित असेल असे वाटून त्यांच्याकडे फोन केला.त्यांच्याकडून लोकमित्र हे चांगले मासिक होते आणि आर्थिक चणचणीमुळे बंद पडले एवढेच समजले.

यानंतर निवडक विनोदी कथांचा कोळारकरांनी संपादित केलेला संग्रह हातात पडला.त्यात खरे नावाच्या लेखकांनी लिहिलेली लोकमित्रमधील कथा होती.हा लोकमित्र कोणता याचा उल्लेख नव्हता.मी पुस्तक प्रकाशित करणार्‍या संजय प्रकाशनकडे फोन केला.त्यांच्याकडे मूळ नियतकालिके नव्हती.मुंबई मराठी ग्रंथालयात ती मिळतील असे सांगितले.लेखकांचा मिरजेचा पता पुस्तकात होता.तेथे जोडकार्ड पाठवले.लगेचच लेखकांच्या सुनेचे उत्तर आले.'१०/१५ दिवसांपूर्वी माझ्या पतींचे निधन झाले.मला विशेष माहिती नाही.माझे दीर पुण्यात राहतात त्याना भेटा'.हाही प्रयत्न व्यर्थच ठरला.

किर्लोस्करांनी सत्कार केला म्हणजे सत्काराचे वृत्त किर्लोस्कर मासिकात निश्चित आले असणार,किर्लोस्कर प्रेसमध्ये गेले.आता किर्लोस्कर प्रकाशन न राहाता अपूर्व कडे हस्तांतर झाले होते. एका काळोख्या खोलीत जुने अंक धूळ खात पडले होते.तेथून सडेकारांच्या सत्काराचे वृत्त असलेला अंक शोधणे जिकीरीचे होते,वेळखाऊ होते.माझे स्वत:चे व्याप सांभाळून वेळ देण्याची माझी तयारी नव्हती.माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते.कारण तसे ते योग्य दिशेने नव्हते.इतिहासाची साधने कशी शोधायची,त्यासाठी लागणारे कष्ट याची मला जाणीव होती पारन्तु मी समाजशास्त्राची प्राध्यापिका,कोणी इतिहासाची व्यक्ती हे काम करेल माझा याच्याशी काय संबंध अशी भूमिका योग्य मार्गांनी जाण्यास परावृत्त करीत होती.तर खानापुराची रहिवासी असून मला लोकमित्रकारांची माहिती नाही याची खंत निरर्थक प्रयत्न करायला भाग पाडत होती.एकूण लोकमित्रकारांनी मला झपाटले होते.

आणि एक दिवस नियतकालिकांची सूची चाळताचाळता मला लोकमित्रकारांची माहिती सापडली.इतके दिवस हा संदर्भ पाहण्याइतकेही कष्ट मी घेतले नाहीत.याबाबत मनातल्या मनात मी थपडा मारून घेतल्या.शेजारून निघणार्‍या नियतकालिकाची मी माहिती मिळऊ शकले नाही.आणि इतक्या नियतकालिकांची संपादकांची माहिती मिळविताना आपल्या समाजाची इतिहासाची जाण पाहता किती कष्ट पडले असतील.अशा प्रकारचा प्रकल्प हाती घेणार्‍या दातेंच्याबद्दल मन आदरानी भरून आले.घर,नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात संशोधन करणार्‍या आम्ही आमच्या पिढीची कीव कराविसी वाटली.

सूचित लोकमित्र व द.गो.सडेकर यांच्याबद्दल पुढील माहिती होती.

'जुलै १८९१ पहिला अंक १८९६ पर्यंत मुद्रक बेळगाव समाचार.
नोव्हेंबर १८९६ धनंजय छापखान्याची  स्थापना. यापुढील मुद्रक धनंजय छापखाना.
उद्देश सामान्य मराठी वाचकाच्या गरजा पुरविणे.
स्वरूप - चरित्रे,निबंध,गोष्टी,स्थळ वर्णने,कविता,मासिक,समालोचन,वाड्मयविहार,सुभाषित संग्रह,पुस्तक परिचय,मुलांचे जग,शोधबोध विनोद,भाषा वैचित्र्य,संस्था समाचार,प्रासंगिक विचार,महिला मनोरंजन.'हे स्वरूप ब्रीदवाक्याला अनुसरूनच होते.

'ब्रीदवाक्य - जितके अपुणासी ठावे तितके हळूहळू शिकवावे शहाणे करुनी सोडावे सकलजन - रामदास
२३व्या अंकापासून ब्रीदवाक्य - अद्वेष्टा सर्वभूतांनां मैत्र,करुण,एवंच | निर्ममो निरहंकारा : समदु:ख सुख:समो
३१व्या अंकापासून जननी जन्मभूमी स्वर्गादपि'
ज्ञान प्रसार ते राष्ट्रप्रेम अशा समाजातील बदलाच प्रतिबिंब नियतकालिकांच्या इतिहासात दिसत तसच इथंही दिसत होत.
यानंतर संपादन आणि संपादकांची माहिती होती.संपादक द.गो.चा होते सहाय्यक बदललेले दिसत होते.
'संपादक- द.गो.सडेकर व सहाय्यक म्हणून ना.ह.आपटे, वर्ष २६ ना.ना. गुणाजी,वी.वा हडप,वर्ष ३० का. रा.पॉलन ठाकर वर्ष ३१ चं.ह.पळणीटकर वर्ष ३३ याशिवाय कृ.ना आठल्ये,के.द. काशीकर यांची नावेही सह संपादक म्हणून होती.'
द.गोंची माहिती पुढीलप्रमाणे होती.
जन्म जुलै १८६० ,मृत्यू २८ नोव्हेंबर १९४१ .
शिक्षण मराठी पाचवी.ग्रंथ प्रकाशन,संपादन,मुद्रण,व्यापारउद्यम,समाजकार्य,कोश चरित्रकार,
संपादक - लोकमित्र

सूची लोकमित्र कारांची माहिती मिळाली परंतु ती अधिक कुतूहल चाळवणारी.पाचवी पर्यंत शिकलेल्या द.गो.ना नियतकालिकाची प्रेरणा कुठून मिळाली? याचे तंत्रज्ञान ते कोठे शिकले.?आर्थिक मदत कोणी केली?त्यांच्या मृत्युला ७५ वर्षेच झाली नाहित तोवर खानापूरकर त्यांना कसे विसरले? लोकमित्रकारांचा शोध अपुराच आहे.तरी २८ नोव्हेंबर या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली म्हणून हे लेखन
 यापुढे मात्र मला शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेऊन कुतूहल शाम्वायाचे आहे.लोकमित्रचे जुने अंक किंवा इतर माहिती असणार्‍यानी कृपया त्याबाबत माहिती कळवावी.
(तरुणभारत बेळगावच्या २८ नोव्हेंबर १९९४ च्या अंकात  हा लेख छापून आला होता.)


Sunday, 20 July 2014

फेसबुक,विस्मरण आणि अल्झायमर

                                             

                               बेळगावला एका लग्नात आमच्या लिंगराज कॉलेजमधील मराठीच्या प्राध्यापिका विजया धोपेश्वरकर भेटल्या.निकुंब सरांचा विषय निघण स्वाभाविक होत.'त्याना अल्झायमर झालाय कोणालाच ओळखत नाहीत.बघवत नाही.त्यामुळे जाण सोडून दिलंय' त्या म्हणाल्या.विद्यार्थ्याना लेक्चरच्यावेळी मंत्रमुग्ध करणारे, ज्ञानेश्वरीतील ओव्या,अनेक कविता, संत साहित्य मुखोद्गत असणारे सर स्मृती हरवून बसलेत?विश्वासच बसत नव्हता.
                     'अमलताश' वाचल्यावर इंदिरा संतांचीही हीच अवस्था झाल्याच समजल.यापूर्वी कुटुंबातील,ओळखीतल्या काहीना अल्झायमर झालेला पाहिला होता.पण या दिग्गजानाही? हा आजार झालेल्या व्यक्तीना काही समजत नाही.पण कुटुंबियाना,सहवासातील व्यक्तीना हे सर्व पाहण यातनामय असत.वय वाढत गेल्यावर आपलीही अशी अवस्था होणार नाही ना अशी भीती वाटू लागते.पार्किन्सन्स .   मित्रमंडळाचे काम करताना, जेष्ठनागरिकांबरोबर वावरताना बहुसंख्यांच्या मनात अशी भीती असते हे प्रकर्षाने जाणवले.थोड विस्मरण झाल तरी अल्झायमर होणार कि काय अस वाटत.निवृत्त, व्ही.आर.एस.घेतलेल्यांच्या बाबत हे जास्त आढळत.होत काय, आयुष्यभर काम केल आता थोडा आराम करू अस वाटत.यातूनच दुष्परिणामांची साखळी सुरु होते.वापरा नाहीतर गमवा या न्यायाने शरीर, मेंदू यांच्या क्षमता हळूहळू कमी होऊ लागतात.मेंदूची क्षमता  वाढवण्यासाठी विविध लेखातून, तज्ज्ञांच्या व्याख्यानातून काही गोष्टी सुचविल्या जातात. त्यात शब्द कोडी, सुडोकू सोडवण,जुन्या फोटोंचे अल्बम पाहून त्यातल्या व्यक्तींची नावे लक्षात येतात का पाहणे,सिनेमा टीव्ही.वरील भूमिकांची नावे आठवणे,जुन्या मित्र मैत्रिणी,सहाध्यायी यांची नावे आठवणे असा काहीकाही सांगितलं जात.शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी जस एरोबिक तस मेंदूला ताजतवान ठेवण्यासाठी, स्मरण शक्ती चांगली ठेवण्या साठी न्युरोबिकची गरज आहे असही न्युरॉलॉजिस्टनी व्याख्यानात सांगितलं होत.यासाठी रोज त्याच त्याच गोष्टी तशाच न करता  रोजच्या जगण्यात विविधता हवी.रस्ते बदलण,ब्रेकफास्ट,जेवणासाठीच्या जागा बदलण,उजव्या हाताऐवजी डाव्या हाताने काम करण अशा साध्या सध्या बाबीही महत्वाच्या.
                             आता या सगळ्याचा फेसबुकशी काय संबंध? सांगते.
                            माझ्या अस लक्षात आल. हे सगळ सांगितलं जात असल तरी प्रत्यक्षात  फारस कोणी यातल काही करत नाही.त्याला व्यायाम हे नाव दिल की करायचा कंटाळा येतो..या बाबी आपसूकच व्हायला हव्यात.आणि माझ्यासाठी तरी फेसबुकवरचा वावर यासाठी उपयोगी झाला.गाडीवरच्या काचेवरच पाणी वायपरनी स्वच्छ झाल की जस स्पष्ट दिसायला लागत तस अनेक गतस्मृतीना उजाळा मिळायला लागला.

                           मी टीमवीतून निवृत्त झाले त्याला सात वर्ष झाली.फारसा संपर्क राहिला नाही.२२ वर्षे ज्यांच्याबरोबर काम केल त्यांतील काहींची नावे आठ्वेनाशी झाली.हजारो विद्यार्थ्यांची नावे गावे माझ्या लक्षात असायची.हे काय झाल?फेसबुकवर तृप्ता, मंदार, वीणा  अशी एकेक मंडळी करत टीमवीजत्रा जमा झाली.अनेक आठवणी,नवीन घटना घडामोडी समजायला लागल्या.आता सहज नाव तोंडावर यायला लागली.
                          आमच्या देशपांडे फॅमिली या क्लोज ग्रुपवर बहिणी, भाऊ,त्यांची मुल, मुली,जावई,सुना,नातू,नाती,नातजावइ,नातसुना अशा ३७ व्यक्ती आहेत.ओळखा पाहू नावाखाली .कोणाकोणाच्या लग्नातले मुन्जीतील शाळेचे ग्रुपफोटो टाकले जातात.हयात असलेली नसलेली कितीकिती माणस समोर ठाकतात.खानापुरची खास खादाडी मध्ये विस्मृतीत गेलेले पदार्थ आणि त्याबरोबरच्या आठवणी घेऊन रुझुणतं पाखरू रुंजी घालू लागत.मेंदूला छान खुराक.
                         काही जुन्या संबंधित व्यक्ती तिसर्‍याच कोणाच्या तरी प्रतिक्रियेत भेटल्या.म्हणजे मायबोलीवरून ओळखीची  झालेली सई तिची मैत्रीण म्हणून सेतूची यशोदा .यशोदाद्वारे समाजशास्त्राचे नारायण चौधरी.फेसबुकनीच सुचविलेले डॉक्टर राजा दिक्षित असा मैत्रीचा आभासी जगाद्वारे  जुन्या, नव्या ओळखीच्या व्यक्तींचा. सुंदर गोफ विणला जात होता.यशोदाची ओळख आत्ता आत्ताची म्हणजे पाच सहा वर्षातली.सेतुदारे पण चौधरींची ओळख ९४ सालची.गुजरात युनिव्हर्सिटीत झालेल्या रिफ्रेशर कोर्सच्यावेळची.एकत्रित पाहिलेले टेक्सटाइल म्युझियम,अक्षरधाम,भारताच्या विविध भागातून आलेले आणि ज्याना मी पार विसरून गेले होते ते  प्राध्यापक प्राध्यापिका.सगळ आता घडून गेल्यासाख डोळ्यासमोर उभे राहील.त्यानंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठातील वातानुकूलिक रूममधल्या मिटिंगज, वरखेडेन्च्या घरचे जेवण त्याबरोबर रंगलेल्या साहित्यिक गप्पा.अचानक माझी बिघडलेली तब्येत,शेजारच्याच रूम मध्ये असलेल्या डॉक्टरनी गोळ्या सुचविल्या आणि मुंबईहून आलेल्या प्रा. प्रतीभानी २०  किलोमीटर नाशिकपर्यंत स्कूटरवरून जाऊन त्या आणलेल्या.फेसबुकनी या डीलिट होऊ घातलेल्या आठवणी सेव्ह केल्या.
                            माझ आता सेमिनारमधून,व्याख्यानाना जाण कमी झाल्याने राजा दिक्षित भेटण तस अशक्यच होत.एक दिवशी अचानक people you may knowमध्ये दिक्षित सर दिसले आणि माझ्याही नकळत मी Add friend वर क्लिक केल.डॉक्टर अरविंद देशपांडे स्कूलच्या या दिग्गजांच्यापर्यंत मी आरतीमुळे 'आधुनिक महाराष्ट्र १९ वे शतक 'द्वारा सामील झाले.दिक्षित सरांमुळे मी जाणीव पूर्वक बंद केलेलं हे कवाड धाडकन उघडल.झंझावातासारख्या संबंधित आठवणी भिडल्या.
                          सिनेमाला तर मी हद्दपारच केल होत.पण अशोक, अतुल,माधवी,सई,पार्थ यांच्या मागोमाग कधी चोरपावलाने तो शिरला आणि माझ्या मनाचा कब्जा घेतला मला समजलच नाही.आता आठवणीच मोहोळ थांबवण अशक्यच होत.खानापूरच त्रिमूर्ती,बेळगावची आता अस्तित्वात नसलेली अनेक थिएटर, पाहिलेले सिनेमा तीन तीन तास रंगउन सांगितलेल्या गोष्टी सगळ ताज झाल.
                         माझ्या शुष्क कोरड्या होत चाललेल्या जीवनात,अमेय,भारती,माधवी,विशाल यांच्या कवितांनी ओलावा आणला विशाल सोडता इतराना मी प्रत्यक्ष भेटलेही नाही.यांच्याप्रमाणे हर्षद,दीप्ती,कौतुक,जाई इत्यादी मायबोलीवरील अनेक मंडळी येथेही भेटू लागली. साहित्य कला संगीत यांचा भरभरून आस्वाद घेण सुरु झाल काळपांढर होत चाललेलं आयुष्य रंगीबेरंगी झाल.आरती तर माझ्या मेंदूवरील गोंदण ते पुसलं जाण शक्यच नाही.पण तिनी मला या आभासी जगात ढकललं. आणि मेंदूला तरतरीत ठेवण्याच काम आपसूकच होऊ लागल.

                          ' एक लाट फोडी दोघा पुन्ह:नाही भेट' हे फेसबुकनी खोट ठरऊन टाकल.पुन्हा कधी भेटण्याची शक्यता नसलेली माणस अचानक पुढ्यात येऊ लागली.मुलींच्या शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी,कुठल्यातरी समारंभात,प्रवासात  ओळखीच्या झालेल्या व्यक्ती.आणि त्याबरोबर त्यांच्या संबंधातील  अनेक आठवणी.काहीना मी फ्रेंडशिप रिक्वेस्ट केली काहींनी मला.अमेरिका,इंग्लंड,चायना दिल्ली कुठून कुठून.
                          एकुणात काय तर फेसबुक माझ्यासाठी ब्रेनजीम आहे.
                         हे खर आहे? की मी फेसबुकवर रमतीय त्याच समर्थन. शोध घ्यायला हवा.पुन्हा मेंदूला खुराकच.