Tuesday, 25 January 2022

कन्या व्हावी ऐसी


                                                 कन्या व्हावी ऐसी

                           महाराष्ट्र टाईम्स मध्ये आज जन्मलेले मुल नावाखाली भविष्य यायचे. २४ जानेवारी १९७२ चे भविष्य होते.सूर्य नेपचून त्रिकोण योगामुळे आज जन्मलेल्या मुलाचे आयुष्य अनेक आश्चर्याने भरलेले असेल.दैविक कृपा आणि ग्रहांची साहानुभूती सतत लाभेल.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडवील.
                          घरात आवराआवरी करताना हे सापडले.मी भविष्यावर फारशी विश्वास ठेवणारी नाही.आणि त्या दिवशी जन्मलेली माझी मुलगी सोनाली तर त्याहून नाही.पण तरीही तिने भविष्य खरे केले आहे.स्वच्छ चारित्र्याचा आदर्श घडविला आहे. माझा उर भरून येईल अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.किती लिहू,किती सांगू.
                       लहानपणापासून स्वतंत्र विचाराची,आपल्या विचाराशी ठाम.यात आदळआपट रडारडी न करता हवे तेच करणारी.लोअर केजीला क्रीसेंट स्कूलमध्ये घातले.तिला मराठी मिडीयमला जायचे होते.पुढच्या वर्षी घालू सांगितले वर्षभर गेली आणि दुसऱ्या वर्षी अडून बसली.प्रवेश संपले होते.कसाबसा प्रवेश  मिळाला.आमच्या जवळ राहणारे आर्किटेक्ट पळशीकर यांच्याकडे पाहून आर्किटेक्ट व्हायचे हेही अगदी लहानपणीच ठरवलेले.बारावीनंतर प्रवेश मिळाला नाही.त्यासाठी एक वर्ष थांबली पण आर्किटेक्ट झाली.चवथ्या वर्षात प्रोफेशनल प्रॅक्टिसक्टीससाठी अहमदाबादचे बाळकृष्ण दोषी यांच्याकडेच जायचे होते.आणि तेच तिने केले.या क्षेत्रातील तिचे यश पाहता तिचे निर्णय बरोबर होते.
                    कधी हैद्राबाद,कधी मद्रास,कधी जपान अशी तिच्या पायाला भिंगरी असते.हैद्राबादचे पर्यावरणपूरक आयआयटीचे हॉस्टेल,कोइमतुरचे  मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी तिच्या यशाची काही उदाहरणे.त्या त्या क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास, कलात्मकता, क्लायंटची गरज,नितीमत्ता या सर्वांचा मेळ घालून हे काम केलेले.जुन्या नव्याचा मेळ,क्रिएटिव्हिटी,यामागे व्यापक विचार हा तिचा स्थायी भाव आहे.बाहेर छोटीशी रांगोळी असो,गणपतीची,दिवाळीची आरास असो साधी भाजी चिरणे.थाळीतील पदार्थांची रंगसंगती,न्युट्रिशन व्ह्याल्यू, घराची सजावट घरगुती कार्यक्रम,लिखाण या सर्वात हा स्थायी प्रगट होत असतो.हे सर्व कमिन्सच्या आर्किटेक्चरच्या विध्यार्थिनीपर्यंत आपल्या व्याख्यानातून,प्रॅक्टिकल,सहली यातून तळमळीने पोचविलेले असते.नवभारत टाईम्सच्या सुरुची तर्फे तिला स्त्रीशक्ती पुरस्कार मिळाला पण त्यापेक्षा स्त्रीशक्ती, आर्किटेक्चरचा गाभा या विध्यार्थिनीपर्यंत पोचणे आणि त्यांची भरभरून मिळालेली पावती तिला पुरस्करापेक्षा अधिक महत्वाची वाटते.हे सर्व असूनही तिचे पाय नेहमी जमिनीवर असतात.
                  इमारतीचे डिझाईन असो,स्वत:चा पेहराव असो,मैत्री असो,नातेसंबंध असो त्यात दिखाऊपणापेक्षा एक ग्रेस,भक्कमपणा,प्रामाणिकपणा असतो.स्वत:च्या पेहरावातही ही ग्रेस असते. प्रसन्न हास्यामुळे,कोणताही आव नसता वागण्यामुळे ती सर्वाना हवीहवीशी वाटते.यात सख्खे,चुलत,आत्ये,वगैरे सासू सासरे यांची पिढी,नणंदा,सलीलचे मित्र,त्यांच्या बायका,सोशल मिडीयावरून झालेल्या बरोबरीच्या मैत्रिणी,पुढच्या पिढीतले भाचे, भाच्या,विध्यार्थी,हात्खाली काम करणारे हे सर्व आले.अनेकांसाठी ती रोल मॉडेल असते.
                 बाहेरचे सर्व व्याप सांभाळताना.सासर,माहेरची नातीही तिने कुशलतेने सांभाळली आहेत.स्वत: धार्मिक नसली तरी सण, समारंभ ती उत्तम साजरे करते त्याचे कर्मकांड न होऊ देता उत्सव करते.तिच्या घराचे दरवाजे कोकणातील माणसे असोत, जर्मनीची मार्गारेट असो,सलील, क्षितीजचे मित्र असोत की सासुबाईंच्या मैत्रिणी. सर्वाना घराचे दरवाजे उघडे असतात.तिच्या घरातला मोकळेपणा सर्वाना आवडतो.तिच्या या गुणामुळे तिने नात्यातली,देश,परदेशातील अनेक माणसे जोडली आहेत.तिच्या सोशल मीडियातील मित्रमंडळीत ती किती प्रिय आहे ते मीडियातील कॉमन मित्र,मैत्रिणींकडून मला समजत असते.
                 तिच्यातील सच्चेपणा,संवेदनशीलता,मिस्कीलता,संस्कृतीशी जोडलेली नाळ हे सर्व तिच्या लिखाणातूनही असते. मग ते लिखाण वास्तू,वास्तू तज्ज्ञ,देश,परदेशातील भटकंती,एखादी रेसिपी कोणतेही असो.यात हटके असेही असते.
                तिचे सगळेच हटके असते त्यामुळे ती युनिक असते.क्षितीजला वाढवताना ही ती आई कमी आणि मैत्रीण जास्त होती.त्याच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर एक संवेदनाशील आणि वैश्विक माणूस बनवण्यात ती यशस्वी झाली आहे. यासाठी तिने हळुवारपणे घेतलेले कष्ट,प्रक्रिया मी पाहिलेली आहे.मला भावणारी ही तिची सर्वांग सुन्दर रचना आहे. तिची भटकंती ही अशीच हटके.युरोप ट्रीप बॅगपॅक मैत्रिणीबरोबर केली.स्पेनमधील कमिनो वारी तीन मैत्रिणी बरोबर केली.कामासाठी परदेशात गेल्यावर इतर खरेदि करतात पण ही मात्र इमारती तिथली सांस्कृतिक वैशिष्ठ्य बघत फिरते.येथून आता तिला सायकलवर भटकंतीचा छंद लागला आहे.अचानक पाषाण हून आमच्याकडे सल्स्बारीपार्कला येते सरप्राईज देते. आमचे अनेक दिवस आनंदात जातात.यावेळीही ती आळंदीहून किंवा १५ ऑगस्टला ७५ किलोमीटर करण्यासाठी निघालेली असते.
             मुलगी,बहिण,पत्नी,आई,सून,मैत्रीण.बॉस,आर्किटेक्ट,या सर्व आघाड्यावर ती आदर्श आहे.ती स्वत:ची काळजी घेत नाही अशी माझी तक्रार होती. पण आता सलील खनपटीला बसून ती घ्यायला लावतो. एक मुलगी म्हणून आमच्याशी नाते एक स्वतंत्र लेखातच लिहावे लागेल.आम्हाला तुझा अभिमान वाटतो एवढेच म्हणते.
घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे असते पण आता आमचे पिल्लू  उंच आकाशात भरारी घेत आहे.पण लक्ष मात्र आमच्याकडे असते.  
 अशी अनादी राहा.आनंद वाटत रहा.
जीवेत शरद शतम   
                
          May be an image of bicycle, outdoors and text that says 'tir thali's'     
      May be an image of 3 people and indoor         

 








                             











Friday, 21 January 2022

माझे दूरस्थ विद्यार्थी - - तुळशीराम कुसाळकर

                                            माझे दूरस्थ विद्यार्थी - तुळशीराम कुसाळकर

   तुळशीराम कुसाळकर यांचे अकस्मात फेसबुकवर भेटणे.फेसबुकला खूप खूप धन्यवाद.त्यानंतर Whats app वर भरभरून कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र येणे.सोबत १७ नोव्हेंबर १९८८ मधल्या पदवीदान समारंभाचा फोटो.एका शिक्षकासाठी याहून मोठ्ठा पुरस्कार तो कोणता असणार.त्यांचे पत्र तसेच्या तसे देत आहे.

*वंदनीय तिर्थळी मॅडम*,
स.न.वि.वि.

१७ नोव्हेंबर १९८८ चा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे पदवीदान समारंभाचा आपल्या समवेत चा फोटो जतन करून ठेवला आहे. माझ्या सारख्या भटक्या विमुक्त समाजतल्या मुलाला तुम्ही मोलाचे मार्गदर्शन केले.माझ्यात चैतन्य फुलविले. आपण माझ्या भरकटलेल्या जीवनाला दिशा दिलीत  आत्मविश्वास निर्माण केला. तुमच्या आशिर्वादाने पदवीधर झालो.आणि पुढे जाऊन बी .एड केले. तुम्ही केलेले मोलाचे मार्गदर्शनला 35 वर्षे शिक्षकी पेशात वर्गात तुमचे उदाहरण देत होतो प्रसंगी हाच फोटो वर्गात दाखवत होतो.तुमच्या मुळे माझ्या कुटुंबाला मार्ग व दिशा मिळाली.

माझी तीनही मुले उच्चविद्याविभूषित आहेत.तुमच्या आशिर्वादाने सेवा निवृत्त झाल्यानंतर एक सामाजिक प्रतिष्ठान स्थापन केले आहे.त्या द्वारे गोरगरीब दीनदलित मुलांना मदत करतो. मदत करतो .त्यांच्यासाठी उर्वरीत आयुष्य वाहून घेतले आहे. तुमच्या आठवणी मुलांना सांगत असतो. तुम्ही माझ्या जीवनाचे शिल्पकार आहात. विद्यापीठाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तुमचा आशीर्वाद कायम आहे. तुम्ही व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. शतायुषी व्हा.तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे.भेतीअंती खूप बोलेन.

*आपला विद्यार्थी*
तुळशीराम कुसळकर सर

 

त्यांची २ मुले  सायंटीस्ट झाली आहेत याचे तर मला फारच अप्रूप वाटले.त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले तेंव्हा ते ९० साली म्हणजे बी.ए,झाल्यावर लगेचच एम.ए.झाल्याचे समजले. त्यांनी माजी विध्यार्थ्याना हाताशी धरून पिंपळनेर सामजिक प्रतिष्ठान नावाचा न्यास स्थापन केला आहे.गरीब विद्यार्थ्यानापुस्तके वह्या पुरविणे,गणवेश देणे गरजूंची फी भरणे हे ते करत असतात.ते कृतार्थ,समाधानी जीवन जगत आहेत. मला हे सर्व खूपखूप सुखाऊन गेले.

त्यांच्यावर २७ नोव्हेंबर २००४ साली केसरी मध्ये उत्तुंग भरारी सदरात लिहिलेला लेखही सोबत देत आहे.                         

                                 मुक्त विद्या केंद्राने मला घडवले.

  • गुप्त विद्या केंद्रानेस्ट १९८५ मध्ये बी.ए. चा अभ्यासक्रम सुरू केला आणि अनेक वर्षे उपाशी असलेल्या माणसांसमोर पक्वान्नाचे भरलेले ताट ठेवल्यावर तो जसा त्या अन्नावर तुटून पडेल तसे अनेक विद्यार्थी अभ्यासक्रमावर अक्षरशः तुटून पडले. कुसळकर तुळशीराम सोमा त्यातील एक. केसाला चोपून लावलेले तेल, मागे फिरवलेले केस, पांढरा शुभ्र पायजमा व शर्ट, प्रसन्न व हसतमुख चेहरा. का कोण जाणे पण कुसळकर यांना पाहिल्यावर 'नव्या मनूचा गिरीधर पुतळा' या मर्ढेकरांच्या ओळी आठवायच्या. 
    कुसळकर यांसारखे विद्यार्थी ज्ञानासाठी हपापलेले होते. परंपरा, सामाजिक परिस्थिती, औपचारिक शिक्षण पद्धतीची ताठरता यामुळे ही भुक मारून जगावे लागत होते. वडारी जातीच्या कुसळकर यांचे बालपण दगड काम करणाऱ्या वडीलांच्या बरोबर गावोगाव भटकणाण्यात गेले. ना घर, जमीन. पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव फिरायचे. मिळेल तिथे काम करायचे. काम संपले की दुसरे काम. अशात मुलांच्या शिक्षणाची फरपटच. नियमित शिक्षण घेता आले नाही तरी अनंत अडचणींना तोंड देत एसएससी पर्यंतचा पल्ला गाठला. एसएससी होणे तसे सोपे नव्हते. परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे तर, राहायचे कुठे ? तितके दिवस येणारा जेवणाचा खर्च कसा करायचा? हे साधे सोपे वाटणारे प्रश्न कुसळकरांसाठी अत्यंत जटील होते. अडचणींवर मात करत परीक्षा दिली खरी परंतु गावोगाव भटकत राहणाऱ्या कुसळकर यांचे गणित व इंग्लिश विषय कच्चे राहिले होते. त्यामुळे अनुत्तीर्ण होणे नशिबी आले. दहावीला गणित, इंग्लिश मध्ये विद्यार्थी नापास होतात त्याच्या मुळाशी अशी कारणे असतात. कुसळकर यांचे शिक्षण यानंतर बंद झाले. वडीलांच्या दृष्टीने आतापर्यंत झालेली चैन खूप झाली होती. शिकण्याचे स्वप्न सोडून देण्याशिवाय इलाज नव्हता.
     पिंपळनेर मध्ये माध्यमिक विद्यालय सुरू झाले आणि छोटी नोकरी मिळाली. शिक्षण नाही तरी शिक्षण क्षेत्राशी संबंध ठेवता येत होता. अशातच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली.दहावी नापासांना प्रवेश चाचणी घेऊन प्रवेश दिला जाणार होता. आणि कुसळकर प्रवेशचाचणीत उत्तम प्रकारे पास होऊन  प्रथम वर्षास प्रवेश करते झाले. अत्यंत अभ्यासू विद्यार्थी म्हणून ते सर्व शिक्षकांना परिचित होते. सर्व संपर्कसत्रांना ते हजर राहात. नियमित गृहपाठ पाठवत. मी पीएचडीसाठी पाठवलेली प्रश्नावलीही त्यांनी तातडीने आणि मनापासून भरून पाठवली होती. प्रश्नावलीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला म्हणून मी आठवण पत्र पाठवले. संशोधकास संशोधन करताना असा कमी प्रतिसाद मिळण्याचा अनुभव नवा नाही. आठवण पत्रे पाठवणे हा एक तंत्राचा भाग होता. कुसळकरांसारख्या अनेक विद्यार्थ्यांना मात्र साधी प्रश्नावली भरून पाठविता येत नाही याचा राग येत आला व वाईट वाटले. विद्यार्थ्यांना आर्थिक भार पडू नये म्हणून मी प्रश्नावली बरोबर परतीसाठी पोस्टेज पाठवले होते इतके असूनही विद्यार्थ्यांतील ही उदासीनता त्यांच्या मते अक्षम्य होती. कुसळकर यांचे लगेच पत्र आले 'आपण नाउमेद होऊ नका. आपले संशोधन ही काळाची गरज आहे आणि ती तुम्ही पूर्ण कराल अशी खात्री आहे'. कुसळकर यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखवलेला विश्वास व मानसिक आधार यांचा माझ्या पीएचडी होण्यात खूप मोठा वाटा आहे
                माझे पीएचडी पुर्ण झाल्यावरही त्यांचे अभिनंदनाचे पत्र आले.बी.ए.उत्तीर्ण झाल्यावरही त्यांची अधूनमधून पत्रे येत.बी.ए.झाल्यामुळे त्यांना प्रयोगशाळा सहायाक पदावरून प्रमोशन मिळाले होते. त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ झाली होती. पुढे त्यांनी बी.एड.ही केले.शिक्षक झाले पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ लागले. आज ते दैनिक समाचार अहमदनगरचे वार्ताहर म्हणून काम करतात.बी.ए. होणे गुलबकावलीच्या फुला प्रमाणे असाध्य होते. ते साध्य  झाल्याचा आनंद या सर्वांपेक्षा मोठा होता. स्वतःचा विकास करून ते थांबले नाहीत आपल्या समाज बांधवांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना सक्तीने शिक्षण घेण्यासाठी ते प्रवृत्त करीत आहेत. समाजातील जुन्या चालीरीती अनिष्ट रूढी अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. विद्यापीठाला पाठवलेल्या मनोगतात त्यांनी लिहिले आहे, 'जिद्द, दृढनिश्चय, आत्मविश्वास व सुयोग्य नियोजन असल्यास अनंत अडचणींवर मात करून विजयश्री खेचून आणता येते'. त्यांच्या मनोगतातील ही वाक्ये, परिस्थितीबाबत कुरकुर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी आहेत. मुक्त विद्या केंद्राच्या अभ्यासक्रमामुळे जीवन उजळलेल्यात कुसळकर यांसारखे वडारी समाजातील विद्यार्थी आहेत, कैकाडी, कंजारभाट, आदिवासी, वंजारी इत्यादी समाजातील आहेत. शेतमजूर, हमाल आहेत. अशी यादी लांबत जाईल. या सर्वांच्या कथा थोड्याफार फरकाने अशाच आहेत. समस्या थोड्या वेगळ्या, अडचणी वेगळ्या परंतु वंचितता तीच. ज्ञान मिळवण्याची आस तीच.  आणि या सर्वांचा परिणाम ही तोच. मुक्त विद्या केंद्रातून आत्तापर्यंत  १४००० पदवीधर बाहेर पडले परंतु मुक्त विद्या केंद्राचे खरे यश म्हणजे आमचे असे प्रबोधित झालेले तळागाळातील विद्यार्थी.
     May be an image of 4 people and indoor

Friday, 3 December 2021

माझे दूरस्थ विद्यार्थी - अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                                       माझे दूरस्थ विद्यार्थी  -  अपंगांचे खंबीर नेते रामदास म्हात्रे

                      रामदास म्हात्रे यांच्यावरील सदर लेख १२ जानेवारी २००६ मध्ये लिहिलेला आहे.केसरी वर्तमानपत्रात आमच्या टीमवी च्या यशस्वी विद्यार्थ्यांच्यावर 'उत्तुंग भरारी' हे सदर लिहित होते.हे विद्यार्थी सध्या काय करतात ते  शोधून त्यांच्या पुढील यशाबद्दल माझ्या ब्लॉगवर लिहित होते.प्रत्येक अपंग दिनाला मला रामदास म्हात्रे त्यांची स्वप्ने आठवायची.त्यांचा माझ्याकडे असलेला फोन नंबर लागत नव्हता त्यांचा पत्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला पण मिळाला नाही.अचानक मला ते फेसबुकवर ते भेटले.मी त्यांचा फोन नंबर मागितला त्यांच्याशी बोलून लिहायचे होते.पण त्यांचा फोन मिळालाच नाही.काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण शारदा वाडकर हिच्याशी बोलताना करोनामध्ये किती लोकांचे नाहक बळी गेले हे सांगताना रामदास म्हत्रेचे नाव घेतले गेले. माझ्यासाठी हे खूपच धक्कादायक होते. त्यांचा पत्ता  सापडला तोही असा.शारदा त्यांच्याबद्दल भरभरून बोलत होती.आज अपंग दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.                        

                            
                                        अपंगांचे खंबीर नेते
                         पुण्यातील कुमठेकर रोडवरील शिक्षण शास्त्र संस्थेचा हॉल खच्चून भरला होता ग.प्र.प्रधान, नारायण सुर्वे, शरदचंद्र गोखले अशी दिग्गज मंडळी व्यासपीठावर स्थानापन्नवर भेटले. झाली होती. निमित्त होते रामदास म्हात्रे यांच्या 'थोट्या' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. रामदास म्हात्रे आमचे बी.ए.चे विद्यार्थी म्हणून मी आवर्जून गेले होते.
                              कोकणातल्या खेड्यातील एका गरीब शेतमजुराच्या मुलाची शिक्षणासाठीची धडपड अचंबित करणारी होती. जगण्याच्या प्रत्येक क्षणाला समाजाने अव्हेरले, नाकारले तरी सर्वातुन वर उठून रामदास म्हात्रेनी समाजालाच भरभरून दिले होते. 
                                 पेण जवळील मळवली गावातील शेतमजुराच्या घरात जन्मलेले रामदास हे पाचवे अपत्य. ते पाच वर्षाचे असतानाच पोलिओंनी अपंगत्व आले आणि नंतर सगळं जगणंच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे झाले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे आपण धांडोरे पिटतो पण शिक्षणाच्या जबरदस्त ओढीने खुरडत घराचा उंबरठा ओलांडून जाणाऱ्या रामदासला अपंग म्हणून शिक्षकांनी प्रवेशच नाकारला. वडिलांना काही झाल्यास मी जबाबदारी घेईन असे लिहून द्यावे लागले. पाच मैलावरच्या शाळेत रामदास माकडासारखा सारख्या उड्या मारत जाई. पावसाळ्यात हात चिखलाने कोपरापर्यंत  बरबटलेले असत. साप अंगावरून जात. शाळे बरोबर शेतात ढेकळे फोडणे, लावणी करणे, गुराखी पण करणे अशी कामेही रामदास करी. यातूनही रामदास चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होई. पुढे पुण्याला  शिक्षणासाठी जायचे खुळ डोक्यात शिरले. अशोक विद्यालयात धडपड करून प्रवेश मिळविला. तिथे राहायची मोफत सोय होती. जेवायला मिलो ची भाकरी मिळायची कोकणात दारिद्र्य असलं तरी रान मेवा भरपूर असे. पळून जावं वाटे पण शिक्षणाच्या ओढीने त्यावर मात केली. पुढे ज्ञानेश्वर वस्तीगृहात प्रवेश मिळाला. जीपीओ ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत खुरडत, तेथून न्यू इंग्लिश स्कूलला बसने जावे लागे. अपंग रामदाससाठी हे खूप कष्टाचे होते. एसएससीला बोरमाळ विकून आई ने पैसे भरले दहावीत ६५  टक्के गुण मिळाले. एस.पी.त सायन्सला प्रवेश घेतला. शिक्षणाच्या वाटेवर वेगळीच समस्या निर्माण झाली.भावाचे निधन झाले. गावाकडून पैसे येणे बंद झाले. त्याचा संसार हि उघड्यावर पडला. शिक्षण सोडून अर्थार्जन करावे लागले.
                                            रामदास ने निर्वाहासाठी आपली कामे सुरू केली.पुढे समाज कल्याण खात्यात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी मिळाली. येथेही अपंग म्हणून घेण्यास खळखळ होती. या काळात सेवा दलाशी संपर्क आला. एस. एम. जोशी, भाई वैद्य यांचा सहवास लाभला व्यक्तिमत्त्व विकसित झाले१९८१ मध्ये जागृत अपंग संघटनेची स्थापना केली. अपंग जागृतीसाठी लेखन, कृती सर्व मार्ग हाताळले.पु.ग. वैद्यांनी आपटे प्रशालेत संस्थेसाठी मोफत जागा दिली. अपंग जागृती करणे तसे सोपे नव्हते अपंगांचे पत्ते काढून घरी जायचे घरच्यांना पटवायचे स्त्रियांसाठी तर हे अधिक कठीण होते पण नोकरी सांभाळून झपाटल्यासारखे रामदास ने काम केले फलित म्हणून १९८१ मध्ये राज्य पुरस्कार १९८७  मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाले.
                              अपंगांच्या हक्कासाठी लढायचे तर कायद्याचे शिक्षण हवे होते त्यासाठी पदवी नव्हती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पदवी मिळाली आणि लगेच शाहू कॉलेजमध्ये सकाळच्या शाखेत प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज दिवसा नोकरी, संध्याकाळी संस्थेचे काम अशी कसरत सुरू झाली अपंगांचे विवाह, नोकऱ्या, प्रवेश, त्यांच्यात स्वाभिमान जागृत करणे, न्यूनगंड नाहीसा करणे, समाजात अपंगांच्या कर्तृत्वाबद्दल विश्वास निर्माण करणे हे सगळे म्हणजे कठीण खडकात बी पेरणे होते. कोकणातल्या निसर्गाने खडतरतेवर मात करावयाची दिलेले शिक्षण कामी आले. दुर्दम्य इच्छाशक्ती होती आज संस्थेच्या रोपट्याचा वृक्षासारखा विस्तार झाला आहे.४० अपंगांची निवासाची सोय आहे. संगणक, शिवणकाम असे स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण दिले जाते. रामदास ने अपंगांतून नेतृत्वाची पुढची फळी तयार केली आहे. संस्थेचा  डोलारा सांभाळताना  महाराष्ट्र अपंग विकलांग मंच, महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटना यांच्या कार्याध्यक्ष पदांची धुरा ही आता रामदास म्हात्रे यांच्याकडे आहे. हे सर्व करताना अपंगांचे सोबती, अपंगाचे हक्क, सनद हे हँडबुक, गंगाजळी कादंबरी आणि भरपूर स्फुट लेखन म्हात्रे यांनी केले आहे.
 आज ते ऑफिस सुपरिटेंडेंट या पोस्टवर आहेत. धडधाकटांनाही लाजवेल असे  त्यांचे कर्तृत्व पाहून त्यांच्या मित्रांच्या अव्यंग असलेल्या मावशीनीच त्यांच्याशी विवाह केला. त्या जिल्हापरिषदेच्या शिक्षिका आहेत. दोन मुलं उत्तम शाळेत शिकत आहेत स्वतःची कोणतीही गोष्ट बायको-मुलांना करावी लागू नये असा त्यांचा कटाक्ष असतो. पत्नीची शनिवारी सकाळची शाळा म्हणून घरातील स्वयंपाका पासून सर्व कामे करतात पण तरी अपंगांच्या बाबतीत समाजाच्या मानसिकतेबद्दल त्यांना खंत वाटते. ते म्हणतात कार्पोरेशन,  एटीएम सेंटर अशा अनेक ठिकाणी जाताना बिल्डिंगच्या रचनेत अपंगांचा विचार न केल्याने अडचणी येतात. इतरांवर अवलंबून राहावे लागते. रामदास मात्रे यांच्या जीवन कार्यातून धडधाकट माणसांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांचे कार्य आहे. अपंगा बद्दल च्या त्यांच्या कार्यासाठी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
 

Sunday, 17 October 2021

रिक्षावाले अरुण शिंदे - घरचा माणूस

                                              रिक्षावाले अरुण शिंदे  -  घरचा माणूस

                                 पुणेरी रिक्षा वाल्यांच्या बाबत नेहमी तक्रारीचा सूर असतो.आम्हाला मात्र नेहमी चांगलेच अनुभव आले.त्यातही अरुण शिंदे हे आमच्यासाठी घरचा माणूस आहेत.आम्ही दोघे जेष्ठ नागरिक असल्याने त्यातही माझ्या पतिना पार्किन्सन्स सारखा आजार असल्याने कोणीतरी मदतीला लागते.कोठेही जायचे असले तर आम्ही अरुण शिंदेना फोन करतो.जवळच्या  ATM मध्ये, किराणा माल, फळवाला,पिठाची गिरणी असे कोठेही अगदी छोट्या अंतरासाठी ते येतात. ते असले कि बिनधास्त वाटते काही गोष्टी प्रत्येक ठिकाणी थांबत करतो.आम्हाला यासाठी वेळ लागतो पण त्यांची कधी कुरकुर नसते.उलट वस्तू. रिक्षात आणून ठेवणे, दळण गिरणीत ठेवणे अशी कामे ते न सांगता करतात.

रिक्षात वृध्द माणसे आहेत याचे त्याना भान असते.त्यात मला कमरेचा त्रास आहे ही जाणीव असल्याने ते अत्यंत सुरक्षित रिक्षा चालवतात.

 दैनंदिन गरजांव्यतिरिक्त इतरही ठिकाणी आम्ही त्यांच्या वेळेनुसार हक्काने बोलावतो.एकदा सारसबागेत जायचे होते. त्यांनी बाजूच्या गेटने कमीत कमी पायर्या चढाव्या लागतील अशा ठिकाणा पर्यंत रिक्षा नेली. वयस्क माणसे पाहून बागेतही कोणी हरकत घेतली नाही.आमचे छान गणेश दर्शन झाले.जवळच एक शिव मंदिर आहे तेथेही बदल म्हणून त्यांना घेऊन जातो.घाई करू नका व्यवस्थित दर्शन घ्या असे सांगतात.

स्टेशन,विमानतळ अशा ठिकाणी पहाटे जायचे असेल तर अरुण शिंदेना रिक्षा सांगितली की अलार्मही न लावता बीनधास्त झोपता येते.

त्याना बोलावले की ते पाच मिनिटे आधीच येऊन थांबतात.बेल वाजवून मी आलो आहे. सावकाश आवरा काही घाई नाही.असे सांगतात..लगबगीने सामान घ्यायला येतात. कधी चहा घ्यायला थांबा म्हटले कि मात्र घाई करतात.कधीच थांबत नाहीत.मृदू आवाजात नम्रतेने बोलतात.

आमच्या साठी अडीनडीला उपयोगी पडणारा,आधार देणारा हा घरचा माणूस आहे.

 




Sunday, 12 September 2021

आनंदी वृद्धत्व - ७

               या ग्रुपवर एका लेखाद्वारे एकट्या पुरुषांनी राहण्याविषयी चर्चा झाली होती. मला आमचे कलबागकाका आठवले आणि त्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे वाटले.                         

                                                        आनंदी वृद्धत्व - ७

                ' परंतु यासम हा' असे ज्यांच्याबद्दल म्हणता येईल असे आमचे कलबाग काका होते. आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान.उर्जा स्त्रोत,तन,मन धनानी  पार्किन्सन्स मित्रमंडळाशी  एकरूप झालेले कलबागकाका म्हणजे जेष्ठ शुभार्थी नारायण कलबाग.असा माणूस होणे नाही.आज ते आपल्यात नाहीत पण ९६ वर्षे ते आनंदात जगले.पर्किन्सन्सही त्यांच्या आनंदाला रोखू शकला नाही.यांचे ३० सप्टेंबर २०२० ला ९६ व्या वर्षी निधन झाले.तसे त्यांचे जाणे अनपेक्षित नव्हते.तरीही ते सेन्चुरी नक्की करतील असे वाटत होते.त्यांच्याशी अजून किती तरी विषयावर बोलायचे होते सर्व राहून गेले.माझा शेवटचा फोन lock down च्या काळात झाला.

                   .त्यांच्या पत्नीलाही पार्किन्सन्स होता.त्या डॉक्टर होत्या. त्या गेल्यावर काका  एकटेच राहात.रडत कण्हत नाही तर गाण म्हणत.फक्त स्वत:पुरते पाहत  नाही तर इतरांनाही मदत करत.स्वत:चा पार्किन्सन्स त्यांनी नीट समजून घेतला होता. त्यानुसार दिनचर्या आखली.छानशी सपोर्ट सिस्टिम तयार केली.या सपोर्ट सिस्टीममध्ये मुंबईचा भाचा,कॅनडाची भाची,मसाजवाला,कामवाली,तिची मुलगी,काही काळाकरता येणारा केअरटेकर,पीवायसीच्या कॅन्टीन मध्ये गप्पा मारायला भेटणारे मित्र.असे अनेकजण होते.आमचा सपोर्टग्रुपही त्यात असावा.सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.कधी गोकर्ण,कारवार असे गाडी करून जात.आळंदी देहूला जात.

                 ते भांडारकररोडला राहात.सकाळी  रिक्षाने वैशालीत जाऊन ब्रेकफास्ट करत. ते त्यांना पचनाला त्रासदायक वाटायला लागले.नंतर यात त्यांनी बदल केला.मुंबईच्या भाच्याकडे ते आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा ब्रेकफास्ट ठरवायचे.यात सूप sandwich,इ.हलका आहार असायचा. भाचा स्वीगीवरून तो बुक करायचा. 

                          Lock down काळात त्यांच्याकडे येणारा मसाजवाला सकाळी थोड्या वेळासाठी आणि रात्री येणारा केअर टेकर येत असेल का अशी काळजी मला वाटत होती..म्हणून चौकशीसाठी सारखा फोन करत होते त्यांचा लैंडलाइन लागत नव्हता. ते हल्ली काही वेळा मुंबईला भाच्याकडे राहतात. तेथे असतील असे वाटले. मोबाईलही लागत नव्हता. थोडी काळजी वाटत होती आणि एक दिवशी त्यांचाच फोन आला मला हायसे वाटले. नेहमी सारखा स्पष्ट आवाज.त्यांच्या पत्नीच्या पार्किन्सन्स बद्दल,त्यांच्या भाचीने पाठवलेल्या सपोर्ट ग्रुपच्या पुस्तकाबद्दल अशा खुप गप्पा झाल्या.

             मधल्या काळात त्यांना भोवळ आली होती त्यांचे भिंतीवर डोके आपटले ते खाली पडले. बराच वेळ पडून होते. काम करणारा माणूस आल्यावर भाची ला फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे दोन-तीन दिवस राहावे लागले. भाची भारतात आलेली होती.ती काही दिवस राहिली आणि आता परत कॅनडाला गेली आहे डॉक्टरने सांगितले आता एकटे राहायचे नाही त्यामुळे आता चोविस तास एक माणूस असतो.हे सर्व कथन ते कोणतेही भयंकरीकरण न करता सांगत होते. अगदी सर्दी खोकला झाला होता आणि डॉक्टर कडे गेलो होतो इतक्या सहजतेने सांगत होते.लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र नव्हते,त्यांचा टीव्हीही बिघडलेला.दुरुस्तीसाठी कोणाला बोलावणे शक्य नव्हते.याबाबत त्याना काही खंत नव्हती.ते सांगत होते माझी कॅनडाची भाची दोन वेळा भारतातल्या सर्व हकीकतीच्या बातम्या वाचून दाखवते.त्यांच्याकडे सर्व गोष्टीची त्यांच्या पद्धतिची सोल्युशन असायची.

                              त्यांच्या फोनच्या डीपीवर आमच्या मंडळाच्या सहलीच्या वेळचा वसू देसाई आणि सरोजिनी कुर्तकोटी त्यांच्याशी बोलत असतानाचा फोटो होता. ते मला सांगत होते तुमच्या दोघांचा बाकावर बसलेला फोटो आहे तो माझ्यासमोर ठेवलेला आहे. मी एकदम नीशब्द झाले.बहुता भाचीने काही फोटोची हार्ड कॉपी काढून दिली असावी का? त्यांच्यासाठी आम्ही सर्व त्यांचे कुटुंबीय होतो म्हणून ते मुंबईत असले तरी मुंबईवरूनही मोठ्या आवडीने मासिक सभेला येत.सह्लीना येत.
                          मंडळात ते सामील झाले तेंव्हा बहुदा त्यांची  ८५ वर्षे उलटून गेली होती.मध्यंतरी आता हयात नसलेल्या जुन्या शुभार्थीच्या घरी जाऊन भेटी द्यायचे ठरले कलबागांची पत्नी पेशंट होती.शेखर बर्वे त्यांच्या घरी गेले तर कलबागांची भेट झाली.ते म्हणाले मला आता पार्किन्सन्स झाला आहे मला मंडळात सामील करून घ्या.ते सामील झाले आणि आमच्यातलेच झाले.सभेच्यावेळी फार बोलता येत नसे पण सहलीत गप्पा होत. त्यांचे नवनवीन पैलू तुकड्यातुकड्याने समजत गेले.त्यांच्या तरुणपणातील मुंबईच्या साहित्यिक,सांस्कृतिक, वैद्यकीय,शैक्षणिक वर्तुळात त्यांचा संचार होता.त्या काळाचा ते चालताबोलता इतिहास होते.आचार्य अत्रे,विजय तेंडुलकर,वसंत देसाई अशी बुजुर्ग मंडळी त्यांच्या उठण्या बसण्यातील होती.वसंत देसाई यांच्या कार्यक्रमात ते सहभाग ही घेत असत.
                          .त्यांनी न्यूरॉलॉजिकल आजारावरची वृत्तपत्रातील, मासिकातील कात्रणे काढून ठेवली होती.ती वेगवेगळ्या आजारानुसार लावून ठेवली होती.ती त्याना आमच्याकडे सुपूर्द करायची होती.त्यांच्याकडे येणाऱ्या केअरटेकरच्या मुलीची शिक्षणासह सर्व जबाबदारी त्यांनी घेतली होती.ते दीडदोन तास सलग बोलायचे.दमतील म्हणून त्याना थांबावावे लागायचे.
                         माझे नाव त्याना आठवायचे नाही मग ते डॉक्टर म्हणायचे.२०१९ सालच्या सहलीत दुपारी कोणाला आराम करायचा असेल तर वेळ ठेवला होता.कलबाग म्हणाले डॉक्टर जरा बसा बोलायचे आहे.मला त्यांनी विश्रांती घ्यावी असे वाटत होते.पण गप्पा हीच त्यांची विश्रांती असावी.बसमधून येताना त्याना छोटी छोटी गावे दिसली.आय.एम,ए.चे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे त्यांचे Family Doctor. त्यांच्याशी बोलतो हे फॉर्म हाऊस छान आहे येथे डॉक्टर्सची मिटिंग घेऊन आजूबाजूच्या गावातील वैद्यकीय प्रश्नांचा  आढावा घ्यावा.ते प्रश्न सोडवावे असा त्यांचा विचार होता.त्यासाठी फार्महाउसचा फोन नंबरही त्यांनी घेतला.आम्ही बसमधून येताना गमती जमती करत होतो पण हा अनेक आजार असलेला ९५ वर्षाचा तरुण भोवतालच्या खेड्यांचा विचार करत होता.त्यांची यासाठी पैसे खर्च करायची तयारी होती. त्यांच्याविषयीच्या आदरानी मी नतमस्तक झाले.असे क्षण त्यांनी वेळोवेळी दिले.नंतर त्यांच्या  डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली.ते बरेच दिवस भाच्याकडे मुंबईला होते.हा विषय मागे पडला असावा.
                          सोमवार ११ डिसेंबर ला पार्किन्सन्स मित्रमंडळ सभा नर्मदा या नव्या वास्तुत होणार होती  कलबागकाकांचा  फोन आला.नव्या वास्तुत पहिलीच सभा होणार तर ईश्स्तवनाने सुरुवात करूया.फोनवरून त्यांनी २/३ प्रार्थना म्हणून दाखविल्या.या वयातही आवाजात अजिबात थरथर नाही,सुरेल आवाज. मी लगेच होकार दिला. सभेची सुरुवात त्यांच्या प्रार्थनेनेच झाली.ऐनवेळी आमचा स्पीकर चालू झाला नाही.त्यांची दमणूक झाली.तरीही त्यांचा आवाज सर्वांपर्यंत पोचला.सर्वजण भारावून गेले..ते अनेक वर्षे सभांना येतात पण त्यांचे गान  कौशल्य आमच्या नव्यानेच लक्षात आले होते.
                              त्यावर्षी आम्ही एप्रिलमधील जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात कलबाग काकांचे इशस्तवन ठेवायचे ठरवले. आत्तापर्यंत २/४ शुभार्थी आणि त्यांना आधारासाठी १/२ शुभंकर (केअरटेकर) असा इशस्त्वनात सहभाग असायचा.आम्ही हे धाडस केले असले तरी मनातून थोडी धाकधूक होती.नेहमी इशस्तवन म्हणायला ५/६ जण असल्याने.एकाची काही अडचण आली तर बाकीचे असतात.पण येथे ते एकांडा शिलेदार असणार होते.वय,पीडी,त्यांचे इतर आजार उन्हाळा,विविध आजाराच्या साथी असे विविध प्रतिकूल घटक ऐनवेळी दगा देवू शकले असते हे लक्षात घेऊन आम्ही कार्यकारिणीतीलच काहींनी मिळून एक इशस्तवन तयार ठेवले होते. सकाळी त्यांचा फोन आला.'मी बरोबर पावणे चार वाजता हॉलवर हजर असेन मला सोडायला येणाऱ्या माणसाच्या नातीला माझी प्रार्थना ऐकायची आहे. तिची शाळा सुटली की तिला घेऊन आम्ही येऊ?'त्याप्रमाणे ते आलेही.
                                  ते चार खुराची काठी वापरतात.त्यांना धरून वर नेले. बसायला खुर्ची ठेवली होती ती त्यांनी नाकारली आणि उभे राहणे पसंत केले'.मी गणेश वंदना,ध्यान वंदना आणि सरस्वती वंदना म्हणणार आहे यासाठी मला  तीन मिनिटे पंधरा सेकंद लागतील' असे सांगत त्यांनी काठी कडेला ठेवली आणि हातात माईक धरून नमस्कार करत ओंकाराने सुरुवात केली.त्यांचा स्टेजवरचा वावर,स्पष्ट शब्दोच्चार,स्तवनातील भावपूर्ण तन्मयता, सुरेलपणा, थक्क करणारा होता.एका हातात माईक आणि दुसऱ्या हाताने हातवारे करत ते गात होते   त्यांचे आजार आणि वय पाहता त्यांचा सहभाग प्रेररणादायीच होता.गाताना एकदाच क्षणभर त्यांचा तोल जात होता आणि त्यांनी काठी धरली.आमची कार्यकर्ती सविता तेथे होतीच पण निमिषात त्यांनी स्वत:ला सावरले.प्रार्थना संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.सर्व सभागृह भारावून गेले होते.प्रमुख पाहुणे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर उल्हास लुकतुके यांनीही आपल्या भाषणात त्यांचे भरभरून कौतुक केले.
                       त्यांच्याकडे सांगण्याजोगे  खूप होते..कोणीतरी त्यांच्याशी  बोलून हे शब्दबद्ध केले पाहिजे.त्यांच्या दिनचर्येचा व्हिडिओ केंला पाहिजे असे आम्हाला  वाटत होते.पण सर्व राहूनच गेले याची फारफार हळहळ वाटते.
.आपल्या परिवारातील वडिलधारे माणूस गेल्याची भावना आम्हा सर्वांच्याच मनात आहे.कलबागकाका आमच्यासाठी तुम्ही कायम प्रेरणा स्थान राहाल.
                      
            

                
                      
 


                    

Wednesday, 14 July 2021

आनंदी वृद्धत्व - ६

                                                               आनंदी वृद्धत्व - ६

                                             आत्तापर्यंत आमचे वृद्धत्व आनंददायी होण्यासाठी रोलमॉडेल असणाऱ्या  व्यक्तींच्याबद्दल  लिहिले यावेळी मात्र एका व्यक्तीबद्दल नाही तर जोडप्याबद्दल लिहिणार आहे.या दोघांचा एकमेकाव्यतीरिक्त विचारच करता येत नाही इतके त्यांच्यात अद्वैत आहे.हे जोडपे म्हणजे हास्य्योगी विठ्ठल काटे सर आणि सुमनताई  काटे.काटे सर वय वर्षे ८४ आणि सुमनताई वय वर्षे ७५. केवळ या वयामुळेच त्यांना वृद्ध म्हणायचे.नाहीतर कोणत्याच अंगाने ते वृद्ध नाहीत.गेली २३ वर्षे ते चैतन्य हास्ययोग परिवाराची धुरा समर्थथपणे सांभाळत आहेत..ही सांभाळतानाचा त्यांचा उत्साह थक्क करणारा आहे.

                                  आमची रोजची सुप्रभात  विठ्ठल काटे सर आणि सुमनताई काटे यांच्या टाळ्या आणि प्रार्थनेने होते.खणखणीत आवाजात आकडे मोजत आणि माहिती सांगत २० मिनिटे व्यायाम प्रकार,यात डोळ्यापासून पाउलापर्यंत सर्व अवयवांना व्यायम होईल अशी रचना आहे.त्यानंतर प्राणायाम आणि हास्य असे चालते.प्राणायाम झाला की मकरंद टिल्लू हास्य घेतात.प्रमोद ढेपे वाढदिवस साजरे करतात.ही सर्व रचना अनेक रथी मह्रारथीनी पाहून मान्यकेली आहे.काही सुधारणा सुचविल्या.त्याचे कौतुक केले.यात कै. डॉ. ह..वी.सरदेसाई, कै.डॉ.नितीन उनकुले,डॉ.शरद मुतालिक, डॉ संचेती, डॉ.हिमांशू वझे अशी दिग्गज मंडळी आहेत.

                           करोना पूर्व काळात १८० बागामधून विविध सहकारी हे सर्व घेत.अधून मधुन प्रत्येक बागेत दोघांची फेरी असे.त्यात्या  बागेत यांच्या फेरीने चैतन्य निर्माण होई.यासाठी  दोघे पहाटे पाचला उठत.अंघोळ,पूजा आवरून स्कूटरवर  लांबलांबच्या ठिकाणी जात.फक्त शस्त्रक्रिया,आजारपण यामुळे या अविरत चाललेल्या कामात खंड पडे.सगळ्या हास्यक्लबनी मिळून फोर व्हीलर भेट द्यायचा प्रस्ताव मांडला होता पण त्यांनी तो धुडकावून लावला.काही घेण्यापेक्षा देणेच ते पसंत करतात. मध्यंतरी त्यांच्या पंच्याहत्तरीला त्याना पंच्याहत्तर हजाराची थैली देण्यात आली.त्यात २५००० ची भर घालून  त्यांनी हास्य्क्लबलाच ती दिली.आमच्या समोरच्या बागेत २००७ साली हास्यक्लब सुरु झाला आणि आम्ही या दाम्पत्याच्या संपर्कात आलो.प्रथम दर्शनी प्रभाव पडावा अशी ही जोडी.बघता बघता आमच्या जवळची झाली.आमच्या बरोबर आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळ असतेच ते आमच्या या परिवारातलेही झाले.केंव्हाही बोलावले तरी आमच्यासाठी हजर झाले.

                          करोना नंतर बागा बंद झाल्या आणि एकदम हे सर्व ठप्प झाले.पण स्वस्थ बसतील ते काटे दाम्पत्य कसले? टिल्लू यांनी ओंनलाईन  हास्यक्लब घेण्याची कल्पना सुचवली आणि ती एकदम हिट झाली.आज महराष्ट्रातील विविध भागातून, भारत आणि परदेशातीलही २००० च्या वर सदस्य आहेत.झूमवर जास्तीत जास्त १००० सहभागी  मर्यादा आहे.ती संपल्यावर युट्युबवर सोय करण्यात आली.सहभागी करून घेणे थांबवले नाही.सेवादलातील सानेगुरुरुजींच्या आंतरभारती,विश्वभारतीची संकल्पना येथे प्रत्यक्षात आली आहे 'भारत जोडो विश्व जोडो' हे हास्यक्लबचे  ब्रीदवाक्य असते.सर्व जाती धर्माच्या, सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक स्तरातल्या सदस्यामुळे सामजिक समरसतेचे हे उत्तम उदाहरण आहे. सेवादलाचे संस्कार असले तरी येथे सर्व राजकीय पक्षाचे सहभागी आहेत आणि विविध पक्षांचे  नेते या कार्याला मदत करत असतात. माणसे जोडण्याच्या या जोडप्याच्या गुणामुळे हे शक्य होते. हे मोफत चालते.या त्यांच्या कामाबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे.यावर  स्वतंत्र लेख लीहावा लागेल.आनंदी वृद्धत्व हा विषय असल्याने हात आवरता घेते.महत्वाचे म्हणजे या कार्याची सुरुवातच काटे सरांच्या निवृत्तीनंतर झाली.

                          गव्हर्मेंट पॉलीटेकनिक मधून निवृत्त झाले.घरातल्या जबाबदाऱ्या आधीच संपल्या होत्या. काम करून शिक्षण केल्याने सतत कामात राहायची सवय निवृत्तीनंतर रिकामपण खायला उठले.त्यातच स्वत;ची चूक नसताना एका जवळच्या व्यक्तीच्या चुकीने ते आर्थिक संकटात सापडले.त्याना नैराश्याने घेरले.त्याचा शरीरावर परिणाम होऊ लागला.वजन कमी होत होते.सर्व तपासण्या नॉर्मल.तरी तब्येतीची कुरकुर चालू होती.कुटुंबीय चिंतेत पडले. डॉक्टर ह.वी.सरदेसाई यांच्याकडे गेले. त्यांनी लिहून दिले. रोज सकाळी बागेत जाणे आणि व्यायाम करणे.जवळच्या संभाजी उद्यानात जाऊन सेवादलात शिकलेले व्यायाम सुरु केले. हळूहळू इतर लोक सामील होऊ लागले.नैराश्य कधी पळून गेले समजलेच नाही.यात प्राणायाम ,हास्य यांचाही समावेश झाला. लोकाना फायदा होत होता लोक वाढू लागले.शिक्षक तयार झाले.वेगवेगळ्या बागात शाखा सुरु झाल्या..  

                       घरातील सर्व त्यांचे डिप्रेशन गेले म्हणून खुश होते. सुमनताईनी तर त्यांची अकाउंटंटची चांगली नोकरी पन्नासितच सोडली आणि जेथे राघव तेथे सीता म्हणत त्यांच्या कार्यात स्वत:ला झोकून घेतले.तसे त्यांचे एकत्र कुटुंब आहे.त्याना दोन मुले.एक मुलगा एअरफोर्से मध्ये त्यामुळे त्याची पत्नी आणि दोन मुली प्रथमपासूनच बदलीच्या ठिकाणी.दुसरा साफ्टवेअर इंजिनिअर.पत्नी शिक्षिका आणि दोन मुली,काटे सरांची एक अविवाहित बहीण सिंधुताई त्यांच्याबरोबर राहतात.त्या ९१वर्षाच्या आहेत.काटे दाम्पत्यासाठी  त्या रोल मॉडेल आहेत.मुख्याध्यपिका होत्या..सामजिक कामात सहभागी असतात.यासाठी कोरोना पूर्व काळात दुपारी तीन साडे तीनला बाहेर पडायच्या त्या रात्री आठ साडेआठला घरी यायच्या.अजूनही स्वत:ची कामे स्वत: करतात. पहाटे उठून व्यायाम करतात.काटे सरांचे आईवडील ९७/९८ वर्षाचे होऊन गेले.सरांची मावशीही त्यांच्याकडे राहायची.ती ९७ वर्षांची होऊन गेली.सुमन ताईंची याबद्दल तक्रार नसते.नोकरी सांभाळून सर्वांचे करताना त्यांना त्रास झाल असेल असे आपल्याला वाटते.त्या म्हणतात सहवासातून प्रेम निर्माण होते.आता सुनेशीही त्या छान जमवून घेतात.इतर कामाला बाई असली तरी स्वयंपाक घरीच असतो.दोघी मिळून परस्पर संगनमताने त्या स्वयंपाक  करतात.आपल्याला सामजिक काम सुनेच्या सहकार्यामुळे करता येते हे अभिमानाने त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.मुलांनीही बाबांना सांगितले आहे आतापर्यंत खूप केलेत आता घराची जबाबदारी माझी.तुम्हाला जे आवडेल ते करा.काटे सरांनी तन मन, धनाने हास्यक्लबच्या कार्याला वाहून घेतले. एकुणात काटे सरांच्या.तीन पिढ्या गुण्यागोविन्दानी राहतात. 

                       त्यांचे घर मोट्ठे आहे.पण कोरोनामुळे सगळे घरी आणि दोन नाती,सून मुलगा यांचे ऑनलाईन काम चालू असते.प्रत्येकजण एकेका खोलीत. दर बुधवारी हास्यक्लबची ऑनलाईन मिटिंग तसेच विविध कार्यक्रमही ऑनलाईन असतात.सर्वाना यासाठी एकमेकांशी जुळवून घ्यावेच लागते.सुमनताईनी निवृत्तीनंतर संगीताच्या विशारद पर्यंत परीक्षा दिल्या.आता घरात रोजच्या गरजेच्या गोष्टी विविध खोल्यातून ऑनलाईन चालू असल्याने रियाज करणे बंद असे सुमनताईनी परिस्थितीनुसार ठरवले आहे.हे एक तडजोडीचे उदाहरण सांगितले.अशा अनेक तडजोडी प्रत्येकाला कराव्याच लागत असणार तेंव्हाच आनंदाने एकत्र राहता येते.आता तर हे विश्वची यांचे घर झाले आहे.त्यांचे कुटुंब विस्तारीत झाले आहे.

                      या विस्तारित कुटुंबाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.आनंद लुटला जातो..कोरोन पूर्वी देश परदेश अशा  अनेक सहली झाल्या.अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. दिवाळीत ११००० किलो मिठाई वाटण्यात येते. शहीद जवान कुटुंबियांना मदत केली जाते.भूकंप,पूर अशी  कोठेही आपत्ती आली की हे धाऊन जातात तेथे जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते.अशा खूप गोष्टी आहेत.

                  ऑनलाईन हास्यक्लब मध्ये अनेकजण आपले मनोगत सांगतात काटे दाम्पत्याबाद्द्ल कृतज्ञता व्यक्त करतात..करोनामुळे,लॉकडाऊनमुळे जगणे विसरलेल्या नैराश्यात गेलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढले आहे.हे ते श्वासाईतक्या सहजतेने करतात.उलट या सर्वाना बदलताना पाहून आमचीच उर्जा वाढते, ही देवाणघेवाण आहे असे त्यांचे म्हणणे असते.कोणतेही काम आनंदाने करायचे ही या दोघांची वृत्ती आहे.अनेक पुरस्कार या त्यांच्या कार्यामुळे त्यांच्याकडे चालून आले आहेत.पुणे महानगरपालिकेचा जीवनगौरव पुरस्कार आणि विशेष नागरी सत्कार करण्यात आला जनसेवा फौंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तशी यादी मोठ्ठी आहे हजारोंच्या मनातील अबाधित स्थान हाही मौलिक पुरस्कार आहेच.

                आपले कार्य असेच बहरो.यासाठी आपल्याला उत्तम आरोग्य लाभो ही मनापासून प्रार्थना.

                   

                        

                     

                          

                              

                        

Wednesday, 23 June 2021

आनंदी वृद्धत्व - ५

                                               आनंदी वृद्धत्व  - ५

                                            आमचे पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांना आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये आपले विचार मांडावे असे सांगण्यासाठी मी फोन केला.विषय कोणता या बाबत विचारले तर म्हणाले, सध्या माझा करोनावर अभ्यास चालू आहे.त्यांचा करोना या आजाराचे स्वरूप,करोनाच्या चाचण्या,करोनामुळे होत असलेले सामाजिक मानसिक परिणाम असा करोना वर विविधांगी अभ्यास आकडेवारीसह झाला होता.एकीकडे या विषयाकडे तटस्थपणे पाहात असताना करोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याच्या दोन घटना वाचून ते व्यथित झाले होते आणि यासाठी जेष्ठांसाठी स्वमदत गट तयार करावा का असा विचार त्यांच्या मनात घोळत होता.करोनाविषयी अजिबात वाचायचे नाही.बातम्या पहायच्या नाहीत. प्राथमिक माहिती आहे तेवढी बस झाली असा विचार करणाऱ्या मला हे भारीच वाटले.अर्थात मी हा विषय नाकारला त्यांच्या दुसऱ्या एका प्रयोगाबद्दल बोलायला सांगितले. २००० मध्ये त्यांनी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मुहूर्तमेढ रोवली तेंव्हाचाच उत्साह आज ८७ व्या वर्षी तब्येतीच्या थोड्या तक्रारी असूनही पाहून मी अवाकच झाले.त्यांच्या सहवासात आल्यापासून असे आवाक होण्याचे क्षण अनेक आले.

                          
पटवर्धन आम्हाला प्रथम मधुसूदन शेंडे यांच्या घरी मिटींगमध्ये भेटले.तेंव्हा त्यांनी सत्तरी ओलांडली होती.त्यावेळीही  आणि आताही त्याना वृद्ध म्हणावेसे वाटत नाही.पहिल्या भेटीतच लक्षात आल हे वेगळ रसायन आहे.पार्किन्सन्स मित्रमंडळात आम्ही सामील झाल्यावर अनेक वेगवेगळे पैलू उलगडत गेले..
 १९९२ मध्ये त्यांच्या पत्नीला पार्किन्सनन्स झाल्यापासून पार्किन्सन्सवर विविध माध्यामातून बरीच माहिती गोळा केली.डॉक्टर मोहित भट यांचेकडून पार्किन्सन्स फौंडेशन ऑफ इंडियाबद्दल समजल. त्यांचे सभासदत्व घेण्याचा व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण विशेष प्रतिसाद मिळाला नाही.मग आपणच का असा गट सुरु करायचा नाही या कल्पनेतून २००० मध्ये पार्किन्सन्स स्वमदत गट सुरु केला.

'आपणच' हा त्यांच्या कोशातला महत्वाचा शब्द.दरवर्षी निघणार्‍या आमच्या मासिकात शुद्धलेखनाच्या होणार्‍या चुका त्यांच्यासाठी यातनामय असतात. आता बातमीपत्र सुरु करायचं आहे.तर म्हणाले,त्या चुका पाहण्यापेक्षा आपणच का डीटीपी शिकून घ्यायचं नाही? पुणा इंजिनीअरींग कॉलेजमधून सिव्हील इंजिनिअर झालेले पटवर्धन आईच्या आजारपणामुळे नोकरी सोडून पुण्याला आले.अमोनिया प्रिंटींग,झेरॉक्स, सायक्लोस्टाईल,नंतर इलेक्ट्रानिक क्षेत्रात कॅल्क्युलेटर रिपेअरिंग असे उद्योग आपणच शिकून केले.संगणक नविन आल्यावर संगणकाचे क्लास,खुप ज्ञान होते असे नाही पण जे येते ते शिकवायाचे हे करताना आपल शिकण होईल  हा दृष्टीकोन. अशी आपणचची यादी खूप मोठी आहे.

स्वच्छ शुद्ध विचार, स्वच्छ शुद्ध बोलण आणि स्वच्छ शुद्ध लिहिण यात विचाराची स्पष्टताही आली.आणि त्याप्रमाणे वागण हा त्यांचा स्थायी भाव आहे.कोणतेही निर्णय घेण्यामागे असा विचार असल्याने ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम असतात.आणि त्यानुसार आपली भूमिका इतरांपर्यंत पोचविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात.मी म्हणतो म्हणून ऐका अस नाही तर माझ म्हणण खोडून काढा. मी मान्य करीन. असा त्यांचा खाक्या असतो.याबाबतच एक उदाहरण सांगायचं तर  सुरुवाती पासून वर्गणी न घेण,मासिक,पुस्तके  विनामूल्य देण याबाबत ते ठाम आहेत.पहिल्याबाबत कोणाला फार  विरोध नव्हता.दुसर्‍याबाबत 'रुका हुवा फैसला' सिनेमाप्रमाणे एकेक मोहरे त्यांच्या बाजूनी होत गेले. पुस्तकाबाबत मात्र हे मान्य होत नव्हत. ना नफा ना तोटा या तत्वावर तरी मुल्य ठेवाव अस सर्वाना वाटत होत.याबाबत जवळजवळ सर्वजण एका बाजूला आणि ते एका बाजूलां अशी परिस्थिती होती.पण ते शेवटपर्यंत खिंड लढवत राहिले.त्यांच्या डोळयाच ऑप्रशन होत.पण तरी त्यादिवशी त्यांची बाजू मांडणार्‍या विविध मुद्यांच टिपण काढून ते बर्वेंच्या घरी देऊन गेले. तेही सायकलवर.

 या वयातही उन असो, पाउस  असो,सर्व ठिकाणी त्यांचा सायकलवर संचार असतो.मिटिंग दुपारी तीनला असली तर आम्ही बंद गाडीतून आरामात येऊनही थकलेले.तर पटवर्धन मात्र सायकल चालवत येऊनही हसतमुखाने आणि उत्साहानी कामाला लागलेले.आतापर्यंत मंडळाच्या जितक्यां म्हणून मिटिंग झाल्या त्या सर्वाना त्यांची एखादा अपवाद वगळता १००% उपस्थिती.तीही सक्रीय'.कुठे कमी तिथ आम्ही' ही वृत्ती.आता मिटींगची ठिकाणे सर्व पेशंटना माहित झाली पण सुरुवातीला आल्यावर पेशंटला नेमक कस  जायच समजाव म्हणून छोटीछोटी पत्रके करून आणलेली असत. शिवाय सेलोटेप,छोटी कात्री असायची.वजन काटा तर ते आजतागायत आणतात.वजन कमी होण हे पार्किन्सन्समधील मह्त्वाच लक्षण. प्रत्येकानी दर महिन्यात वजन पाहावं अस त्याना वाटत असत.वही करून त्यानुसार नोंदी करण्याचाही प्रयत्न .झाला. याबाबत सारे उदासीन. पण तक्रार न करता ते  वजन काट्याच ओझ आणतातच.एखादा वक्ता अचानक आला नाही तर वेळ निभाऊन नेण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर सामग्री असते.शुभार्थींची(पेशंट) काळजी,त्यांच्या शुभंकरांपेक्षा (केअर टेकर)यांनाच जास्त असते.

कोरोनानंतर मात्र ते घराच्या बाहेर अजिबात पडले नाहीत.त्यामुळेच कदाचित घरात इतरांना कोरोना भेटून गेला पण पटवर्धन यांच्याकडे मात्र फिरकला नाही.त्यांच्या मुलांनी म्हटले गाडीतून थोडे फिरवून आणू का? तर त्यांनी नकार दिला एकदा बाहेर जायचे नाही हे स्वीकारले आहे.तर आता मला त्याचे काही वाटत नाही. असे त्यांचे म्हणणे.एक मुलगी पुण्यात तर एक तळेगावला करोना काळात त्यांच्या भेटीही फोनवरच असतात.असलेल्या परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार ते नेहमीच करत आले.आम्ही प्रथम त्यांच्या घरी गेलो तेंव्हा ते आणि पत्नी दोघेच होते.मुलगा जपानला होता,नंतर मुलगा जपानहून आला त्याचे लग्न झाले.त्यांच्याबरोबर एकत्रित राहत. पत्नीच्या निधनानंतर मुलगा सून नातवंड असे राहतात.पण या प्रत्येक परिस्थितीत ते विना तक्रार आनंदातच असतात.आता करोना काळात त्यांनी बाहेर तंबू ठोकला आहे आणि मधुन मधून  वाचन,आराम तेथेच करतात, आता पाउसात ते तंबूचे काय करणार आणि आणि कोणता वेगळा मार्ग शोधणार याची मला उत्सुकता आहे.सध्या सायकलला आराम मिळाला आहे.पटवर्धन मात्र आराम करणाऱ्यातले नाहीतच.

 ते सतत पुण्यातील आणि पुण्याबाहेरील शुभार्थीना फोनवरून कौन्सिलिंग करत असतात.तिशीत पार्किन्सन्स झालेल्या एका शुभार्थीने सांगितले.'आत्महत्या करावीशी वाटली.पण पटवर्धनकाकानी हे कसे चुकीचे आहे हे इतक्या छान प्रकारे समजून सांगितले की आता पीडी होऊन दहा वर्षे झाली.खूप सोसावे लागते पण आत्महत्येचा विचार मात्र पूर्ण पुसला गेला'.ते  फक्त त्यांच्या पत्नीचे शुभंकर नाहीत तर जोजो भेटेल पिडीग्रस्त त्यांचे शुभंकर आहेत.पीडी( पार्किन्सन्स डिसीज ) पेशंट स्वत:ही विचार करणार नाही इतका त्यांनी पेशंटच्या भूमिकेत जाऊन जगण्यातील बारीक सारीक बाबींचा विचार केलेला असतो.पार्किन्सन्सवरच चिकित्सकपणाने केलेलं वाचन त्याला असलेली अनुभवाची, निरिक्षणाची जोड,पिडीग्रस्तानी आनंदी राहावं यासाठीची धडपड या सर्वातून निर्माण झालेलं लेखन,शुभंकर,शुभार्थींसाठी दिशादर्शक आणि पिडीवरील लिखाणात मोलाची भर घालणार आहे.अत्यंत वस्तुनिष्ठपणे केलेले तटस्थ,तर्कशुद्ध,तरीही रटाळ न होता संवाद साधणार्‍या ओघवती भाषेत लिखाण हे त्यांचे वैशिष्ट्य.

लिखाणात तटस्थता असली तरी शुभंकर म्हणून त्यांच्या वागण्यात अत्यंत हळुवारपणा असतो.सेवा करण हा स्त्रियांचा गुण हा समज त्यांनी खोटा ठरवला.आमची भेट झाली तेंव्हा त्यांच्या पत्नीला पीडी होऊन १४ वर्षे झाली होती.वहिनींचा मुळातला अशक्तपणा,त्यात गीळण्याची समस्या या बाबी लक्षात घेता इतकी वर्षे  त्यांच्या पीडीला आटोक्यात ठेवण्यात पटवर्धनांचा वाटा खूप मोठ्ठा वाटा  आहे.त्यांचा आहार,विहार व्यायाम,त्याना वेळ देण आणि अवकाशही देण यांचा सुंदर मेळ त्यांनी घातला होता.वहिनी अधून मधून सभाना येत.याबाबतीतला निर्णय वहिनींचा असे. त्या असल्या की सायकलीला थोडा आराम मिळे.एरवी त्यांच्या शबनम मध्ये टीपणासाठी वही,पेन,औषधाच्या रिकाम्या छोट्या काचेच्या बाटलीत पाणी,इतराना देण्या साठी आणलेली काही उपयुक्त कात्रणे असत.वहिनी बरोबर असल्या  की त्यांच्या  औषधांची भर असायची.सभेवर नियंत्रण ठेवताना वहीनींच्या औषधांच्या वेळेवर लक्ष असायचे.पतीपत्नी म्हणून आणि शुभंकर शुभार्थी म्हणून त्यांचे परस्पर सबंध आदर्श असेच.घरी हे दोघच असले तरी वहिनींनीही त्याना कधी आपल्यासाठी अडकवून ठेवले नाही.आणि पटवर्धानानीही बाहेर किती राहायचं याच भान ठेवलं.बाहेर असले तर मधून मधून फोन करून चौकशी आणि कितीवेळ थांबावं लागेल हे सांगून त्याबद्दल चालेल ना ही विचारणा.सगळ कस नेमक !

त्यांच्या नेमकेपणाचा प्रत्यय इतरत्रही येत राहतो.त्यांच्याकडे प्रत्यक्ष बोलताना किंवा फोनवर बोलताना ते म्हणतील 'थांबा थांबा पुन्हा सांगा' आपण ओळखाव आपल्या विधानात गडबड आहे त्याचं पाहिलं थांबा यायच्या आत बर्‍याचवेळा आपल्या विधानातील गडबड लक्षात आलेली असते.आपण फारसा विचार न करता पटकन सरधोपट विधान करतो. मग अस स्वत:लाच तपासण होत. थांबा म्हणताना आपल्याला नीट ऐकू न आल्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली असते.आपण मनाशी ठरवतो पटवर्धनांशी बोलताना घाइगडबडीत, गुळमुळीत विधाने करायची नाहीत.खर तर कधीच करायची नाहीत.तरीही त्याना थांबा थांबा म्हणायला लावण्याचे प्रसंग येतच राहतात.

पटवर्धनांना फोन करायचा म्हणजे व्यवस्थित वेळ घेऊनच फोन करायला हवा.आम्हाला दोघानाही खूप गोष्टी शेअर करायच्या असतात.शुभार्थींची यादी अद्ययावत करण्याच काम पटवर्धन करतात.अत्यंत किचकट असे हे काम ते समर्थपणे करतात.नवीन पेशंट येतात, काहींचा मृत्यू,पता बदल, फोन बदल असे सारखे चालू असते.फोनवर या सर्वांची देवाणघेवाण होते,नवीन उपचार,शुभार्थीच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती, त्यानुसार मंडळाच्या कामाची दिशा ठरवणे अशा अनेक गोष्टी असतात.पटवर्धन म्हणजे पीडीवरील चालता बोलता कोश त्यामुळे बरीच नवी माहिती समजते, काही चुकीची माहिती दुरुस्त होते.कधीतरी साहित्य इतिहास असेही विषय निघतात.त्याना लहान मुलासारखे अनेक गोष्टीबद्दल कुतूहल असत.अनेक प्रश्न असतात, शंका असतात काहीवेळा या विषयावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणे भेटू अस बोलण होत.पण ते घडत नाही.शुभंकर शुभार्थींसाठी सहल असली की मात्र अशा ठेवणीतल्या गोष्टी बाहेर पडतात.

एका सहलीत त्यांनी आठवणीतील जुनी गाणी आणली.ती कोणाची ओळखायची होती.एकदा विविध वलयांकित व्यक्तींच्या फोटोवर आधारित ओळखा पाहू हा खेळ करून आणला होता.त्यासाठी सर्वाना पुरतील इतक्या प्रती काढण,उत्तरे लिहिण्यासाठी कागद असा सर्व खटाटोपही केला होता.एकदा ओरीगामिच्या स्पर्धेसाठी विविध आकाराचे कागद कापून आणले होते. या सर्व खेळात पीडी पेशंटच्या क्षमता,मनोरंजनाबरोबर उपयुक्तता याचाही त्यांनी विचार केलेला असतो.मनोरंजनाच्या कार्यक्रमात Ramp Walk असो की सैराट वरील गाण्यावर नाचणे असो पटवर्धन यांच्या उत्स्फूर्त सहभागाने इतरांना ही स्फूर्ती मिळते..प्रत्येक सहलीत वहिनी बरोबर असायच्या.एक वर्षी मात्र त्यांच्या डोळयाच ऑप्रशन झाल त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत.अशावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी घरी  कोणीतरी वहिनींच्या मदतीला येत.उगाच इतराना त्रास द्यायचा नाही.पण गरज असेल तेंव्हा मदत घेण्यास अनमान करायचं नाही अशी त्यांची वृत्ती असते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाला २०१४ मध्ये अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार मिळाला त्यावेळी वहिनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होत्या.त्याआधी बरेच दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांच्या मुलांनी म्हणजे मुलगा आणि दोन विवाहित मुली यांनी हॉस्पिटलचा सर्व  चार्ज घेतला होता त्याना त्यांची कामे करण्यासाठी मोकळे ठेवले होते.तुम्हाला इच्छा होईल तेंव्हा या असे सांगितले होते.पुरस्कार सोहळ्यास ते आले होते.स्टेजवर पुरस्कार घेण्यासही ते गेले.पण हा सन्मान पाहण्यास वाहिनी उपस्थित नव्हत्या.सोहळा संपल्यावर वहिनींना सन्मान चिन्ह  दाखवण्यासाठी ते घेऊन गेले.या सन्मानात पटवर्धनांबरोबर त्यांचाही वाटा होताच ना?काही दिवसातच वहिनींचे निधन झाले.हे होणार हे माहिती असले तरी.त्रास हा होतोच पण 'मृत्यू एक चिरंतन सत्य'असा स्वीकार त्यांच्या वागण्या बोलण्यात होता.भेटायला येणार्‍यांसाठी एका कागदावर हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत काय-काय झाले ते लिहिले होते.तो कागद ते येणार्‍यांना देत होते नंतरच्या सभेला ते आले तेंव्हा शुभार्थींच्या यादीतले बदल असलेला कागद दिला.डिलिटच्या लिस्ट मध्ये शुभलक्ष्मी पटवर्धन नाव होते. हे नाव डिलिट करताना किती यातना झाल्या असतील त्याना?का नसतील माहित नाही.पण माझ्या मात्र डोळ्यातून पाणी आले.काही दिवसातच दिनानाथ हॉस्पिटलमध्ये पार्किन्सन्स मुव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी तर्फे पीडीवर कार्यक्रम होता.इथेच वहिनी अनेक दिवस होत्या. माझ्या नात्यातल्या दोन व्यक्ती बरेच दिवसापूर्वी येथे गेल्या.तर माझे पाय दिनानाथ मध्ये जाताना अजून लटपटतात.
त्यामुळे वाटलं पटवर्धन येतील?पटवर्धन आले थोडे उशिरा. कारण ९० वर्षाच्या व्याह्यांना भेटण्यास ते तळेगावला गेले होते.ते पटवर्धनाना भेटायला येऊ शकत नव्हते म्हणून हेच गेले.

सध्या ते महाराष्ट्रातील नाटक मंडळींचा अभ्यास करत आहेत.त्यासाठी ते भरतनाट्य मंदिराच्या वाचनालयात जात असतात.हे त्याचं काम  स्वांतसुखाय आहे. स्वांतसुखाय अस काम कोणी करूच शकत नाही ही माझी धारणा पटवर्धनांकडे पाहून बदलली.आता बाहेर जाता येत नसल्याने हे काम थांबले पण त्याची खंत न  करता त्यांचा कोरोनावर अभ्यास सुरु झाला.  

माझ्या पाहण्यात ते एकदाच आजारी पडले त्यावेळी खोकला आणि अशक्त पण खूप होता आवाज खोल गेला होता.मुलगा सून घरी असल्याने त्यांचा आधार होता.तो घेण्यात त्यांनी अनमान केले नाही.या काळात त्यांनी आपल्या आजाराची कारणे शोधली ठराविक सिझन मध्ये हे होते हे त्यांच्या लक्षात आले त्यानुसार त्याकाळात ते आधीपासूनच तयार असतात एकदा हे होणार हे माहित आहे तर स्वीकार करून त्यातून मार्ग काढायचा हे त्यांनी ठरवून टाकले.सारखे पडून राहावे लागायचे तर त्यांनी श्रवणपचार शोधून स्वत:वर प्रयोग केले.पीडीमुळे हालचालीवर मर्यादा आलेल्याना बेडरिडन पेशंटना,वृद्धत्वामुळे विकलांग झालेल्यांना उपयोगी होईल असा एम पी ३ प्लेअर घेऊन  मराठी हिंदी भरपूर गाणी लोड केली.वापरायला सोपा असा हा प्लेअर तीन महिने शुभार्थिनी वापरायचा आणि उपयोगी वाटला तर ठेऊन घ्यायचा अशा तत्वावर प्रयोग केला स्वत:च्या पदरचे पैसे घातले.फारसा प्रतिसाद मिळाला नाही असे का झाले याचा शोध घेणारा लेख लिहिला.मग काही शुभार्थीना ओळखीच्या स्नेही मंडळीना ऐका आणि आनंद लुटा म्हणत भेट दिला.असे आमचे स्वत:ही आनंदी राहणारे आनंद लुटणारे तरुण शुभंकर.

शुभार्थी गेल्यावर अपवाद वगळता शुभंकरांच येण बंद होत.पण ही तर त्यांचीच निर्मिती.हे काम सुरु करताना वहिनी निमित्य असल्या तरी ते सर्वांचे शुभंकर होते.त्यांची भूमिका वैश्विक होती..धार्मिक लोकाना पाखंडी वाटू शकणारे,विज्ञाननिष्ठा आचरणात आणणारे चैतन्याचा अखंड झरा असे  पटवर्धन मला तरी खरे अध्यात्मिक वाटतात.आचार्य भागवतांनी मांडलेल्या कर्मयोगी अध्यात्माची संकल्पना जगणारे स्वत:ला वैश्विक बनवणारे कर्मयोगी.अध्यात्म जगणारे अध्यात्मिक.