Tuesday, 12 February 2019

ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी लेखिका - प्रतिभा रानडे - पुस्तक परिचय

  •            नोव्हेंबर १९९८ मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशी झाली.अवघ्या सह महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.दरम्यानच्या काळात या दोघींमधल्या गप्पा चालूच होत्या.त्यातला महत्वाचा वाटणारा भाग लेखिका आणि प्रकाशक यांनी तत्परतेने दुसऱ्या आवृत्तीत वाचकांना उपलब्ध करून दिला.
                        या   गप्पा आहेत दोन प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाच्या विदुषी मधील त्यातील एक दुर्गाबाई या खाष्ट विदुषी म्हणून सर्वांना परिचित आहेत. शिवाय त्या मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ लोकसाहित्याच्या भाष्यकार, ललित लेखिका .संस्कृत, पाली, बंगाली, जर्मन अशा विविध भाषेत निष्णात आहेत ७० वर्षे त्या विविध विषयावर लेखन करीत आहेत. दुसऱ्या विदुषी प्रतिभा रानडे  प्रथितयश लेखिका आहेत, जिज्ञासू आहेत अभ्यासू आहेत, देश विदेश फिरलेल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी सभोवतालचं जग न्याहाळताना जे जाणवलं त्यावर धीटपणे आपली मतं त्यांनी आपल्या लिखाणातून मांडलेली आहेत बदनसीब, अफगाण डायरी, स्त्री प्रश्नांची चर्चा - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री प्रश्नांचा अभ्यास या पुस्तकांना महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट साहित्याचे पुरस्कार मिळालेले आहेत. अशा या दोन विदुषी मधील गप्पा असूनही विद्वज्जड , तर्ककर्कश नाहीत, चौकटीबद्ध ही नाहीत. आहे ती चौकट ऐसपैस शब्द वापरून त्यांनी लवचिक करून घेतली आहे एकनाथांनी भारूडातून जसे सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचवले तसे प्रतिभाताईंनी दुर्गाबाईंचा व्यासंग, ज्ञानसाधना, तत्वचिंतन, संशोधन, निसर्गाचे हळुवार वर्णन करत त्याचा घेतलेला शोध हे सर्व काही गप्पांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचलेले आहे त्यामुळे विचारवंत, समाजशास्त्रज्ञ, समाजसेवक, सर्वसामान्य या सर्वांनाच भावेल असे हे पुस्तक आहे
                           पुस्तकाची विभागणी पाच प्रकरणात केलेली आहे. पहिल्या भागात संस्कृती शब्दाची व्युत्पत्ती, व्याख्या, वाटचाल, मीथक कथांचे समाजाच्या दृष्टीने महत्त्व, दशावतार कल्पना, तांत्रिक पंथ याबाबतच्या गप्पा आहेत पाषाणयुगापासून आज पर्यंतच्या संस्कृतीबाबत चर्चा करताना शेवटी मुक्त विचार हा संस्कृतीचा आधार आहे असे मत दुर्गाबाई व्यक्त करतात. यापुढे म्हणतात मुक्त विचारांची जपणूक करणे हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे. विचारवंत लेखकावर कोणतीही बंधने आली की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते ती येऊ नये म्हणून सामाजिक आरोग्य सुस्थिती राजकीय स्थिरता या गोष्टी आवश्यक. संस्कृतीच्या साखळीत एकातून दुसरे निघत वाढत गेले पण प्रत्येक टप्प्यावर निसर्गाशी नातं कुठे तुटलं नाही आजच्या काळात मात्र आपण निसर्गाशी नातं तोडत आहोत माणूस सारखा निसर्गाला ओरबाडून घेतोय याची त्यांना खंत वाटते. संस्कृती वरून गप्पांचा ओघ  मिथककथा कडे येतो. त्यांच्या मते समाजाची सांघिक जाणिव, संवेदना या मिथककथातून प्रगट केल्या जातात. जगात प्रथम मिथक कथा भारतात रचल्या गेल्या आणि तेथून त्या जगभर पसरल्या मिथककथातून  अध्यात्मिक शिक्षण दिलं जातं. जीवनाचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न असतो. दुर्गाबाईंनी वाचायला सांगितलेल्या' पावर ऑफ मीथ' चा हवाला देऊन प्रतिभाताई सांगतात अमेरिकन समाजात मोठ्या प्रमाणात हिंसा व क्रौर्य आहे. याचे कारण त्यांच्याकडे सशक्त समृद्ध अशा मिथक कथा नाहीत. गप्पांमध्ये मग दशावतार, विठोबा, पदूबाई, जगन्नाथ पुरी ची लक्ष्मी, सावित्री इत्यादी मिथककथा येतात व वाचकांची उत्कंठा वाढवत जातात या कथा सांगताना साहित्यात नित्य कथा रचण्याची शक्ती ज्याप्रमाणे अधिक आणि सातत्याने चालते त्या प्रमाणात ते साहित्य समाज अधिक चैतन्यमय वर्धिष्णू असतो, असे भाष्यही त्या  करतात पुढे संस्कृतीचा महत्त्वाचा भाग अशा तांत्रिक पंथाची चर्चा सुरू होते.


Thursday, 19 April 2018

भिंत

                                      संपूर्णनी दिलेले सर्वच विषय टेम्पटिंग असतात. मला त्यावर भसाभस सुचत असत. पण ते लिहिण्यासाठी प्रकृतीची भिंत आडवी येते.whats app वर मी व्हाईस मेसेज वापरतेआणि मला जे व्यक्त व्हायचे असते ते होऊन घेते.आता या भिंतीला थोड भगदाड पाडून लिहिते.
माणसामाणसातल्या जात,धर्म,वय,लिंग अशा कोणत्याच भिंती माझ्याबाबत नसतात.पण तिच्यात आणि माझ्यात एक भिंत निर्माण झाली होती त्यामुळे तिच्या आणि माझ्या जीवनावर काहीच परिणाम होणार नव्हता त्यामुळे ती तशीच राहिली.त्याच असं झाल. आमच्या कॉलनीत राहणाऱ्या राणी राजांनी यांच्याशी थोडी तोंडओळख होती.उंच,गोऱ्या,ऐटीत कार चालवायच्या..नंतर रस्त्याने जाताना २/४ वेळा दिसल्या पण हसल्याही नाहीत.शिष्ठ दिसतात.मी शिक्कामोर्तब करून मोकळी.एकदा लक्ष्मीरोडला शेवानी यांच्या दुकानात त्या दिसलया.ते त्यांचे नातेवायिक असल्याने गप्पा मारत होत्या. आमची सर्व खरेदी होईपर्यंत त्या तेथेच होत्या.ओळख नाही दिली.भिंत पक्की झाली.अनेक वर्षांनी हास्यक्लबमुळे समोरासमोर आलो.चाफ्याची फुले द्यायच्या.सह्ली,विविध कार्यक्रमातून त्यांचे वेगळेच रूप दिसू लागले.माझ्या मुलीच्या प्रेग्नन्सीच्यावेळी रात्री अपरात्री केंव्हाही बोलवा मी गाडी घेऊन येईन म्हणाल्या.अबोल पण प्रेमळ आज्जी,आई,सासू,शेजारी,मैत्रीण अशी तिची वेगवेगळी रूपे दिसू लागली.तिला शिष्ठ म्हणणे म्हणजे कर्णाला कंजूष म्हणण्यासारखे होते.भिंत पडली नाही,पडली नाही अपोआप गळून गेली.हास्यक्लबमध्ये वाढदिवसाला त्या व्यक्तीबद्दल कोणी कोणी बोलत असते.तिच्या एका वाढदिवसाला मी तिच्याबद्दल गैरसमजापासून झालेल्या बदलापर्यंत सर्व सांगितले.कोणावरही झटकन शिक्कामोर्तब करू नये हा धडा शिकल्याचही सांगितले.राणीनी मला घट्ट मिठी मारली.भिंत पडली नाही,पाडली नाही आपोआप गळून गेली.

Monday, 29 January 2018

स्वत:विषयी

                              दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास हे बोधवचन ऐकत आम्ही मोट्ठे झालो.इतरांसाठी जगताना आनंदही मिळत होता.हल्ली तब्येतीच्या तक्रारी सांगितल्या की डॉक्टर,समुपदेशक यांच्याकडून सल्ला मिळतो थोडे काम कमी करा. काही वेळ फक्त स्वत:साठी ठेवा.कळत होते पण वळत नव्हते.
                           त्यादिवशी संगणकावर काम करायचे होते दुखरी कंबर बसू देत नव्हती,चुरचुरणारे,डोळे स्क्रीन कडे पह्यलाही तयार नव्हते.मग हॉट bag मध्ये पाणी भरून कंबर शेकायला घेतली, गुलाब पाण्यात रुमाल भिजवून डोळ्यावर ठेवला आणि स्वस्थ पडून राहिले.शेकणे कंबर सुखावत होती, डोळेही सुगंधी थंडाव्याने शांतवत होते.नकळत शरीर ,मन एक होत होते.किती ताबडवले आपण या शरीराला.प्रेमाने कधी पहिलच नाही. आणि कधी नव्हे ते स्वत:बद्दलच मन प्रेमाने भरून आले कितीकांबद्द्ल सातत्याने कृतज्ञता व्यक्त केली.पण स्वत:च्या शरीराला कधी ती दाखवली नाही.अगदी मनापासून सॉरी म्हटल आणि अगदी प्रेमाने धन्यवद पण.आता शरीराची नस अन नस सुखावत होती.स्वत:च्या श्वासोच्छवासाकडे लक्ष देत कितीतरी वेळ .तशीच पडून राहिले.स्वत:साठी वेळ देण्यातला आनंद समजला होता शरीर न रागावता नव्या जोमाने कामाला उठले.का नाही समजले मला.स्वत:ला थोडा वेळ दिला की त्याबदल्यात दुसऱ्यासाठी वेळ देण्याची ताकद वाढणारच आहे,मी पुन्हा मनापासून मलाच धन्यवाद म्हटले.

Friday, 15 December 2017

एक थरारनाट्य

         आज दुपारी आमच्याकडे एक थरार नाट्य घडले.आमच गेट जोरजोरात वाजवून एक मुलगा सांगत होता आज्जी घराची दारे लवकर लावून घ्या तुमच्याकडे पिसाळलेली म्हैस शिरले.दार लावता लावता मला वेगाने आत शिरलेली म्हैस दिसली.आम्ही जीव मुठीत घेऊन आत बसलो. आमच्या कामवालीच काम उरकल होत तिला जायचं होत.पण बाहेरून आरडा ओरडा ५ मिनिटे थांबा.बाहेर गलका ऐकू येत होता.म्हशीला बाहेरूनच आमच्या कुंपणाला कोणीतरी बांधल होत.तिला काही खाण्यातून गुंगीचे औषध दिले कि काय माहित नाही पण ती आता शांत झाली होती.वरून गच्चीत जाऊन पाहिल्यावर पोलीसही आलेले दिसत होते.आमच्या बाईची जायची घाई आणि बाहेर्च्याचे दार उघडू नका हे चालले होते.मुलानी गेटला आतून बाहेरून म्हैस बाहेर येऊ नये म्हणून कड्या लावल्या होत्या.आणि म्हशीनी धडक देऊन गेट वाकवले होते.आता तिला बाहेर न्यायचे तर कड्या निघत नव्हत्या.खूप प्रयत्नांनी ठोकून ठोकून कड्या काढल्या.५/६ माणसांनी तिला गाडीत चढवल.गाडी गेल्यावर बाहेर जमलेली मुले सांगत होती.तिनी आमच्या कडे येईपर्यंत क्रिकेट खेळणारी मुले, एक स्कूटर स्वार,एक रस्त्यावरचा माणूस अशा अनेकांना दुखापत केली होती.' आज्जी तुमच्या बंगल्यांनी छान सहकार्य केल.' एक मुलगा सांगत होता.मला गंमतच वाटली.आता आम्ही गेट दुरुस्त करतोय.
.

Wednesday, 11 October 2017

माझे दूरस्थ विद्यार्थी - हनुमंत गवळी

                      

   बऱ्याच वर्षानी हनुमंत गवळी यांचा फोन आला भेटायला येऊ का? प्रत्येकवेळी ते आले की त्यांच्या एका नव्या उद्योगात भर पडलेली असते.पुस्त्क प्रकाशन,पुस्तक विक्री हे सर्व बंद केल्याचे त्यांनी सांगितले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी समाजातल्या वंचित घटकापर्यंत मोफत पुस्तके वाटत ते फिरत असतात.अपंग संस्था,येरवडा जेल,अंधशाळा,जव्हार येथील आदिवासी भाग येथे त्यांचा संचार असतो.
                          सध्या त्यांनी एका वेगळ्याच सामाजिक कामाचा वसा घेतलाय.लष्कर परिसरातील सैनीकी महाविद्यालय परिसरात ते फिरायला जात तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की  कमांड हॉस्पिटलमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, ,लातूर अशा विविध जिल्ह्यातून उपचारासाठी लोक येतात.अंध,अपंग,वृद्ध येतात.हॉस्पिटलचा पसारा मोठ्ठा,भाषेचा प्रश्न. त्यामुळे गोंधळून जातात.ही समस्या लक्षात घेऊन ते गरजू पेशंटना मार्गदर्शन करतात.आपल्या दुचाकीवर बसवून योग्य त्या विभागात पोचवतात.हिंदी भाषिक डॉक्टर,वैद्यकीय अधिकारी यांच्यात संवाद साधून देण्यासाठी दुभाषे बनतात. एखाद्याला काही खायची इच्छा झाल्यास स्वत: पुरवतात.ही त्यांची सेवा गेली दहा वर्षे चालू आहे. त्यांच्यावर लिहिलेला.केसरीमधील उत्तुंग भरारी या सदरातील लेख  येथे देत आहे.
                                                     नांगर,लेथ लेखणी 
                       आमचे अनेक विद्यार्थी पहिले की मला नेहमी प्रश्न पडतो,यांच्यात इतका उत्साह,इतकी उर्जा येते कुठून?कामाचे व्याप सांभाळून बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही पदरमोड करून समजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती,आजूबाजूचे चंगळवादी स्वार्थी जग पाहताना सुखावणारी वाटते.आमचे विद्यार्थी  हनुमंत गवळी त्यातील एक.आता ते आमचे विद्यार्थी नसले तरी विद्यापीठच्या ग्रंथालयात प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते म्हणून त्यांची नेहमी फेरी असते.आले की भेटून जातात आणि त्यांच्या नव्या कामाची माहिती मिळते.नांगर लेथ,लेखणी सर्व हाताळलेल्या गवळीनी अनेक चढउतार पहिले; पण समाजाभिमुखता सोडली नाही.याबद्दल त्यांचे नेहमीच कौतुक वाटते.
                                             त्यांचे कुटुंब पुण्याच्या आताच्या फातिमानगर भागात सरदार बावडेकर यांचे कुळएकत्र कुटुंब होते म्हणून काम करीत असे..आईवडील अशिक्षित पण मुलांना शाळेत घातले.शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेतून आल्यावर शेतीची कामे करावी लागत.शेळ्या,मेंढ्या राखणे,जनावरांना पाणी घालणे.गाजराचा पाला काढणे,गाजरे धुऊन मंडइत नेणे,ज्वारी,बाजरी काढणी... अशी अनेक कामे करावी लागत.हे करताच सातवी पर्यंत महानगरपालीकेच्या शाळेत आणि नंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शिक्षण झाले.ल.न. कानडेयांच्यासारख्या शिक्षकांकडून लहानपणीच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मिळाला.लिखाणाची प्रेरणाही मिळाली.चुलतभाऊ आयटीआय झालेला.गवळीनाही घरच्यांनी तंत्रज्ञ होण्याचा मार्ग दाखविला.
                                    २१ वर्षे किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्ये काम केले.मिलिंग मशीन,लेथ मशीन,ड्रिलिंग मशीन असे सर्व हाताळले.पण मुळातला लेखक ,कवी सतत जागृत होता.
'लोहाला कापताना मोहाला त्यागितो मी
गतीला रोखताना मातीला जाणतो मी'
असा तो कवितेतून प्रगट झाला.कारखान्यात रात्रपाळी करावी लागे.पण ती आपत्ती न मानता संधी मानून त्याचा उपयोग इतर छंद जोपासण्यासाठी,व्यवसायासाठी केला
                               .वाचनाची प्रचंड आवड असल्याने नगरवाचन मंदिरासारख्या जुन्या संस्थेशी सतत संपर्क राहिला.हद्प्सार्मध्ये ललित वैचारिक साहित्य मिळेल असे पुस्तकाचे दुकान नव्हते.गवळीनी स्वत:च असे दुकान काढले.एकीकडे स्वराज्य,प्रभात,विशाल सह्याद्रीत स्फुट लेखन चालू होते.त्यास बक्षिसेही मिळत होती.साहित्याच्या ओढीने आणि पुस्तक विक्रीच्या निमित्ताने साहित्य संमेलनाला जाणे सुरु झाले.गं.बा.सरदार,ग.ना.जोगळेकर,ग.ल.ठोकळ,अनिल अवचट,म.श्री.दीक्षित,न.म.जोशी अशा प्रतिथयश लेखक,साहित्यिकांशी ओळख झाली.त्यांच्याशी चर्चेतून वैचारिक प्रगल्भता वाढत गेली.प्रतिभा विकसित होत गेली.कृषिराज कादंबरीचा जन्म झाला.प्रकाशनासाठी इथे तिथे न जाता स्वत:च प्रेरणा प्रकाशन सुरु केले.खर्चासाठी बायकोच्या बांगड्या गहाण टाकल्या.महापौरांच्या हस्ते झोकात प्रकाशन झाले.
                             वाचनातून अनेक मानव रत्ने सापडत होती.लोकांपर्यंत विशेषत: संस्कारक्षम वयाच्या मुलांपर्यंत पोचावावीशी वाटत होती.यातून मानवरत्न या पुस्तकाचा जन्म झाला.या पुस्तकाला १९८४ चा  वाङमय निर्मितीचा राज्य पुरस्कार मिळाला.अर्थात गवळी यांचे काम पुरस्कारासाठी नव्हते.तर कर्तव्य भावनेतून होते.त्यामुळे जागतिक कीर्तीचे प्रज्ञावंत या पुस्तकाची निर्मिती झाली.याशिवाय वि.दा.सावरकर,विनोबा भावे,सावित्रीबाईफुले यांच्यावर छोट्या छोट्या पुस्तिका लिहिल्या.काही इतरांची पुस्तकेही प्रकाशित केली यातही पर्यावरण,विज्ञान असे समाज जागृती करणारेच विषय होते.
                              एकीकडे नोकरी,रात्रपाळ्या, दुसरीकडे लेखन,त्यासठी वाचन,प्रकाशन,वितरण यासाठी उन्हातान्हात फिरावे लागे.उन्हाळ्यात घरच्या उसाच्या गुऱ्हाळावर काम करावे लागे.पण गवळी एव्हढ्यावरच तृप्त नव्हते.त्यांची समाजाभिमुखता,समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा बोलघेवडी नव्हती.तर कृतीशील होती.बाबा आढाव,अनिल अवचट,विकास वाघ,रा.प.नेने यांच्याशी संपर्क आला.एक गाव एक पाणवठा,दलित प्रश्न,देवदासी परिषद,शेतकरी परिषद,दुष्काळासाठी सर्व्हे यात कृतीशील सहभाग घेतला.
                              या सर्व गोष्टी नोकरी सांभाळून करायच्या तर तारेवरची कसरत होती.झोप अपुरी व्हायची घरातही अनेक दु:खाच्या,संकटाच्या प्रसंगांना सामोरे जावे लागले.मुलाचे निधन झाले.नोकरी की व्यवसाय आणि सामजिक प्रश्न असा प्रश्न होता.गवळीनी नोकरी सोडण्याचा इतरांना अव्यवहार्य वाटणारा निर्णय घेतला.टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील दूरशिक्षणाद्वारे बी.ए.अभ्यासक्रमास प्रवेश याच काळातला. किर्लोस्कर न्यूमॅटिकमध्येअसताना सासवड येथे श्री तीर्थळी यांच्याशी घनिष्ठ संबंध आला.त्यांनीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा रस्ता दाखविला.
                            ज्ञान मिळवण्यासाठी पदवीची काय गरज असे वाटे.म्हणून तसा प्रयत्नही केला नव्हता.पण बी.ए.च्या अभ्यासक्रमामुळे नवीन ज्ञानाची ओळख झाली.ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या.आजही मेळघाट गट,सदाचार भारती अशा संस्थांशी ते संबंधित आहेत
'.देश माझा मी देशाचा हा विचारच आता नाही.
माझा मी सुखी राही एव्हढच मी पाही.'अशी वृत्ती पाहून त्यांना यातना होतात.प्रत्येकाने मेळघाट सारख्या एखाद्या संस्थेशी संबंधित असावे असे त्यांना वाटते.हा विचार लेखन,प्रकाशन,व कृतीद्वारे समाजात रुजविणे हे त्यांचे काम अखंड चालू आहे.
(सदर लेख केसरी दिनांक ९ मार्च २००६ मध्ये पूर्व प्रकाशित.)
                            

Friday, 26 May 2017

गेले द्यायचे राहुनी

                                          
         दसऱ्याच्या आधी झेंडूच्या फुलांच्या राशी दिसल्या की मला प्रकर्षाने आमच्या झेनची आठवण येते.  आमची झेन गाडी विकली त्याला ४ / ५  वर्षे तरी झाली. गेली एकदा कटकट अशीच भावना होती त्यावेळी.त्याला कारणही तसेच होते.माझ्या  नवऱ्याला पार्किन्सन्स झाल्यावर झेन घरी असेपर्यंत ती ते चालवीत होते.डॉक्टरनी खर तर चालवू नका असे सांगितले होते.पुण्याच्या रहदारीत नॉर्मल माणसासाठीही वाहन चालवणे कठीण झाले आहे.पीडी असणाऱ्यांना किती कठीण याची कल्पना करु शकतो. मोटर डिसऑर्डचा हा आजार असल्यामुळे हालचालीवर नियंत्रण कठीण जाते. त्यात हात,पाय अशा शरीराच्या विविध भागावर कंप असतो.प्रतिक्षिप्त क्रिया असतात तेंव्हा इतका प्रॉब्लेम येत नाही. पण विचार प्रक्रिया सुरु झाली की कंप वाढतो. गाडी सरळ रस्त्यावर चालवताना प्रॉब्लेम यायचा नाही.पण रिव्हर्स घेणे,यु टर्न घेणे, ट्राफिक जाम झाला की त्यातून गाडी बाहेर काढणे कठीण व्हायचे,आजूबाजूच्या लोकांचे हॉर्न वाजणे सुरु झाले की कंप वाढायचा.आजूबाजूचे लोक अशावेळी वाट्टेल ते बोलतात ते ऐकताना मला त्रास व्हायचा,यांच्या रागाचाही पारा चढायचा.पेट्रोल पंपावरचा माणूस दरवेळी म्हणायचा आजोबा आता गाडी चालवणे बंद करा.रस्त्यावरच्या इतर लोकांचे आडाखे  आणि पीडीमुळे यांच्या मेंदूने निर्णयास घेतलेला वेळ यात फरक पडत होता.छोटे मोठे अपघात होत होते,नशीबाने आम्हाला आणि इतर कोणाला कधी दुखापत झाली नाही. पण गाडी दुरुस्ती साठी १० /१२ हजार तरी खर्च यायचा.गराजवालेही आता गाडी चालवणे बंद करा म्हणायचे. यांना एकट्याला मी कुठे जाऊ देत नव्हते याचाही त्यांना राग यायचा.मी यांच्या बरोबर जीव मुठीत घेऊन गाडीत बसायची,पार्किन्सन्सची सभा संपवून आले की पोचलात ना व्यवस्थित असे सहकाऱ्यांचे फोन यायचे.कुठे जायचे तर एखादा ड्रायव्हर बोलऊ असे सुचवून पहिले पण त्यांना ते मान्य नव्हते.आणि हवा तेंव्हा असा ड्रायव्हर मिळणे कठीणही होते.गाडीवरून आमची सारखी भांडणे होऊ लागली.गाडी विकणे हा पर्याय होता.गाडीवर येणाऱ्या खर्चापेक्षा भाड्याचे वाहन वापरणे कसे स्वस्त पडेल हा गणिती हिशोबही करून झाला.शेवटी आमच्या ग्रुपमधील बुजुर्ग शुभार्थी ( पार्किन्सन्स पेशंट )  शेंडे साहेब यांना मी सांगितले ह्यांना जरा समजावा.शेंडे साहेबांनीही गाडी चालवणे योग्यवेळी थांबवले होते.कशाचाच उपयोग होत नव्हता.
शेवटी यांनाच उपरती झाली.ब्रेक पटकन दाबला जात नाही असे लक्षात आले.आपल्या गाडीखाली कोणी गेले तर काय असा विचार आला आणि आता गाडी विकूया असे त्यांनी जाहीर केले.जेथे गाडी दुरुस्तीला देत होतो त्यांनीच गिऱ्हाईक आणले.
                   मला हुश्य झाले.रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या वेळी गाडी विकली ते किती बरे झाले असे वाटायचे गाडी विकल्यानंतरचा पहिला दसरा आला.नेहमीप्रमाणे भरपूर झेंडूची फुले आणली.दाराची तोरणे केली. आता गाडीसाठी हार करायचा.आणि एकदम लक्षात आले गाडी कुठे आहे आता? आणि प्रथमच झेनच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले.ती आणल्यापासूनच्या आठवणी येऊ लागल्या.आपण तिला हकलायच्या नादात तिची पाठवणी किती निर्दयपणे केली.ती आमच्या कुटुंबाचा एक हिस्सा होती.दरवर्षी सावंतवाडी,गोवा,बेळगाव अशी ट्रीप तर जवळजवळ ठरलेली असे.महाबळेश्वर, नाशिक सहल व्याही आणि विहीणबाईबरोबर केली होती.रत्नागिरीला समाजशास्त्र परिषदेला गेलो. माझ्या  आईला सोपान महाराज समाधी पहायची होती,आळंदी, देहू तर कितीक वेळा.मुलींच्या लग्नात हिने खूप धावपळ केली.लेकीला रात्री डीलीव्हरीसाठी नेताना हिचाच आधार होता.छोट्या बाळालाहि हिने आणले. आणि हे बाळ मोट्ठे  झाले  तर आमच्या कडे झेन आहे म्हणून त्यांनी आमचे झेन आज्जी आणि झेन अब्बू असे नामकरण केले. झेन गेली तरी हे नाव मात्र आम्हाला चिकटलेलेच राहिले.
                  पार्किन्सन्स मित्रमंडळाचे काम सुरु केल्यावर हडपसर,कात्रज,औंध,कोथरूड अशा पुण्याच्या कानाकोपर्यातील कित्येक घरभेटी हिच्या साथीने झाल्या.पेशंट असून गाडी चालवत येतात याचे इतरांना कौतुक वाटे.पीडी आटोक्यात होता तोवर हे ठीक होते.झेन गेल्यावर आमच्या घरभेटीना मर्यादा आल्या.मंडळाच्या पहिल्या सहलीत बस बुक केली होती ऐन वेळी लोक वाढले आणि ही मदतीला आली.अशा या सखीच्या बाबत मी रुक्ष कोरडी कशी झाले.मला प्रकर्षाने वाटले आपण तिच्यावरून हात फिरवून धन्यवाद. तरी म्हणायला हवे होते. प्रेमाने तिची पाठवणी करायला हवी होती राहूनच गेले.
(' संपूर्ण ' या मित्रगणात' गेले द्यायचे राहुनी' असा विषय दिला होता त्याला अनुसरून लिहिले आहे. आरती प्रभू यांच्या कवितेतील ओळीलक्षात घेऊन नाही.)

Monday, 17 April 2017

उत्साह्मुर्ती विद्याताई देशपांडे

                                                     उत्साह्मुर्ती विद्याताई देशपांडे
आमची सर्वात तरुण मैत्रीण विद्याताई देशपांडे यांनी आज ८० व्या वर्षात पदार्पण केले.त्यांना वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि सुख समाधान लाभो.
विद्याताईंची आणि आमच्या कुटुंबाची ओळख खुप पूर्वीची.त्यांची मुकुंदनगरची  किलबिल शाळा खूप प्रसिद्ध होती. आमच्या भागात त्यांनी बंगला बांधला.नव्यानेच  वस्ती विस्तारत होती. येथेही त्यांना किलबिलची शाखा काढायची होती.आमच्या साठी ही खूप चांगली सोय होती.आम्ही दोघींनी घरोघर जाऊन शाळेबद्दल सांगितले. बघता बघता अनेक विद्यार्थी दाखल झाले..माझी मुलगी शाळेची  पहिली विद्यार्थिनी.तिच्या मार्फत विद्यार्थ्यात विविध मुल्ये रुजवण्यातील त्यांची कल्पकता,शालेचा दर्जा अत्युत्तम ठेवण्याची त्यांची तळमळ माझ्यापर्यंत पोचत होती.घराजवळ उत्तम शाळा मिळाल्याने आम्ही खुश होतो.त्यांचे वेगळेपण सांगणारे एक उदाहरण सांगते. स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदना साठी विद्यार्थ्यांना बोलावले होते.त्यादिवशी धोधो पाऊस.कोणीच गेले नाही.विद्याताई आणि त्यांच्या पतीनी स्वत:ची गाडी काढली आणि घरोघर जाऊन विद्यार्थ्यांना आणले.एखादे काम हातात घेतले की काही झाले तरी करायचेच आणि तेही उत्तमरीतीने हे त्यांचे वैशिष्ट्य हळू हळू लक्षात येत होते.
आमच्या सेकंड इनिंगमध्ये ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.आम्हा निवृत्त झालेल्या अनेकांना भिमाले उद्यानाने एकत्र आणले.सकाळी मोकळ्या हवेत भरपूर प्राणवायू मिळतो आणि एकमेकिंकडून सकरात्मक उर्जाही.ही उर्जा देण्यात विद्याताईंचा वाटा मोठ्ठा असतो.आमच्या सर्वात पूर्ण पणे निवृत्त न झालेल्या फक्त विद्याताईच.त्यांच्या सुनेने आता शाळेचा भार उचलला आहे.पण विद्याताईंचे मन अजून शाळेत रेंगाळत असते.शाळेला पुढच्या वर्षी  ५० वर्षे होणार त्याची जोरदार तयारी आतापासून चालू आहे.कोणताही उपक्रम असो,घरगुती कार्यक्रम असो,संगीत क्लास असो,दैनंदिन व्यवहार असो, त्यातील नियोजनबद्धता,शिस्तबद्धता  ही त्यांची खासियत असते.
बागेत त्या फिरायला येतात. आमचा हास्यक्लब झाला की आम्ही काहीजणी ओंकार करतो.त्यांनी एक दिवशी फतवा काढला,ओंकारानंतर रोज एक प्रार्थना म्हणायची.ती आठवडाभर म्हणायची, ती तयार झाली की दुसरी.यासाठी त्यांनी गूगलवरून प्रार्थना शोधल्या. कोणत्या ओळी कितीदा म्हणायच्या या तपशिलासह सुंदर अक्षरात त्या  लिहिल्या. झेरॉक्स करून फाईलमध्ये घालून सर्वाना दिल्या.एव्हढ्यावर न थांबता गाणी रेकॉर्ड करून आणणे ती ऐकवणे,म्हणून घेणे हेही केले'.तू बुद्धि दे,' 'हमको मनकी शक्ती देना','ये मलिक तेरे बंदे हम','गगन सदन',' इतनी शक्ती हमे देना दाता' अशा अनेक प्रार्थना तयार झाल्या.हे करताना ताल,चाल, उच्चार हे सर्व व्यवस्थित होत आहे ना याकडे त्यांचे लक्ष असे प्रार्थनेच्या सकारात्मक सुरुवातीने दिवस सुंदर जायचा.त्यांच्या आजारपणात त्यांचे येणे बंद झाले आणि उपक्रमही थंडावला.आता त्या यायला लागल्या तो पुन्हा सुरु होईल.त्यांच्या उत्साहाचे कारंजे सतत उसळत असते. त्याच्या शिडकाव्याने  शुष्क झालेली मनेही टवटवीत होत असतात.कधी डोळ्याची शस्त्रक्रिया कधी गळ्याची,कधी इतर काही आजार यामुळे अनेकदा त्यांचे बागेत येणे बंद होते. सर्वच जेष्ठ असल्याने प्रत्येकाचेच असे आजार चालू असतात.विद्याताई मात्र त्यांच्या इच्छ्याशाक्तीच्या जोरावर डॉक्टरनी दिलेल्या मुदती पूर्वीच बऱ्या होतात. उत्साहाने कामाला लागतात.                      
                                                 गाण्याची आवड हा आम्हाला एकत्र आणण्याताला समान धागा आहे.ज्योती देशमुख यांचा संगीतानंद वर्ग त्यांच्या आणि आमच्या घरी असतो.बऱ्याचवेळा आम्ही एकमेकांचे स्पर्धक असतो पण ही स्पर्धा खेळीमेळीची असते.वैयक्तिक स्पर्धा असो किंवा दोन क्लास मधली असो.अटीतटीचे प्रयत्न आणि नंतर आत्मपरीक्षण हे त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे.सवाईगंधर्व महोत्सव हा त्यांचा विकपॉइंट आहे.यासाठी त्या इतरानाही प्रवृत्त करतात. तिकीटे काढण्याची व्यवस्था,येण्याजाण्याची सोय यासठी धडपड करतात.त्यांची तब्येत पाहता आता यावर्षी काही त्या जाणार नाहीत असे वाटते.पण आपला होरा त्य खोटा ठरवतात.सकारात्मक विचार प्रबळ इच्छ्याश्क्ती या जोरावर त्यांचे सर्व चालते. त्यांची युरोप सहलही  या बळावरच झाली.
                  .घरात संस्कृतचा वारसा असल्याने  आणि काही काळ संस्कृत शिक्षिका म्हणून काम केल्याने संस्कृत उच्च्याराबाबतही त्या जागरूक असतात.कोणाच चुकत असेल तर बरोबर येईपर्यंत शिकवण्याची त्यांची तयारी असते.अनेकांना त्यानी गीता,श्रीसूक्त, विविध स्तोत्रे शिकविली आहेत.
                  उत्साही, स्पष्टवक्ती,व्यवहारी, कडक शिस्तीची,परफेक्शनिस्ट,जीवाला जीव देणारी  अशी ही आमची मैत्रीण आहे.तोंडावर एक बोलेल मागे वेगळेच असे नसल्याने मैत्री करणे, निभावणे सोपे जाते.
            आज त्यांचे जीवन कृतार्थ आहे.संस्कारक्षम वयात त्यांनी घडवलेले विद्यार्थी डॉक्टर,इंजिनीअर,संशोधक,उद्योजक असे विविध स्तरात आहेत.बागेत भेटतात तेंव्हा आदरानी त्यांच्याशी बोलतात आमच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही सुखाऊन जातो.
त्यांच्या मुली,जावई,मुलगा ,सून,नातवंडे सर्वच आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत त्या आनंदी आहेत.सखी अशीच हस्त रहा आनंदी राहा.
जीवेत शरद: शतम!