Monday 13 May 2024

अघटित

                                             अघटित

  •               जुनी कागदपत्रे आवरताना माझी कथा असलेले अनुप्रिता मासिक सापडले.एप्रिल १९७४ चे होते.मुल्य तीन रुपये.वार्षिक वर्गणी २५ रुपये.कागद जीर्ण झाल्यामुळे ब्लॉगवर सेव्ह केली.
     
                          रात्रीची वेळ असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर विशेष गर्दी नव्हती आणि तसेच स्टेशनही लहानच कुठेतरी तुरळक दोन-चार माणसं दिसत होती. आणि सालं घड्याळ ही किती मंद चाललं आहे आता कुठे सव्वा दहा झालेत. मन इतकं अधीर झाले आईकडे पोहोचायला पण चांगली पंधरा मिनिटे आहेत गाडी यायला. एक एक क्षण अगदी युगासारखा वाटतोय गाडी केव्हाही येवो पण मनाला सवड कुठे आहे इतका वेळ वाट बघायला ते केव्हाच धावत पळत आईकडे जाऊन पोहोचते देखील आणि म्हणते आई मी तुझा लाडका श्री आलोय.बनघ किती पैसे घेऊन आलोय. आपण आज सारं कर्ज फेडून टाकू. तुला आता बरोबर घेऊनच जाईन. तुझा शिवण क्लास, शिवण सगळं बंद. आजवर खूप सोसलस आणि कष्टलिस. आता अगदी आरामात ठेवणार तुला आणि आई बरं का तू माझ्या ड्रॉइंगच्या नादावर चिडायचीस त्या नादानेच तर एवढा पैसा मिळवून दिलाय.  ड्रॉइंग मास्तरची नोकरी म्हणून नाराज असायचीस ना आता चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी पण मिळाली खूप खूप सुखात ठेवीन तुला. आईच्या चेहऱ्यावर ओसंडणाऱ्या समाधानाचं हसू पाहून जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.
                                    आईकडे जाऊन येऊन पिसाट मन केंव्हाच नव्या नीटनेटक्या घराचं चित्र बघण्यात रमून गेले. तिथं गेल्यावर आईला काहीही काम करायला लावायचं नाही. धुण्या भांड्याला मोलकरीण, नाना आजोबांसाठी दाई आणि नेसायला चांगली तलम लुगडी घ्यायची. इतके दिवस सतरा कडे फाटकीच लुगडी नेसलीन बिचारीनं. गाडी येण्याची सूचना देणारी घंटा वाजली आणि मी भानावर आलो. डब्यात जागा मिळाली प्रवाशांनी रिकाम्या बाकांवर पथाऱ्या पसरल्या. मीही वरच्या बर्थ वर जाऊन झोपलो. गाडी पोहोचायला सकाळचे आठ साडेआठ तरी वाजणार होते. तोपर्यंत झोप काढावी म्हटलं पण झोप कुठली? मन पिसासारखं हलकं झालं होतं. खरंच दैव फळाला आले होते. वाटलं सुद्धा नव्हतं आयुष्यात इतक्या लवकर इतकी मोठी संधी मिळेल. झोप येत नव्हती पण गत जीवनाचा चित्रपट डोळ्यापुढे तरळत होता. तसा मी चार-पाच वर्षाचा असताना वडील वारले. नीटसा आठवत सुद्धा नाही त्यांचा चेहरा. त्यांना कॅन्सर झाला होता म्हणे. बरेच उपाय झाले ऑपरेशन ही केलं पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. वडील जायचे ते गेलेच. त्यांचे आजारपण आणि ऑपरेशन यासाठी कर्ज तेवढं झालं. माझे वडील म्हणजे पटवर्धन मास्तर सगळ्यांचा तसा आदराचा विषय. नातलगांसाठी आणि मित्रमंडळी साठी खूप केलं होतं त्यांनी. पण अडचणीच्या वेळी सगळे पाठ फिरवून हात झटकून मोकळे झाले. माझी आणि आजारी नाना आजोबांची सर्वस्वी जबाबदारी फक्त आईवर. दोन-चार पोती येणार भात एवढेच काय ते उत्पन्न. राहायला घर सुद्धा नाही. तसे इतर भाऊबंद श्रीमंत होते पण आजोबांनी तरुण वयातच जंगीभंगीपणा व व्यसन यात सारं घालून टाकलं होतं. आईचे भाऊ आणि वडील म्हणाले होते "रमा इथं काय राहिले तुझं श्रीला घेऊन चल आमच्याकडे राहायला" पण आईने साफ नकार दिला. आणि माझी आणि नाना आजोबांची जबाबदारी धडाडीने स्वीकारली होती. घरी हात मशीन होती त्यावर दिवस-रात्र शिलाई करायची. आणि एक शिवण क्लास मध्ये 250 रुपये पगारांवर शिवण शिकवायची नोकरी. तसं पाहिलं तर चालकांना जास्त पगार देणं परवडलं असतं पण ते "पटवर्धन मास्तरांची बायको आणि अशी वेळ आली आहे म्हणून नोकरी दिली तशा शिवणाचा डिप्लोमा घेतलेल्या कितीतरी काम करायला तयार आहेत" असं म्हणायचे. शिवाय गावातल्या बायकाही हर घडी मदतीला बोलवायच्या. आई कुणाला नाही म्हणायची नाही. त्या कामातून काही फायदा नसायचा. कपभर चहा दिला तरी मेहरबानी केली असं वाटायचं त्यांना. मी लहान असल्यापासून आईला नुसतं दिवस रात्र राबतानाच पाहिले. अगदी अंगात ताप असतानाही. कर्ज फेडायची जबाबदारी आणि घर चालवायचं तर पैसा तरी पुरला पाहिजे. त्यात नानांचा दम्याचा विकार. औषधाला पैसा आणि बिडीसाठी पैसा सारखा लागायचाच. मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये पण नाना म्हणजे एक बॅदच होती. इतकं वय झालं पण परिस्थितीची जाणीव आई इतक राबून दोन-चार घास घालते त्याबद्दल कृतज्ञता आणि कौतुक तर नव्हतच, उलट त्यांचा त्रास असायचा. आई राबुन घरी येते तर स्वस्थ झोप म्हणून मिळत नव्हती. खोकत खोकत त्यांची कुरकुर सारखी चालायचीच. येणाऱ्या जाणाऱ्यांना बसवून माझे कसे हाल करते, लक्ष देत नाही, चांगल्या डॉक्टरच औषध देत नाही, मी डगळ वाटतो तिला. एकदा उलथून गेलो की हिला नंगा नाच घालायला मोकळीक असं सांगायचे.
    आई सगळ्या कामातून वेळ काढून सरकारी दवाखान्यातल्या भल्या मोठ्या रांगेत उभी राहून नानांचं औषध आणत होती. कोणी काही घरगुती उपाय सुचवले की तेही करून बघायची. मोठ्या डॉक्टरांची बिल परवडायची कशी? रतीबाचे दोन पावशेर दूध म्हणजे नुसते पाणी. नानांना दिवसातून दहा-बारा वेळा चहा लागायचा. आई बिचारी सकाळी एक थेंबभर दूध गळवून काळं कुट्ट चहाचं पाणी प्यायची.  मला आणि नानांना त्यातल्या त्यात जास्त दूध घालून द्यायची. जास्त दूध घेणं तरी परवडलं पाहिजे. नाना कप भिरकावून द्यायचे एवढा खोकून जीव जातोय पण चहा सुद्धा धड करून देत नाही म्हणायचे. नानांच्या जिभेला चमचमीत खायची सवय. पण आता कसं असं करून भागलं असतं? भाताला कधी पातळ भाजी असली तर वरण नसायचं. डाळीतच कसल्या तरी चार दोन फोडी टाकून भाकरीसाठी कालवण भागवाव लागे. आई स्वतः कितीदा तरी नुसतं गटागट पाणी पिऊनच राहायची पण आमचं दोघांचं व्यवस्थित व्हावं म्हणून धडपडायची. पण नाना कधीच तृप्त नसत. आई मला आणि नानांना जेवण ठेवून गेली असली तर नाना सारे फस्त करीत. अर्धी चतकोर भाकरी किंवा घासभर भात ठेवीत आणि म्हणत, "पाहिलं श्री, आपण दुसरीकडे भरपूर खाते. इथेही खाऊन गेलीये पोटभर. तुला आणि मला मात्र एवढं जेवण ठेवले. मला अशी भूक लागलीये पण तू उपाशी राहशील तर तूच खाऊन टाक माझं म्हाताऱ्याचं काय? आईने किती ठेवलं होतं काय ठेवलं होतं मला माहिती असायचं मी फक्त शाळेला जायच्या गडबडीत जेवलेलो नसायचं. आईला तरी किती आणि काय काय सांगून त्रास देणार म्हणून निमुट राहायचो. पण नानांच्या निर्दय हृदयाची व खोटेपणाची एवढी चिड यायची ब्रह्मदेवांनी असं कसं हृदय घडवले तोच जाणे.
                              आई घरी आली की पुन्हा तेच रडगाणं आणि तीच कटकट सुरू म्हणायचे माझा सोन्यासारखा मुलगा तूच मारलास. तो तुझ्याच पायगुणाने गेला. तुला मजा करायला मोकळीक मिळावी म्हणून धड औषधही केलं नाहीस. त्यावर आई एक शब्दही बोलायची. नाही बोचरे बोलणं ऐकून हळूच माझ्या नकळत डोळे टिपायची. मी लहानपणापासून आईचे हेच त्रास बघत आलो. प्रसंगांनी माणसाला जास्त लवकर शहाणपण येत असावं. लहान असल्यापासून वाटायचं लवकर शिकून खूप मोठं व्हायचं, आईला अगदी सुखात ठेवायचं. नानांच्या बद्दल मात्र शेजाऱ्यांकडून त्यांच्या तारुण्यातील एकेक रंगेलपणाचे पराक्रम ऐकून आणि आत्ताच वागणं बघून नुसती चीड आणि तिरस्कार मात्र यायचा. कधी सारखं खोकणार नरड आईला काही  बोलायला लागले की दाबून टाकावे असे वाटे. पण कधी उलट उत्तर सुद्धा द्यायचो नाही कारण आईची ताकीद, "अरे ते मोठे आहेत उलट बोलू नये".
     मी थोडासा मोठा झाल्यावर सकाळी पेपर टाकायला जायचो. थोडेफार पैसे मिळवायचो.  मी लहान वयात राबताना पाहून आईला भडभडून यायचे. पोटाशी धरून रडत राहायची आणि म्हणायची 'तुझ्या वडिलांना किती हौस होती रे मुलांची. तुझ्याबद्दल एवढी मनोरथ करायचे. तुला सुखात, चैनीत ठेवलं असतं मी आभागिनी म्हणून हे पाहण्याची वेळ आली आहे". मी तिचे डोळे पुसून म्हटलं, "आई मी लवकर मोठा होऊन तुला सुखात ठेवीन" ती मला घट्ट मिठी मारून जास्तच रडायची. आईची सगळी आशा माझ्यावरच केंद्रित होती. मी खूप शिकावं असं तिला वाटे. पण इथेही तिचं दुर्दैव आडच आलं. मी तिला वाटायचं तसा हुशार निपजलो नव्हतो. मी तसा शाळेत जाण्यास दुर्लक्ष करत नसे. पण अभ्यास माझ्या डोक्यात शिरायचा नाही. किंबहुना चित्रकलेचे इतके वेड होते अभ्यास करण्यापेक्षा त्याचं जास्त चिंतन चालायचं. मी इतक्या लहान वयात इतकी सुंदर चित्रे काढलेली पाहून मास्तरांकडून कौतुक वाटायचं पण मठ्ठपणाबद्दल शिक्षाही. ड्रॉइंगच्या परीक्षा द्याव्या असं मला फार वाटायचं पण आई परवानगी देणं शक्य नव्हतं ती आधीच ड्रॉइंग चा राग करायची. वही समोर घेतली की अभ्यासापेक्षा चित्र काढणं चालायचं. आई ते बघून चिडायची. आधीच वैतागलेली आणि त्यात दरवर्षी काठावर कसाबसा पास होई. कधी गटांगळी खायचो. आई निराश व्हायची चित्रकला पाहिली की तळपायाची आग मस्तकाला लागायची तिच्या. या चित्रकलेपाई तू अभ्यास करत नाहीस आणि नापास होतोस म्हणायची. कधी पट्टीने झोडपून काढायची. मग तिचे तिला वाईट वाटे. आणि आपणच डोळे पुसत मला जवळ घ्यायची मला मारलं म्हणून. आई बद्दल आलेला राग मग कुठल्या कुठे पळून जायचा. तिची तरी बिचारीची काय चूक होती मी सरळ पास होत जावं अशी अपेक्षा करण्यात. माझ्या अंगात चित्रकला इतकी भिनली होती इतका वेड केलं होतं, कधी कधी वाटायचं माझ्या कलेचे कुणाला कौतुकच नाही.
                               मी एसएससी ला होतो त्यावेळी मात्र रात्रंदिवस अभ्यास केला  अगदी कसाबसा काठावर का होईना पहिल्या वर्षी पास झालो. आईला खुप आनंद झाला. तिला फार वाटे मी खूप पुढे शिकावं पण माझी कपॅसिटी मला माहिती होती. आणि आईला तरी किती दिवस कष्ट करायला लावायचे. गटांगळ्या खात एस.एस.सी. पर्यंत आल्यानं अठरा वर्षे पुरी झाली होती म्हणून गोव्याला प्राथमिक शाळेत अर्ज करून टाकला.
                            नुकतेच गोवा स्वतंत्र झाल्याने बऱ्याच नोकऱ्या मिळत. तेथे एका लहानशा गावात नोकरीही लागली चटकन. गोव्याचा निसर्ग सोबत असताना चित्रकला प्रेम जास्तच उफाळून आलं. आणि इथं चित्र काढण्यावर कुणाचं बंधन ही नव्हतं. या बाबतीत पिंजऱ्यातून उडालेल्या पक्षासारखी गत झाली. भराभर ड्रॉइंगच्या परीक्षा देत सुटलो. शाळा सुटली की दिवसभर चित्रकलेचा ध्यास. हिरवीगार शेत, फेसाळणारा समुद्र, नारळी,पोफळी आणि कुळाघर साऱ्यांनी अगदी वेड करून सोडलं होतं. आईला पैसेही पाठवत असे पण मास्तरकीत पगार किती मिळणार? नानांचा दुखणं पाच सहा वर्षात जास्त झालं होतं. अंग सुजलं होत अंथरुणावर पडून होते. सारे विधी घरीच. सारं आईला करावे लागे.
     मी पैसे पाठवल्यावर आईने नानांसाठी चांगल्या डॉक्टरचं औषध सुरू केलं होतं. आईची इतर काम चालूच होती. मी मधून सुट्टीत जायचो. आईचे हाल बघत नव्हते. आजाराबरोबर नानांचा छळणही चालूच होतं. डॉक्टरांनी वीड्या ओढणं बंद करा म्हणून सांगितलं, तरी धड उडता येत नव्हतं तशात विड्या ओढणं चालूच होतं. पथ्य पाणी काहीच करत नसत. आईला बोचरे बोलणं मात्र नेहमी असे. दुखणं इतकं  विकोपाला गेलो होते की हे वर्ष काढतील असं वाटत नव्हतं. अशा अवस्थेत नानांना टाकून माझ्याकडे आई येण शक्यच नव्हतं. मनात यायचं की नानांची बॅद टळली की आईला घेऊन जाता येईल. थोडा पगार मिळतो त्यातल्या त्यात सुखात ठेवता येईल. खरंच नानांच्या बद्दल काडीचाही ओलावा मनात नव्हता. लहानपणापासून त्यांच्यामुळे खुप सोसलं होतं. गेले तरी देखील डोळ्यातून पाणी आलं नसतं.
                                      माझं नशीब भलतंच बलवत्तर निघालं होतं मी परिश्रमपूर्वक काढलेल्या चित्राला पाहिलं पाच हजाराच बक्षीस मिळालं होतं. मला कल्पना देखील नव्हती पहिलं बक्षीस मिळण्याची. फारच कष्ट घेतले होते आणि त्या चित्रामुळे माझ्याकडे बरेच जणांचं लक्ष वेधलं होतं  एका जाहिरात कंपनीत बड्या पगाराची नोकरीही चालून आली होती म्हणून मी इतका आनंदात होतो. आता कर्ज थोडं थोडं फेडत बसण्यापेक्षा एकदम सारं फेडता आलं असतं. मला मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यामुळे आईला खूप आनंद झाला होता. मी आईला पत्र घातलं होतं सगळी आवरावर करून ठेव मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठीच येणार आहे. नानाला तसेच घेऊन जाऊन त्यांच्यासाठी एक दाई ठेवता येईल. आईला आता कसलेच कष्ट लावायचे नाहीत आता मी आईला सुखी करू शकेन म्हणून वेगळीच धन्यता वाटत होती.
     गाडी पोहोचली त्यावेळी ९ वाजून गेले होते. मला कधी एकदा घरी पोहोचेल असं झालं होतं. लांब लांब टांगा टाकत आपल्याशी हसत निघालो होतो. शेजारचे खटाव दिसले. विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते पण मला हे असं का पाहतात याची चिकित्सा करत बसायला वेळ नव्हता. चांगल्या ड्रेस मध्ये आणि आनंदात असलेलं बघवत नसेल.  त्यांच्याकडे दुर्लक्ष करून निघालो कारण त्याचं बोलणं सुरू झालं असतं तर चार तास थांबावं लागलं असतं घरी जायला तेवढाच वेळ झाला असता. वाटेत भेटणारे प्रत्येक जण विचित्र नजरेने माझ्याकडे पाहत होते. मोठी नोकरी मिळाली बक्षीस मिळालं बघवत नसेल त्यांना. मी नुसतं साऱ्यांशी हसत हसत काय कसं काय म्हणत चाललो होतो. घर कधी येईल असं झालं होतं. गल्लीच्या टोकाला पोहोचलो असेल तोच आमच्या दारात वेगळं दृश्य दिसत होतं. मी डोळे फाडून पाहिलं, नक्की आपल्या दारात ना? मर्तिकेची तयारी होती. ती तीरडी बांधणे चालले होते. शेवटी नाना गेले वाटतं? तरी मी वेळेवर पोहोचलो म्हणायचं. दारात पोहोचलो तर सगळे वेगळ्याच सहानभूतीच्या नजरेने पाहत होते. नाना गेले तर विशेष वाईट वाटायचं कुणालाच कारण नव्हतं कारण त्यांनी इतके दिवस काढले तेच जास्ती. पण अगदी दारातून आज शिरणार तर नानांचा खोकला ऐकू येतच होता. वाटलं भास असेल पण नाही जीवाचे कान करून ऐकलं, तरी होय नानांच्या खोकल्याचाच आवाज. आणखी आत गेलो तर खाली आईला झोपवलेलं होतं वरून चादर घातलेली होती चेहरा ओळखता येणार नाही इतका भाजून विद्रूप झाला होता. जागा आहे की स्वप्नात समजत नव्हते. कुणाकुणाचे काय काय शब्द अर्धवट कानावर येत होते. काल गुळपापडीच्या वड्या करताना स्टो भडकला. रात्रीच तुला तार केली. कोण काय कोण काय सांगत होतं. काही डोक्यात शिरत नव्हतं. माझ्या आवडत्या वड्या मी येणार म्हणून करायला गेली होती आणि मला सोडून गेली. मग नुसतच ओरडून म्हणत होत, "आई अशी का सोडून गेलीस. अशा सुखाच्या क्षणी मी तुझ्या पाया पडायला, तुझ्या मिठीत विसावायला आणि तुझ्या डोळ्यात कृतार्थतेच हसू बघायला इतका उत्सुक झालो होतो. आई बोल ना, तुझा लाडका श्री आलाय. उठ इ! अशी कशी गाढ झोप लागलीये तुला. मी आलोय,उठ  जवळ घे मला." लोक मला बाजूला ओढत होते पण कशाचाच भान राहिल नव्हतं. घशाला कोरड पडली होती. पाय जमिनीवर नाहीत  असं वाटत होतं. सगळं घर गरगर फिरत आहे असं वाटत होतं. ऐकू येत होती फक्त डोक्यात तिडीक आणणारी नानांची धाप आणि खोकला.

No comments:

Post a Comment