आनंदी वृद्धत्व - १२
श्रीपाद कुलकर्णी यांचा मेसेज आला 'कोथरूडच्या स्मरणिका मी घरी नेऊन देईन स्पीडपोस्टने पाठवू नका'.मंडळाचे पैसे वाचवणे आणि शुभार्थीना भेटणे या हे दोन्ही उद्देश त्यात होते.कोथरूड भागात राहणारे सभासदही बरेच आहेत.
दरवर्षी ११ एप्रिल या पार्किन्सनदिनानिमित्त पार्किन्सनमित्रमंडळातर्फे मेळावा आयोजित केला जातो.त्यावेळी तज्ञांचे लेख,शुभंकर शुभार्थींचे अनुभव असा भरगच्च मजकूर असलेली स्मरणिका प्रकाशित केली जाते.कार्यक्रमाला न आलेल्याना ती पोस्टाने पाठवली जाते.कुलकर्णी यांनी स्वत:हून मदत करण्याची तयारी दाखवल्याने आम्ही आनंदित झालो.
त्यांनी आपले काम चोख पूर्ण केले आणि त्याचा रिपोर्टही दिला.त्यांच्या या
कृतीमुळे इतर ही काहीजण आम्हीही पुढच्या वर्षी हे काम करू म्हणाले.
कुलकर्णी आता ७७ वर्षाचे आहेत.पत्नी ७४ वर्षाची तिला पार्किन्सन झाला त्याला २७ वर्षे झाली.पगारी केअरटेकर परवडणार नसल्याने तेच तिचे सर्व पाहत असतात.अशावेळी अशी दमवणारी जबाबदरी घेण्याची इच्छा आणि उर्जा आम्हाला थक्क करणारी होती.त्यांचा प्रेरणादायी जीवन परिचय आनंदी वृद्धत्व या सदरातून इतरांपर्यंत पोचवावा असे वाटले.
सामान्य
मध्यमवर्गीय कुटुंब.वडील खाजगी सहकारी बँकेत नोकरीला होते. आई लहानपणी
गेली चार भावंडे.दहावी नंतर मिळेल ती नोकरी सांगतील ते काम,देतील तो पगार
अशा तर्हेने नोकरी करत बी.कॉम.शिक्षण करताना केलेल्या नोकरीतून मिळालेल्या पैशातून ही घरी पैसे द्यावे लागायचे. कृषी संशोधन केंद्र सोलापूर येथे लिपिक
म्हणून नोकरी केली.पुढे कोल्हापूरला वरिष्ठ लिपिक म्हणून निवड
झाली.या काळात शिल्पा ताईंशी विवाह झाला.त्याही सामन्य मध्यमवर्गीय घरातून
आलेल्या.शेंडेफळ असल्याने लाडात वाढलेल्या.म्हणेल ते मिळत असल्याने थोड्या
हट्टी.
कोल्हापूरला भाड्याने घर घेतले.चार भिंतीशिवाय काहीच नव्हते.लग्नात आलेल्या आहेरातून घर सजवले.पगारातून घरी पैसे द्यावे लागतच.त्यामुळे काटकसर करतच राहावे लागे.कधीतरी गोकुळ हॉटेलमध्ये जाणे.रंकाळ्यावर फिरायला जाणे हीच काय ती चैन.शिल्पाताईंनी पुण्याला बदली करून घेण्यासाठी धोशा लावला.त्यांचा हट्ट पटींनी पुरवला.कृषी विद्यालय पुणे येथे बदली करून घेतली.उरळी कांचन येथे खोली घेऊन राहिले.येजा करायचे.अत्यंत खडतर जीवन होते.शिल्पा ताईनी कोणतीही कुरकुर न करता साथ दिली.
१९९५ मध्ये थोडी परिस्थिती सुधारली.मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यात घर घेतले. सगळे काही सुरळीत आहे असे म्हणेपर्यंत पत्नीला पार्किन्सनने गाठले.आता पार्किन्सनशी लढा सुरु झाला.पत्नीचा पीडी आटोक्यात येण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना तोड नाही.त्यावर स्वतंत्र लेख होईल.काहीच गोष्टींचा उल्लेख करत आहे.
अनेक पुस्तके वाचून अभ्यास केला.गव्हान्कुराचा प्रयोग वाचून तो प्रयोग सुरु झाला.रामदेव बाबांचे शिबीर केल्यावर प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायाम सुरु केले.यासाठी पहाटे साडेपाचला उठून टूव्हिलरवर दोघे परमहंस टेकडीपाशी जायचे.अर्धी टेकडी चढून गार वारा आणि सकाळचा अरुणोदय पाहत एके ठिकाणी सतरंजी टाकून प्राणायाम व हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करायचे.घरी आल्यावर गव्हांकुर रस करून द्यायचा.असा रस काढणे ही अत्यंत किचकट आणि दमवणारी प्रक्रिया आहे.नंतर विविध भाज्यांचे सूप करून द्यायचे.ऑफिसला जायचे.संध्यकाळी पुन्हा परमहंस टेकडीवर फिरायला जायचे.असे ६/७ वर्षे केले.अनेक प्रयोग करत शेवटी फक्त अलोपाथीवर स्थिर झाले.
पत्नीला पान्न्शीच्या आताच पार्किन्सन झाला.तेंव्हापासून ते त्यांचा पार्किन्सन न कंटाळता सांभाळत आहेत.अर्थात एकत्र कुटुंब असल्याने घरातील इतरही मदत करतात.तरीही त्यांच्या पत्नीचा पार्किन्सन्स आटोक्यात राहण्यात कुलकर्णींचा मोठ्ठा वाटा आहे.पत्नी शिल्पाताईसह अजूनही सहलीला,कार्यक्रमांना हजर राहतात.त्यांचे न्यूरॉलॉजिस्ट राहुल कुलकर्णी यांनी त्यांचा मंडळात इतकी वर्षे पीडीला छान संभाळल्याबद्दल सत्कार करायला सांगितला होता. आम्ही एका कार्यक्रमात तो केलाही.आपल्याकडे स्त्रिया सेवा करू शकतात.पुरुषांना ते जमत नाही असा एक समज असतो.आमच्या ग्रुपधीलल उल्हास गोगटे,शरच्चंद्र पटवर्धन,विनोद भट्टे,श्रीपाद कुलकर्णी यांनी तो खोटा ठरवला आहे.
शिल्पाताई अशक्त झाल्या आहेत.परमहंस टेकडीवर जाणे शक्य होत नाही.तरी ते पत्नीकडून संध्याकाळी अनुलोम विलोम आणि हातापायाचे सूक्ष्म व्यायाम करून घेतात.सकाळी शाखेत जातात. तेथे इतर कार्यक्रम चालू असले आणि त्यासाठी थांबण्याचा मोह होत असला तरी बायकोचा डोस वेळेत देण्यासाठी लवकर परत येतात.